19 August 2018

News Flash

भेट नर्मदेची!

आपल्या देशातल्या पाच महत्त्वाच्या नद्यांमधली एक म्हणजे नर्मदा नदी. तिच्या परिक्रमेला धार्मिक महत्त्व आहे. पण खरं म्हणजे स्वत:चा स्वत:शी संवाद घडवणारी, स्वत:ला स्वत:ची नव्याने ओळख

| April 3, 2015 01:04 am

lp78आपल्या देशातल्या पाच महत्त्वाच्या नद्यांमधली एक म्हणजे नर्मदा नदी. तिच्या परिक्रमेला धार्मिक महत्त्व आहे. पण खरं म्हणजे स्वत:चा स्वत:शी संवाद घडवणारी, स्वत:ला स्वत:ची नव्याने ओळख करून देणारी अशी ही परिक्रमा आहे.

मी कधी काळी नर्मदा परिक्रमा करेन असं वाटलंच नव्हतं. मी देव मानते पण धार्मिक कर्मकांड किंवा ठिकठिकाणी जाऊन देवदर्शन घेत नाही. त्यामुळे कुठल्याही यात्रांना वगैरे जायला मी फार उत्सुक नसते. पण नर्मदा मातेचं बोलावणं आलं आणि माझ्याकडून परिक्रमा पार पडली. नर्मदा मातेच्या आशीर्वादाविना ही कठीण, साहसी, अवघड तरीही धार्मिक अशी परिक्रमा घडणं माझ्यासाठी तरी स्वप्नवत होतं.
माझ्या मैत्रिणी एका ट्रॅव्हल्सबरोबर नर्मदा परिक्रमेला जाणार होत्या. मी पण मी त्यांच्यात सामील झाले. इंटरनेटवर परिक्रमेची माहिती गोळा करायला सुरुवात केली. लायब्ररीत जाऊन परिक्रमेवरची जगन्नाथ कुंटे, सुहास लिमये, गंगाधर कुलकर्णी या लेखकांची पुस्तके वाचायला आणली. यू टय़ूबवर ‘नर्मदा परिक्रमा’ प्रतिभा चितळे यांचे परिक्रमेचे अनुभव कथन करणारे १३-१४ मिनिटांचे १८ भाग ऐकले. या सगळ्या गोष्टींमुळे माझा उत्साह वाढण्याऐवजी भीती मात्र वाढत चालली. आपण ठीक केलं ना परिक्रमेला जायचं ठरवून असंही वाटलं. मग ‘नर्मदा परिक्रमा, बसने किंवा कारने’ हा पर्यायही पाहिला, नकाशा पाहिला, त्याचा अभ्यास केला तरीही भीती कमीच होत नव्हती. पूर्वी बस, कार अशी साधने नव्हती तेव्हा लोक चालत परिक्रमा करायचे, आता अनेक आधुनिक साधनं उपलब्ध आहेत. घाबरायचं काहीच कारण नाही असं मनाला बजावलं.
आणि मग निघालो आम्ही बारा जणी. मुंबई ते इंदोर विमानाने प्रवास करून इंदोर एअरपोर्टवर उतरलो. बसने इंदोर ते ओंकारेश्वर हा अडीच-तीन तासांचा प्रवास केला. नर्मदेची पूजा करून परिक्रमेचा संकल्प सोडायला दुसऱ्या दिवशी सकाळी ओंकारेश्वरला नर्मदेच्या घाटावर जमलो. आदल्या दिवशी ब्रिजवरून पलीकडे जाऊन ओंकारेश्वराचे दर्शन घेऊन आलो होतो. आता यापुढे नर्मदा ओलांडायची नव्हती. नर्मदा सतत आपल्या उजव्या बाजूला राहील अशी परिक्रमा पुरी करायची होती. त्यामुळे ममलेश्वर या दक्षिण तटावरील देवळाचे दर्शन घेऊन नर्मदेत स्नान केलं व नर्मदेच्या घाटावर पायऱ्यांवर बसून नर्मदेची यथासांग पूजा केली. एका बाटलीत नर्मदेचं पाणी भरून घेतलं व पुढील प्रवासाला सुरुवात केली.
lp79नर्मदेच्या दक्षिण तटावरून ओंकारेश्वर ते शहादा हा प्रवास केला व तिथे मुक्काम करून तिसऱ्या दिवशी प्रकाशा गावात केदारेश्वर, काशी विश्वेश्वर व पुष्पदेतेश्वर अशी तीन देवळे बघितली. तापी नदीचा घाट पाहिला. संध्याकाळी अंकलेश्वर येथे मुक्काम. तिथे रात्री लवकर झोपलो कारण दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठायचं होतं. परिक्रमेतला अत्यंत कठीण असा चौथा दिवस होता. पहाटे चारला उठून पाच वाजता कठपोर नावाच्या छोटय़ाशा गावात आलो. इथून पुढे चार-साडेचार तास लहानशा बोटीतून प्रवास करायचा होता. इथे नर्मदा सागराला मिळते तेव्हा तिचं पात्र २१ कि.मी. एवढं विस्तीर्ण झालेलं असतं. नर्मदा ओलांडायची नाही म्हणून या ठिकाणी तिला सागरातून वळसा घालून जायचं. नर्मदेला पुरेसं पाणी आलं की बोटी निघतात. रोज आठ बोटी निघतात. बोटी कसल्या पन्नास माणसं दाटीवाटीने बसतील अशी होडकीच होती ती! पहाटे साडेपाच ते साडेआठ तीन तास वाट पाहिल्यावर ‘पाणी आलं पाणी आलं’ असा ओरडा झाला. सगळे लोक होडय़ांकडे धावायला लागले. आमच्या ट्रॅव्हल्सची स्पेशल होडी होती. चिखल तुडवीत तुडवीत होडय़ांजवळ पोहोचायचं मग टायरवर एक पाय देऊन दुसरा पाय होडक्यांत टाकायचं दिव्य पार करून फळफुटांवर स्थानापन्न झालो. पाय चिखलाने भरलेले, पण होडक्यात न पडता चढल्याचा आनंद होता. अशा होडक्यातून पुढे साडेचार तास ५० कि.मी.चा प्रवास सागरातून केला. या सागराला रेवा सागर असं म्हणतात. गुजराथेत भडोचजवळ मिठी तलाई गाव आहे तिथे कंबरभर पाण्यात नावाडय़ाने आम्हाला उतरवले. या प्रवासात कुठेही कसलीही सुरक्षेची उपाययोजना नव्हती. ताशी दहा कि.मी. वेगाने होडकी धावत होती. इथे सरकारतर्फे काहीही सोयी नव्हत्या. कुणी एक तथाकथित महाराज आहे तो इथला सर्वेसर्वा आहे. सरकार काही करत नाही किंवा तो सरकारला दादागिरी करून मध्ये येऊ देत नाही ते माहीत नाही. असो, तर कंबरभर पाण्यात उतरल्यावर हळूहळू चालत पाण्याबाहेर आलो तर परत हा एवढा चिखल सामोरा आला. आधीच्या किनाऱ्यावर १५ पावले चिखलातून चाललो तर आता ५० पावले चालायची होती. प्रत्येक पाऊल चिखलात रुतत होते. इथे मला माझा अश्वत्थामा भेटला. पुस्तकांतून वर्णने वाचली होती की, नर्मदा परिक्रमेत अश्वत्थामा भेटतो वाट दाखवायला. इतर बोटींतून अनेक खेडूत उतरले होते. त्यातल्या एकाकडे खांद्यावर दोन काठय़ा होत्या, मी त्यांना ‘दंडा’ द्यायची विनंती केली आणि त्यानेही तो दिला मला. त्या दंडय़ाच्या आधाराने एक एक पाऊल टाकत कसा तरी तो चिखल पार केला. आता आमची बस ब्रिज क्रॉस करून मिठी तलाईला येऊन उभी होती. आम्हाला ब्रिजवरून नर्मदा ओलांडायची नव्हती म्हणून हा होडक्याचा द्राविडी प्राणायाम. जेवणानंतरपुढे प्रवास चालू झाला. किचन स्टाफ बरोबर असल्याने जेवणाची आबाळ होत नव्हती, उत्तम घरगुती जेवण रोज मिळत होतं. पुढचा टप्पा होता गरुडेश्वर. हा अविस्मरणीय असा सागरातला प्रवास पार पडल्याचा आनंद होता.
गरुडेश्वरला नर्मदेचा घाट अतिशय सुंदर आहे. सकाळच्या वेळी उत्साहात घाटाच्या पायऱ्या उतरून नर्मदेला अघ्र्य दिलं. विस्तीर्ण पात्र होतं इथे नर्मदेचं, अगदी प्रसन्न वाटत होतं. पण नंतर घाटाच्या उंच उंच पायऱ्या चढताना मात्र नाकीनऊ आले, पण कालच्या होडीच्या अनुभवानंतर आता हा त्रास काहीच वाटत नव्हता. गरुडेश्वरपासून १३ कि.मी.वर असलेले सरदार सरोवर पाहायला गेलो. नर्मदा नदीची वाटचाल हा जसा निसर्गाचा चमत्कार आहे तसं सरदार सरोवर हे मानवनिर्मित आश्चर्य आहे. सरदार सरोवर हे प्रचंड मोठं धरण तोशिबा या जपानी कंपनीच्या साहाय्यानं निर्माण केलं आहे.
आमच्या टूर गाइडनं विशेष परवानगी मिळवल्यामुळे आम्हाला हे धरण आतून बघायला मिळालं. स्पेशल बसनं, स्पेशल सिक्युरिटी चेकनंतर जमिनीखाली झालेलं टर्बाइन्सचं काम बघायला मिळालं. जमिनीखाली सहा मोठे टर्बाइन्स होते, रोज हजार टन वीज निर्मिती करायची क्षमता होती या टर्बाइन्सची. मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्र या तीन राज्यांना या धरणामुळे वीज पुरवली जाते. शिवाय पाणीपुरवठाही होतो. ही टर्बाइन्स दुरुस्तीसाठी उघडावी लागली तर ४०० टन्स वजन उचलू शकतील अशा क्रेन्स लावल्या होत्या. सगळंच एकूण अवाढव्य काम होतं. हे सारं आम्हाला ‘याचि देही याचि डोळा’ बघायला मिळालं. म्हणून आम्ही स्वत:ला फार भाग्यवान समजतो. अतिशय भारावलेल्या मनानं आम्ही तिथून बाहेर पडलो. बाहेर आल्यावर धरण पुन्हा एकदा नवीन नजरेनं पाहिलं. सामानाची ने-आण करायला वर रोप वे होता. सामान म्हणजे धरणाचं हं! बाहेर सरदार पटेलांचा भव्य पुतळा होता. फारच अद्भुत असा अनुभव होता.
lp80दुपारी जेवणानंतर महेश्वरला प्रयाण. रात्री मुक्काम. पुढच्या दिवशी महेश्वर फोर्ट, महेश्वर घाट व खरेदी आटपून इंदोरला प्रयाण. इंदोर दर्शन करून पुढच्या दिवशी नेमावरला रवाना. नेमावर हे नर्मदेचं नाभीस्थान आहे. अमरकंटक हे नर्मदेचे उगमस्थान आणि रेवासागर येथे ती समुद्राला मिळते. नेमावर हे मध्यस्थान आहे. इथे मात्र नर्मदेचा घाट नीट बांधलेला नव्हता व भिकाऱ्यांनी तो फार अस्वच्छ केलेला होता. इथे कसंबसं बाटलीतलं नर्मदेचं पाणी बदललं व सिद्धेश्वर मंदिर बघायला गेलो. मंदिरावर भरपूर कोरीव काम केलेलं होतं. हे मंदिर पांडवांच्या काळातलं आहे, असं मानलं जातं.
नेमावरहून भोपाळ व भोपाळहून जबलपूरला गेलो. तिथे नर्मदेच्या आजूबाजूला मार्बल रॉक्स् आहेत. तिथे एक तास बोटिंग केलं. नर्मदा ओलांडली जाणार नाही याची काळजी घेतली. डोळ्यांचे पारणे फिटेल असे मार्बल रॉक्स आहेत. इकडे पाहू की तिकडे असं होऊन गेलं होतं. उंचच उंच मार्बलचे डोंगर दुतर्फा. मस्त दृश्य होतं, पण त्या उंच डोंगरावरून दहा-बारा वर्षांची मुलं दहा-वीस रुपये मिळवण्यासाठी उडय़ा मारत होती. ते पाहून आपल्या देशात माणसाचा जीव किती स्वस्त आहे, असं वाटून गेलं. त्यानंतर जवळच असलेला धुवाधार धबधबा पाहिला. नर्मदेची इतकी विविध रूपे बघायला मिळाली या परिक्रमेत. रात्री जबलपूरला राहून सकाळी उठून अमरकंटकला जायला निघालो. खूप मोठा, लांबचा प्रवास होता. दुपारी जेवणानंतर दोन तास रस्ता अतिशय खराब होता. चांगले रस्ते आहेत, ब्रिजही आहेत, पण आम्हाला नर्मदा ओलांडायची नव्हती म्हणून हा खराब रस्ता निवडावा लागला होता. संध्याकाळी पाच वाजता अमरकंटकला पोहोचलो. इथे मात्र उत्तम थंडी होती, आत्तापर्यंत बॅगेतच असलेले गरम कपडे आता काढावे लागले होते. तीन हजार फुटांवर होतो आम्ही त्यामुळे थंडी असणं स्वाभाविक होतं. आम्ही सगळेच नर्मदेचा उगम व मंदिर बघायला उत्सुक होतो. संध्याकाळी देवळात गेलो, पण नर्मदेचं कुंड ओलांडलं नाही. दुसऱ्या दिवशी उठून नर्मदा मातेच्या मंदिरात पूजा केली व नंतर कपिलधारा व दुग्धधारा हे दोन धबधबे बघितले. जंगलातून जरा कठीणच रस्ता होता धबधब्यांपर्यंत. पण धबधबे फार सुंदर होते. दुग्धधाराला तर नर्मदेचं पाणी इतकं मधुर होतं की, पीतच राहावं असं वाटत होतं, पुन:पुन्हा पाणी प्यायलो व परत निघालो. रस्ता अतिशय खडकाळ व निसरडा होता, पण निभावलं. संध्याकाळी नर्मदेची आरती बघितली. तिथे एक दगडी हत्ती होता. त्याच्या चार पायांच्या मधून जो पार जाऊ शकतो तो पुण्यवान समजला जातो. आमच्यातले बारीक लोक त्यातून पार झाले. आम्ही प्रयत्नच केला नाही.
lp81दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पाचला जंगलातून नर्मदेच्या उगमाला वळसा घालून उत्तर तटावरून परत दक्षिण तटावर आलो. इथे नर्मदेचं कुंड व देऊळ होते. इथेही पूजा केली व पुढे निघालो. आता जवळपास पाऊण प्रवास पार पडला होता व फक्त पाव टप्पा उरला होता. आमच्या बसेस ब्रिज क्रॉस करून येऊन थांबल्या होत्या. अमरकंटक ते नरसिंगपूर हा प्रवासही मोठा होता. नरसिंहाचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी होशंगाबादला गेलो. इथे नर्मदेचा घाट अतिशय मोठा व सुरेख होता. संध्याकाळी नर्मदेत दिवे सोडले. नर्मदेची आरती केली. पुढच्या दिवशी परत ओंकारेश्वरला पोहोचलो व परिक्रमा निर्विघ्नपणे पार पडली म्हणून खूप खूप समाधानी होतो.
संध्याकाळी नर्मदा स्नान, पूजा व आरती केली. जमलं आपल्याला जमलं, असं आनंदानं ओरडावंसं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रिजवरून पलीकडे जाऊन ओंकारेश्वराला बरोबर आणलेल्या नर्मदेनं स्नान घातलं.
परिक्रमा पूर्ण झाली. मनात तृप्त भाव होते. नर्मदा परिक्रमा आपल्याला सुजाण करते, प्रगल्भ करते. छोटे- मोठे हेवेदावे विसरले जातात. मन विशाल होतं. अशी ही माझी परिक्रमेची कहाणी!
उमा सहस्रबुद्धे

First Published on April 3, 2015 1:04 am

Web Title: narmada parikrama