कधी बिपाशा बासू- जॉन अब्राहम, तर कधी पूनम पांडे किंवा मग नेहमीचे यशस्वी म्हणून सलमान खान किंवा सचिन तेंडुलकर असे या देशातील नेहमीच्या चर्चेचे विषय असायचे. गुगलला सर्च इंजिनच्या क्षेत्रातील स्पर्धकांची जाणीव झाल्यानंतर तर आता त्यांनी दर महिन्याला भारतातील सर्वाधिक चर्चेच्या विषयाची क्रमवारीच द्यायला सुरुवात केली आहे. भारतात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून ते अगदी आता मोदी सरकार स्थापन झाल्याच्या घटनेला दोन महिने होईपर्यंत चर्चाच्या या यादीत पहिल्या स्थानावर पंतप्रधान नरेंद्र मोदीच विराजमान झाले आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये बहुमत मिळाल्यानंतर तर मोदींनी हे स्थान सोडलेलेच नाही. ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइटस्च्या बाबतीतही मोदीच आघाडीवर आहेत. निवडणुका जिंकल्यानंतर आईचा आशीर्वाद घेण्यास गेलेले मोदी, संसदेच्या पायरीवर डोके ठेवणारे मोदी ही छायाचित्रे देशातील सर्वाधिक वितरित झालेली छायाचित्रे ठरली. निवडणुकाजिंकल्यानंतरचे त्यांचे भाषण, वाराणसीतील पहिले भाषण, संसदेमधील पहिले भाषण आणि आता यंदाच्या स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेले पहिले भाषण हे सारे यूटय़ुबवर अधिराज्य गाजवणारे ठरले आहे. यात गाजावाजाच अधिक आहे, अशी टीका करण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे. पण त्यांचा आवाज अतिशय क्षीण आहे. काँग्रेसच्या टीकेला तर कुणीच गांभीर्याने घेत नाही, अशी अवस्था आहे. तिथे पक्षामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती, राहुल गांधी यांच्यावर होणाऱ्या टीकेची! कधी नटवर सिंग उठतात आणि राहुल गांधींवर टीका करतात तर कधी दिग्विजय सिंग हुंकारा देतात. मग कधी इतर कुणी नेता बोलू लागतो. आता तर ए. के. अँटोनी यांनी सादर केलेल्या पराभवाची मीमांसा करणाऱ्या अहवालातही राहुल गांधींकडेच अंगुलिनिर्देश केल्याची चर्चा आहे. तेव्हा काँग्रेसची अवस्था त्यांना स्वत:चे सावरतानाच मुश्कील अशी आहे. दुसरीकडे ममता आणि जयललिता या दोघांचेही पाठीराखे आक्रमक झाले आहेत. कधी ते सरकारविरोधात दंड थोपटण्याची भाषा करतात तर कधी मोदींवर थेट टीका करण्याचा प्रयत्न करतात. आजवर त्यांच्या कोणत्याही टीकेला मोदींनी उत्तर न देता आपण त्यांना मोजत नाही, असे दाखवून दिले आहे. अमित शहांच्या निवडीनंतर तर आता भाजपाची सूत्रेही मोदींच्याच हाती असल्याचे संकेत सर्वत्र गेले आहेत. एकुणात काय तर ‘सबकुछ मोदी’ असेच वातावरण आहे!
या सर्व पाश्र्वभूमीवर यंदाचे मोदी यांचे भाषण स्वातंत्र्यदिनी पार पडले. या भाषणातील काही बाबी सामान्य माणसाला खूप भावल्या. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामान्य हिंदी भाषेत साधलेला थेट संवाद! यंदा पंतप्रधानांनी भाषण करताना समोर बुलेटप्रूफ काचही नव्हती. खरे तर त्याने काही फार फरक पडत नाही, कारण सुरक्षाव्यवस्था कडेकोटच होती. पण तरीही सामान्य माणसासाठी या बाबी त्याला खूश करणाऱ्या असतात. एरवी पंतप्रधानांचे भाषण लिहिलेले असते तेच वाचले जाते. इथे सारे काही उत्स्फूर्त वाटावे, असे होते. मोदी हे खरे तर चांगले चतुर राजकारणी आहेत. म्हणून तर ते महाराष्ट्रात आल्यानंतर छत्रपती शिवरायांचा उल्लेख आवर्जून करतात. राज्यातील त्यांची सर्व सार्वजनिक भाषणे काढून पाहा म्हणजे लक्षात येईल. तर इतरत्र गेल्यानंतर ते स्थानिक मानिबदूचा उल्लेख करतात.. ती स्थानिक जनतेला घातलेली भावनिक साद असते. त्यांना मिळणाऱ्या टाळ्यांच्या माध्यमातून ते सारे नेमके पोहोचल्याची पावती त्यांना मिळते. भाषणात त्यांनी घेतलेल्या अल्पविरामांवरून त्यांच्यातील चातुर्य लक्षात येऊ शकते. कमी-अधिक फरकाने अनेक राजकीय नेत्यांकडे ते असते. मोदींकडे ते अंमळ अधिकच आहे!
मोदींच्या भाषणातील महत्त्वाच्या मुद्दय़ांमध्ये नियोजन आयोगाच्या विसर्जनाचा समावेश होतो. सद्य:स्थिती पाहता ते गरजेचेच होते. कारण तज्ज्ञांची संख्या कमी आणि राजकीय व्यक्तींची वर्णी अधिक असेच स्वरूप त्याला प्राप्त झाले होते. ज्यांना मंत्रिमंडळात बसविता येत नाही त्यांना नियोजन आयोगाच्या मखरात बसवायचे अशी प्रथाच जणू काही गेल्या काही दशकांमध्ये पडून गेली होती. गेल्या अनेक वर्षांमध्ये नियोजन आयोगावर कोणत्या व्यक्तींनी काम केले याचा आढावा घेतला तर हे सहज लक्षात येईल. या निर्णयाच्या निमित्ताने ती प्रथा संपुष्टात यावी अशी अपेक्षा आहे. त्या जागी राष्ट्रीय विकास सुधारणा आयोग येणार आहे. या आयोगावर अशी राजकीय वर्णी असणार नाही, अशी अपेक्षा आहे. विदेशात होणाऱ्या वैज्ञानिक संमेलन आणि चर्चासत्रांना यापुढे नोकरशहा किंवा राजकारणी जाणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह निर्णय मोदी सरकारने घेतला होता. तशाच आशयाचा निर्णय या आयोगाच्या बाबतीतही घेतला जाईल आणि केवळ त्या त्या विषयातील तज्ज्ञ (म्हणजे त्या विषयांतील सरकारचे ‘तज्ज्ञ हुजरे’ नव्हेत!) सहभागी असतील असा निर्णय सरकारने घेणे आवश्यक आहे. या आयोगात राज्यांना चांगले प्रतिनिधित्व देण्याविषयीही मोदींनी सूतोवाच केले आहे. हेही चांगले पाऊल आहे.
दुसरे चांगले पाऊल होते ते पंतप्रधान जनधनविकास योजनेचे. त्याअंतर्गत देशातील सर्व गोरगरिबांना सरकारतर्फे बँक खाते उघडून दिले जाणार असून त्यांचा एक लाख रुपयांचा विमाही काढला जाणार आहे. हे खूपच चांगले पाऊल आहे. त्या निमित्ताने वित्तीय जाळे सामान्य माणसापर्यंत खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचेल! मोदींचे भाषण आणि ते उद्योगधंद्याबद्दल बोलणारच नाहीत असे होणारच नाही. त्यांनी भारतीय बनावटीच्या उत्तम दर्जाच्या उत्पादनांचा विषय काढला आणि ते आपले स्वप्न असल्याचे सांगून त्याचे वर्णन ‘झीरो डिफेक्ट, झीरो इफेक्ट’ असे केले. खरे तर प्रथमदर्शनी ती विरोधाभासात्मक घोषणा वाटते. मात्र त्याचे स्पष्टीकरण त्यांनी केल्यानंतर मात्र त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, त्याची उकल झाली. आपल्याला जे म्हणायचे आहे ते सारे काही घोषणेच्या किंवा घोषवाक्याच्या रूपात बसविण्याचा नाद आता पंतप्रधानांनी सोडायला हवा. निवडणूकजिंकल्यानंतरच्या भाषणापर्यंत ते ठीक होते आता त्यांच्या स्थिर सरकारला घोषणांची गरज नाही तर त्यांनी कर्तृत्वसिद्ध काम करण्याची गरज आहे! मात्र अद्याप ते घोषणा आणि घोषवाक्यांमध्येच अडकलेले दिसतात.
त्यांच्या या संपूर्ण भाषणामध्ये गंगा शुद्धीकरण योजनेचा उल्लेख कुठेही आला नाही. तसाच त्यांच्या पक्षाच्या निवडणूक- पूर्व असलेल्या भ्रष्टाचार किंवा काळा पैसा आदी कोणत्याही घोषणांचा उल्लेख त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आला नाही. तसाच एक उल्लेख मात्र दिसायला चांगला वाटला तरी खटकला. तो म्हणजे सर्व पापांना मागे सोडून नवी वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले. देशाच्या प्रगतीसाठी दहा वर्षे धर्मजातिभेद आपण दूर सारू, असे आवाहन त्यांनी केले. असे आवाहन करणे यात नवीन काहीच नाही पण ‘दहा वर्षांसाठीच का?’ असा प्रश्न मनात कायम राहतो. त्या राष्ट्रहितैशी नसलेल्या भावनेचे समूळ उच्चाटन का नाही करायचे? त्यांनी दहा वर्षांचा उल्लेख करणे हे मात्र केवळ अनाकलनीय होते की, दहा वर्षे आपण सत्तेत असू त्या काळात तरी हे दूर ठेवा, असे त्यांना सुचवायचे होते?
स्त्री-भ्रूणहत्या आणि स्वच्छता या दोन्ही मुद्दय़ांना त्यांनी हात घातला. तरुण मुलींना त्यांचा स्त्री-भ्रूणहत्येबाबतचा उल्लेख आवडला तर स्वच्छतेच्या मुद्दय़ाचा उल्लेख थेट पंतप्रधानांनी देशपातळीवर स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात करावा, याचे अनेकांना अप्रूप वाटले! पण हे दोन्ही मुद्दे अप्रूप वाटण्यापलीकडे जाणे हे आपल्यासाठी गरजेचे आहे! शेजारी असलेल्या छोटेखानी भूतानला जे जमते ते आपल्याला जमू नये, याचे वैषम्य अलीकडेच भूतान दौऱ्यावरून आलेल्या पंतप्रधानांच्या मनात असावे का?
सध्या मोदींचे भाषण हा देशभरात कौतुकाचा विषय ठरला आहे. ‘कैसे त्यांचे बोलणे, कैसे त्यांचे चालणे’ अशाच पद्धतीने हे कौतुक सुरू आहे. त्यांनी केलेल्या घोषणांच्या समर्थनार्थ व्हॉस्सप आणि सोशल नेटवर्किंग साइटस्वरून संदेश फिरत असतात. त्यात मग बुलेटप्रूफ काचेशिवाय बोलणाऱ्या मोदींची छाती कशी बुलंद आहे, त्याचे दाखले दिले जातात. हे सारे संदेश प्रचारार्थच तयार केले जातात आणि ते मोदींचा प्रसार व मोबाइल कंपन्यांचा महसूल वाढविण्याचेच काम करतात.. पण जनभावना ही काही सोशल नेटवर्किंग साइटवरची ‘पोस्ट’ नाही; याचे भान पंतप्रधानांनी आणि भाजपानेही ठेवायला हवे. अन्यथा ज्या तरुणाईचे ते आज गोडवे गात आहेत तीच तरुणाई त्याच भाषेत त्यांना विचारेल, मोदीजी हे काय चाललेय? व्हॉस्सप मोदीजी?