29 February 2020

News Flash

विनोदी-रहस्यमय-थरारपट

मराठी चित्रपटांना विनोदाची मोठी परंपरा लाभली आहे. निरनिराळ्या धाटणीच्या विनोदाची हाताळणी मराठी चित्रपटांमध्ये मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली आहे. किंबहुना मराठी चित्रपटांमध्ये विनोदाची लाट हीच...

| July 3, 2015 01:13 am

lp58मराठी चित्रपटांना विनोदाची मोठी परंपरा लाभली आहे. निरनिराळ्या धाटणीच्या विनोदाची हाताळणी मराठी चित्रपटांमध्ये मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली आहे. किंबहुना मराठी चित्रपटांमध्ये विनोदाची लाट हीच कायम होती असेही दिसून येते. कौटुंबिक नर्मविनोदी चित्रपटांची संख्याही मराठीत खूप आहे. मास्टर विनायक यांच्यापासून ते दादा कोंडके, सचिन, महेश कोठारे यांच्यापर्यंत अनेक दिग्दर्शकांनी विनोदी चित्रपट केले. त्याशिवायही अनेक दिग्दर्शकांनी विनोदी चित्रपट केले आहेत. विनोदी चित्रपटांच्या परंपरेत प्रामुख्याने कौटुंबिक विनोदी चित्रपटांची संख्या अधिक आढळून येते.
आताच्या बदललेल्या काळात टीव्हीवर मोठय़ा प्रमाणावर स्टॅण्डअप कॉमेडी कार्यक्रमांचे पेव फुटलेले असताना विनोदी चित्रपट करणे हे निराळे आव्हान ठरते. आगामी ‘मर्डर मेस्त्री’ हा विनोदी चित्रपटांच्या परंपरेपेक्षा वेगळा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. १० जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच या विनोदी कम रहस्यमय चित्रपटाचे वैशिष्टय़ प्रेक्षकांना समजू शकेल.
‘मर्डर मेस्त्री’ चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जाधव यांच्याशी बातचीत करताना ते म्हणाले की, माझ्या मते प्रथमच या चित्रपटात आम्ही विनोदी-रहस्यमय-थरारपट असे मिश्रण असलेले कथानक मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
विनोदाची मोठी परंपरा मराठी चित्रपटांना लाभली आहे त्याबद्दल बोलताना राहुल जाधव यांनी सांगितले की, या चित्रपटाच्या नावावरून रहस्यमय थरारपट वाटत असला तरी त्यात विनोदाचे तीन निरनिराळे प्रकार हाताळण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. प्रमुख भूमिकेत दिलीप प्रभावळकर-वंदना गुप्ते, विकास कदम-मानसी नाईक आणि संजय खापरे-क्रांती रेडकर अशा दाम्पत्यांच्या तीन जोडय़ा आहेत. प्रभावळकर-गुप्ते या जोडीने साकारलेल्या व्यक्तिरेखांद्वारे हळुवार विनोद सादर करण्यात आला असून विकास कदम-मानसी नाईक यांच्या व्यक्तिरेखा रोमॅण्टिक कॉमेडी धाटणीच्या आहेत. तर संजय खापरे-क्रांती रेडकर या दाम्पत्याच्या व्यक्तिरेखांमार्फत भडक विनोदाची फोडणी देण्याचा प्रयत्न केला आहे. दिलीप प्रभावळकर यांची मध्यवर्ती भूमिका असून त्यांचे आडनाव मेस्त्री आहे. त्याशिवाय हृषिकेश जोशी हेही प्रमुख भूमिकेत असून त्यांनी एका पोस्टमनची व्यक्तिरेखा साकारली आहे.
चित्रपटाची थोडक्यात गोष्ट सांगताना राहुल जाधव म्हणाले की, साधा-सरळ पापभीरू अशा स्वभावाच्या पोस्टमनच्या एका सवयीमुळे म्हणा किंवा त्याच्या एका विशिष्ट व्यसनामुळे म्हणा प्रमुख व्यक्तिरेखा असलेल्या तीन दाम्पत्यांच्या जीवनात गोंधळ निर्माण होतो. पोस्टमनच्या मिस्कीलपणातून निर्माण झालेल्या गैरसमजातून घडलेल्या घटनांवर हा चित्रपट आहे.
पारंपरिकदृष्टय़ा आपल्याकडे सिनेमा, नाटक, टीव्ही मालिका यांतून बायको नवऱ्यावर संशय घेते असे बरेचवेळा दाखविण्यात येते. परंतु या चित्रपटात आम्ही नवऱ्याला बायकोचा संशय येतो आणि मग पुरुषाला संशय आल्यावर तो कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतो किंवा मग तो काय करतो हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. काहीसा गंभीर विषय असला तरी तो विनोदाच्या निरनिराळ्या प्रकारांच्या माध्यमातून हाताळण्याचा प्रयत्न आम्ही केला असून तो प्रेक्षकांना नक्कीच वेगळा वाटेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटाविषयी नमूद करण्यासारखी आणखी वैशिष्टय़े आहेत. एक म्हणजे आशा भोसले यांनी ‘अळीमिळी गुपचिळी’ असे बोल असलेले गाणे गायले आहे. तर या चित्रपटाद्वारे हिंदीतील बडे निर्माते साजिद नाडियादवाला प्रथमच मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ सांगताना दिग्दर्शक राहुल जाधव म्हणाले की, या चित्रपटाचा क्लायमॅक्स हा गाण्यावर चित्रित करण्यात आला आहे. दिग्दर्शक-नृत्य दिग्दर्शक आणि फाइट मास्टर अशा आम्ही तिघांनी मिळून एकत्र चित्रीकरण या क्लायमॅक्ससाठी केले आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स गाण्यावर होत असलेला हा मराठी चित्रपट आहे.
मुलांसाठी पालकांना काय काय करावे लागते याचेही दर्शन या चित्रपटातून घडविण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. नेहा कामत यांची कथा आणि प्रशांत लोके यांनी पटकथा-संवाद लेखन केले आहे. पंकज पडघन यांचे संगीत आहे.
सुनील नांदगावकर response.lokprabha@expressindia.com

First Published on July 3, 2015 1:13 am

Web Title: murder mestri
टॅग Marathi Movie
Next Stories
1 वेगळ्या विषयांची जुगलबंदी
2 रिमेकदृश्यम
3 दोन भागांतील भव्य चित्रपट ‘बाहुबली..’
X
Just Now!
X