मनात आणलं तर माणूस काय करू शकतो त्याचं दृश्य रूप म्हणजे.. ‘मिरॅकल गार्डन’. हे गार्डन म्हणजे अगदी नावाप्रमाणेच दुबईच्या वाळवंटात फुललेलं अघटितच.. त्या अर्थानं पाहण्यासारखं दुबईमध्ये भरपूर काही आहे.. पण आपल्याकडचे बहुतेकजण दुबईला खरेदी करण्यासाठी जातात..!

कितीही नाही म्हटलं तरी आपण दुबईच्या प्रेमात पडतोच..! हे शहर आहेच मुळी एखाद्या भुरळ पाडणाऱ्या अप्रतिम देखण्या अप्सरेसारखं..! कितीही रूक्ष माणूस असेल तरी तो दुबईच्या सौंदर्यानं कळत नकळत वेडावला जातोच असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मीही त्यातलीच! ‘‘काय बघायचं मेलं त्या दुबईत. मोठमोठय़ा इमारती आणि काँक्रीटचं जंगलच,’’ अशी निरगाठ मनाशी बांधूनच दुबईला गेले होते. पहिल्या वेळी एअरपोर्टवरून मुलाच्या (सारंगच्या) डिस्कव्हरी गार्डन या भागातील भाडय़ाच्या घराकडे पोहोचलो. रात्रीच्या काळोखात झगमग झगमग करणारं दुबईचं अनोखं रूप पाहून अचंबित झाले खरी, पण खऱ्या अर्थानं दुबईच्या प्रेमात पडले ती तिथं रखरखणाऱ्या वाळवंटात फुललेल्या हिरवाईमुळे..! पैशांच्या मदतीनं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं, जिद्द असेल तर काहीही शक्य आहे हे आजच्या वर्तमानातील अलिखित सत्य आपल्याला दुबई नगरीत पडताळून पाहता येते.
दुबईच्या रणरणत्या वाळवंटात तिथल्या राज्यकर्त्यांनी फुलवलेला निसर्ग मात्र माणसाच्या आणि निसर्गाच्या नात्यातील एका विलक्षण सुंदर अनुबंधाची साक्ष देतो. उपजाऊ जमीन नाही, पाणी नाही, वर्षांतील सहा महिने दगडही फुटून जाईल असं भयानक रणरणतं ऊन.. कधी तरी वर्षांतून एखादवेळेस या रेताड वाळवंटाच्या आकाशात ढगांची वर्दळ होते.. पण चार श्िंातोडेही भूमीवर सांडतीलच याची शक्यता कमीच..! अशा या दुबईत कष्टानं फुलवलेली हिरवाई मनाला इतकं प्रसन्न करून जाते की सांगायला शब्दच कमी पडतील.. रस्त्यांच्या कडेला दुतर्फा अंथरलेले हिरवेकंच गालीचे, त्यातूनच डवरलेल्या विविधरंगी भडक फुलांच्या बिछायती.. हिरवेगार वृक्ष आणि त्यावर विविध पाखरांची मनमोकळी वर्दळ पाहून जीव चक्रावतोच..! हे सगळं पाहिलं की तुम्ही मनानं दुबईच्या प्रेमात आकंठ बुडून जाताच!
समुद्राचं डिसलायनेशन केलेलं पाणी तेथील रहिवाशांना मुबलकपणे वापरायला मिळतं.. मात्र प्रत्येक थेंबासाठी पैसा मोजावा लागतोच. पुढे या वापरलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब रेताड जमिनीतून हिरवाई फुलवण्यासाठी वापरण्यात येतो. सांडपाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करून ड्रीप इरिगेशनने हे सर्व पाणी हिरवाकंच निसर्ग फुलवण्यासाठी वापरलं जातं- हे पाहिल्यानंतर आनंदाइतकीच खंतही वाटत राहते.. ज्या आपल्या देशात सुपीक जमीन आहे.. बारमाही पाणी देणाऱ्या नद्या आहेत.. तलाव आहेत.. चार महिने कोसळणारा मान्सून आहे.. शिवाय बारा महिने तळपणारा सूर्यही साथीला आहे. त्या आपल्या देशात अशा तऱ्हेचे बागबगीचे का असू नयेत? का आपल्याकडची माळरानं उघडी-बोडकी असावीत..? असो.. मनात आणलं तर माणूस काय करू शकतो हे पाहण्यासाठी खरं तर दुबईला भेट द्यायला हवी.. त्या अर्थानं पाहण्यासारखं दुबईमध्ये भरपूर काही आहे.. पण आपल्याकडचे बहुतेकजण दुबईला खरेदी करण्यासाठी जातात..! माझ्या या वेळच्या दुबई भेटीत सारंगने आग्रहपूर्वक ‘मिरॅकल गार्डन’ बघण्यासाठी नेलं..! आणि हे अप्रतिम सुंदर गार्डन पाहून मी थक्कच झाले..खरेच. हा फुलांनी बहरलेला बगीचा पाहून पुन्हा एकदा मनात आलं.. मनात आणलं तर माणूस पैशांच्या सहाय्याने आणि निग्रहपूर्वक प्रयत्नांच्या जोडीने काहीही करू शकतो..! याचे उत्तम उदाहरण ‘मिरॅकल्ड गार्डन’च्या रूपात आपल्यासमोर येतं..!
‘मिरॅकल गार्डन’ म्हणजे अगदी नावाप्रमाणेच दुबईच्या वाळवंटात फुललेलं अघटितच..! नेत्रसुखद, नेत्रदीपक.. डोळय़ांबरोबर मनाला आणि आत्म्याला सुखावणारं.. आगळंवेगळं अद्वितीय असं काहीसं..! खरेच.. निसर्गाच्या कॅनव्हासवर मनात भरणाऱ्या अप्रतिम रंगांनी रंगलेलं एक अत्यंत देखणं असं ते चित्र डोळय़ात साठवताना तेथे येणाऱ्या प्रत्येकाचे डोळे दिपून जात होते हे नक्की.. सोनेरी रंगाच्या मऊ रेतीवर पडणाऱ्या सोनेरी सूर्यप्रकाशामुळे तसेही दुबईची मरूभूमी झळाळत असतेच. त्यात लाल, तांबडा, जांभळा, पिवळा केशरी, पांढरा, गुलाबी.. अशा अगणीत छटांमध्ये फुललेल्या असंख्य फुलांनी झळाळलेले मिरॅकल गार्डन अक्षरश: मनावर गारुड करून गेले..
दुबईच्या मरूभूमीवर नैसर्गिक फुलांनी सजलेलं हे देखणं गार्डन गतवर्षीच्या ‘व्हॅलेंटाइन्स डे’ दिवशी सर्वासाठी खुलं करण्यात आले.. खरं तर इतक्या विविध रंगांची फुले इथं आहेत की आपण अनिमिष नजरेने फुलांनी बनवलेल्या सुंदर आकारातील रचना पाहात राहातो. या अगणित फुलांची मोजदाद तरी कशी करायची?.. पण असं म्हणतात की साधारणपणे पंचेचाळीस प्रकारच्या नैसर्गिक रंगात फुललेली ही एकाच प्रकारची फुलं साडेचार कोटींच्या आसपास आहेत. सध्या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या बागेतील फुलांच्या संख्येची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत असं सांगण्यात आले. ७२ हजार चौ. मीटर आकाराच्या गोलाकार जागेत ही बाग फुलवलेली आहे.
दुबईच्या वाळवंटात अशी नाजूक साजूक फुलं फुलवणं हे सोपं काम नाहीय..! त्या पाठीमागे अविरत कष्ट आणि अमर्याद प्रयत्नांची पराकाष्ठा आणि जोडीला पैशांचा प्रचंड ओघ या सर्वच गोष्टींचे पद्धतशीर नियोजन आहे. अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजनपूर्वक फुलोत्पादनाचा हा जागतिक विक्रम केला गेलेला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
दुबईस्थित ‘आकार लँड स्केपिंग सव्र्हिसेस अँड अॅग्रीकल्चर’ या कंपनीने ‘मिरॅकल गार्डन’ची ही अद्भुत संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. लहान लहान कुंडय़ांमधून फुलवलेल्या फुलझाडांनी संपूर्ण बगीचामध्ये विविध आकार तयार केलेले आहेत. या सर्व कुंडय़ांना सतत ड्रीप इरिगेशनच्या सहाय्याने ओलावा पुरवला जातो.. अन्यथा सदैव तळपणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे ही नाजूक फुलं एक-दोन दिवसांतच कोमेजून गेली असती.. मुळातच ज्या देशात पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही त्या भूमीवर असं देखणं पुष्पोद्यान तयार व्हावं हे अघटितच.. त्यातूनही अपार मेहनत घेऊन ज्या सौंदर्यपूर्ण रीतीने ही बाग फुलवलेली आहे ते पाहून आकारच्या निर्मिती प्रमुखाला सलाम केल्याशिवाय राहवत नाही.
बागेतून फिरताना काय पाहू आणि काय नको असं होऊन जातं.. फुलांचे रंग तर इतके आकर्षक आहेत की आनंदातिशयाने डोळे मिटून घ्यावंसं वाटत होतं.. जणू डोळय़ात काठोकाठ साठवून घेतलेले सुंदर सुंदर फुलांचे रंग सांडू नयेत असं वाटत होतं. संपूर्ण बागेची रचना, त्यामध्ये निर्मिलेले विविध आकार पाहून मन थक्क झालं. सात हृदये, सात कमानी, सात चांदण्या, पिसारा फुलवलेले मोर, लहान मोठी फुलांची घरे, पिरॅमिड आणि पायवाटांच्या दुतर्फा फुललेले फुलांचे ताटवे.. उत्कृष्ट रचना करून जागोजागी लटकणाऱ्या फुलांच्या कुंडय़ातून ओसंडून फुललेली फुले.. हे सगळं आपल्या डोळय़ांना त्रिमितीचा अनोखा अनुभव देऊन जाते.. प्रत्येक ठिकाणी पावलं रेंगाळत राहातात.. मन तृप्त होऊन निसर्गाच्या आणि मनुष्याच्या सौंदर्यपूर्ण आविष्काराला दाद देत तेथेच रेंगाळत राहते.
फुलांनी डवरलेल्या कमानीखालून चालताना आपण स्वर्गाच्या पायवाटांवरून चालतोय असं वाटत राहतं.
सर्व काही फुलांनी निर्माण केलेलं आहे.. सुंदर आकाराचे पिरॅमीडस्, स्वप्नातील वाटावीत अशी सुंदर आकाराची, फुलांची घरं, अंगोपांगी फुलं लेवून सजलेल्या गाडय़ा, बग्गी, बोट असं बरंच काही.. संपूर्णपणे फुलांनी नटवलेली एक फेरारी उद्यानाच्या गोलाकार रस्त्यावर अगदी मंद वेगाने फिरत असते.. संपूर्णपणे फुलांची बनलेली भिंत प्रवेश द्वाराजवळ आपल्याला खिळवून ठेवते. सुंदर आकाराचे मोठे घडय़ाळ, मोर व आणखीन बरेच काही बनवलेले आहे..
अद्याप या उद्यानाची संपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरलेली नाहीय.. अजून बरंच काही बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे.. यामध्ये फुलपाखरांचे उद्यान, फळांचे उद्यान व इतरही काही संकल्पना आहेत. साधारणपणे ऑक्टोबरच्या सुमारास हे उद्यान पर्यटकांसाठी उघडण्यात येतं.. ते मे महिन्यापर्यंत चालू राहतं.. नंतर मात्र ते बंद करण्यात येतं. तसंही मे नंतर दुबईतील उन्हाच्या झळा अस होऊन जातात.
खरंच..! निसर्गाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न बरेच जण करतात पण.. निसर्गाच्या मर्जीविरुद्ध निसर्ग फुलवण्याचाच प्रयत्न करावयाचा म्हणजे थोडं अवघडच काम आहे.. पण दुबईमध्ये हे करून दाखवलं जातंय.. म्हणूनच या रमणीय नगरीच्या मी प्रेमात पडलेय..!

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Using Plastic Chopping Board Can Harm Stomach Throw These Four Items From Kitchen
Earth Day: तुमच्या किचनमधून आजच बाहेर काढा ‘या’ ४ वस्तू; पर्यावरणच नव्हे तर पोटाच्याही ठरतात शत्रू
How much added sugar does your Favorited packet
तुमच्या आवडत्या चिप्समध्ये साखरेचे प्रमाण किती असते? ते कसे ओळखावे घ्या जाणून…
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…