विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
अनेकांना एकमेकांशी जोडत समाज बांधणी करत असल्याचे फेसबुकचे ‘दाखवायचे दात’ असून त्यांचे ‘खायचे दात’ हे प्रत्यक्षात केवळ कंपनीला मिळणाऱ्या नफ्याशीच संबंधित आहेत. ‘नफा की, समाजाचे हित’ अशी निवडीची वेळ आली की, दर खेपेस निवड मात्र नफ्याचीच होते. परिणामी असामाजिक बाबी वारंवार डोके वर काढतात. हे सारे एकूणच समाजासाठी घातक आहे, असे जाहीर करून पूर्वाश्रमीच्या फेसबुकच्या उत्पादन व्यवस्थापक असलेल्या फ्रान्सेस हॉगेन या महिला कर्मचाऱ्याने गेला आठवडाभर एकच राळ उडवून दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी तर तिने अमेरिकन काँग्रेससमोरही आपले म्हणणे मांडले. तत्पूर्वी ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ आणि अमेरिकन सरकारी यंत्रणांनाही तिने भरपूर दस्तावेज सादर केले. फेसबुकवर झालेले हे काही पहिलेच आरोप नाहीत. याहीपूर्वी फेसबुकवर अनेकदा आरोप झाले. दोन वर्षांपूर्वी तर मार्क झकरबर्गची साक्षही अमेरिकन काँग्रेससमोर पार पडली, त्यात तो पुरता उघडा पडला. जी बाब फेसबुकची तीच बाब गूगलचीही. भारतीय सीईओ म्हणून उदोउदो झालेल्या सुंदर पिचईंची अमेरिकन काँग्रेससमोरच्या साक्षीमध्ये झालेली अडचण आता लपून राहिलेली नाही. या दोघांचीही हुशारी अशी की, त्यांनी अनेक प्रश्नांना थेट उत्तरे देणे सफाईने टाळले. मात्र त्यामुळे सत्य काही लपून राहिलेले नाही. समाजमाध्यमावरच्या हमामखान्यात फेसबुक आणि गूगल दोघेही उघडेच आहेत, हे पुरते स्पष्ट झाले. 

हॉगेन यांनी दिलेल्या माहितीत खूप नवे असे फारसे काही नाही. यापूर्वीच माहीत असलेल्या आणि फेसबुक कोणत्या क्लृप्त्या वापरते याचा अंदाज असलेल्याच बाबी पुन्हा अधोरेखित झाल्या आहेत. त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेच्या निवडणूक निकालानंतर पूर्वाश्रमीचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिलवर घातलेल्या गोंधळाला फेसबुकचे बदललेले धोरणही कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिकेच्या निवडणुकांपूर्वी त्यांनी समाजभेद पसरवून मतांचे ध्रुवीकरण करणारी मते समाजमाध्यमातून व्यक्त करण्यास प्रतिबंध करणाऱ्या गाळण्या लावलेल्या होत्या. मात्र निवडणुका संपताक्षणीच त्या ऑनलाइन गाळण्या काढून टाकण्यात आल्या. या गाळण्यांचा फेसबुकच्या नफ्यावर विपरीत परिणाम होतो. या गाळण्या नसतील तर समाजात विद्वेष पसरतो आणि वापरकर्ते संतप्त होऊन फेसबुकादी समाजमाध्यमे व्यक्त होण्यासाठी सर्वाधिक काळ वापरतात. परिणामी त्यांचा समाजमाध्यमे वापरत राहण्याचा काळ (एंगेजमेंट) अधिक राहिल्याने पलीकडे जाहिरातींमधून मिळणारे महसुलाचे आकडेही सातत्याने वाढते राहतात.

त्याचबरोबर इन्स्टाग्राम या सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या समाजमाध्यमाचे धोरण हे कसे असामाजिक आणि चिंताजनक आहे, ते त्यांनी उघड केले. खासकरून तरुण मुलींसाठी ‘दिसणे’ हे खूप महत्त्वाचे असते. या पाश्र्वभूमीवर त्यांच्या शरीराविषयी न्यूनगंड निर्माण करणारे धोरण इन्स्टाग्रामतर्फे राबविले जाते. त्या धोरणामुळे अशाच गोष्टी सातत्याने सादर होतात ज्यामुळे हा न्यूनगंड वाढत जाईल. एका बाजूला त्यामुळे मुलींमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढते आणि त्या सतत समाजमाध्यमावर एंगेज राहणेदेखील! परिणामी त्यांचे नैराश्य वाढत जाते आणि पलीकडे त्यांच्या एंगेज राहण्याने इन्स्टाग्रामचा नफाही वाढता राहातो. समाजमाध्यमामुळे येणाऱ्या या नैराश्याची आकडेवारी थेट कुठेच उपलब्ध नसल्याने अद्याप हे सारे समाजासमोर आलेलेच नाही. हा दुसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण फेसबुकचे हे धोरण हळूहळू भिनत जाणाऱ्या विषासारखे आहे आणि म्हणूनच ते असामाजिकही ठरते!

vinayak parab