रंगतरंग मनाचे

सप्तरंग इंद्रधनूचे
मृदुमुलायम मोहक मोरपिसांचे
मनात उठता तरंग सोनेरी
बनते जीवनही जरा जरतारी
मनसागरी उसळता प्रचंड लाटा
हरवुनी जाती सर्व जीवनवाटा

या मनाचे मित्राचे हजारो रंग, तेच प्रतििबब पडते जीवन जलाशयात. मन बहुरंगी, बहुढंगी, क्षणोक्षणी बदलणारे, रंग जीवनालाही त्यांच्याच रंगात रंगवून देतात. मनसागरावर उसळणारे तरंग असतात, कधी संगीताचे सूर, तर कधी उसळणाऱ्या प्रचंड लाटा जीवनजहाजाला प्रचंड हादरे देतात. मन सागर शांत, स्थिर असेल तर जीवन जहाज भरकटत जाणार नाही. मनात उसळत असतो कधी उल्हास आणि उत्साह आणि जीवन जगणेच बनते सोहळा, जगण्याचा जल्लोष. जीवनाचे आकाश झगमगून जाते लखलखणाऱ्या चंद्रतारकांनी. प्रत्येक सकाळ येते सोनपिसारा फुलवून, मनात दाटून आले असतील जीवन जलधर, तर जलाशयात दिसते धन इंद्रधनूचे. उल्हासाने मन, जीवन नाचत असते. दु:खी, उदास, निरुत्साही मनाचा परिणाम जीवन जगण्यावर होतोच. काळवंडून जाते कधी मन. जणू काळोखी रात्र, पण कधी काळ्या मेघांनी झाकलेल्या आकाशातही क्षणभर वीज चमकून जाते. क्षणभर चमकते वीज, पण किती तरी दूपर्यंतचा रस्ता दाखवून देते. वाटेतील विघ्ने, अडथळे लक्षात येतात तशी निराश मनातही आशेची किरण वीज चमकून जाते.
मनासारखे चंचल कोण? कधी स्वप्नांचे मागे धावते, तर माणसाची पावले पुढे पडत असताना मन मागेच रमून रेंगाळते मधुर आठवणीच्या बागेत, तर कधी ओरखडे काढणाऱ्या आठवणीच्या जंगलात. मनाचा अवखळ वारू आवरता आवरता माणसाची दमछाक होते. त्यांच्या मागे धावताना होणारी हार वेदना देणारा डंख वाटते.
मन असते मधाचे पोळे! मधुर आठवणीचा साठा, पण डंख देणाऱ्या मधमाश्याही तिथेच असतात. मन धावते मृगजळासारख्या स्वप्नांचा मागे, जे कधी मिळण्याची शक्यता नाही त्याच्यामागे धावायचं, पण जे आहे त्यांची किंमत, मूल्य जाणून घ्यायचं नाही. आपल्या ओंजळीतले हिरे-मोती मौल्यवान आहेत त्याकडे लक्ष नाही, त्याचं समाधान नाही; तर मृगजळामागे धावायचं.
मन असते नाराज, कारण त्याची प्रत्येक इच्छा तर माणूस पूर्ण करू शकणार नाही. माणूस उधळणाऱ्या मनाला लगाम तर घालावाच लागेल. मानवी समाजात राहताना नियम पाळावेच लागतात. मनाला वळण लावावेच लागते. मन मुक्त पाखरू असले तरी त्यावर बंधने घालावीच लागतात, पण नेहमी त्यालाच जखडून ठेवायचा प्रयत्न केला तर मन कधी विचारतं ‘‘माझ्यावरच अन्याय का?’’
तर प्रश्न पडतो माणसाला त्याला ‘‘मी उत्तर देऊ तरी काय?’’ कारण जे आपल्या अत्यंत जवळचे असतात त्यांच्यावरच आपण अधिकार गाजवतो. अनेक वेळा दुसऱ्याच्या साठी त्याग करावा लागतो. आपल्या मनाला मारावं लागतं. त्याग ही कल्पना जरी भव्य, सुंदर असली तर त्या इमारतीच्या पायतळी ज्यांच्या आकांक्षा मनीषा स्वप्ने गाडली जातात त्यांचं काय? त्या मनाचं काय?
मानसिक वेदनेपेक्षा शारीरिक जखमा सहन करता येतात. उपचार करता येतात. लोकांना कळतं दु:ख, वेदना, पण मानसिक वेदना मनातच सहन कराव्या लागतात. मनातलं सगळं काही योग्य व्यक्ती जवळ व्यक्त झालं तर मन हलकं होतं, पण जिच्याजवळ आपण आपलं दु:ख वेदना व्यक्त करतो त्या व्यक्तीजवळ समजून घेण्याइतकी संवेदनशीलता पाहिजे नाही तर आपल्या वेदनेची होते चर्चा तीही आपल्यासाठी वेदनादायी ठरते.
काही काळ मन नाराज होते, रुसते, पण तरीही तेच जीवनाचा आधार! त्याच्यासारखे कोणीच नाही महान; राजा ना रंक. मनात होते आधी निर्मिती प्रत्यक्षात येते, प्रतिकृती मनात. निश्चय केला तरच धेय्य गाठता येतं; ज्याचं मन केलेल्या निश्चयावर ठाम असतं त्याला यश दूर नसते. मनच मित्र आणि मार्गदर्शकसुद्धा! मनाला चांगल्या कामात गुंतवणे हेच आवश्यक. अभ्यास, संगीत, चांगला छंद मनाला गुंतवू शकतात, रिकामे मन, सतानाचे घर, नाही बनू द्यायचे माणसाने.
अ‍ॅड्. गीतांजली सुकळकर – response.lokprabha@expressindia.com