‘काय हे धकाधकीचे जीवन झाले आहे हल्ली?’
‘सततच्या धावपळीने नुसती दमछाक होते!’

‘रोजच्या कटकटी, वाद यांनी मनावर अतिशय ताण पडतो.’
‘किती मनस्ताप सहन करायचा आमच्यासारख्या सरळमार्गी लोकांनी?’
अशी अनेक वाक्ये रोजच्या संवादामध्ये आपण सर्व जण कधी ना कधी वापरतो. या सगळ्या वाक्यांमधून आपल्याला हेच अभिप्रेत असते की आपले ‘मन:स्वास्थ्य’ बिघडले आहे. शरीराला त्रास झाला की आपल्या लगेच लक्षात येते. दुखणे, ताप येणे, सर्दी-खोकला, अपचन अशी अनेक लक्षणे आपल्याला शारीरिक व्याधीबद्दल सहज कल्पना देतात; परंतु मानसिक अस्वास्थ्याची नेहमीच स्पष्टपणे कल्पना येत नाही. मानसिक अस्वास्थ्य म्हणजे काय हे जाणून घेण्याआधी ‘मानसिक स्वास्थ्य’ म्हणजेच मानसिक आरोग्य म्हणजे काय, हे थोडक्यात जाणून घेऊ.
जागतिक आरोग्य संघटनेने ‘आरोग्या’ची व्याख्या करताना असे म्हटले आहे की, ‘आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नाही, तर त्यात मनुष्याचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे हित किंवा कल्याण किंवा खुशाली अंतर्भूत आहे.’ म्हणजे माणसाच्या संपूर्ण आरोग्यासाठी मन:स्वास्थ्य असणे आवश्यक असते. जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आरोग्याचीही एक व्यापक व्याख्या केली आहे. ‘मानसिक आरोग्य म्हणजे मनुष्याची अशी क्षेमकुशल मन:स्थिती ज्यामध्ये तो आपल्या सर्व क्षमतांचा (potential) परिपूर्ण उपयोग करतो, आयुष्यातल्या दैनंदिन ताणतणावांशी यशस्वीपणे सामना करतो, आपल्या कार्यक्षमतेच्या आधारे हातातले काम पूर्णत्वास नेतो आणि आपल्या समाजासाठी काही योगदान देऊ शकतो.’
काय आपण या व्याख्येत वर्णन केल्याप्रमाणे मन:स्वास्थ्याच्या कसोटीला उतरतो? आपले आपणच तपासून पाहावे. कोणी अत्यंत कार्यक्षम असते, परंतु वैयक्तिक आयुष्यात आलेल्या विविध अडचणींचा सामना करण्यास असमर्थ ठरते; कोणी ताणतणावांचा सामना करताना थकून जाते, कोणी वैयक्तिक पातळीवर अत्यंत यशस्वी होते, पण सामाजिक भान हरवून बसते. सगळ्यात अवघड बाब म्हणजे आपल्या क्षमतांचा परिपूर्ण विकास आणि उपयोग! (To realize onels potential’). ‘खरे म्हणजे मला आणखी किती तरी गोष्टी करता येतील पण..’ आपल्या क्षमता अशा आपल्यापाशीच राहतात आणि त्यांचा पूर्णपणे उपयोग केला जात नाही.
रोजचा जीवनसंघर्ष करतानाच थकून जायला होते. कसे टिकावे मन:स्वास्थ्य, असा विचार मनात येणे स्वाभाविक आहे. म्हणूनच अशा काही गोष्टींची आता चर्चा करू या ज्यांचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. शास्त्रीय संशोधनामधून असे लक्षात आले आहे की अनेक व्यक्तिगत, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घटक मानसिक आरोग्याला बाधा आणतात.
आपले विचार, भावना, आपली वर्तणूक यांच्यातील संतुलन आणि त्यावरील नियंत्रण आपल्याला समाजात वावरताना, कामाच्या ठिकाणी, घरात उपयोगी पडते. आपले सशक्त नातेसंबंध आपल्याला कठीण परिस्थितीत आधार देतात. आयुष्यातल्या कठीण प्रसंगांना तोंड देण्याची आपली क्षमता आपल्याला बळ देते. लहानपणापासून प्रतिकूल घटना घडत गेल्या तर त्यांच्याशी सामना करण्याचे बळ अंगी राहत नाही आणि मानसिक संतुलन ढळू शकते.
सामाजिक परिस्थितीचा आणि बदलांचा परिणाम होऊन आपल्या मनावरचा ताण वाढू शकतो. उदा. शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर येणाऱ्यांची वाढती संख्या, अतिगर्दी, गरिबी, निर्माण होणारी अस्वच्छता, कोलाहल इ. गोष्टींनी मन:शांती नष्ट होते. सामाजिक विषमता, आर्थिक विषमता मानसिक संघर्ष वाढवतात. सरकारी धोरणे, कायदे उदा. स्त्री सुरक्षेसंबंधीचे कायदे, अमली पदार्थविषयक कायदे इ. समाजाच्या मन:स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. जागतिक आर्थिक संकटाचा परिणाम म्हणून बेकारी वाढीस लागते. बेकारीसारख्या संकटाला तोंड देताना तरुण मेटाकुटीस येतात आणि त्यातून मानसिक विकार उद्भवतात. आजच्या काळातल्या सांस्कृतिक बदलांशी उदा. विभक्त कुटुंबपद्धती, स्त्री-स्वातंत्र्याच्या कल्पना, लैंगिक स्वातंत्र्य इ. प्रत्येकाला जुळवून घेणे जमत नाही आणि मानसिक संघर्ष निर्माण होतो.
आपल्या करिअरमध्ये यश मिळवणे, कौटुंबिक जबाबदाऱ्या तितक्याच यशस्वीपणे पार पाडणे, समाजातील असुरक्षित वातावरणाला सामोरे जाणे या सगळ्यातून स्त्रियांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. लहान वयापासूनच इतरांच्या अपेक्षा पूर्ण करणे, मित्रांच्या गोतावळ्यात स्वत:चे स्थान टिकवणे, पौगंडावस्थेत समोर येणारी वेगवेगळी प्रलोभने या सगळ्यामुळे बालपणापासूनच मानसिक ताण वाढतो.
भरीस भर म्हणून विविध आपत्तींना उदा. दुष्काळ, भूकंप, दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट इ.ना तोंड देताना अनेकांच्या तोंडचे पाणी पळते. शिवाय या सगळ्याची कायमस्वरूपी भीती मनात निर्माण होऊ शकते.
अशा सगळ्या विपरीत परिस्थितीत कसले मन:स्वास्थ्य आणि कसले काय, असा विचार मनात आल्यास नवल नाही.
आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधावेसे वाटते. मन आणि शरीर या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. त्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम झाला की शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. ताणतणावांचा आणि अतिचिंतेचा परिणाम म्हणून हृदयविकार, अल्सर असे आजार उद्भवतात. धूम्रपान, दारू पिणे अशा सवयी लागतात. मानसिक विकारांचा योग्य इलाज केला नाही तर डॉक्टरांकडे पुन:पुन्हा जाणे, अनेक वेळा तपासण्या करून घेणे यावर उगाचच खर्च होत राहतो परंतु ना शारीरिक स्वास्थ्य लाभत ना मानसिक.
आयुष्याचा गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी मानसिक स्वास्थ्याचा विचार होणे आवश्यक आहे. मन निरोगी असेल तर निकोप नातेसंबंध निर्माण होतात, आयुष्यातले चढ-उतार ओलांडणे सोपे जाते, त्याचबरोबर आपल्या क्षमतांचा विकास करता येतो.
यापुढील लेखांमधून मानसिक आरोग्याच्या संदर्भातल्या अशा अनेक पैलूंचा आपण विचार करू या.
डॉ. जान्हवी केदारे

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Sindhi buildings Shiv Koliwada
शीव कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी
Devotees demand through a march in Kolhapur
बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची सीआयडीकरवी करा; कोल्हापुरात मोर्चाद्वारे भक्तांची मागणी