जगातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून चेरापुंजीची नोंद झाली असली तरी आता असं आढळून आलं आहे की चेरापुंजीजवळच्या मोहसिंराम इथं चेरापुंजीहूनही जास्त पाऊस पडतो. नेमकं कसं आहे हे मोहसिंराम?

काझीरंगा, जोराघाट, माजोली इथल्या मान्सूनचा आणि मान्सूनमुळे होत असलेल्या निसर्गातील आणि माणसांमधील बदलांचा अभ्यास करून, ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट मेघालय राज्यात येऊन पोहोचला आहे. या वर्षीच्या नियोजनामध्ये मुख्यत: दोन भाग लक्षात घेतले होते. एक म्हणजे ईशान्येकडील हवामानाचं प्रतिनिधित्व करणारे भाग बघायचे आणि त्याचबरोबर वेळेचं नियोजन. या वर्षीच्या अभ्यासामध्ये सर्वात मोठा अडथळा होता, तो म्हणजे तिथला प्रवास.
या सर्व भागांत शक्यतो कोणी रात्री प्रवास करत नाही. डोंगराळ भाग, सतत पाऊस म्हणून हे योग्यच आहे, पण याचा परिणाम ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या प्रवासाच्या वेगावर नक्कीच होणार होता. जास्तीत-जास्त वेळ प्रवासात जाणार होता. त्यातून या भागात खूप लवकर अंधार पडतो. म्हणजे साधारण संध्याकाळी चारच्या सुमारास अंधार व्हायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे बाकीचे व्यवहारही लवकर बंद होतात. सरकारी कार्यालये जरी पाचपर्यंत सुरू असली तरी दुपारी तीननंतर कामाची गती संथ झालेली असते. त्यामुळे लोकांशी संवाद साधायचा तो दुपारी दोनच्या आत. गेली तीन वर्षे रात्रभर प्रवास करायचा आणि सकाळी काम करायचं, त्यामुळे कामाला पूर्ण दिवस मिळायचा. पण इथे परिस्थिती वेगळी होती. हातामधले दिवस होते केवळ आठ ते दहा. तेवढय़ात आसाम आणि मेघालय फिरायचं होतं. आसाममध्ये बऱ्यापकी चांगले रस्ते आहेत, तीनसुखियापर्यंत राष्ट्रीय महामार्ग आहेत; त्यामुळे आपल्याला खूप कमी वेळामध्ये चांगला प्रवास करता येऊ शकतो. प्रश्न येतो तो मेघालयात. तीन ते चार दिवसांत या राज्याचा अभ्यास करायचा होता.
मेघालय – मेघांचं आलय!
मेघालय या राज्याचं नाव पण खूप विचार करून दिलं आहे असं दिसतं. किंबहुना ईशान्य भारतातल्या सर्वच राज्यांबद्दल असं जाणवतं. म्हणजे अरुणाचल प्रदेश म्हणजे सूर्य सगळ्यात आधी या राज्यात उगवतो. आसाम म्हणजे असमान भूभागाचा प्रदेश आणि मेघालय म्हणजे मेघांच्या साम्राज्याचा प्रदेश. या तीन राज्यांचा अभ्यास ‘प्रोजेक्ट मेघदूत’ या वर्षी करणार होता. बाकी राज्यांची परिस्थिती बऱ्यापकी समान असल्यामुळे ही तीन राज्ये निवडण्यात आली होती.
दरवर्षी अभ्यास करताना एक गोष्ट कायम जाणवते; ती म्हणजे प्रदेश बदलला की तिकडची जैव विविधता वेगळी कळायला लागते. लोकांचे पेहराव बदलतात, खाणं-पिणं बदलतं. ईशान्य भारतामध्येही असाच अनुभव आला. पण इथल्या राज्यांच्या सीमा खूप प्रखरतेने जाणवतात आणि त्या भौगोलिक बदलांमुळे जाणवतात. म्हणजे आसाममध्ये अजिबात पाऊस नव्हता, पण ज्या क्षणाला ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट मुख्य रस्त्यावरून मेघालयात शिरला तिथे या गटाला जोरदार पावसाने गाठलं. राज्याच्या सीमेच्या अगदी काही फुटांवर प्रचंड पाऊस आणि शेजारचं राज्य मात्र कोरडं!
मेघालय राज्याच्या सीमेवर अजून एक गमतीदार अनुभव आला. आपण मुख्य रस्त्यावर असताना आपल्या उजव्या बाजूला आसाम आणि डाव्या बाजूला मेघालय राज्य असतं. त्यामुळे आसामचे लोक या रस्त्यावर आले की यू टर्न मारून पेट्रोल भरतात. कारण मेघालय राज्यातलं पेट्रोल आसामपेक्षा १० ते १५ रुपयांनी स्वस्त आहे. या राज्याला कोणत्याच प्रकारचं उत्पन्न नसल्यामुळे सरकारने अशा सवलती देणं आवश्यकच आहे.
मेघालयचा भूगोल
मेघालय राज्यात पोहोचता क्षणी तिथे पाऊस सुरू झाला. हा विलक्षण अनुभव होता. या राज्यात गारो, खासी आणि जयंतीया या तीन डोंगररांगा आहेत. या सर्व रांगांचा प्रदेश म्हणजे मेघालय. बंगालच्या उपसागरातून येणारे वारे आणि बाष्प बांगलादेशच्या सपाट प्रदेशातून प्रवास करून इथे येतात आणि एकदम या डोंगररांगांना येऊन धडकतात. त्यामुळे या टेकडय़ांवर ढग हे कायमस्वरूपी वास्तव्याला असतात. जवळजवळ वर्षांतले आठ महिने या भागामध्ये पाऊस पडतो. या टेकडय़ांच्या मध्यभागी आपण गेलो तर आपण कायमचं ढगांमध्ये असतो. मेघालय हे राज्य महाराष्ट्रातल्या एखाद्या जिल्ह्य़ाएवढंच असेल; पण निसर्गाने याला वेगळेपणा बहाल केला आहे.
पावसाच्या ग्रहावर
शिलाँगहून मोहसिंराम हे अंतर साधारण ६० किलोमीटर्सचं. ईशान्य भारताचा दौरा सुरू झाल्यापासून ‘प्रोजेक्ट मेघदूत’ने प्रत्यक्ष पावसाचा अनुभव घेतला नव्हता, पण शिलाँगपासून पाऊस जाणवायला लागला. शिलाँगहून साधारण १५ किलोमीटरवर मोहसिंरामचा फाटा दिसतो. फाटय़ावरून आत गेलो आणि एकदम जाणवलं की हा भाग बऱ्यापकी निर्जन आहे. हळूहळू रस्ताही खराब व्हायला लागला. हा सगळा भाग उत्तर खासी टेकडय़ांवर वसलेला. अजून एक पातळी वर गेल्यावर पावसाचा जोर आणखीनच वाढायला लागला. या भागाची तुलना आपण कोकणाशी करू शकतो. जसं काहीही झालं तरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्य़ांमध्ये पाऊस पडतो तसाच या मोहसिंराम भागाचं आहे. या भागात सपाट प्रदेश कमी. पण टेकडय़ादेखील फार उंच नाहीत. इथे दर काही मीटर्सवर दरड कोसळलेली. मोहसिंराम साधारण २० किलोमीटर अंतरावर असताना धुकं सुरू झालं. त्यामुळे गाडी २० किमीच्या वेगानं जात होती. इथे गेल्यावर आपण एका पावसाच्या ग्रहावर आल्यासारखं वाटतं. आपण फक्त ऐकत असतो की मोहसिंराम किंवा चेरापुंजीला जगातला सर्वात अधिक पाऊस पडतो. पण हे ऐकणं आणि प्रत्यक्ष अनुभव घेणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. आपण कायम ढगात असतो; धुक्यात असतो! हे ढग आपल्या लोणावळ्या, खंडाळ्याचे ढग नाहीत. आपले ढग अरबी समुद्रातले थोडय़ा थोडक्या बाष्पामुळे तयार झालेले. मोहसिंराममधले किंवा सर्वच ईशान्य भारतातले ढग हे बंगालच्या महासागरामधले. या सागराची व्याप्ती अधिक बाष्पाचं प्रमाण अधिक. इथे तयार होणारं वातावरण एका वेळेला दोन-तीन राज्यांना पाऊस देऊन जातं. या ढगांमध्ये वसलेलं हे मोहसिंराम. म्हणून इथल्या पावसाची तीव्रता अधिक. इथे फेब्रुवारी महिन्यात पाऊस सुरू होतो तो एकदम ऑक्टोबपर्यंत असतो. पावसाबरोबर जवळजवळ दर ५० मीटरवर धबधबे असतात.
‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या मागच्या वेळेच्या सफरीमध्ये कच्छच्या रणाचाही अभ्यास आपण केला. जवळजवळ त्याचं अक्षांशावर पश्चिमेकडे पूर्णपणे वेगळी परिस्थिती. इथे भारतातला सर्वात कमी पाऊस पडतो. ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या निमिताने हे निसर्गातले उजवे-डावेही बघायला मिळाले.
मोहसिंराममध्ये मुख्य प्रश्न होता तो भाषेचा. इथे खासी भाषा बोलतात आणि काही लोक इंग्रजी बोलतात. िहदी बोलणारे तुरळकच. पोहोचायलाच दीड वाजला होता. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला तास-दीड तासच मिळणार होता. तिथे एका शाळेतले शिक्षक एस. एन. सिंग यांना भेटायचं ठरलं होतं. ते स्वत: अनेक वर्षे भूगोल शिकवत आहेत. त्यांना भेटायला जायची वाट एका मार्केटमधून जात होती. पाऊस पडत असल्यामुळे प्रत्येकाच्या हातात छत्र्या होत्या. त्यामुळे सगळ्या बाजाराला छत्र्यांचं रंगीबेरंगी कवच आल्यासारखं दिसत होतं.

‘प्रोजेक्ट मेघदूत’मध्ये आपण निसर्ग आणि माणूस यांच्यामधलं नातं अनुभवायचा प्रयत्न करत असतो. एस. एन. सिंग यांच्याशी चर्चा करताना असं कळलं की गुजराथी समाज पाऊस कमी असल्यामुळे पहिल्यापासूनच व्यापारामध्ये आहे. पाऊस नसल्यामुळे शेती नाही, पिकवायला काही नाही. त्यामुळे पहिल्यापासूनच उदरनिर्वाहासाठी व्यापार हेच एकमेव साधन. मागच्या वर्षी ‘प्रोजेक्ट मेघदूत’ने हा अनुभव ढोलावीरा या शहरामध्ये घेतला होता. हे संपूर्ण शहर व्यापाऱ्यांचं. तिथला समाज आजही व्यापारामध्ये आहे. खूप जास्त पावसाच्या प्रदेशामध्येही तीच अवस्था आहे. त्यांच्या मते, मेघालयात तुम्ही कुठेही जा इथे जो सगळा श्रीमंत समाज तुम्हाला बघायला मिळेल तो मोहसिंराम आणि चेरापुंजीचा आहे. का, तर इथे पिकत काही नाही. काही सुपीकता असेल ती पावसाने वाहून गेलेली. इथल्या मातीत पाणी टिकतही नाही. त्यामुळे इथल्या बाजारामध्ये स्थानिक उगवलेलं काहीच आपल्याला बघायला मिळत नाही. सगळ्याच गोष्टी बाहेरच्या. व्यापारी असले तरी इथले खासी बाहेरच्यांमध्ये फारसे मिसळत नाहीत. कदाचित जुने-वाईट अनुभव असतील; माहीत नाही. त्यामुळे मोहसिंराममध्ये पर्यटनाला थोडी मर्यादा येते.
एवढा पाऊस असूनही ऑक्टोबर-नोव्हेंबरनंतर पाण्याचं दुíभक्ष असतं. कारण पाणी साठवून ठेवलं जात नाही. कोणतीही पाणी साठवण्याची सोय इथे नाही. अशा प्रचंड पावसाच्या ठिकाणी पाणी कसं अडवायचं याचा अभ्यास होणं आवश्यक आहे.
एवढय़ा प्रचंड पावसामुळे इथे जवळजवळ तीन महिने काहीच करता येत नाही. आपल्याच घरात कोंडून घ्यायचं. भाज्या मिळतात त्याही प्लास्टिकमध्ये लपेटलेल्या. कारण उघडय़ा ठेवल्या तर त्या लगेचच खराब होणार. घरांना एक प्रकारची बुरशी आलेली. असं सतत ओलंचिंब.
इथल्या माणसांच्या आहारामध्ये मांसाहाराचं प्रमाण अधिक. त्यातही पोर्कचं प्रमाण सर्वाधिक. आसपासच्या हॉटेल्समध्ये विविध प्रकारचे डक आणि पिजन करीचे प्रकारही पाहायला मिळतात. या सगळ्याबरोबर भात तर आहेच.
सर्वाधिक पाऊस मोहसिंरामला?
जगातल्या सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणजे चेरापुंजी हे आपण अनेक वर्षे ऐकत आलो आहोत. पण कदाचित मोहसिंराम चेरापुंजीचा विक्रम मोडणार आहे. पण यासाठी मोहसिंरामला २०२६ सालची वाट बघावी लागणार आहे. आणखी बारा वर्षांनी मेघालयाच्या पूर्व खासी टेकडय़ांमध्ये वसलेलं हे ठिकाण अधिकृतपणे जगातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून जाहीर केलं जाईल. इथे वर्षांत सरासरी १२,०१२ मि.मी. पाऊस पडतो तर चेरापुंजीमध्ये वार्षकि ११,४९० मि.मी. पावसाची नोंद होते. मेघालयाच्या खासी टेकडय़ांमध्ये इंग्रजांनी आपलं बस्तान बसवलं. चेरापुंजीमध्ये त्यामुळे १८५० पासून पावसाची नियमित नोंद होते. चेरापुंजीपासून केवळ सात ते आठ किमी हवाई अंतर असलेल्या मोहसिंराममध्येही मोठा पाऊस होतो हे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नंतर लक्षात आलं. तेव्हा १९४० पासून इथे नोंदी घ्यायला सुरुवात झाली. १९४१ ते १९७९ या कालावधीत मोहसिंराममध्ये वर्षांला सरासरी ११,८७३ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्याच काळात चेरापुंजी इथे ११,५४२ मि.मी. पाऊस पडला. तेव्हाच मोहसिंरामला चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस पडतो हे लक्षात आलं. परंतु मोहसिंराममध्ये पावसाच्या नोंदी घेण्यामध्ये सातत्य नव्हतं. त्यामुळे ही नोंद मोहसिंरामला सर्वाधिक पावसाचा प्रदेश म्हणून ओळख देऊ शकली नाही. मोहसिंराममधल्या आय.एम.डी.च्या गुवाहाटीमधले शास्त्रज्ञ सुनीत दास यांनी याबद्दल अधिक माहिती दिली. मोहसिंराममध्ये १९९६ सालापासून शास्त्रीय निकषांनुसार नोंदी घेणारं केंद्र सुरू झालं. एखाद्या ठिकाणचं हवामान हे तीस वर्षांच्या नोंदीद्वारे निश्चित करण्यात येतं. त्यामुळे मोहसिंरामला सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून ओळखळे जायला २०२६ सालची वाट पाहावी लागणार आहे.
मोहसिंरामच्या पावसाचं प्रमाण वर्षांचं १२,०२० मि.मी. आणि चेरापुंजीचं ११,४९० मि.मी. या तुलनेत पुण्याच्या पावसाचं प्रमाण वर्षांला ६०० मि.मी. आश्चर्याची गोष्ट अशी की या वर्षांच्या ७ जुलला चेरापुंजीमध्ये ७२९ मि.मी पाऊस पडला. म्हणजे पुण्याच्या वार्षकि पावसापेक्षा जास्त!
१९९६ पासून नोंदी जिथून घेतल्या जातात त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठिकाणीही ‘प्रोजेक्ट मेघदूत’ने भेट दिली. इथे रामकृष्ण शर्मा यांची भेट झाली. त्यांनी १९९६ पासून नोंदी दाखवल्या.
इथून परत येताना गटातल्या लोकांना इतक्या कठीण परिस्थितीतही इथे लोक का वास्तव्य करत आहेत असा प्रश्न पडला. या आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट चेरापुंजीच्या मार्गाला लागला.