शहाणपणाचा घडा रिकामाच!

पावसाळा सुरू झाला की, सृष्टीला नवचैतन्याचा साज प्राप्त होतो आणि केवळ निसर्गच नव्हे तर माणसालाही नवचैतन्याची ऊर्जा मिळते! देशभरात पाऊस किती कोसळणार याचे आडाखे मांडले जातात.

पावसाळा सुरू झाला की, सृष्टीला नवचैतन्याचा साज प्राप्त होतो आणि केवळ निसर्गच नव्हे तर माणसालाही नवचैतन्याची ऊर्जा मिळते! देशभरात पाऊस किती कोसळणार याचे आडाखे मांडले जातात. साधारणपणे काही भागांत तो तुलनेने कमी पडतो तर ईशान्य भारत किंवा कोकण- केरळसारख्या ठिकाणी तुफान कोसळतो! ६-७ जूनच्या आसपास आगमन जून, जुलै या महिन्यात ज्येष्ठ-आषाढाच्या तुफान सरी हे सारे तसे नियमितच.. संपूर्ण वर्षभर पुरेल इतके पाणी खरे तर या काळात आकाशातून खाली येते पण खालती भूतलावर आपल्याकडे असलेला नियोजनाचा घडा इतका फुटका आहे की, काही दिवसांतच ते नदीमार्गे समुद्राला जाऊन मिळते. ते जमिनीत मुरवण्याचे आणि त्या माध्यमातून पाण्याची भूजल पातळी उंचावण्याचे कष्टही आपण घेत नाही. आणि मग मार्च-एप्रिल उजाडला की, दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवल्याचे सांगून निसर्गाच्या नावे गळे काढतो. कधी हे गळे कोकणासारख्या तुफान पाऊस पडणाऱ्या भागात काढले जातात तर काही वेळेस चेरापुंजीसारख्या जगातील सर्वाधिक पाऊस कोसळणाऱ्या ठिकाणी! दोन्ही ठिकाणी पाऊस तुफान तरीही पाण्याचे दुर्भिक्ष असल्याची ओरड कायम आहे.
गेली तीन वर्षे ‘लोकप्रभा’कडून ‘ऑपरेशन मेघदूत’च्या टीमसोबत पावसाचा पाठलाग सुरू आहे. यंदा ही टीम ईशान्य भारतात होती, त्या वेळेसही चेरापुंजीतील पाण्याच्या दुर्भिक्षाची बाब लक्षणीयरीत्या समोर आली. आता याला काय म्हणावे? हा तर केवळ कपाळकरंटेपणाच आहे! कोकण आणि चेरापुंजी या दोन्ही ठिकाणी पाणी पकडून ठेवील, अशी भूरचना नाही, हे वास्तव आहे. पण मग आपण माणसाने त्यावर काय केले, या प्रश्नाला नकारार्थी उत्तर मिळते. माणूस कृत्रिम तलावांची निर्मिती करू शकतो. पण या दोन्ही ठिकाणी आपण फारसे काहीच केलेले नाही. शहाणपणाचा वापरच केलेला नाही!
पावसाच्या नियोजित तारखा चुकल्या की, सत्ताधाऱ्यांपासून सर्वाचीच गाळण उडते. कारण आजही आपली अर्थव्यवस्था ही पावसावर बहुतांश अवलंबून आहे. त्यामुळे त्याच्या येण्या-जाण्यावरच अर्थव्यवस्थेची गणिते ठरतात किंवा कोसळतात, पण तरीही शहाणपणाचा धडा आपण घेतलेला नाही. मुंबईवर पाणी कपातीची वेळ अनेकदा येतेही, पण म्हणून आपण उपाययोजना करताना दिसत नाही. नव्या गृहनिर्माण प्रकल्पांना पर्जन्यजल नियोजनाशिवाय मंजुरी नाही, असा कायदाही झाला. पण एकाही संकुलाने काटेकोरपणे सर्व अटी पूर्ण करून त्याची अंमलबजावणी केलेली नाही.. तरीही पालिकेची मंजुरी मिळतेच! म्हणजे नियोजनाच्या घडय़ाच्या बुडाशी भ्रष्टाचाराने एक मोठे छिद्र केले आहे. त्यामुळे पाऊस कितीही कोसळला तरी घडा रिकामाच राहतो. मध्यंतरी एका अभ्यासामध्ये हे स्पष्ट झाले की, मुंबईत बांधलेल्या फ्लायओव्हर्सवर पावसाच्या काळात कोसळणारे पाणी गोळा केले तरी मुंबईची चार महिन्यांची पाण्याची गरज भागू शकते. पण इथे तर ते पाणी भरायला घडाच नाही! आता तर नियोजनाच्या फुटक्या घडय़ालाही कुणी दोष देत नाही. पाऊस आल्यानंतर तो आपण किती साठवतो याकडे लक्ष देण्यापेक्षा ‘ग्लोबल वॉर्मिग’मुळे तो कमी कसा झाला आहे, याच्या वांझोटय़ा भंपक चर्चा करण्यात आपण वेळ दवडतो. उद्या पाणी न मिळाल्याने मृत्युपंथाला लागण्याची वेळ आली तर त्याला ग्लोबल वॉर्मिगचे भूत नव्हे तर नियोजन नावाच्या शहाणपणाच्या घडय़ाचा अभाव हेच महत्त्वाचे कारण असणार आहे!
 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Monsoon special

ताज्या बातम्या