लोकप्रभा सिने रिव्ह्यू : युद्ध

समाजातल्या वाईट प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष हा अनेक पातळ्यांवर सुरू असला तरी त्याला महत्त्वाचे दोन पदर असतात.

yuddh-300-2समाजातल्या वाईट प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष हा अनेक पातळ्यांवर सुरू असला तरी त्याला महत्त्वाचे दोन पदर असतात. एक असतो तो एक घाव दोन तुकडे करणारा आणि दुसरा असतो तो अभ्यासातून समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत मुळातूनच ही समस्या समजून नाहीशी करण्याचा. बलात्काराच्या गुन्ह्यांबाबत बोलतानादेखील या दोन्ही मानसिकता हमखास दिसून येतात. मात्र आपल्याकडे एक घाव दोन तुकडे करून समस्या मिटवण्याचा प्रयत्न तर दिसत नाहीच, पण समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्नदेखील होत नाही. त्यामुळेच या प्रकरणांमध्ये बलात्काºयांची मानसिकता आणि समाजाची मानसिकता मांडण्याचा आणि त्यातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न ‘युद्ध’ या चित्रपटातून पाहताना विषयाचं नावीन्य खुणावतं. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बलात्काराच्या गुन्ह््यांबाबत होणारी चर्चा आणि त्यातून हाती आलेले विश्लेषणाचे अर्धवट तुकडे यावर हा चित्रपट आधारला असल्यामुळे संकल्पना चांगली असूनदेखील हे युद्ध मात्र अर्धवटच राहणारे आहे.

बलात्काराच्या एका विविक्षित केसवर लिहलेला शोधअहवाल आपल्या वर्तमानपत्रात छापला जाणार नाही हे कळल्यावर अस्वस्थ होऊन रागीणी नोकरी सोडते. मात्र पत्रकारितेच्या माध्यमातून तिला काहीही करून या केसचा निकाल लावायचा असतो. तिच्या या कामात तिचा पत्रकार संपादक मित्र उज्ज्वल, धडाकेबाज काम करणारा पोलीस निरीक्षक गुरू नायक आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सारंगी देशपांडे तिला साथ देतात. बलात्कार करणाºया गुन्हेगारांची मानसिकता ते जाणून घेतात. त्यातून तिला दिसलेली समाजाची विकृती आणि नंतर चूक झाली म्हणणारी गुन्हेगाराची मानसिकता यावर प्रकाश टाकते. हा मनोविश्लेषणात्मक अहवाल प्रकाशित झाल्यावर समाजाची प्रतिक्रिया नेमकी कशी बदलत जाते यावर चित्रपटाचा भर आहे.

बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह््याचा मानसिकतेच्या चष्म्यातून वेध घेण्याचा प्रयत्न करणं ही चित्रपटातली बाब नोंद घेण्यासारखी असली तरी मांडणीतला विस्कळीतपणा, संवादातलं फोलपण, अभिनयातली असाहजिकता, अभिनिवेशी प्रसंग अशा अनेक मुद्द्यांवर चित्रपटातून हाती काहीच लागत नाही. खूप काही मांडायचं असताना जाणीवपूर्वक टाळायचा फाफटपसारा न टाळल्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या असं स्वरूप या चित्रपटाला आलं आहे.

गंभीर अशा सामाजिक समस्यांची मांडणी करताना कधी कधी समस्येत इतकं वाहवत जायला होतं की नेमकं आपल्याला काय सांगायचंय, समस्या की उपाय याचं भान सुटतं. मग अशा वेळेस चित्रपटाच्या चौकटीचा प्रभावी वापर होत नाही तसचं येथे झालं आहे. प्रसंगांची, संवाद मांडणीची पुनरावृत्ती वाढत जाते आणि शेवटी उपाय मांडायची वेळ आल्यावर सगळेच मुद्दे एकमेकात अडकून जातात.

उपाय मांडताना अभ्यासू निरीक्षणांची गरज प्रतिपादित केली जात असली तरी चित्रपटातील निरीक्षणांबद्दल वृत्तपत्रात नेमकं काय छापून आलं, याची पुरेशी कल्पनाच चित्रपटातील विरोधकांना जशी होत नाही तशीच प्रेक्षकांनादेखील होत नाही. मनोविश्लेषणासाठीचे प्रसंग केवळ आकडेवारी वाढवतात, पण आशयाची मांडणी करत नाहीत. त्यातच प्रेमकथेचा एक तडका देऊन आहे ते गांभीर्यदेखील कमी झाले आहे. अनेक संवादांना कात्री लावून आणखीन मनोवैज्ञानिक विश्लेषण करायला चांगला वाव असतानादेखील तो झाला नसल्यामुळे हे युद्ध भरकटलेलेच म्हणावे लागेल.

श्रद्धा एन्टरटेन्मेंट प्रस्तुती – ‘युद्ध’
निर्माता – शेखर गिजरे
दिग्दर्शक – राजीव एस. रुईया
कथा – शेखर गिजरे
पटकथा – प्रकाश कदम
संगीत – विवेक कार
कलावंत – राजेश शृंगारपुरे, तेजस्विनी पंडित, क्रांती रेडकर, पंकज विष्णू, शेखर गिजरे, सचिन देशपांडे, रवींद्र पाटील, गणेश सोनावणे

मराठीतील सर्व सिने रिव्ह्यू ( Moviereview ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi film yuddha review by lokprabha magazine

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी