scorecardresearch

पावसाळा विशेष : पावसाच्या कळा आणि झळा (कोल्हापूर)

पाऊस म्हणजे निव्वळ आनंदानं थुईथुई उमलणं नव्हे किंवा पृथ्वीतलावरचं नाहीच, असं वातावरण अनुभवणं नव्हे तर कधी कधी पाऊस जगण्यासाठी अस्तित्वाची लढाई करायलाही शिकवतो.

पावसाळा विशेष : पावसाच्या कळा आणि झळा (कोल्हापूर)

कोल्हापूर
पाऊस म्हणजे निव्वळ आनंदानं थुईथुई उमलणं नव्हे किंवा पृथ्वीतलावरचं नाहीच, असं वातावरण अनुभवणं नव्हे तर कधी कधी पाऊस जगण्यासाठी अस्तित्वाची लढाई करायलाही शिकवतो. 

अलीकडं ‘कधी येईल. कधी येईल’ अशी फार वाट बघायला लावतो पाऊस..
एकदा आला की सलग इतका कोसळ कोसळ कोसळतो आणि कधी एकदा जातो अशीही वाट बघायला लावतो पाऊस..
आला नाही तरी डोळ्यातनं पाणी काढतो .. आणि नको इतकं बदाबदा पडूनही पाणी काढतो..
हवं तितकं नेमस्त वागणं हे याच्या स्वभावातच नाही का?
असं का वागतो हा? – आर या पार ..
हा नक्की मला आवडतो की आवडत नाही?
..
बत्तीस शिराळ्यात शाळेत जाताना पन्हळीखाली मुद्दाम उभं राहून भिजायला मला फार आवडायचं. घरून निघताना काय जामानिमा असायचा.. रेनकोट-टोपी आणि वर छत्रीही! इतका पाऊस पडतोय आणि आपण कोरडेच हे कसंसंच वाटायचं.. आणखी एक, हा पाऊस घरातून बाहेर पडलं की थांबायचा.. किंवा अशक्तपणा आल्यागत बारीकसाच पडायचा.. मग रेंगाळत चालायचं.. कारण शाळेपर्यंत पोहोचेपर्यंत किमान एकदा तरी भिजल्याशिवाय काय तरी मजा आहे का! – मग मोठी सर आली की कुणाच्या तरी घराबाहेरची पन्हळ गाठायची.. किंवा रस्त्याच्या उतारावरून खळखळ वाहाणाऱ्या पाण्यात मुद्दाम फताक् फताक् चालायचं.. मागं रेनकोटवर चिखलाच्या ठिपक्यांची रांगोळी तयार झाली पाहिजे, पाय चिखलानं माखले पाहिजेत.. सगळं कोरडं ठेवून, न मळता शाळेत पोहोचलं की आपली काही इज्जतच नाहीये असं वाटत राहायचं.. आपण गरीब झाल्याची भावना व्हायची.. तेव्हा भिजणं हे खरं!
मात्र चौथीत गेल्यावर जो पाऊस आला तो पावसाळा संपल्यावर आभाळातून गेला पण, घरातील सगळ्यांच्या डोळ्यातच मुक्कामाला आला काही दिवसांकरता.. त्या दिवशी बलगाडीजवळ खेळताना ती उलटली माझ्या पाठीवर आणि चालता येणं बंदच झालं अचानक! मग तो पूर्वीसारखा भेटलाच नाही कधी.. अनोळखी होऊन येत राहिला. म्हणजे ओढ होती त्याच्याविषयी पण, मग माझ्या मनानंच रेनकोट घातला कदाचित.. थुईथुई नाचायला, अंगावर त्याचा मारा झेलायला मला अंगणात नेणारे पाय आता नव्हते ना.. खरंच इतकं बदलतं सगळं जग एखाद्या अपघातानं..? – का? कधीपर्यंत? स्वत:ची हळवी सुखदु:खं आणि पाऊस यांचं अंतर बदलत जातं का?
..
घरातच राहून औपचारिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयुष्याचं नवं पर्व सुरू झालं ते कोल्हापुरात. कोल्हापुरातही पहिली सात र्वष पाऊस पाहिला दररोज उचगावपासून कोल्हापूर शहरातील ऑफिसपर्यंत रिक्षातून जाता-येताना. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मला स्वत:चे असे पंख फुटले. चालता येत नसलं तरी कुठं जायचं-कुठं जायचं नाही हे आपल्या मर्जीनं ठरवण्याचा हक्क मिळाला आणि मग सुरू झाली एक शोधयात्रा. आयुष्याची आणि पावसाचीही.
माणसं एकाच आयुष्यात ओली-सुकी अनुभवतात तसंच जिल्ह्यचंही असतं हे माहिती नव्हतं. जिल्ह्यच्या पश्चिम भागात तीन-चार हजार मिलीमीटर इतका पाऊस बदाबदा कोसळतो आणि त्याच जिल्ह्यच्या पूर्व भागात तीन-चारशे मिलिमीटरचा पाऊस म्हणजे शेंडीदांडी हे कोल्हापुरातलं चित्र. एक नक्की, संपूर्ण कोल्हापूर जिल्हा दुष्काळी म्हणून जाहीर करावा अशी स्थिती अपवादानंसुद्धा येत नाही असा आजवरचा अनुभव आहे. आता पाऊस येण्याचे दिवस, पावसाचा कालावधी आणि प्रमाण यात हळूहळू बदल होताहेत हे खरं असलं तरी संपूर्ण जिल्ह्यवर एखाद्या पावसाळ्यात पूर्ण काळ सूर्यानं डोळे वटारले असं होत नाही. या वर्षीच बघा ना, १५ जुलपर्यंत पावसाचं नामोनिशाण नव्हतं, पण नंतर बघता बघता धरणांमध्ये ६०-७० टक्के पाणी साठलं. कोल्हापूर जिल्ह्यच्या पावसाबाबतीतलं हे झालं ढोबळ वर्णन, पण खरं सांगू? पावसाच्या वेगवेगळ्या तऱ्हा ही वर्णन करायची नव्हे तर अनुभवायची गोष्ट आहे.
छान धुक्याच्या दुलईतून पावसाचे तुषार अनुभवत आणि झोंबरा गार वारा अंगावर घेत भटकंती करायची तर कोल्हापूरपासून अवघ्या अध्र्या तासाच्या अंतरावर असलेल्या पन्हाळ्यात फेरफटका मारायला हवा. दोन-चार फुटांवरचंसुद्धा स्पष्ट दिसत नाही इतके ढग आणि धुक्याने आपण वेढले जातो आणि आपली खात्री पटते, आपण पृथ्वीतलावर नाही आहोत! अशा वातावरणात पन्हाळगडावरील बाजीप्रभू देशपांडेंच्या पुतळ्याला अभिवादन करून, अभिषेक करून दरवर्षी शेकडो तरुण इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत पावनिखडीच्या दिशेनं निघतात. छत्रपती शिवाजी महाराज यांची मोगलांच्या वेढय़ातून सुटका व्हावी म्हाणून नरवीर बाजीप्रभू देशपांडेंनी जी िखड लढवली ती िखड पावनिखड म्हणून ओळखली जाते. पन्हाळा ते विशाळगड दरम्यान पायवाटेनं जात असताना ही िखड लागते. काही वर्षांपूर्वी इतिहासप्रेमी व हौशी भटकंती करणाऱ्या तरुणांनी पाऊस, दगडगोटे, निसरडे चिंचोळे रस्ते याची पर्वा न करता पावनिखडीपर्यंत जाणारी जुन्या काळातील फरसबंदी पायवाट शोधली आणि त्यानंतर हा ट्रेक पूर्ण करणं व पावसाळ्यात या ऐतिहासिक मार्गावरचा थरार अनुभवणं याचं वेडच अगदी मुंबई-पुण्यातल्या तरुणांनाही लागलं. पावनिखडीच्या जवळच ‘पांढरं पाणी’ हे ठिकाण. तिथल्या विहिरीतलं पांढऱ्या रंगाचं पाणी अनेकांना चकित करतं.
भरभक्कम पाऊस अनुभवायचा तर दाजीपूर, आंबोली, राधानगरी, गगनबावडा ही कोल्हापूर जिल्ह्यतली आणखी काही ठिकाणं. आंबोलीमध्ये पर्यटक मुख्यत: गर्दी करतात ते गोव्याकडे जाणाऱ्या घाटातील रस्त्यालगत असलेल्या एका मोठय़ा धबधब्यात उतरून त्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेण्यासाठी. अर्थात जाण्यासाठी सोपं ठिकाण असल्यामुळं अलीकडं तिथं दारू पिऊन नंगानाच घालणाऱ्या उपद्रवी तरुणांची संख्या वाढतेय. राधानगरी व शाहूवाडी तालुक्यातही अनेक ठिकाणी पावसाळ्यात धबधब्यांचा आनंद लुटता येतो. राधानगरी तालुक्यात दूधगंगा व राधानगरी ही दोन मोठी धरणं. शाहूवाडी तालुक्याच्या परिसरात चांदोली म्हणजेच वारणा धरणाच्या बॅकवॉटरचा भाग आणि आंबोलीपासून तिलारी धरण काही अंतरावर. थोडक्यात हा सर्व भाग म्हणजे धरणांच्या पाणलोट क्षेत्रांचा भाग. साहजिकच या ठिकाणी पावसाची झड लागली की सहजासहजी डोकं बाहेर काढू देत नाही. सगळ्यात जास्त पाऊस गगनबावडय़ात आणि दाजीपुरात. यापकी दाजीपूर परिसरातच गवा अभयारण्य आहे. पावसाळ्याच्या दिवसात दाट जंगलात जाऊन झाडावरून टपटपणारा पाऊस पाहणं यात एक वेगळी गंमत आहे, पण एक काळजी नक्की घ्यायला लागते, ओलसर जंगलाच्या भागात जायचं तेव्हा अंगाला जळवा केव्हा लागतात हे कळत नाही. अंगातलं रक्त पिऊन जळू तट्ट फुगतं तेव्हाच कळतं की आपल्याला जळू लागली. जळू काढायची कशी आणि त्याची गावठी तंत्र कुठली हे या भागात जाताना माहिती असायला लागतं. बाकी शेकरू किंवा अन्य छोटे-मोठे प्राणी यांना घाबरण्याचं कारण नसतं, जपावं लागतं ते मुख्यत: सरपटणारे प्राणी व जळवांपासून. चुकून गवा आसपास दिसलाच, तर शांतपणानं त्याला जाऊ द्यावं यात शहाणपणा.
‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तरांचल राज्यातील ठिकाणाइतकीच तऱ्हेतऱ्हेची फुलं पावसाळा संपता संपता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यंतील पठारांवर पाहायला मिळू शकतात याची पहिली जाणीव सातारा जिल्ह्यातील कास पठारामुळं पर्यटकांना झाली हे खरं असलं तरी कोल्हापूर जिल्हाही अशा पठारांना अपवाद नाही. पन्हाळ्याच्या परिसरात मसाई पठार म्हणून ओळखले जाणारे पठार आहे. मसाई देवीचं एक छोटं मंदिर आणि पांडवदरासारखी बौद्धकालीन लेणी यासाठी एरवी मसाई पठाराला लोक भेट देतात, पण पावसाळ्यात मसाईला भेट द्यायची ती हिरव्यागार झालेल्या पठारावरची न्हातीधुती झुडपं आणि त्यावर उमलून हसणारी विविधरंगांची छोटीमोठी फुलं पाहण्यासाठी. कासप्रमाणंच इथल्या झुडपांवर व गवतांवर उगवणारी फुलं ही अल्पजीवी, त्यामुळं पावसाळा उतरणीला लागला की पुढच्या महिन्याभरात पठाराचा रंग वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी सतत बदलता दिसतो. जी तऱ्हा मसाईची तशीच तऱ्हा राधानगरी अभयारण्याच्या भागातील इदरगंज पठाराची. कधी काळी बॉक्साइटच्या उत्खननासाठी इदरगंज भागात खणती लावण्याचा बहुराष्ट्रीय कंपनीनं आटोकाट प्रयत्न केला, पण वनखातं आणि पर्यावरणवादी कार्यकत्रे यांनी या कंपनीचा करार संपेपर्यंत प्रकरण लावून धरलं, वनखात्याच्या हद्दीतून कंपनीला वाहतूकच करू दिली नाही आणि कोर्टबाजी केली ती वेगळीच. या सगळ्यामुळं इदरगंजसारखं पठार वाचलं. आत्तापर्यत पावसाळ्याच्या काळात या पठारावर जाण्याची कुणाला परवानगी दिली गेली नव्हती, पण या वर्षी या पठारावर पावसाळ्यात उमलणारा पुष्पखजिना आणि इतर जीवसृष्टीचं निरीक्षण करण्यासाठी तिथे जाऊ देण्याबाबत वनखातं सकारात्मक विचार करतेय.
जिल्ह्यच्या पश्चिम भागात दमदार पाऊस, धरणांचे जलाशय, धबधबे आणि अभयारण्यातील पाऊस अनुभवता येतो हे खरं, पण पूर्व भागाची तऱ्हा वेगळीच आहे. विशेषत: शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यात पावसाची लागून राहिलेली झड फारशी नसते, पण या भागात पाऊस नसतानाही पुराचा फटका बसू शकतो. पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आणि नद्यांची पातळी वाढत गेली की शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीसारख्या दत्त देवस्थानाच्या मंदिरातही नदीच्या पुराचं पाणी घुसतं, तेव्हा मग त्याला ‘दक्षिणद्वार सोहळा’ होणं असं म्हणतात. मंदिरात पाणी असेपर्यंतच्या काळात मंदिरातील उत्सवमूर्तीचं तात्पुरतं स्थलांतर होतं. अलमट्टीसारखं धरण कर्नाटकात उभारण्यात आलं आणि इसवीसन २००५ मध्ये ते त्या वेळच्या पूर्ण क्षमतेनं भरण्यात आलं तेव्हा कृष्णेचं बॅकवॉटर मागं चढत चढत आलं आणि शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी घुसलं.
या महापुरातून बचावासाठी तात्पुरत्या छावण्या आणि मदतकेंद्रं उभारावी लागली. अगदी खिद्रापूरसारखं वास्तुशिल्पकलेचा अप्रतिम नमुना असणारं शिरोळ तालुक्यातलं मंदिरही पुराच्या पाण्यात पूर्णपणे वेढलं गेलं. आता तर नव्याने करण्यात येत असलेले रस्ते आणि त्यांचं-नवनवीन विकास प्रकल्पांचं चुकीचं नियोजन यामुळं कोल्हापूर शहराच्या काही भागांत खूप पाऊस नसतानाही घरात पाणी घुसतं. त्या घरात राहणाऱ्यांच्या जगण्याची लढाई अवघड करून सोडतं. पाऊस तारणाराच नव्हे तर मारणाराही असू शकतो याचा अनुभव माझ्यासारख्या पावसाच्या काव्यात्मक अनुभवात डुंबणाऱ्यांना वेगळ्या वास्तवाची जाणीव करून देणारा!
कोल्हापूर जिल्ह्यतल्या पावसानं मला सांगितलंय, शिकवलंय.. पाऊस म्हणजे निव्वळ आनंदानं थुईथुई उमलणं नव्हे किंवा पृथ्वीतलावरचं नाहीच असं वातावरण अनुभवणं नव्हे तर कधी कधी पाऊस जगण्यासाठी अस्तित्वाची लढाई करायलाही शिकवतो. कधी प्रतिभेला बहर आणतो तर कधी वास्तवाच्या झळांनी डोळ्यांत पाणीही आणतो.. पावसाचे असे अनेक रंग, अनेक तऱ्हा.. एकाच जिल्ह्यात अशा अनेक तऱ्हा अनुभवायच्या तर कोल्हापूर जिल्ह्यच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन खरंच पाऊस अनुभवायला हवा!

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-08-2014 at 01:19 IST

संबंधित बातम्या