News Flash

परछाईयॉँ : मगर तेरा प्यार नहीं भूलें! – ए. हमीद

‘अमृतसर ते लाहोर व्हाया पुणे-मुंबई’ असा सांगितिक प्रवास करीत पाकिस्तानी सिनेसंगीतावर आपल्या असामान्य प्रतिभेची अमिट मुद्रा कोरणारे बिनीचे संगीतकार...

| August 22, 2014 01:10 am

‘अमृतसर ते लाहोर व्हाया पुणे-मुंबई’ असा सांगितिक प्रवास करीत पाकिस्तानी सिनेसंगीतावर आपल्या असामान्य प्रतिभेची अमिट मुद्रा कोरणारे बिनीचे संगीतकार ए. हमीद यांच्या नावाला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वलय आहे. मूळचे पियानिस्ट असणाऱ्या हमीद यांनी मेहदी हसन, नूरजहाँ, नसीम बेग़म, माला बेग़म, अहमद रश्दी, सलीम रज़ा यांच्या आवाजात असंख्य सदाबहार गाणी दिली आहेत, जी ऐकताना आजही भान हरपायला होतं.

‘सौतन की बेटी’ (१९८९) या चित्रपटात दिग्दर्शक कम गीतकार सावनकुमार टाक यांनी एक गाणं लिहून लता मंगेशकर यांच्या आवाजात वापरलं आणि सीमेपलीकडून शब्दांसकट गाणं ढापलं म्हणून वादाचं मोहोळ उठवून घेतलं. गाणं होतं. ‘हम भूल गये रे हर बात
मगर तेरा प्यार नहीं भूले.’
भारतातल्या असंख्य संगीतशौकिनांनी साठच्या दशकात रेडिओ सिलोन व विविध पाकिस्तानी नभोवाणी केंद्रावरून अनेकदा ऐकलेलं हे मूळचं पाकिस्तानी गाणं अंगलट न आल्यासच नवल! सावनकुमार टाक यांनी गाणं लिहिताना मुखडा आणि कडवं जसंच्या तसं उचललंय. खरंतर सावनकुमार, टाक आणि दौत सरसावून गीतलेखन करण्यासाठी बसले की त्यांना पाकिस्तानी गाण्यांची उधारउसनवारी का करावी लागत असे हे एक न उलगडलेलं कोडंच आहे. गाण्याचे अंतरे कसेबसे उरकल्यासारखे लिहिले आहेत. वेदपाल शर्मा नामक संगीतकाराने गाणं वेगळ्या चालीत बांधण्याचा प्रयत्न जरूर केलाय; परंतु गाण्याची सुरुवातच आपलं अपहरण झाल्याची कबुली खुलेआम देत होती तिथे बिचारा संगीतकार तरी काय करणार. चेहऱ्यावर भरपूर ‘मेकअप’ व काळा ओव्हरकोट परिधान करून हे ‘विफलगीत’ बर्फाच्छादित दऱ्याखोऱ्यांतून गात फिरणारी मादक रेखा तेवढी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. बाकी गाण्याचे शब्द आणि चालच नव्हे तर ‘हर बात’ चित्रपट संपताच मायबाप रसिक विसरूनदेखील गेले होते.
एस. एम. युसूफच्या ‘सहेली’(१९६०) या चित्रपटासाठी संगीतकार ए. हमीद यांनी या गाण्याला नसीम बेग़मच्या आवाजात स्वरसाज चढविला होता. मूळ गाणं असं होतं.
हम भूल गये हर बात, मगर तेरा प्यार नहीं भूले
क्या क्या हुआ दिल के साथ, मगर तेरा प्यार नहीं भूले
हाऽय रे मजबुरी दिल की भेद न दिल ने खोले
अपने घर को जलते देखा मुंह से कुछ न बोले
हम जलते रहे रे दिन-रात मगर तेरा प्यार नहीं भूले
हे एक उत्कृष्ट ‘पियानो साँग’ आहे. पियानोच्या कॉर्ड्स आणि व्हायलीनच्या पाश्र्वभूमीवर गाणं सुरू होतं. तबला ढोलकबरोबर मटक्याचा वापर करताना संगीतकाराने केरव्याचा आकर्षक ठेका निवडला आहे. संपूर्ण गाण्यात पियानोचा लाजवाब ‘फील’ जाणवत राहतो. हा ग्रँड पियानो हमीद यांनी स्वत: वाजविला आहे. फ़य्याज़्‍ा हाश्मीच्या आशयघन काव्यातून प्रेमाची उत्कट भावाभिव्यक्ती नसीम बेगमने आपल्या आर्त स्वरात अशी काय साकारली आहे की ती थेट अंत:करणाला जाऊन भिडते. ‘हमने जो फूल चुने दिल में चुभे जाते हैं’ हे नसीम बेग़मच्याच आवाजातलं दर्दभरं गीत हमीद यांनी आकर्षक सुरावटीत गुंफलं आहे. ‘कहीं दो दिल जो मिल जाते बिगडता क्या ज़्‍ामाने का’ हे सलीम रज़ा आणि नसीम बेग़मच्या आवाजात युगुलगीत अत्यंत श्रवणीय बनलं आहे. सलीम रज़ाने हे गाणं तलत मेहमूद यांना डोळ्यांपुढे ठेवून मखमली अंदाजात गाण्याचा प्रयत्न केला आहे. तो अगदी शंभर टक्के जमला नसला तरी बऱ्यापकी असरदार ठरला आहे.
नसीम बेग़म आणि कोरसच्या आवाजात हे ‘मुखडम्े पे सेहरा डालें आ जाओ आनेवाले चाँद सी बन्नो मेरी तेरे हवाले.’ हे विवाहप्रसंगी गायलं जाणारं कर्णमधुर बिदागी-गीत कंपोझ करून ए. हमीद यांनी एकच धमाल उडवून दिली होती. विशेषत: रतजग्यात (विवाहप्रसंगी महिलांकडून रात्र जागवणारा संगीताचा कार्यक्रम) हे गाणं ढोलकवर चमच्याचा आघात करीत हमखास म्हटलं जायचं.
ए. हमीद यांचा जन्म १९२४ साली अमृतसर येथे झाला. त्यांचं मूळ नाव शेख अब्दुल हमीद असं होतं. वडील शेख मोहंमद मुनीर संगीताचे गाढे अभ्यासक व अमृतसरच्या दयानंद अँग्लो वेदिक ऊर्फ डी. ए. व्ही. कॉलेजमध्ये संगीत विषयाचे प्राध्यापक होते. त्यांच्याकडे संगीतविषयक दुर्मीळ ग्रंथांचा खजिनाच होता. मोहंमद मुनीरसाहेब यांनी भारतात ‘आखरी ग़लती’(१९३२) या चित्रपटासाठी संगीत दिलं होतं. दुसरा उल्लेख ‘इंदर राज’ असा सापडतो. तथापि या नावाच्या चित्रपटाचा तपशील मात्र उपलब्ध होऊ शकला नाही. वडिलांचा आदर्श समोर असल्याने किंवा घरातला संगीताचा माहोल विचारात घेता अब्दुल हमीद यांची पावले आपसूकच संगीताच्या दिशेने पडू लागली होती. त्यांनी पाश्चिमात्य व िहदुस्तानी शास्त्रीय संगीताचा कसून अभ्यास केला. अब्दुल हमीद ऐन तारुण्याच्या उंबरठयावर उभे असतानाच त्यांचे पितृछत्र हरपले. मोहंमद मुनीर यांच्या निधनानंतर डी. ए. व्ही. कॉलेजच्या विश्वस्त मंडळाने अब्दुल हमीद यांची नियुक्ती संगीत प्राध्यापक म्हणून केली. परंतु हमीद यांचे मन शिकवण्यात रमत नव्हतं, त्यांना संगीतकार बनायचे वेध लागले होते. मुंबईची चंदेरी मायानगरी साद घालीत होती. शेवटी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व ते मुंबईला आपल्या चुलत्यांकडे आले. हमीद यांचे काका मोहंमद अस्लम हे त्या वेळी िहदी चित्रपटसृष्टीत अभिनेते होते. त्यांनी हमीदला पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये शिकण्यासाठी पाठविले. काही काळ ए. हमीद पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये शिकत होते. येथे त्यांना रामचंद्र व मोहम्मद अली यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन प्राप्त झाले. त्यानंतर हमीद मुंबईच्या चित्रपटसृष्टीत पियानोवादक म्हणून स्थिरावले. चाळीसच्या दशकात पियानोवादक असणे ही फार मोठी बाब होती. सिनेसंगीताने नुकतीच कात टाकली होती. संगीतात नवीन मन्वंतर येऊ घातले होते. बहुतेक मोठे संगीतकार िहदुस्तानी स्वरलिपीऐवजी पाश्चात्त्य पद्घतीच्या स्टाफ नोटेशनचा व त्याचबरोबर पाश्चिमात्य वाद्यांचा समावेश ‘ऑर्केस्ट्रेशन’मध्ये आवर्जून करू लागले होते. हार्मनी, कॉर्ड्स, आब्लीगाटोज, सिंफनीज यांचं सखोल ज्ञान असलेल्या हमीदना िहदी चित्रपटसृष्टीत चांगला मान व पसा मिळू लागला होता. अनेक दिग्गज संगीतकारांचे काम त्यांनी जवळून पाहिले असल्याने ए. हमीदच्या प्रारंभिक संगीतावर िहदी सिनेसंगीताची दाट छाया दिसून येते. नंतर लाहोरला ते संगीतकार मास्टर ग़ुलाम हैदर यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम पाहू लागले. तथापि स्वतंत्र संगीतकार बनण्याची मनीषा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
फाळणीनंतरचा बराचसा काळ हा नव्याने उभं राहणाऱ्या सिनेइंडस्ट्रीचा जडणघडणीचा काळ असल्याने ए. हमीद यांना विभाजनानंतर दहा वष्रे वाट पाहावी लागली. १९५७ साली पाकिस्तानातले प्रसिद्ध छायाचित्रकार ज़्‍ाफरशाह बुख़ारी यांनी त्यांना स्वतंत्र संगीतकार म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यांनी आपल्या ‘अंजाम’ या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या संगीताची धुरा हमीदवर सोपविली. ‘अंजाम’ बऱ्यापकी चालला. त्यानंतर बुख़ारींनी ‘भरोसा’ (१९५८) व ‘फ़ैसला’(१९५९) या आपल्या दोन चित्रपटांचं संगीत हमीदवरच सोपवलं होतं. चित्रपट व संगीत बरं म्हणावं इतपतच चाललं. १९५८ साली रिलीज झालेला ‘तौहिद’सुद्धा फारशी करामत दाखवू शकला नाही.
ए. हमीदचं संगीत गाजलं ते ‘रात के राही’ या १९६० साली प्रदíशत झालेल्या चित्रपटामुळे. या चित्रपटातील गाणी तुफान लोकप्रिय झाली. चित्रपटात एकूण नऊ गाणी होती. फ़ैयाज़्‍ा हाशमी गीतकार होते. हाशमी यांच्याबरोबर जुळलेले हमीद यांचे सूर पुढील वाटचालीत अधिकाधिक दृढ होत गेले. ‘क्या हुआ दिलपें सितम तुम न समझोगे सनम’ व ‘ऐ बादलोंके राही किसका पयाम आया’ (स्वर : ज़ुबेदा ख़ानम), ‘हुस्न की दे हमे ख़ैरात भला होगा तेरा’ (स्वर : सलीम रज़ा व ज़ुबदा ख़ानम) या गाण्यांना रसिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. मात्र यातलं सर्वाधिक श्रवणीय युगुलगीत अहमद रश्दी व ज़ुबदा ख़ानमने गायलं होतं, गाण्याचे बोल होते.
तेरी ऐसी ये उठान, जैसे रावी में तुफान
ओ दिल ले गयी रे मेरा ओ जवाब नही तेरा
चन्ना तेरी ऐसी शान, बनके आँखों की मेहमान
किया दिल में बसेरा, ओ जवाब नहीं तेरा ओय.
‘रातके राही’तल्या या गाण्यावर ओ.पी. नय्यरच्या ‘दो उस्ताद’ (१९५९) मधल्या ‘तेरे दिल का मकान, संया बडा आलिशान’चं दाट सावट आहे. मात्र हमीदने ते लपविण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला आहे. ओ.पीं.चं गाणं या गाण्याहून सरस व लाजवाब असलं तरी स्वतंत्र गाणं म्हणून या गाण्याचा विचार करता ते सुरेख जमून आलं आहे. ‘रातके राही’ने ए. हमीद यांना नाव मिळवून दिलं असलं तरी ‘सहेली’ या चित्रपटाने त्यांना थेट प्रस्थापितांच्या श्रेणीत नेऊन बसविलं.
अशीच एक परछाई ए. हमीद यांनी संगीत दिलेल्या ‘औलाद’ (१९६२)या चित्रपटातल्या एका हळुवार गीतावर आढळून येते.
तुम क़ौम की माँ हो सोचो ज़्‍ारा,
औरत से हमे ये कहना है
औलाद तुम्हारी दौलत है
तालीम तुम्हारा ग़हना है
‘साधना’ (१९५८) चित्रपटासाठी एन. दत्ता यांनी रचलेली एक अजरामर धून ‘औरत ने जनम दिया मर्दो को’ ची छाप हमीद यांच्या ‘औलाद’ चित्रपटातल्या गाण्यावर दिसून येते. साहिरचं आशयप्रधान काव्य ज्या तरल व लाजवाब चालीत एन. दत्ता यांनी गुंफलं आहे त्याच सुरावटीवर हमीद यांनी फ़ैयाज़्‍ा हाश्मीचे शब्द पेरले आहेत. सुरावट एकच असली तरी दोन्ही सामाजिक आशयाच्या गाण्याचा विषय बदलला आहे. साहिरने आपल्या काव्यात ‘स्त्री’ची व्यथा, फरफट व तिची घुसमट मोठय़ा परिणामकारकरीत्या मांडली आहे. फ़ैयाज़्‍ा हाश्मींनी विषयाला बगल देत गाण्याला बालसंगोपन, देशप्रेम, आणि महिला शिक्षण यांची तात्त्विक डूब दिली आहे. शिवाय तिला देशाची जननी म्हणून गौरवलं आहे. ऑर्केस्ट्रेशन बहारदार आहे. गाण्याला नसीम बेग़मच्या सुंरेल गायकीची मखमली किनार आहे. एका सुपरहिट गाण्यासाठी आणखी काय हवं? उणीव फक्त एकच ‘ही धून मी एन. दत्तांच्या चालीवरून उचलली आहे’ असं जाहीर कबूल केलं असतं तर ए. हमीदसारख्या सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाला ते अधिक शोभून दिसलं असतं.
एस.एम. युसुफ़चा ‘आशियाना’(१९६४) हा ए. हमीदच्या संगीताने नटलेला एक संगीतप्रधान चित्रपट होता. यात ‘जी देखा जो उन्हे दिलने चुपकेसे कहा हाये, बडे संगदिल हो बडे नासमझ हो (स्वर : अहमद रश्दी व माला), ‘जो दिल को तोडते हैं उनका भी जवाब नही’ (स्वर : मुनीर हुसेन), ‘जा रे बेदर्दी हमें कहीं का हमे ना छोडा’ (स्वर : माला), ‘इक हसीं मेहरबां प्यार का ये समां’ (स्वर : आयरिन परवीन) यासारखी गाणी लोकांना आवडली.
याच वर्षांत रिलीज झालेला ‘पग़ाम’ या चित्रपटात सातपकी चार गाणी नूरजहाँच्या आवाजात होती. ‘तौबा’ (१९६४ ) हा चित्रपट गाजला तो त्यातील ‘न मिलता ग़र तौबा का सहारा हम कहाँ जाते’ (स्वर : सलीम रज़ा, मुनीर हुसन, साईं अख़्तर व कोरस) या कव्वालीमुळे. ही कव्वाली विलक्षण लोकप्रिय ठरली. याशिवाय चित्रपटातली उर्वरित गाणीसुद्धा आकर्षक होती. १९६७ साली झळकलेला दिग्दर्शक क़दीर मलिकचा ‘मैं वो नहीं’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी करामत दाखवू शकला नाही. परंतु यात मेहदी हसन यांनी गायलेली भावगर्भ स्वररचना देशविदेशातून गाजली. भारतातसुद्धा या मोहक सुरावटीने लाखो रसिकांना मंत्रमुग्ध केले.
नवाज़िश, करम, शुक्रिया, मेहरबानी
मुझे बख़्श दी आपने िज़्‍ादगानी
जवानी की जलती हुई दोपहर में
ये ज़ुल्फ़ों के साये घनेरे घनेरे
अजब धूप-छाँवों का आलम है तारी
महकता उजाला चमकते अंधेरे
ज़्‍ामी की फ़ज़ा हो गयी आसमानी
साडेचार दशकांचा काळ उलटूनही हे गाणं विस्मृतीत गेलेले नाही यावरून त्याची मौलिकता लक्षात येते. १९६८ साली दिग्दर्शक एस.एम. युसुफ यांनी ‘शरीक-ए-हयात’ (‘जीवनसाथी’ या अर्थाने प्रियतमा किंवा पत्नीसाठी हे संबोधन वापरले जाते.) या चित्रपटाचं संगीत ए. हमीदवर सोपविलं होतं. यात बहादूरशहा ज़्‍ाफरची एक लाजवाब ग़ज़्‍ाल ए. हमीद यांनी मेहदी हसन यांच्या स्वरात साकारली. मेहदी हसन यांनीही ग़ज़्‍ालेत जीव ओतला होता. बोल होते.
बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसी तो न थी
जैसे अब है तेरी महफ़िल कभी ऐसी तो न थी
ले गया छीन के कौन आज तेरा सब्रे-करार
बेकरारी तुझे ऐ दिल कभी ऐसी तो न थी
मेहदी हसन यांनी राग पहाडीवर बेतलेली ही ग़ज़्‍ाल काही वर्षांपूर्वी रेडिओवरून सादर केलेली होती. या ग़ज़्‍ालेला मेहदी हसन यांनीच पडद्यावर साकार करावं असा प्रस्ताव हमीद यांनी दिग्दर्शकासमोर मांडला व त्याला दिग्दर्शक एस.एम. युसुफ यांनी अनुमोदन दिले. मेहदी हसन यांनी चित्रीकरणात मफलीचा जो समां बांधला तो निव्वळ लाजवाब होता. या गोष्टीचा फायदा उठविण्याकरिता चित्रपटाच्या पोस्टरवर मेहदी हसन यांची स्वरमंडलांच्या तारा छेडतानाची छबी दाखवीत ‘मेहदी हसन फर्स्ट टाइम ऑन द स्क्रीन’ अशी जाहिरातदेखील करण्यात आली होती. साक्षात ग़ज़्‍ालचा बेताज शहेनशहा साजिंद्यांच्या समवेत मफलीत गज़्‍ालगायन करतोय. ही बाब लोकांना विलक्षण भावली. केवळ मेहदी हसन यांच्यासाठी पाकिस्तानात अनेकांनी हा सिनेमा वारंवार पाहिला.
या चित्रपटामुळे मेहदी हसन यांना आपला गायकीचा आवाका आणि असाधारण प्रभाव लक्षात आला. ग़ज़्‍ाल मफलीतून सादर करण्याची कल्पना त्यांना या चित्रपटात केलेल्या भूमिकेमुळेच सुचली. नंतर सत्तर व ऐंशीच्या दशकात मेहदी हसन नावाच्या झंझावाताने खासगी व जाहीर मफलीच्या माध्यमातून देशविदेश कसा ढवळून काढला हा इतिहास सर्वश्रुतच आहे.
१९७१ सालच्या ‘दोस्ती’ या ए. हमीद यांच्या संगीताने नटलेल्या सुपरडुपर हिट सिनेमातील बहुतेक सर्वच गाणी चित्ताकर्षक व वेधक होती. चित्रपटात नूरजहाँच्या आवाजात एक नितांतसुंदर स्वररचना हमीद यांनी पेश केली होती. बोल होते.
ये वादियाँ, ये परबतों की शाहजादीयाँ
सोचती है कब बनेंगी तू दुल्हन
म कहूं जब आयेंगे मेरे सजन
मेरे सजन, चला भी आऽ चला भी आऽ
ए. हमीदची बेहतरीन कॉम्पोझिशन म्हणून या गाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच सत्तरच्या दशकातसुद्धा नूरजहाँच्या स्वरांमधली झार, दमसास व आवाजाची रेंज किती लोभस होती याचा अंदाज येतो. या चित्रपटातली अन्य गाणीसुद्धा हमीद यांनी मनोवेधक चालीत बांधली होती.
दिग्दर्शक फ़रीद अहमदचा ‘अंगारे’ (१९७२) हा एक सर्वसाधारण चित्रपट होता. परंतु यात अहमद फ़राज़्‍ा यांची मेहदी हसन यांनी गायलेली व स्वरबद्घ केलेली ग़ज़्‍ाल हमीद यांनी काहीशा वेगळ्या अंदाजात सादर केली होती. मूळ गज़्‍ाल भूप रागात रेडिओवरून मेहदी हसन यांनी काही वर्षांपूर्वी गायली होती. त्यात मेहदी हसन यांनी स्वरांचे असे काही अनवट ताणेबाणे गुंफले होते की जे या रागात प्रचलित नाहीत. हृदयनाथ मंगेशकरांच्या ‘मालवून टाक दीप’ या भावगीतावर याच ग़ज़्‍ालेच्या सुरावटीचं दाट सावट आहे. ही ग़ज़्‍ाल ऐकून पाश्र्वगायक मन्नादांनी (मन्ना डे) मेहदी हसन यांची मुक्तकंठाने तारीफ केली होती. हमीद यांनी या ग़ज़्‍ालेला मेहदी हसन यांच्याच आवाजात स्वरबद्ध करताना काहीशा ‘सुगम’ चालीत सादर केलं होतं..
अब के हम बिछडे तो शायद कभी ख़्वाबों में मिले
जिस तरह सुखे हुए फूल किताबों में मिले.
तू ख़ुदा है न मेरा इश्क़ फ़रिश्तों जैसा
दोनो इन्साँ है तो क्यूं इतने हिजाबों में मिले
चित्रपटात या ग़ज़्‍ालच्या पाश्र्वभूमीवर ऑर्केस्ट्रेशनमध्ये व्हायलिन्सचे अफलातून जे ‘रन्स’ ऐकू येतात व हार्मनीचा जो लाजवाब इफेक्ट जाणवतो तो हमीद यांच्या वाद्यमेळ जुळवणीच्या कौशल्याचा अप्रतिम नमुनाच म्हणावा लागेल. मेहदी हसन यांना मात्र रेडिओवरचीच चाल अधिक प्रिय होती. कारण त्यातील स्वरांवर, विषादाचा, खिन्नतेचा जो झाकोळ आहे तो त्यांना शब्दांच्या आशयानुरूप वाटायचा. अर्थात मफल आणि सिनेमा दोन्ही माध्यमांतल्या प्रेक्षकांची रुची विचारात घेता हमीद यांची सिनेमातली चालदेखील समर्पकच वाटते, असं एका जाहीर कार्यक्रमात मेहदी हसन यांनी सांगितलं होतं. एकाच चालीची शास्त्रोक्त व सुगम अशी दोन्ही रूपे विलोभनीय आहेत.
१९७७ साली ज़्‍ाफर शहाब यांनी ‘भरोसा’ हा चित्रपट ए. हमीदच्या कर्णमधुर संगीतामुळे सुपरहिट करून दाखविला. मोहम्मद अली व ज़्‍ोबा या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत होते. यातलं मेहदी हसन यांनी गायलेलं गाणं तर निव्वळ लाजवाब होतं.शब्द, भाव, आशय, स्वर, संगीत, वाद्यमेळ सर्वच बाबतीत हे गाणं ए. हमीद यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारं सुपरहिट अजरामर गाणं ठरलं. आशयघन काव्याची नज़ाक़त, व मेहदी हसनसाहेबांच्या मदहोश स्वरांची जादू गाण्यात प्रत्यही आढळते.
किस तरह जाने-वफा शौक़ का इज़्‍ाहार करूं
ग़र इजाज़्‍ात हो तो जी भर के तुझे प्यार करूं
तूने शर्माके सिमटने की अदा पायी है
मेरा दिल ऐसी अदाओंका तमन्नाई है
क्यूं न फिर म तेरे शरमाने पे इसरार करूं
किस तरह जाने-वफा शौक़ का इज़्‍ाहार करूं
तुझको पहलु में लिए मस्त फ़ज़ाओं में चलूं
गुनगुनाती हुई लहराती घटाओं में चलूं
इन बहारों में बिठाकर तेरा दीदार करूं
किस तरह जाने-वफा शौक़ का इज़्‍ाहार करूं
शांत, सुसंस्कृत व मृदुभाषी अशी हमीद यांची इमेज होती. वेळ मिळेल तेव्हा पियानोवर काही ना काही वाजवीत राहणं हा त्यांचा आवडता छंद होता. मित्रांच्या बरोबर खासगी मफलीत रमले की फर्माईशीनुसार गायचेदेखील. ‘अंजाम’ (१९५७) ते ‘डिस्को दीवाने’ (१९८८) या तीस -बत्तीस वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी सत्तर एक चित्रपटांना संगीत दिलं. १९८३ साली ते पाकिस्तान नॅशनल आर्ट्स कौन्सिलचे कार्यवाह म्हणून रावळिपडी येथे रुजू झाले. अनेक नवीन कलावंतांना त्यांनी घडविलं. मनापासून शिकवलं. २० मे १९९१ रोजी रावळिपडी येथे त्यांचं निधन झालं.

यूटय़ुबच्या सर्च बॉक्समध्ये Aasifali Pathan या नावाचा सर्च दिल्यास या लेखाशी संबंधित सर्व गाणी ऐकता येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2014 1:10 am

Web Title: musician a hameed
Next Stories
1 ब्लॉगर्स कट्टा : विकासाचे जनआंदोलन
2 ब्लॉगर्स कट्टा : अशी ही प्रामाणिक माणसं!
3 पोश्टर मैफल
Just Now!
X