आपल्याकडे लोकप्रिय चित्रपट तयार करण्याचा एक लोकप्रिय साचा ठरुन गेला आहे. असा साचा मोडायची संधी दोनच वेळेला असते. एक म्हणजे मुळातच हा साचा धुडकावून स्वत:ची वेगळी रचना मांडायची आणि दुसरी पद्धत म्हणजे सत्यकथेवर आधारीत चित्रपट करण्याची. पहिल्या पद्धतीत सगळचं नवीन असतं. तर सत्यकथेवर चित्रपट करताना फार तोडमोड करता येत नाही आणि त्याला लोकप्रिय साच्यात बसवायची गरज नसते. अर्थातच असा चित्रपट साकारणं अवघड असते. पण ती एक चांगली संधी असते. ‘परतु’ हा त्याच सदरात मोडणारा चित्रपट. थेट भिडणारी आणि काही प्रसंगी तर काल्पनिक वाटावी अशी ही सत्यकथा असल्याचा फायदा चित्रपटाला नक्कीच झाला आहे. पण काही प्रसंगात लोकप्रिय साचा मोडण्याची हिंमत मात्र सिनेमाकर्त्यांना झालेली नाही हे देखील जाणवत राहते.

राजस्थानातील एका छोट्या खेड्यातील छोटा मुलगा (पृथ्वी) त्याच्या नातेवाईकाबरोबर मुंबई दर्शनसाठी येतो (१९६८). आणि मुंबईतल्या गर्दीत रेल्वेमध्ये त्याची आणि नातेवाईकाची ताटातूट होते. त्याच्या एकट्याचाच प्रवास सुरु होतो. थकला भागलेला, भांबावलेला पृथ्वी अहमदनगर स्टेशनवर उतरतो. असहाय असा हा छोटा मदतीच्या अपेक्षेने भटकताना त्याला खेड्यातला साधासुधा शेतकरी लक्ष्मण (किशोर कदम) भेटतो. भाषेची अडचण असल्याने नेमकं काय झालं आहे, हे पृथ्वीला सांगता येत नाही, पण लक्ष्मणला ते नेमकं जाणवते. तो त्याला आपल्या घरी घेऊन जातो. त्यांच्या ग्रामीण भाषेत या पृथ्वीचा परतु होतो. राजस्थानातला पृथ्वी, परतु नावाने अहमदनगर जवळच्या खेड्यात लक्ष्मण आणि सुगंधाच्या (स्मिता तांबे) दोन मुलांबोबर वाढू लागतो. दुसरीकडे पृथ्वीचे राजस्थानातील आईवडील त्याच्या शोधासाठी भटकत असतात. तर लक्ष्मणदेखील परतुचे राजस्थानातलं गाव शोधण्यासाठी धडपडत असतो. पण यश लाभतं नाही. १७ वर्षे हे सुरु असते, आणि परतु मात्र इथल्या मातीत मिसळून गेलेला असतो. मूळ गाव, घर, कुटुंबिय सारं त्याच्या मनातून पुसलेलं असते. त्याचं लग्नदेखील होते. अर्थातच दोन्ही आईवडीलांचा शोध मात्र थांबलेला नसतो.

परतुची ही कथा खरेच काल्पनिक वाटावी अशीच म्हणावी लागेल, पण ती पूर्णपणे प्रत्यक्षात घडली आहे. मूल हरवतं, ते कोठेतरी वाढतं, हे आपण अनेकवेळा पाहतो-ऐकतो. पण असं हरवलेलं मूलाची नाळ एका नव्या घराशी इतक्या नाट्यमय पद्धतीने जोडली जाणं हे मात्र अपवादानेच घडते. आणि नंतरच्या टप्प्यात त्याला आणखीन नाट्यमय वळण मिळणे हेदेखील अभावानेच घडते. एक आयुष्य असं वेगळ्या पद्धतीने घडण हे नक्कीच अपवादात्मक म्हणावे लागेल.

चित्रपट हा उत्तम कथाबीज, कथा त्यावरुन पटकथा आणि संवाद, आणि मग कलाकारांच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर उमटत असतो. त्यामुळे यापैकी केवळ एक बाजू चांगली आणि दुसरी लंगडी असे असून चालत नाही. परतुचे कथासूत्र खूप भक्कम आहे. पण त्यावर चित्रपटीय संस्कार करताना काही बाजू कमी पडल्या आहेत. तांत्रिक बाबींचा विचार करता चित्रपटाने बाजी मारली आहे. १९६८-८५ च्या आसपासचा काळ अनेक प्रसंगात व्यवस्थित उभा केला गेला आहे. अशा अनेक चांगल्या बाबी असल्या तरी लंगड्या बाजूदेखील तितक्याच आहेत. कथेतून भावना कळतात, पण त्या थेट भिडत नाहीत. नेमकं काय सांगायचे तेदेखील जाणवतं, पण ते प्रसंगातून उमटत नाही.

कथेला पडद्यावर सक्षमपणे साकारण्यात कलाकाराची जी सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे, त्याला किशोर कदम, स्मिता तांबे या दोघांनी संपूर्णपणे न्याय दिला आहे. त्यांची एकंदरीतच या भूमिकेतील मानसिक गुंतवणूक खूप खोलवर झाली असल्याचं पदोपदी दिसते. पण त्याचवेळी इतरांचे अस्तित्त्व हे केवळ जागा भरण्यासाठीच किंवा कथेची गरज म्हणून आहे की काय असे वाटते. परतु हा चित्रपटाचा नायक असला तरी त्याला टिपिकल चित्रपटाच्या नायकाप्रमाणे इतका चकाचक करुन टाकलाय की त्याची पुरेशी छाप पडत नाही. हिरो हा चकाचकच असला पाहिजे हे आपलं गृहितक या कथेत सिनेमाकर्त्यांना बंधनकारक नव्हतं. इतर पात्रांपैकी पृथ्वीचे राजस्थानातील आई-वडील, भाऊ आणि परतुच्या कुटुंबाच्या तीर्थाटनाच्या वाहनाचा चालक () यांनी तुलनेनं छोटी पण प्रभावी भूमिका साकारली आहे.

किशोर कदम आणि स्मिता तांबे यांची परतुचे संगोपन करतानाची सारी घालमेल अत्यंत प्रभावीपणे दिसून येते. परक्याचं पोर सांभाळावं तर जीव जडण्याचा धोका, न सांभाळावं तर ते छोटं पोर या जगात कसं जगेल याची भीती. त्यातच परिस्थितीचा रेटा, स्वत:च्या मूलांकडे दुर्लक्ष होण्याचा संभव. आणि पुढेमागे त्याचे खरे आईवडील सापडलेच, तर आजवर जोपासलेल्या मायेचं काय होणारं. अशी ही घालमेल अत्यंत प्रभावीपणे या दोन कलाकारांनी दाखवली आहे. थेट सांगायचं तर या चित्रपटात हे दोघेही या भूमिका जगले आहेत. त्याचवेळी सौरभ गोखलेला मात्र परतु जमलेला नाही. किंबहुना तो त्या भूमिकेतच शिरला नाही असे म्हणावे लागेल.

चित्रपट दिग्दर्शनाच्या पातळीवर अनेक ठिकाणी कमी पडतो. चित्रपट सुरुवातीला तुमची हळूहळू पकड घेत जातो. पण त्याचवेळी हळहळू निसटू देखील लागतो. परतु लक्ष्मणला सापडल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळातील अनेक प्रसंग प्रभावीपणे साकारले आहेत. छोट्या परतुच्या तोंडी अगदी एक किंवा दोनच वाक्य आहेत. पण त्याच्या एकंदरीत देहबोलीतून लहानग्या परतुची सारी उलथापालथ दिसून येते. ही सत्यकथा असली तरी ती रुपेरी पडद्यावर चित्रपट म्हणून मांडायची असेल तर त्याचा माहितीपट होऊ न देणे हे सर्वात मोठे आव्हान असते. त्यासाठी पटकथेची मांडणी भक्कम असावी लागते. नेमका येथे त्याचाच अभाव आहे. त्यामुळे एकामागोमाग प्रसंग जोडत गेल्यासारखे झाले आहे. त्यामुळे संपूर्ण चित्रपट प्रेडीक्टेबल होत जातो. संपूर्ण चित्रपट जरी तुम्हाला माहित असला तरी तुम्हाला खिळवून ठेवण्याची ताकद पटकथेत असावी लागते. त्याचीच कमतरता आहे.

चित्रपटात तीन गाणी आहेत. संगीत, शब्द वगैरेसाठी ती चांगली असतील कदाचित, पण ज्या विचित्र पद्धतीने ती येतात ते पाहील्यावर ती तीनही गाणी नसती तरी काहीही बिघडले नसते. गाण्यांच्या या लोकप्रिय फॉम्र्युल्याचा मोह सिनेमाकर्त्यांना टाळता आला नाही हेच त्यातून दिसते. अर्थात किशोर कदम यांनी मात्र एका कवितेतून कथेचा गाभा अत्यंत समर्पकरित्या मांडला आहे. केवळ या एका कवितेवर संपूर्ण चित्रपट तोलून धरता आला असता.

चित्रपटातील एक प्रसंग मात्र अत्यंत खटकणारा आहे. तो म्हणजे सर्व कुटुंबिय तीर्थाटनाला गेले असता, एका साध्वीने दृष्टांत देणे. सत्यकथेत हा प्रसंग असणे, त्यावर सर्व कुटुंबियांची श्रद्धा असणे या गोष्टी समजू शकतात. पण हा प्रसंग चित्रपटात येतो तो मात्र अत्यंत विचित्र पद्धतीने. साध्वी दाखवताना थेट आजच्या काळातील सोकॉल्ड गुरुमातासदृश्य पात्र पडद्यावर पाहताना, लय बिघडण्याचा संभव अधिक आहे.

अर्थातच एका अपवादात्मक अशा सत्यकथेला मात्र यामुळे रुपेरी पडदा पाहायला मिळाला ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि तेदेखील प्रत्यक्षात परतुच्या समोरच. चित्रपट संपल्यानंतर श्रेयनामावलीत प्रत्यक्षातील परतु आपल्याला भेटतो. त्याच्या कथेची सुरुवात त्याच्या तोंडूनच ऐकायला मिळते. दोन सामान्य कुटुंबांची ही कथा काळाच्या ओघात अनेक वळणे घेत, माणुसकीचे अनोखे दर्शन मात्र घडवते.

प्रस्तुतकर्ते – ‘इस्ट वेस्ट फिल्म्स’
निर्माते – नितीन अडसूळ, सचिन अडसूळ, रुपेश महाजन, डेरेल कॉक्स, क्लार्क मॅकमिलिअन
दिग्दर्शन – नितीन अडसूळ
कथा – क्लार्क मॅकमिलिअन, नितीन अडसूळ, डेरेल कॉक्स
मराठी संवाद लेखन – मयुर देवल
संकलन – राजेश राव
छायाचित्रण-  संजय खानझोडे
संगीतकार – शशांक पोवार
पार्श्वसंगीत – ग्रेग सिम्स
गीतकार – वैभव जोशी, गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, सौमित्र
गायक – जसराज जोशी, जान्हवी प्रभू अरोरा, शंकर महादेवन, मनीष राजगिरे, शिखा अजमेरा
कलाकार – किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री सोहम, नवीन परिहार, राजा बुंदेला, यश पांडे, अशुंमन विचारे, रवी भूषण