News Flash

वर्षां ऋतूमधील आहार

पावसाळा सुरू झाला की सर्व डॉक्टरांकडे रुग्णसंख्या भरमसाट वाढलेली दिसते. यातील जास्त रुग्ण हे पोटाच्या तक्रारीचे असतात. उघडय़ावरील पदार्थ खाणे, चुकीचा जड आहार घेणे यामुळे

| July 3, 2015 01:25 am

avinashपावसाळा सुरू झाला की सर्व डॉक्टरांकडे रुग्णसंख्या भरमसाट वाढलेली दिसते. यातील जास्त रुग्ण हे पोटाच्या तक्रारीचे असतात. उघडय़ावरील पदार्थ खाणे, चुकीचा जड आहार घेणे यामुळे वर्षां ऋतूत अनेकांचे पोट बिघडत राहते.
वर्षां ऋतू म्हणजे जून महिन्याचा उत्तरार्ध, जुलै महिना व ऑगस्ट महिन्याचा पूर्वार्ध होय. वर्षां ऋतूत शरीराचे व्यवहार हळूहळू बदलत असतात. ग्रीष्म ऋतूत म्हणजे उन्हाळ्यात शरीरातील वातदोष वाढलेला असतो. या बिघडलेल्या वातदोषाला वर्षां ऋतूतील थंडाव्याची जोड मिळाली की तो चेकाळतोच! जोडीला मंदावलेली पचनक्रिया तर असतेच. वर्षां ऋतूचे वैशिष्टय़ म्हणजे या ऋतूत पित्तसंचयाला सुरुवात होते. त्यामुळे वर्षां ऋतूत अनेक आजार उद्भवू शकतात.
वर्षां ऋतूमुळे आजूबाजूचे वातावरणही बदलले जाते. जे प्रकृतीला हानिकारक असते. पावसाने नद्या, नाले भरून वाहू लागतात, पण त्यातील पाणी गढूळ असते. तळ्यात, विहिरीत, तलावांवर नवे पाणी येते. नवे पाणी म्हणजे जमिनीवरील सर्व मलमूत्र आपल्यासोबत वाहून आणणारे पाणी. रोगजंतूंचा भरपूर साठा असणारे पाणी, यशिवाय पावसाबरोबर माश्याही वाढतात. पाणी व अन्नपदार्थावर घोंघावणाऱ्या माश्यांचा उपद्रव, त्यामुळे हगवणींसारखे आजार, उलटय़ा-जुलाब सुरू होतात. पोट बिघडणे, गॅस धरणे, आव पडणे अशा तक्रारी या काळात सुरू होतात. यालाच आपण म्हणतो, ‘नवं पाणी बाधलं!’.
पावसाळ्याच्या सुरुवातीला आभाळ भरून येते, गार वारा सुटतो. त्यामुळे या पावसाच्या थंडीवाऱ्यात सांधेदुखी बळावते. पन्नाशी उलटलेल्या लोकांचे सांधे कुरकुरायला लागतात. गारठा व पावसात भिजणे यामुळे सर्दी—पडशाला आमंत्रण मिळते. या थंड वातावरणात दमेकऱ्यांचा दमादेखील बऱ्याचदा बळावला जातो. शिवाय पावसात आपण वापरतो प्लॉस्टिक चपला व प्लॉस्टिकचे बूट. त्यात पाणी साचून राहिल्याने पायाला बोटांच्या मध्ये चिखल्या होऊ लागतात. पावसाच्या साठलेल्या पाण्यात उंदीर, कुत्रे यांचे मलमूत्र मिसळले जाते. पायाला जखम असेल तर अशा पाण्यात फिरताना लेप्टोस्पायरोसिससारखे गंभीर आजार होऊ शकतात.
आहार-विहार कसा असावा?
पाणी : पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे. कारण, नदी, नाले विहिरी, तळी यांच्यात येणारे पाणी बऱ्याच घाणीतून प्रवास करून येत असते. पण बऱ्याच जणांना उकळलेल्या पाण्याची चव आवडत नाही. आजकाल सर्वाच्या घरी फिल्टर किंवा आर ओ (Reverse Osmosis) चे मशीन असते. परंतु ज्यांना ते शक्य नाही त्यांनी पावसाळ्याच्या वेळी नगरपालिकेकडून क्लोरिनच्या गोळ्या/ थेंब मिळतात, ते प्यायच्या पाण्यात टाकल्याने पाणी शुद्ध होण्यास मदत होते. विकत मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्या चांगल्या असतात, परंतु हल्ली तेथेही कधी कधी भेसळ असते. पावसाळ्यातील नवे पाणी बाधते. लोकांना सर्दी-पडसे याचा त्रास होत राहतो. ते टाळण्यासाठी म्हणून पाण्यात (पिंपात) सुंठेचा एक तुकडा घालावा, तो दर तीन-चार दिवसांनी बदलावा.
अन्न : पावसाळ्यात पचायला हलका आहार व प्रमाणशीर असाच आहार असावा. अधिक प्रमाणात घेतलेला आहार जो पचायला कितीही हलका असला तरी अयोग्यच!
पचायला हलका आहार म्हणजे अग्निसंस्कार केलेला आहार. लाह्य, भाकरी, चपाती, दूधभात, पिठले असा आहार असावा. नुसत्या पावापेक्षा त्याचा टोस्ट बनवून खावा.
पावसाळ्याच्या सुरुवातीला शरीरात अग्नी कमी प्रमाणात असतो, जो अन्नपचनासाठी आवश्यक असतो. त्यामुळे या ऋतूत पक्वान्ने टाळावीत. मात्र स्वयंपाकाचे पदार्थ तेल-तुपाने मसाल्याचे चमचमीत बनवलेत तरी चालेल. हिंग, मिरी, आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदीना हे सर्व घटक अन्नपचनाला मदत करणारे आहेत. मोजकेच तेल, वात कमी करणारे आहे, तर साजूक तूप, वात व पित्त दोन्ही कमी करणारं आहे. कारण पावसाळ्यात वात व पित्त दोन्ही वाढलेले असते म्हणून जमल्यास अन्नपदार्थ साजूक तुपात बनवावेत. वनस्पती तुपात नव्हे.
तेलातील विशिष्ट घटकामुळे पित्त वाढते आणि वर्षां ऋतूत पित्तसंचयाचा ऋतू! म्हणून तेलात तळलेले पदार्थ या दिवसात खाऊ नयेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला गरम भजी, बटाटेवडे खावेसे वाटले तरी, प्रमाणात खावेत.
या ऋतूत दही कमी खावे. दह्यमुळे शरीरातील अग्नी मंदावतो, पण ताक याच्या विरुद्ध गुणधर्माचे आहे. या दिवसात ताक प्यावे. सुंठ, आलं व सैंधव मीठ घातलेले ताक व दह्यच्या वरचे पाणी नियमित प्यावे.
पालेभाज्यांमध्ये माठाची भाजी योग्य. शिवाय दुधी, दोडका, पडवळ, भेंडी, अशा वातशामक भाज्या अधिक प्रमाणात घ्याव्यात.
जुने धान्य पचावयास हलके असते. त्यामुळे या ऋतूत जुने गहू, जुने तांदूळ, जुनी धान्ये (मूग, मटकी, चवळी) वापरावीत. आवळा, लिंबू यांची सरबते उत्तम. ओवा, हळद, मिरी, सुंठ यांची पावडर करून भाकरी, चपातीत वापरल्यास उत्तम. मांसाहारी व्यक्तीने मांस खाण्यापेक्षा त्याचे सूप करून प्यावे. यातही सुंठ, मिरी, पुदिनाचा सढळ हाताने वापर करावा.
विहार :
* पायात चप्पल न घालता अजिबात फिरू नये.
* दुपारची झोप शक्यतो टाळावी.
* पायात चिखल्या होऊ नये म्हणून पाय कोरडे ठेवावेत. त्यांना पावडर लावावी.
*वेखंड, कापूर याने सिद्ध तेल वापरावे. हातापायाच्या तळव्यांना हे वापरावे.
* कापूर, उद यांचा धूप करावा.
* साचलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नये. मुलांना बिलकुल डुंबू देऊ नये. पावसाळ्यात आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे.
आपल्या संस्कृतीत आषाढी ते कार्तिकी एकादशीपर्यंत ‘चातुर्मास’ पाळला जातो. यामध्ये मांसाहारी आहार बंद असतो व उपवास जास्त असतात. उपवासाच्या पदार्थात पिष्टमय पदार्थ जास्त असतात व ते पचण्यास सोपे असतात. उपवासात पोटास आराम मिळतो.
म्हणून चातुर्मासाचे जरी धार्मिक निमित्त असले तरी, त्यामागे वैज्ञानिक कारणही असण्याची शक्यता आहे.
डॉ. अविनाश सुपे response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2015 1:25 am

Web Title: monsoon diet
Next Stories
1 कॅन्सर – स्वभावविभाव
2 यकृतातील चरबी
3 जठराचा कर्करोग
Just Now!
X