scorecardresearch

हेच खरे सोने!

गेल्या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचे उद्घाटन केले, याअंतर्गत प्रत्येक भारतीयास आधार क्रमांकाप्रमाणेच खास वैयक्तिक डिजिटल ओळखक्रमांक मिळणार आहे.

dasara
डिजिटल आरोग्य कार्डामध्ये प्रत्येक नागरिकाची आरोग्यविषयक सर्व माहिती साठविली जाणार आहे.

विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
गेल्या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचे उद्घाटन केले, याअंतर्गत प्रत्येक भारतीयास आधार क्रमांकाप्रमाणेच खास वैयक्तिक डिजिटल ओळखक्रमांक मिळणार आहे. या डिजिटल आरोग्य कार्डामध्ये प्रत्येक नागरिकाची आरोग्यविषयक सर्व माहिती साठविली जाणार आहे. त्याला झालेले आजार,  आजारांचे निदान, औषधोपचार, रुग्णालयात दाखल होण्याचे किंवा रुग्णालयातून घरी जाण्याची नोंद आदी सारे काही. या वैयक्तिक आरोग्य नोंदींचे (पर्सनल हेल्थ रेकॉर्ड- पीएचआर) काही फायदेही आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीस अचानक आरोग्यविषयक तक्रारी उद्भवल्या तर त्याच्या आरोग्यविषयक सर्व नोंदी एका क्लिकवर उपलब्ध असतील. शिवाय एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात दाखल करतानाही या नोंदी उपयुक्त ठरतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तमाम साऱ्या नागरिकांच्या आरोग्यविषयक नोंदी एकत्र उपलब्ध झाल्याने त्यांना भविष्यात होऊ शकणारे विकार किंवा सध्या झालेले विकार लक्षात घेऊन सरकारला आरोग्यविषयक ध्येय-धोरणे ठरविता येतील आणि त्याचप्रमाणे आरोग्यविषयक धोरणांची अंमलबजावणीही करता येईल हे सारे नागरिकांच्या फायद्याचेच असेल. सध्या तरी को-विन अ‍ॅप मार्फत लसीकरणाची नोंद करणाऱ्या नागरिकांना ते करतानाच हा विशेष आरोग्य कार्डक्रमांक  स्वयंचलित पद्धतीने देण्यात येतो आहे. मात्र अनेक नागरिकांचे म्हणणे असे की, त्यांना यामध्ये तो न स्वीकारण्याचा पर्यायही असायला हवा. सरकारने सांगितले आहे की, ज्यांना ही सुविधा नको असेल त्यांना आपली माहिती डिलीट करण्याचा अधिकार यामध्ये देण्यात आला आहे.

प्रस्तुत योजना तशी दिसायला चांगली आणि फायदेशीर वाटत असली तरी जे आधारच्या बाबतीत झाले तेच याही बाबतीत होते आहे. म्हणजे वापरकर्त्यांच्या खासगी माहितीच्या सुरक्षेचे काय हा दोन्ही बाबतींत कळीचा मुद्दा आहे. भारतात अद्याप तरी कोणताही वैयक्तिक माहिती सुरक्षा कायदा लागू झालेला नाही. त्यामुळे ही माहिती समाजविघातक किंवा अन्य व्यावसायिकांच्या हाती लागली तर काय, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कोविड महासाथीस सुरुवात झाल्यानंतर अनेक नियमनांसाठी सरकारने सुरुवातीच्या काळात आरोग्यसेतू अ‍ॅप अनिवार्य केले होते, मात्र त्याच्याअंतर्गत माहितीच्या सुरक्षेचा मुद्दा आला त्या वेळेस हे कुणाचे अ‍ॅप आहे, याची आपल्याला माहिती नाही अशी धक्कादायक कबुली केंद्र सरकारनेच सर्वोच्च न्यायालयात दिली होती. त्यामुळे नागरिकांच्या डिजिटल माहितीला कडक कायद्याची कवचकुंडले प्राप्त होत नाहीत तोवर हा सुरक्षेचा प्रश्न कळीचाच राहणार!

कोविडच्या साथीला आता दीड वर्षांचा कालावधी लोटला. या साथीने अनेक कुटुंबांचे होत्याचे नव्हते केले. कोविडने घालून दिलेला धडा हाच की, अखेरीस सर्व आजार आणि साथींवर आपल्या प्रत्येकाची रोगप्रतिकारकशक्ती हाच रामबाण उपाय आहे. त्यामुळे या दसऱ्याच्या निमित्ताने आपण हे लक्षात ठेवू या की, निरोगी शरीरासारखा उत्तम दागिना नाही. त्यामुळे शरीरावर मेहनत घेऊन, व्यायाम करून, आरोग्यदायी सवयींचे पालन करू. कारण निरोगी व सुदृढ शरीर हेच खरे सोने!

vinayak parab

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-10-2021 at 22:26 IST

संबंधित बातम्या