गेल्या सुमारे तीन वर्षांपासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने धसका घेतला आहे तो आजवरची यंत्रणा किंवा पद्धती विस्कळीत करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अर्थात डिस्र्पशनचा. पूर्वी बोलबाला होता तो केवळ आयटी किंवा माहिती तंत्रज्ञानाचा, पण आता डिजिटल क्रांतीने जगभरातील भल्याभल्यांना गोंधळात टाकले आहे. त्याचा वेग एवढा जबरदस्त आहे की, या क्षेत्रात काम करणाऱ्या हजारोंच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि भारतासारख्या देशामध्येही लाखोंच्या नोकऱ्या जाण्याच्या बेतात आहेत. या संदर्भात ‘लोकप्रभा’ने अलीकडेच (आयटी उद्योग- घडा‘मोडी’तच नव्या संधी – २३ जून २०१७) एक कव्हरस्टोरीही केली होती. पण हा धोका काही केवळ या क्षेत्रातील तंत्रज्ञ-अधिकारी यांच्याचपुरता मर्यादित नाही तर त्याचा सर्वात मोठा धोका हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना बसणार आहे. त्यांच्यासमोर त्यांचे भविष्य आणि भवितव्य याचा प्रश्न गेली तीन वर्षे आ वासून उभा आहे. अनेक कंपन्यांनी त्यावर आपापल्या पद्धतीने मात करण्याचा प्रयत्न केला.  यावर मात करण्याचा उपाय हा डिजिटल मार्गानेच जातो. हा मार्ग तेवढा सोपा नाही. एका बाजूस आजपर्यंत केलेले काम आता नाकाम ठरत असून प्रगतीच्या मार्गावर राहायचे असेल तर नवे तंत्रज्ञान अंगीकारून नव्या वाटेने जाणे याला कोणताही पर्याय राहिलेला नाही. याच पाश्र्वभूमीवर अलीकडेच विशाल सिक्का यांनी इन्फोसिसच्या नेतृत्वाचा दिलेला राजीनामा याकडे पाहावे लागते. संपूर्ण देशभरातीलच नव्हे तर जगभरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांचे लक्ष इन्फोसिसमधील या वादाकडे लागून राहिले होते.

भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी तर ही सर्वात धक्कादायक अशी घटना होती. कारण इन्फोसिस ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. दुसरीकडे सध्या भारतीय आयटी कंपन्यांना अनेक पातळ्यांवर झुंज द्यावी लागत आहे. त्यांचा मार्ग तेवढा सोपा राहिलेला नाही. एका बाजूस डिजिटलमुळे आलेल्या डिस्र्पशनला त्यांना सामोरे जावे लागते आहे आणि त्याच वेळेस दुसरीकडे युरोपातील बाजारपेठ जिथून यापूर्वी चांगली आमदनी होत होती, ते आताशा फारसे आकर्षक राहिलेले नाही. जिथून मोठा महसूल येतो त्या अमेरिकेतील ट्रम्प सत्तांतरानंतर स्थानिकांच्या रोजगाराला प्राधान्य देत बाहेरून येणाऱ्यांवर र्निबध लादण्यात आले आहेत. याचा सर्वाधिक फटका भारतीय आयटी कंपन्यांना बसला आहे. त्यामुळे या गर्तेत अडकलेल्या या कंपन्यांना नवा मार्ग शोधण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. अशा वेळेस २०१४ साली नेतृत्व हाती घेतलेल्या विशाल सिक्का यांनी दाखविलेल्या नवीन मार्गावरून चालणे खूप महत्त्वाचे आहे, असे लक्षात येत असतानाच सिक्का यांच्यावर राजीनामा देण्याची आफत ओढवली. त्यामुळे इन्फोसिसला खूप मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सिक्का यांची अडचण अशी झाली की, एक वेळ बाहेरच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करताही येईल, पण घरच्या आव्हानांचा सामना करणे त्यांना मुश्कील. विशेषत: इन्फोसिसचे संस्थापक असलेल्या नारायण मूर्ती यांनी घेतलेल्या आक्षेपांना उत्तरे देतानाच त्यांची पुरेवाट लागली होती. अशा वेळेस मूर्तीच्या सततच्या कुरबुरींमुळे काम करणे अशक्य झाल्यानेच त्यांनी राजीनामा दिला. मात्र तसे करताना त्यांच्यावर कुठेही वैयक्तिक चिखलफेक केली नाही. अलीकडे भारतातील टाटा आणि इन्फोसिस या दोन बडय़ा कंपन्यांमध्ये झालेल्या वादानंतर दोन्ही ठिकाणी नेतृत्वबदल झाले. भारतीय कंपन्यांसाठी हे दोन मोठे धडेच आहेत.

खरे तर हा संघर्ष म्हणजे दोन पिढय़ांतील आणि दोन वेगळ्या सांस्कृतिक-आर्थिक वातावरणातील संघर्ष आहे. एनआर नारायण मूर्ती यांची पिढी ही इन्फोसिसची संस्थापक पिढी आहे. त्यांनी पै न पै जोडून इन्फोसिस उभी केली. स्वत:ची म्हणून काही मूल्ये जपली. त्यांच्याकडे त्या बाबतीत आदर्श म्हणून पाहिले जाते. पण हे सारे झाले त्याला ३६ वर्षे उलटून गेली. आता काळ बदलला आहे. पिढी बदलली आहे, याचे भान नारायण मूर्ती यांच्यासारख्यांनी राखणे आवश्यक होते. मात्र तसे इन्फोसिसच्या बाबतीत झालेले दिसत नाही. यामध्येच या वादाचे मूळ दडलेले आहे. नारायण मूर्ती स्वत:हून स्वत:चे प्रसाधनगृह स्वच्छ करीत होते, म्हणून आताच्या पिढीतील व्यावसायिक असलेल्या विशाल सिक्का यांनीही तीच मूल्ये तशीच जपावीत, अशी अपेक्षा केली जाऊ  शकत नाही. ते त्यांचा व्यवसाय तेवढय़ाच किंवा त्यापेक्षाही उत्तम पद्धतीने करतात का किंवा तेवढय़ाच व्यावसायिकतेने आणि नीतिमत्ता जपून करतात का, एवढेच महत्त्वाचे मुद्दे होते. सिक्का यांनी सध्या सुरू असलेल्या यंत्रणा व पद्धतीला विस्कळीत करणाऱ्या डिस्र्पशनचा सामना करण्यासाठी डिजिटल मार्ग स्वीकारला. त्या मार्गाची निवड केली. खरे तर डॉन टॉपस्कॉटसारखे अनेक भविष्यवेत्ते गेली २० वर्षे हेच ओरडून भारतीय आयटी कंपन्यांना सांगत होते की, सेवा क्षेत्रामध्ये असलेल्या संधी फार काळ टिकणार नाहीत. तुम्ही आयटी उत्पादननिर्मितीमध्ये उतरणे आवश्यक आहे. मात्र त्या वेळेस त्यांचे म्हणणे फारसे कुणी गांभीर्याने घेतले नाही. विशाल सिक्का यांनी या डिस्र्पशनला सामोरे जाताना नेमके हेच केले. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशनल इन्टेलिजन्स), रोबो, बोट्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग हे नवे पर्याय स्वीकारले. यामध्ये उत्पादननिर्मिती होती. त्याचे चांगले परिणामही कंपनीच्या महसुलात पडू लागलेल्या फरकामुळे दिसू लागले होते. जागतिक स्पर्धेमध्ये जगातील सर्वोत्तम बोट्सवर इन्फोसिसने निर्माण केलेल्या बोट्सने मात केली होती. मात्र तरीही नारायण मूर्ती यांच्या कुरबुरी सुरूच होत्या त्यांचा आक्षेप होता तो सॅपमधून आलेल्या विशाल सिक्का यांनी केलेल्या खर्चावर, त्यांच्या वेतनवाढीवर. आम्ही पै न पै जमवले आणि हे उधळत आहेत, असा नारायण मूर्ती यांचा आक्षेप होता. कंपनीचे संचालक मंडळ या बाबतीत पूर्णपणे सिक्का यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. गुंतवणूकदारांनाही नफा हवा होता. सिक्का यांनी स्वीकारलेला मार्ग चांगलाच आहे, याची खात्री त्यांनाही होती, पण नारायण मूर्ती मात्र सारखे आडवे येत होते. त्यांचे म्हणणे होते की, ही उधळपट्टी आहे. जग बदलते आहे. जगातील रोजगाराच्या संधी आणि उत्तमातील उत्तम तंत्रज्ञान आणि कुशल मंडळी तुमच्याकडे आणण्याचे, खेचण्याचे तंत्रही बदलले आहे, हे त्यांनी ध्यानात घेणे आवश्यक होते. शिवाय यामधून इन्फोसिसचा होत असलेला फायदाही ताळेबंदामध्ये पुरता स्पष्ट होत होता. दुसरीकडे सिक्का सॅपसारख्या जगन्मान्य कंपनीतून आले होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्या सवयी, वागणे सारे काही वेगळे होते. त्यांचे आर्थिक गणित आणि त्याच्याशी संबंधित संस्कृतीही वेगळीच होती. साहजिक होते की, त्यामुळे इन्फोसिसलाही बदलावेच लागणार, मात्र हा बदल करण्यास नारायण मूर्ती यांचा तीव्र विरोध होता. त्यातून सुरू झालेल्या पत्रोपत्रीच्या वादाची अखेर सिक्का यांच्या राजीनाम्यामध्ये झाली.

खरे तर तीन वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या मूर्ती यांनी अशा प्रकारची कामातील ढवळाढवळ टाळण्याचा आदर्श बिल गेट्स यांच्याकडून घ्यायला हवा होता. त्यांच्या माफक अपेक्षा आधीच स्पष्ट करायला हव्या होत्या. आता मात्र त्यांच्या या कुरबुरीनंतर त्यांच्या प्रतिष्ठेवरही सर्वदूर शिंतोडेच उडाले आहेत. या क्षेत्रातील मंडळींना त्यांची ही ढवळाढवळ आवडलेली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिजिटल लाटेवर स्वार झालेल्या इन्फोसिससमोर आता पुढे काय, हा यक्षप्रश्नच आहे. कंपनीची प्रगतिशील वाटचाल कायम राखण्याचे मोठेच आव्हान आहे. त्यामुळे जुन्या बुजुर्गानी आता यातून धडा घ्यायला हवा. आपल्या निवृत्तीनंतरची ढवळाढवळ बंद करावी, नव्यांना त्यांच्या पद्धतीने स्वातंत्र्य घेऊन काम करू द्यावे. नैतिकता असायलाच हवी, पण काळाच्या ओघात मूल्ये बदलतात, परिस्थिती बदलते, पिढीही बदललेली असते; त्यांचे सांस्कृतिक आर्थिक पर्यावरण बदललेले असते हे कायम ध्यानात ठेवावे. अन्यथा.. आपलाही नारायण मूर्ती व्हायला वेळ लागणार नाही!

विनायक परब – @vinayakparab, vinayak.parab@expressindia.com