कुंडलीत मंगळ म्हणजे अमंगळच, असे समजणारा एक मोठा वर्ग केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आहे. एवढेच कशाला, तर अमावास्येच्या दिवशी कोणतेही चांगले काम करू नये, असा समज असणाऱ्यांचा समावेशही याच वर्गात होतो. स्वत:च्या कर्तृत्वाविषयी खात्री नसली किंवा मनात संशय असेल तर अनेकदा मग असे गैरसमज आडवे येतात. या पाश्र्वभूमीवर भारतीय मंगळयान मंगळाच्या कक्षेत व्यवस्थित पोहोचणे तेही पितृपक्षात (म्हणजे चांगले काम करण्यासाठी वज्र्य मानलेल्या कालखंडात) त्यातही सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी याला एक वेगळे महत्त्व आहे, असेच म्हणावे लागेल. किमान या यशानंतर तरी मंगळाला अमंगळ ठरविण्याच्या तसेच अमावास्येला वाईट ठरविण्याच्या गैरसमजाला यशस्वी छेद जाईल, असे वाटते. किमान एवढे कर्तृत्व वैज्ञानिकांनी सिद्ध केल्यानंतर तरी आता भारतवासीयांनी आपल्या कर्तृत्वाचा रास्त अभिमान बाळगत या मागास कल्पनांना सोडचिठ्ठी द्यायला हवी. तसे करणे हेच मंगळयानाचे यश खऱ्या अर्थाने साजरे करण्यासारखे असेल. या यशाला एक वेगळे महत्त्व आहे ते तंत्रज्ञानाच्या संदर्भात!
रोजच्या जगण्यातील ताण-तणाव आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर चर्वितचर्वण झालेला ‘युती की तुटी’ हा प्रश्न; हे सारे बाजूला सारत बुधवार, २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास समस्त भारतवासीयांनी एकच जल्लोष केला.. कारण साहजिक होते, पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचलेला भारत हा पहिला आणि एकमेव देश ठरला! तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिका, युरोपियन अंतराळ संस्था किंवा रशियालाही जे जमले नाही ते इस्रोच्या भारतीय वैज्ञानिकांनी करून दाखवले; पहिल्याच प्रयत्नांत यशस्वीरीत्या मंगळकक्षेत पोहोचलेला भारत हा पहिला आणि एकमेव देश ठरला आहे! त्यासाठी ‘लोकप्रभा’ परिवारातर्फे इस्रोमधील वैज्ञानिकांचे विशेष अभिनंदन!
या प्रसंगी आठवण होते ती, चांद्रयान-एक या पहिल्या भारतीय यशस्वी चांद्रमोहिमेची! पहिल्याच प्रयत्नात तिथेही चंद्रावर पोहोचण्याची किमया इस्रोनेच करून दाखविली होती. त्या वेळेस तर भारताचे चांद्रयान भरकटल्याची आवई चीनने उठवली होती आणि नंतर चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर चीनला मोठा धक्का बसला होता, शिवाय अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नंतर त्यांच्या वाटय़ाला नामुष्की आली ती गोष्टही वेगळीच! पण म्हणूनच या खेपेस मंगळयानाच्या प्रक्षेपणाच्या समयी चीनने अतिशय सावध भूमिका घेतली आणि यान मंगळावर पोहोचेपर्यंत गप्प बसणेच पसंत केले! इस्रोमधील वैज्ञानिकांचा हा दबदबा उत्तरोत्तर असाच वाढत जावा, हीच सदिच्छा!
भारताच्या या मंगळ स्वारीबद्दल सर्वत्र जल्लोष होत असतानाही काही मंडळी अशी होतीच की, ज्यांना कशासाठी हवे हे मंगळयान अशासारखे प्रश्न पडलेले होते. मेळघाटात बालमृत्यू होत असताना आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असताना तिथे पैसे वापरायचे सोडून काय बरे हे चालले आहे, असा त्यांचा सूर होता. मात्र असे प्रश्न विचारणाऱ्यांना आणि मोबाइलवरून सोशल नेटवर्किंग साइटस्वर असे अपडेटस् टाकताना या मंडळींना याचे भानच राहिलेले नसते की, हा संवादही आपल्याला शक्य होतो आहे, त्यामागे उपग्रह तंत्रज्ञान हाच कळीचा मुद्दा आहे. हे तंत्रज्ञान नसते तर आजचा हा मोबाइल सोशल नेटवर्किंग संवाद शक्यच झाला नसता. तो शक्य झाला तो केवळ याच उपग्रह तंत्रज्ञानामुळे! हे तेच तंत्रज्ञान आहे किंवा त्या त्याच अंतराळ मोहिमा आहेत ज्यांनी माणसाचे जीवन सुखकर करण्यासाठी मोठा हातभार लावला आहे. याच तंत्रज्ञानामधून ब्लूटूथ तंत्रज्ञान पुढे आले जे आपल्याला माहीतही नसताना घरच्या वॉशिंग मशीनमध्ये वापरले जात होते. मोबाइल ही तर उपग्रह तंत्रज्ञानाची सर्वात मोठी देण आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वापरल्या जाणाऱ्या गोष्टींची एक भलीमोठी यादी केली तर असे लक्षात येईल की, यातील आपल्या वापरातील ६० टक्क्यांहून अधिक गोष्टी या उपग्रह तंत्रज्ञानामधूनच आल्या आहेत. या उपग्रह किंवा अंतराळ संशोधन मोहिमा माणसाने हाती घेतल्या नसत्या तर तो आजही काहीसा मागासच राहिला असता. नव्या सुखसोयींच्या मागे हे तंत्रज्ञान आहे. शिवाय केवळ सुखसोयीच नव्हेत तर आज आपण आरोग्य सेवांसाठी ईसीजी किंवा एमआरआयसारखे जे बहुपयोगी तंत्रज्ञान वापरतो तेही याच उपग्रह तंत्रज्ञानामधून आले आहे. एमआरआय आले ते उपग्रह यंत्रणेची सज्जता तपासण्यासाठी. आज त्याचा वापर मानवाच्या भल्यासाठी होतो आहे. ईसीजी किंवा एमआरआयमुळे प्राण वाचणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अंतराळ संशोधन मोहिमा माणसाने हातीच घेतल्या नसल्या तर हे तंत्रज्ञान आणि त्याचे फायदेही हाती आले नसते. फायदे हवेत पण तंत्रज्ञान किंवा त्याच्याशी संबंधित प्रयोग नकोत, ही भूमिका पूर्णपणे चुकीचीच आहे. देशात गरिबी आहे म्हणून मग क्रिकेट मालिका जिंकल्यानंतरचा जल्लोष आपण कमी करतो का? त्या जल्लोष करणाऱ्यांमध्ये मंगळ मोहिमेविषयी प्रश्न विचारणाऱ्यांचाही समावेश असतो. मग तेव्हाच देशातील गरिबीचा विसर कसा काय पडतो?
पण आजही आपल्या देशातील स्थिती अशी आहे की, विज्ञान-तंत्रज्ञान हा खूप दुर्लक्षित राहिलेला असा भाग आहे. आता मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयाने तरी हा दुर्लक्षित विभाग जनतेसमोर चांगल्या पद्धतीने येईल आणि वैज्ञानिकांचे व पर्यायाने देशाचे भले होईल, अशी अपेक्षा आहे. मंगळ मोहिमेच्या वेळेस इस्रोचे तत्कालीन संचालक माधवन नायर म्हणाले होते की, चंद्रावर यान यशस्वीरीत्या पाठवणे सोपे आहे. पण त्या मोहिमेसाठीची फाइल सरकारी कार्यालयात एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर नेणे फार कठीण आहे. तिथे विज्ञानाचा कोणताच नियम काम करीत नाही. नायर यांना बहुधा कल्पना असावी ती केवळ न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाची. वजन असलेली वस्तू गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने खालच्या दिशेने खेचली जाते. पण भारतातील सरकारी कार्यालयात ती फाइल असेल तर वजन ठेवल्याने ती वरती येते! इथे वेगळाच नियम काम करतो! सध्या सरकारी कार्यालयांची हीच प्रतिमा बदलण्याचे मोदी यांनी मनावर घेतले आहे ही चांगली गोष्ट आहे! म्हणून तर अमेरिका दौऱ्यामध्ये मेडिसन स्क्वेअर गार्डनच्या कार्यक्रमात मोदी म्हणाले की, सरकारी कार्यालयात कर्मचारी वेळेत येतात, याच्या बातम्या पहिल्या पानावर आल्यानंतर दु:ख झाले. कर्मचाऱ्यांनी वेळेत येणे आणि काम करणे दोन्ही अपेक्षितच आहे. त्याची बातमी होणे पंतप्रधान म्हणून दु:खद वाटले, पण वाईट प्रतिमा बदलेल आणि देश विकासाच्या वाटेवर पुढे जाईल, याची खात्री बाळगा!
मंगळयानाच्या यशाचे कौतुक जेवढे झाले तेवढे कौतुक चांद्रयानाच्या वाटय़ाला आले नाही. त्या वेळेस मनसेने उत्तर भारतीयांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाने ते यश झाकोळले गेले होते. चांद्रयानाच्या यशापेक्षा चॅनल्स आणि वर्तमानपत्रांनीही त्या वेळेस मनसेच्या आंदोलनाला महत्त्व दिले होते. साजरे काय करायचे हेही आपल्याला कळायला हवे, त्याचा धडा आपण यातून घेतला असेलच! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळयानाच्या यशानंतर इस्रोमधील वैज्ञानिकांसमोर केलेल्या भाषणात क्रिकेट मालिकाजिंकून परत आलेल्या संघाला भारतीय कसे डोक्यावर घेतात, त्याचा उल्लेख केला आणि इस्रोचे यश त्यापेक्षा अनेक पटींनी खूप मोठे आहे, हेही भारतीयांना सांगितले.. सोनारानेच कान टोचले, हे योग्यच झाले!
चीनचे चँगे-वन चांद्रभूमीवर पोहोचल्यानंतर त्या यानाने पाठवलेली चांद्रभूमीची प्रतिमा चीनमधील घराघरांत अभिमानाने झळकताना दिसते. आपल्या चांद्रयानाने त्याहीपेक्षा अनेक चांगल्या प्रतिमा पाठवल्या, पण त्या काही भारतीय घरांत झळकल्या नाहीत. आता मंगळयानाने पाठवलेली प्रतिमा घराच्या भिंतीवर अभिमानाने झळकावून मंगळयानाचे यश साजरे करू या!
अशा मोहिमा देशाला मोठे बळ देण्याचेच काम करतात. हे बळ किती मोठे असते तर एरवी अमेरिकन वैज्ञानिक कधीच कुणाचे ऐकून घेताना दिसत नाहीत. पण चांद्रयानाच्या यशानंतर खगोल वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत इस्रोच्या संचालकांनी अमेरिकनांना चार खडे बोल सुनावले होते. ते धाष्टर्य़ तुम्ही सिद्ध केलेल्या कर्तृत्वातून येते आणि त्यातूनच तुमचा दरारा उभा राहतो. आता जे रशिया, युरोपियन युनियन आणि नासालाही जमले नाही ते पहिल्याच प्रयत्नात करून भारतीयांचा दरारा अधिक वाढला आहे. म्हणून तर मेडिसन स्क्वेअर गार्डनच्या भाषणातच नव्हे तर अमेरिकेतील प्रत्येक भाषणात मोदी मंगळयानाच्या यशाचा उल्लेख आवर्जून करतात. कारण ती भारतीय वैज्ञानिकांच्या कर्तृत्वसिद्धतेवर उमटलेली जागतिक मोहोर आहे! भारताचे आणि भारतीयांचे सामथ्र्य वाढले आहे, त्यांना मंगळबळ मिळाले आहे! आता तरी आपण मंगळाला अमंगळ ठरविण्याचा वेडेपणा करणार नाही, अशी अपेक्षा आहे!
मंगल मंगळ हो!