lp57संकल्पनांची चर्चा
राखेतून उभे राहण्याचे सामथ्र्य बाळगणाऱ्या जपानने उत्पादनाच्या क्षेत्रात जगभर एक वेगळाच दबदबा तयार केला. जपानच्या या यशामागे होत्या त्या त्यांनी राबवलेल्या विविध उत्पादन पद्धती. त्या अतिशय वेगळ्या, वैशिष्टय़पूर्ण होत्या, व्यवस्थापनात दखल घेतली जावी अशा होत्या. या पद्धतींचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. जपानी लोक जगात सवरेत्कृष्ट दर्जाची उत्पादने घडवू शकले, कारण त्यांच्या हातात होती कायझेन ही संकल्पना. फाइव्ह एस हे त्यांनी केलेले कामाच्या जागेचे व्यवस्थापन असो, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट असो, टोटल प्रॉडक्टिव्ह मॅनेजमेंट असो, जस्ट इन टाइम असो, की त्यांच्याकडे राबवली गेलेली क्वालिटी सर्कल ही आगळीवेगळी चळवळ असो, प्रत्येक गोष्टीत वेगळा विचार करून जपानने वेगळा आदर्श घालून दिला आहे. जपानबरोबरच इतर देशांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये राबवल्या गेलेल्या बेंचमार्किंग, लीन क्वालिटी सर्कल, व्हॅल्यू इंजिनीयरिंग, सिक्स सिग्मा, जोहॅरी विंडो, पॅरोटो नियम, ताकसंधो, आयडिया बँक अशा नावीन्यपूर्ण उत्पादन पद्धतींची माहिती या पुस्तकात दिली आहे.
जगप्रसिद्ध उद्योजकांच्या कार्यपद्धती लेखक – जयप्रकाश झेडे, प्रकाशक- साकेत प्रकाशन, पृष्ठे- २८०, मूल्य- रु.२४५

lp58वाचनीय रहस्यकथा
रहस्यकथांचं गमक हे त्यातलं रहस्य शेवटपर्यंत वाचकाला तर्क करायला लावणं आणि अखेरीस वेगळंच सत्य समोर आणण्यात असतं. प्रसिद्ध लेखक फ्रेडी फोर्सिथ यांच्या ‘नो कमबॅक्स’ या रहस्यकथा संग्रहात अशीच दहा सनसनाटी कथानकं मांडली आहेत. गर्भश्रीमंत उद्योगपतीने प्रियतमेसाठी आखलेला कट, क्षणिक विषयसुखासाठी ब्लॅकमेकर्सच्या जाळ्यात अडकलेला कारकून, धनाढय़ व्यक्तीच्या मृत्युपत्रानंतर त्याच्या अफाट संपत्तीचं काय घडतं, ब्रॅण्डीच्या नऊ हजार बाटल्या चोरण्याचा बेत अशा एकापेक्षा एक थरारक कथा या संग्रहात आहेत. अनुवादकाराने स्वैर अनुवादाची सोपी शैली वापरली असल्यामुळे सर्वसामान्यांनादेखील या कथा आकर्षित करतात.
– ‘नो कम बॅक्स’, लेखक : फ्रेड्रिक फॉर्सिथ, अनुवाद : विजय देवधर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठसंख्या -४६४, मूल्य रु. ४४५/-.

lp60सीआयएबद्दल सर्व काही
कोणताही देश हा सशक्त गुप्तचर यंत्रणेशिवाय जगूच शकत नाही. अनेक घटना सर्वसामान्यांना सामान्य वाटत असल्या तरी गुप्तचर यंत्रणा ह्य़ा एका वेगळ्याच परिप्रेक्ष्यातून त्याकडे पाहत असतात आणि त्यावर आधारित योजना आखून अनेक उद्दिष्टं साध्य करत असतात. मात्र सर्वसामान्यांना त्यामागे असणारं गुप्तचर यंत्रणेचं अस्तित्व जाणवत नाही. अर्थातच हेच गुप्तचर यंत्रणांचं यश असतं. महासत्तेच्या बाबतीत तर अशा शेकडो-हजारो घटना असतात की ज्या गुप्तचर यंत्रणा बेमालूमपणे पार पाडत असतात. त्यामुळेच गुप्तचर यंत्रणेबद्दल सर्वानाच एक कुतूहल असतं. अमेरिकेच्या सीआयएबद्दल हेच कुतूहल जगातल्या प्रत्येक सर्वसामान्यास असते. हेच कुतूहल या पुस्तकातून शमविण्यास मदत होते.
– अमेरिकेची सी. आय. ए. लेखक : पंकज कालुवाला, परम मित्र पब्लिकेशन्स, पृष्ठसंख्या १८८, मूल्य – रु. २००/-

lp59सुरस युद्धकथा
युद्धस्य कथा रम्य : असं एक संस्कृत वचन आहे. मग हे महायुद्ध असेल तर त्यातील कथांना आणखीनच वलय लाभतं. गेल्या शतकातील महत्त्वाच्या आणि सर्वाधिक अशा भयप्रद घटनांमध्ये गणना होणाऱ्या महायुद्धाने अशाच शेकडो सुरस युद्धकथांना जन्म दिला आहे. अर्थातच अनेक भाषांमध्ये त्यावर चित्रपट, कादंबऱ्या आल्या असल्या तरी आजही दुसरं महायुद्ध हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय राहिला आहे. किंबहुना म्हणूनच आजदेखील त्यावर काही ना काही साहित्य येतच राहतं. या पुस्तकातील कथा ह्य़ा सुरस तर आहेतच पण तत्कालीन परिस्थितीवर भाष्यदेखील करतात.
– दुसऱ्या महायुद्धातील शौर्यकथा, लेखक : निरंजन घाटे, साकेत प्रकाशन, पृष्ठसंख्या २१६, मूल्य – रु. २२०/-