scorecardresearch

नामदेव ढसाळ : उत्तरार्ध आणि अस्त

आदरांजली
नामदेव ढसाळ यांच्यातील वैचारिक बदल कसा झाला व का झाला आणि त्या बदलाचा त्यांच्या साहित्यावर काही परिणाम झाला का, या प्रश्नाचा शोध-

नामदेव ढसाळ : उत्तरार्ध आणि अस्त

आदरांजली
नामदेव ढसाळ यांच्यातील वैचारिक बदल कसा झाला व का झाला आणि त्या बदलाचा त्यांच्या साहित्यावर काही परिणाम झाला का, या प्रश्नाचा शोध-
ज्या  पिढीतील कवींशी आपण आयुष्यभर भांडलो, ज्यांच्याविरुद्ध आपण बंड केले, त्यांच्या मृत्यूने आपणाला अतोनात दु:ख का व्हावे? की ढसाळांच्याच भाषेत सांगायचे तर, त्यांच्या कवितेतील मातीच्या वैभवातच हा आपला जीव अडकला आहे? अरुण कोल्हटकर, दिलीप चित्रे, ग्रेस आणि आता नामदेव ढसाळ! सुन्नतेच्या काठावर उभे राहून मृत्युलेख कसे लिहिले जातात? शोकात्म शब्दांच्या अंतरंगात एक पोरकेपण कसे काय पसरते?
० ० ०
असे नव्हते की, ढसाळ हे पहिले कवी होते वा पहिले दलित कवी होते; पण ढसाळांनी दलितांच्या दु:खी वास्तवाला कल्पनाशक्तीने जी उंची दिली, ती उंची देणारे ते पहिले कवी होते. ढसाळांच्या या कल्पनाशक्तीची प्रचीती ‘गोलपीठा’, ‘मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले’, ‘प्रियदर्शिनी’, ‘तुही इयत्ता कंची’, ‘गांडू बगीचा’, ‘हाडकी हडावळा’, ‘खेळ’मध्येच आली होती आणि त्यावर मी ‘नामदेव ढसाळ एक अढळ कवी’ असा प्रदीर्घ लेखही लिहिला होता आणि ढसाळ हे भविष्यात अधिकाधिक आध्यात्मिक, अधिकाधिक बुद्धमार्गी होत जातील असे भाकीतही केले होते; पण त्या वेळीही त्यांच्या मृत्यूची कल्पना मला करवली नव्हती. पण म्हणतात ना- मृत्यू माणसाची शेवटची कल्पना आणि शेवटचे वास्तव आहे. तसेच झाले. शेवटी या शेवटच्या वास्तवाने नामदेव ढसाळांनाही गाठले.
० ० ०
ढसाळांचा हा अस्त त्यांच्या उत्तरार्धाविषयी कित्येक प्रश्न घेऊन माझ्यासमोर अवतरतो आहे. दलित साहित्यिकांना अनेकदा त्यांचा पूर्वार्ध आवडतो. मध्यार्ध अडचणीचा वाटतो, तर उत्तरार्ध नकोसा वाटतो, कारण पूर्वार्धात चळवळीतला धगधगता नामदेव आहे, तर मध्यार्धात प्रियदर्शनीकडून सर्वागीण क्रांतीची अपेक्षा करणारा नामदेव आहे, पण उत्तरार्धातला नामदेव ढसाळ हा ‘रीडल ऑफ राम’ या बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखावरून शिवसेनेशी लढणाऱ्या नामदेव ढसाळला बाजूला सारून शिवसेनेशी व बाळासाहेब ठाकरेंशी युती करणारा नामदेव ढसाळ आहे.
उत्तरार्धातला नामदेव ढसाळ हा ‘समष्टीचे भान हरवू लागलेली साहित्य चळवळ’ या लेखात ‘‘बहुतांशी दलित साहित्य ‘रायवळांची जत्रा’ झाली आहे आणि या जत्रेला दलित साहित्यातील पुरोगामी प्रवर्तकाचा रोल करणारेच जबाबदार आहेत,’’ असा ठणकावणारा नामदेव ढसाळ आहे.

भविष्यातील लढा हा पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असाच आहे आणि पुरोगामी व प्रतिगामी हे कुठल्याही जाती, वर्ण, वर्ग, धर्मात असू शकतात. त्यामुळे ढसाळांच्यातील बदल हा ते पुरोगामी, अधिक पुरोगामी बनल्याचे लक्षण होते.

उत्तरार्धातला नामदेव ढसाळ हा ‘‘शंकराचार्याची भाषा वापरून सांगायचे तर कम्युनिझम ही माया आहे,’’ असे अनपेक्षित बोलणारा धक्कादायक नामदेव ढसाळ आहे.
उत्तरार्धातला नामदेव ढसाळ हा एकाच वेळी फुलनदेवीला ‘महाकाव्याची नायिका’ व पु. ल. देशपांडे यांना ‘प्रस्थापितापेक्षा वेगळे पुलं’ म्हणणारा नामदेव ढसाळ आहे.
नामदेव ढसाळ यांच्यातील हा वैचारिक बदल कसा झाला व का झाला आणि त्या बदलाचा त्यांच्या साहित्यावर काही परिणाम झाला का, या प्रश्नाचा शोध मला नेहमीच घ्यावासा वाटला आहे.
० ० ०
राजकीय नेत्यांचे पक्षांतर हा काही फार नवीन घटनाक्रम (निदान भारतात) तरी नाही. खुद्द नामदेव ढसाळ यांचे सासरे शाहीर अमर शेख यांनी १९६२ च्या आसपास कम्युनिस्ट पक्ष सोडला होता आणि ते काँग्रेस पक्षात दाखल झाले होते. जॉर्ज फर्नाडिस यांनी ज्या जनसंघाच्या मुद्दय़ावरून मोरारजी देसाई यांचे सरकार पाडले होते त्याच जनसंघाशी म्हणजेच भाजपशी नंतर हातमिळवणी केली होती. मग नामदेव ढसाळ यांच्या पक्षांतराचे आपणास इतके दु:ख का व्हावे? हे दु:ख खरोखर आपणास होते आहे, की नामदेव ढसाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ज्यांचे राजकीय नुकसान झाले त्या कम्युनिस्टांचे, लोहियावाद्यांचे आणि रिपब्लिकनांचे दु:ख मराठी साहित्याच्या आणि साहित्यिकांच्या माथी मारले जात आहे? जो सोडून जातो त्याची बदनामी करण्याचे एक विशिष्ट तंत्र कम्युनिस्टांनी अवगत केले आहे. त्यामुळे साहजिकच नामदेव ढसाळ मराठी साहित्यात बदनाम होत गेले. याशिवाय घडले असे की, लोकांच्या कलावंत लोकांकडून काही अपेक्षा असतात, त्यातील एक म्हणजे निदान कलावंतांनी तरी पक्षांतर करू नये, आपल्या भूमिका बदलू नयेत. साहजिकच एखाद्या कलावंताने पक्ष बदलला की, त्याची निष्ठाही बदलली असे लोक गृहीत धरतात. प्रत्यक्षात नामदेव ढसाळांची निष्ठा बदलली का? तर त्याचे निश्चित उत्तर ‘नाही’ असे आहे. ढसाळांचा पक्ष बदलला तरी त्यांची आंबेडकर व बुद्ध यांच्या ठायी असलेली निष्ठा कायमच राहिली. अर्थात त्यांना उमगलेले आंबेडकर हे एका जातीचे नसून सर्व समाजाचे होते आणि त्यांच्या मते दलित पँथरमधील त्यांचे अनेक सहकारी हे एकजातीय पुढारी होते आणि या एकजातीय म्हणजेच महारजातीय परिवर्तनवादात अडकून ना त्यांना स्वत:ला संकुचित व्हायचे होते ना आंबेडकरांना संकुचित करायचे होते. प्रत्यक्षात त्यांचे सहकारी हे खरोखरच एकजातीय होते का? उदाहरणार्थ अरुण कांबळे यांच्याशी माझा वैयक्तिक परिचय होता आणि मी निश्चित म्हणेन की, ते एकजातीय नव्हते. मग जर एकजातीयतेच्या मुद्दय़ात तथ्य नव्हते, तर पँथर का फुटली? माझ्या कानावर आलेली बातमी अशी की, एका ज्येष्ठ दलित नेत्याने ढसाळांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना जिवे मारण्याची दिलेली अप्रत्यक्ष धमकी! ही धमकी दलित समूहातून आल्याने आणि आपला जातसमूह आपले संरक्षण करू शकेल की नाही याची शंका वाटल्याने ढसाळ बाहेर पडले आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे संरक्षण आपलेसे केले. या बातमीतही तथ्य किती?
यातील एक गोष्ट मात्र खरी, ती म्हणजे दलित पँथरमधील प्रत्येक नेत्याचा अहंकार आणि खोटय़ा शक्तीचा खरा माज! पँथर या अहंकारावरून व माजावरून झालेल्या भांडणावरून फुटली.
गांधीवादी काँग्रेसला शरण जाणाऱ्या प्रस्थापित दलित गांधीवादीशरण नेतृत्वाविरुद्ध केले गेलेले तरुण लोकांचे बंड म्हणजे दलित पँथर! हे बंडच फुटल्याने दलितही फुटले. अशा वेळी काँग्रेसला शरण जाणे म्हणजे गांधीवादाला शरण जाणे होते. ढसाळ हे कट्टर आंबेडकरवादी असल्याने त्यांना गांधीवादाला शरण जाणे परवडणारे आणि मानवणारे नव्हतेच. मग ढसाळांनी जायचे तर कुठे जायचे? स्वत:चे रिपब्लिकन घर मोडून पडलेले, स्वत: नवीन उभे केलेले दलित पँथरचे घर कोसळलेले, गांधीवादी घरात घुसायचे नाही हे मनोमन ठरलेले! अशा वेळी ढसाळांपुढे दोनच पर्याय होते. पहिला कम्युनिस्ट सोश्ॉलिस्ट घराचा ज्याला खुद्द बाबासाहेबांनीच नकार दिलेला, तर दुसरा जनसंघ-भाजपच्या घराचा ज्याच्याशी ढसाळांचे पटणे शक्यच नव्हते. अशा रस्त्यावर उभे असणाऱ्या ढसाळांना दिसले ते प्रादेशिक पक्षाचे शिवसेनेचे घर! नेमकी त्याच वेळी इंदुरीकरांच्या वगाला बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली आणि शिवसेनेच्या घराविषयी ढसाळांच्या मनात असलेला आकस मावळला आणि ढसाळांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या वेळी ढसाळ शिवसेनेत फार काळ टिकणार नाहीत अशी सर्वानाच खात्री होती, पण इथेच नियती स्वत:ची चाल खेळली. ढसाळांना ‘मेंदूस्मरणतूट’ हा रोग झाला आणि त्याच्या उपचारासाठी अवाढव्य पैशांची गरज निर्माण झाली. या गरजेवेळी बाळासाहेब ठाकरेंनी हात दिलाच, पण बाळासाहेबांमुळे अमिताभ बच्चननेही व पुढे सलमान खाननेही मदत केली. त्यामुळे शिवसेनेत राहणे ही ढसाळांची केवळ सामाजिक- राजकीय गरज न राहता वैयक्तिक गरजही बनली. नामदेव ढसाळांना त्यांचा मूर्ख म्हातारा माओ त्से तुंग हा बाळासाहेबांच्यात सापडावा हा हुकूमशाहीच्या अराजकी ढसाळी मानसिक सेटअपचा विकास होता की ती त्या मेन्टॅलिटीची गरज होती, हा प्रश्न त्यामुळेच अधिक अणकुचीदार झाला. अशा वेळी स्वत:चा आंबेडकरवाद (निदान कवितेत) शाबूत ठेवण्याची जबाबदारी द्विगुणित झाली आणि ढसाळ शिवसेनेत राहून आंबेडकरांवर दरवर्षी कविता लिहिते झाले. स्वत:ची आंबेडकरांवरील निष्ठा शिवसेनेत जोपासताना साहजिकच ढसाळांचे अस्तित्व पणाला लागले. सत्ता आहे आणि सत्तेत जीव रमत नाहीये अशी ही दुभंगणी होती आणि तिची सोडवणूक बुद्धाच्या अनात्मवादी अध्यात्मात होती. ढसाळ हे त्यामुळेच आध्यात्मिक झाले.
० ० ०
दलित पँथर फुटल्यानंतर प्रत्येक नेत्याजवळ उरले ते दोनशे-तीनशे कार्यकर्ते. या कार्यकर्त्यांची कविता करण्याची हौस दांडगी होती. त्यामुळे या कवी-कार्यकर्त्यांना त्यांच्या काव्यसंग्रहांना स्वत:कडे शाबूत ठेवण्यासाठी लायकी असो वा नसो, प्रस्तावना देणे भाग होते. स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या विचारवंतांनाही कार्यकर्त्यांविषयी सहानुभूती होती. त्यामुळे त्यांना उत्तेजन देण्यासाठीही प्रस्तावना प्रकरण सुरू झाले. परिणाम असा झाला की, प्रत्येकाने ही ‘रायवळांची जत्रा’ गतिमान केली. ढसाळ पडले अभिजात प्रतिभेचे कवी! त्यांच्यातल्या अस्सल कवीला ही ‘रायवळांची जत्रा’ कशी मानवणार? शिवाय ही रायवळांची जत्रा त्याच्या प्रतिस्पर्धी दलित नेतृत्वांनी जन्माला घातलेली! साहजिकच त्यांनी या जत्रेवर आसूड ओढायला सुरुवात केली. परिणामी कवी कार्यकर्ते, विशेषत: सुमार प्रतिभेचे, ढसाळांपासून दूर जायला लागले आणि ढसाळ अधिकच एकाकी झाले.
प्रश्न असा निर्माण होतो की, ही ‘रायवळांची जत्रा’ फक्त दलित साहित्यात निर्माण झाली की स्त्री साहित्यात, देशीवादी साहित्यातही निर्माण झाली? नेमाडे किंवा दिलीप चित्रे यांनीही ती निर्माण केली नाही का? चित्र्यांनी निर्माण केलेले त्यांचे वारसदार कवी ढसाळांना अतिशय सुमार दर्जाचे वाटत होते आणि खासगीत ते तसे बोलूनही दाखवत. मात्र ढसाळांनी पब्लिकमध्ये मात्र याविषयी मौनच पाळले ते का?
याहूनही अधिक मूलभूत प्रश्न असा की, ही रायवळांची जत्रा हे आपल्या वाङ्मयसंस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण का बनले आहे? वस्तुस्थिती अशी आहे की, मराठी संस्कृतीत चित्रे, कोलटकर व ढसाळ हे तीन जागतिक दर्जाचे कवी निर्माण झाले खरे, पण त्यांचे कवितासंग्रह खरेदी करून किमान हजार प्रती खरेदी करतील असे हजार अव्वल दर्जाचे रसिक मात्र मराठीत निर्माण झाले नाहीत. परिणाम चित्रे-नेमाडेंसारखे प्रवर्तक दुय्यम दर्जाच्या कवींच्यात स्वत:चे असे अव्वल रसिक शोधत राहिले आणि मग ते टिकावेत म्हणून प्रस्तावना, ब्लर्ब लिहून द्यायला लागले आणि त्यांच्या या तडजोडीने ही रायवळांची जत्रा अधिकच गतिमान झाली. याबाबतीत नामदेव ढसाळ मात्र भाग्यवान ठरले. नव्याने जगण्याचे भान आलेल्या दलित आंबेडकरी समाजाने इतरांच्या तुलनेत ढसाळांचे कवितासंग्रह विकत घेतले आणि ढसाळांना रायवळांची जत्रा निर्माण करण्याची गरज याही पातळीवर उरली नाही आणि त्यांनी बिनधास्त टीका केली.

ढसाळ हे कट्टर आंबेडकरवादी असल्याने त्यांना गांधीवादाला शरण जाणे परवडणारे आणि मानवणारे नव्हतेच. मग ढसाळांनी जायचे तर कुठे जायचे?

० ० ०
नामदेव ढसाळांची जडणघडण झाली ती लोहियांच्या देशी समाजवादात आणि आंबेडकरवादात. साहजिकच कम्युनिझम हा लोहियांप्रमाणे त्यांना एकाच वेळी शत्रू आणि मित्र वाटत राहिला. त्याविषयी नेमकी काय भूमिका घ्यायची हे त्यांना कळले ते १९८५ सालानंतर. १९८९ साली रशियात कम्युनिझम कोसळला आणि ढसाळांचे कम्युनिझमविषयीचे उरलेसुरले आकर्षण संपले, मात्र आंबेडकरवादामधला लोकशाही समाजवादाचा अजेंडा त्यांना अधिक आकर्षक वाटू लागला. त्यातूनच कम्युनिझम हा माया आहे हे धक्कादायक विधान जन्मले. जगभर कोसळलेल्या कम्युनिझमच्या अवशेषात उभ्या राहिलेल्या एका कवीची ती प्रतिक्रिया होती.
० ० ०
ढसाळांचा आणि माफियांचा संबंध हा फार जुना! साहजिकच त्यांना फुलनदेवीविषयी आकर्षण वाटणे हे तसे नैसर्गिक! फुलनदेवी ही प्रथम ढसाळांसारखी बंडखोर, पण नंतर प्रस्थापितांच्या वळचणीला नाइलाजाने ढसाळांसारखीच उभी राहिलेली. साहजिकच ढसाळांना ती महानायिका वाटली. भारतात जेवढे शोषण फुलनदेवीचे झाले तेवढे कदाचित कुठल्याच स्त्रीचे वा अस्पृश्य व्यक्तीचे झाले नसावे. ढसाळांप्रमाणेच तिलाही शेवटी आजारानेच गाठले. ते साम्यच बहुधा ढसाळांना भावले असावे. पुलंच्या निधनानंतर ‘प्रस्थापितांपेक्षा वेगळे पु.ल.’ हा लेख त्यांनी लिहून एका अर्थाने दलित साहित्याला पाठिंबा देणाऱ्या पुरोगामी ब्राह्मणांना सन्मानित केले. एकदा तर आपण ब्राह्मणांना घातलेल्या शिव्या चुकीच्या होत्या अशी कबुलीही दिली. बदलत चाललेल्या परिस्थितीचे हे भान होते आणि ज्यांना हे भान नव्हते त्यांनी ते प्रस्थापितांना जाऊन मिळालेत अशी ओरडही केली. माझ्या मते भविष्यातील लढा हा पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असाच आहे आणि पुरोगामी व प्रतिगामी हे कुठल्याही जाती, वर्ण, वर्ग, धर्मात असू शकतात. त्यामुळे ढसाळांच्यातील बदल हा ते पुरोगामी, अधिक पुरोगामी बनल्याचे लक्षण होते. एका प्रतिगामी पक्षात राहून ढसाळ अधिकाधिक पुरोगामी बनावेत हा विरोधाभास मात्र विचित्रच!
० ० ०
या सगळ्याचा परिणाम म्हणून ‘जागरण घालणारा शतकांचा चक्रधर’, ‘मन चंगा तो कठोती में गंगा’ यांसारख्या वक्रोक्ती कवितांतून यायला लागल्या. ‘‘अमृताचा धनू वर्षो न वर्षो या समाधीत मला कोंडून घ्यायचं नाही मी तर अजूनही उद्याच्या भाकरीची चिंता करतो आहे’’ अशा साध्या सरळ ओळींची संख्या वाढू लागली. मात्र ढसाळ साधे लिहिणारे झाले याचा अर्थ ते सोप्पे आणि स्वस्त लिहिणारे झाले, असा मात्र नाही. फक्त सरळ दिसणारे सत्य सरळ भाषेत मांडण्याची त्यांची कला अधिक कुशल झाली एवढेच.
० ० ०
ढसाळांच्या नंतर काय, या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे नाही. एक मात्र खरे की, यापुढील दलित कविता फक्त दलित समाजात जन्मलेल्या व्यक्तीच लिहितील ही गॅरन्टी मात्र आता संपणार हे नक्की. दलित ही संज्ञाही हळूहळू जातीय आणि वर्णीय अर्थ गमावत जाऊन वर्गीय होत जाणे अटळ आहे. याचा अर्थ कम्युनिझमचे पुनरागमन होणे असा नाही, तर सर्वहारा वर्गाच्या दृष्टिकोनातून एका नव्या तात्त्विक मांडणीचा व चळवळीचा उदय असा आहे. मात्र ही नवी तात्त्विक मांडणी करणाऱ्या वा कवटाळणाऱ्या कवींना नामदेव ढसाळांची कविता निरंतर प्रेरणा देत राहील एवढे काम मात्र या नामदेवाने करून ठेवले आहे हे नक्की. ढसाळांचे हे सर्वात मोठे यश आहे.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2014 at 01:02 IST

संबंधित बातम्या