विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
आत्मनिर्भर भारताच्या कितीही बढाया मारल्या तरीही शस्त्रास्त्रांमध्ये अतिमहत्त्वाचे असलेले तंत्रज्ञान विकसित करण्यात आजही भारताला यश आलेले नाही. किंबहुना त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धामध्ये त्यात सहभागी देशांमध्ये समावेश नसलेल्या, मात्र युद्धाची झळ मोठय़ा प्रमाणावर सहन कराव्या लागणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रक्रमावर असणार आहे. परराष्ट्र व्यवहार नीतीमध्ये त्यामुळेच तारेवरची कसरत करण्याची वेळ भारतावर आली. एका बाजूस देशाची गरज सांभाळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये रशियाविरोधातील महत्त्वाच्या ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहण्याच्या नामुष्कीला भारताला सामोरे जावे लागले. आणि त्यामुळेच शांततेचा पुरस्कार करणारा भारत युक्रेनच्या बाजूने उभा का राहात नाही, हा इतर देशांकडून विचारला जाणारा राज‘नैतिक’ प्रश्न येणाऱ्या काळात भारतालाही छळत राहणार आहे. अर्थात आपण आपल्या भूमिकेचे समर्थन करण्याचे प्रयत्न केलेही, मात्र ते सर्वच थोटके ठरले हे वास्तव आहे. कारण तो केवळ थोटका युक्तिवाद आहे. त्यात ठोस व ठाम भूमिकेला वावच नाही. या कोंडीतून भारताला बाहेर पडायचे तर शस्त्रास्त्रनिर्मितीच्या क्षेत्राचे खऱ्या अर्थाने निर्रशियाकरण करावे लागेल.

दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक बडय़ा राष्ट्रांकडे शस्त्रभांडार व युद्धोपयोगी गोष्टी पडून होत्या. चीन युद्धातील पराभवानंतर भारताला संरक्षणाच्या क्षेत्रातील मोर्चेबांधणीची जाणीव पराकोटीने झाली. रशियाकडे शस्त्रसाठा होता, तंत्रज्ञान होते आणि भारताला त्याची गरज होती. त्यामुळे करार झाले आणि त्याबदल्यात संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताला एक मोठा पािठबाही अधिकृतरीत्या मिळाला. त्याचे रूपांतर राजकीय मैत्रीत झाले. राजकारणात मैत्री अशी नसतेच, असतात ते हितसंबंध. त्यावेळेस दोघांचेही हितसंबध जुळलेले होते एवढेच. शिवाय त्यावेळची जागतिक राजकारणाची दिशाच अशी होती की, दोन्ही देश एकमेकांच्या जवळ आले.

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
Pakistani flight attendants
पाकिस्तानी एअर होस्टेस अचानक देश का सोडतायत? कॅनडामध्ये आश्रय घेण्याची कारणे काय?
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
How did Indian young man go to fight in Russia-Ukraine war Will they be rescued
विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धात लढण्यासाठी भारतीय तरुण कसे गेले? त्यांची सुटका होणार का?

आता जागतिक राजकारणाची दिशा बदलली आहे. सोविएत रशियाचे विघटन झाले आहे. परिस्थिती खूपच बदलली आहे. मात्र भारतीय राजकारण्यांच्या संरक्षण क्षेत्रातील धोरणअभावामुळे भारत आजवर मुख्य शस्त्रसामग्रीसाठी रशियावरच अवलंबून आहे. त्यामुळे रशियाच्या विरोधात भूमिका घेणे हे आत्मनिर्भरतेचे कितीही डांगोरे पिटले तरी देशास परवडणारे नाही. त्यामुळेच संयुक्त राष्ट्र संघात अनुपस्थित राहणे हा धोरणात्मक भाग तर नाहीच, उलटपक्षी ती भारताची अगतिकता आहे. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे रणगाडे, युद्धनौका, लढाऊ विमाने यामध्ये आपण स्वयंसिद्ध झालेले आहोत, असे कितीही सांगितले तरी जळजळीत वस्तुस्थिती अशी की इंजिन्स, क्षेपणास्त्रांशी संबंधित अतिमहत्त्वाच्या यंत्रणा, रडार-सोनार आदींशी संबंधित लहान-सहान सर्वच बाबी आजही आपल्याला बाहेरून निर्यातच कराव्या लागतात. गॅस टर्बाइन्स असोत किंवा मग ट्रान्समीटर्स, ते नसतील तर युद्धनौका किंवा इतर यंत्रणा कामच करू शकणार नाहीत. म्हणजेच हृदय, फुप्फुस किंवा यकृतादी महत्त्वाच्या अवयवांअभावी ज्या पद्धतीने मानवी देहाला फारसा अर्थ उरत नाही तद्वतच अवस्था मानायला हवी. त्यामुळे जोवर आपण या अतिमहत्त्वाच्या यंत्रणा आपल्याकडे निर्माण करणार नाही, तोवर त्या आत्मनिर्भरतेस खरा अर्थ प्राप्त होणार नाही. शिवाय हे सारे करताना एक महत्त्वाचा धडाही आपण रशियाच्या प्रकरणातून शिकायला हवा, तो म्हणजे भविष्यात तरी आपण कुणा एका राष्ट्रावर अवलंबून राहणार नाही, याची काळजी घेणेही तेवढेच आवश्यक आहे. याही अर्थाने निर्रशियाकरण लक्षात ठेवणे अधिक महत्त्वाचे असेल.