15 August 2020

News Flash

बस नेकलेस सही होना चाहिये…

कुठलीही साडी असो की ड्रेस, त्याच्यावर नेकलेस घातलाच पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ते अगदीच चुकीचं आहे. म्हणूनच नेकलेस कधी घालायचा आणि कधी नाही

| November 28, 2014 01:07 am

lp56
lp57कुठलीही साडी असो की ड्रेस, त्याच्यावर नेकलेस घातलाच पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ते अगदीच चुकीचं आहे. म्हणूनच नेकलेस कधी घालायचा आणि कधी नाही हे आपल्याला माहीत असलंच पहिजे-

अ‍ॅक्सेसरीजचा विषय चालू आहे आणि साहेबांचा विषय नाही निघणार असे होऊच शकत नाही. एका सिनेमामध्ये शाहरुखचा डायलॉग आहे, ‘हमारा जिक्र तो हुआ हररोज फसानो में, तो क्या हुआ अगर देर हुई आने में’. या डायलॉगचा थाट या साहेबांना अगदी तंतोतत जुळतो. गेले काही दिवस आपण वेगवेगळ्या अ‍ॅक्सेसरीजबद्दल बोलतोय, पण त्यामुळे यांच्याकडे दुर्लक्ष झालंय, असं अजिबात नाही. आणि हे साहेबांनाही ठाऊक आहे. त्यामुळे तेही याबाबत निश्िंचत आहेत. तुम्हीही विचार करायला लागला असाल ना.. मी ज्याच्याबद्दल इतकं भरभरून बोलतेय, तो साहेब नक्की आहे तरी कोण? तर हे आहेत अ‍ॅक्सेसरीजच्या विश्वातील शहेनशहा, ज्यांच्याशिवाय कोणत्याही मुलीचाच काय स्त्रीचा वॉडरोब पूर्ण होणे शक्य नाही. त्यांच्या असण्याने तुमच्या लुकला चार चांद लागतातच, पण एखाद दिवशी ते नसले, तरी त्यांची कसर भरून काढण्यासाठी खटपट करावी लागते. तसे ते शूज, बॅगसारख्या अत्यावश्यक अ‍ॅक्सेसरीजमध्ये मोडत नाहीत, पण त्यामुळे त्यांचे महत्त्व तसूभरही कामी होत नाही. त्यांचे नाव आहे ‘नेकलेस’.

त्यांची विविध रूपे आहेत आणि रूपांप्रमाणे त्यांना वेगवेगळी नावेही आहेत. गळ्याभोवती विराजमान होणारे ते नेकलेस किंवा कंठहार, नाजूकशी चेन आणि त्याला ‘पेन्डंट’ असेल तर पेन्डंट चेन हे त्यांचे मुख्य प्रकार. त्यानंतर लक्ष्मीहार, ठुशी, टेंपल नेकलेस, कुंदनहार असे त्यांचे प्रांतागणिक आणि रूपानुसार उपप्रकार पडत जातात. एखाद्याा स्त्रीसमोर दुसरी स्त्री आली की, पहिल्यांदा एकमेकींच्या गळ्यावर नजरा जातात. प्रामुख्याने एखाद्या सणसमारंभाला किंवा लग्नाच्या वेळी तर असे प्रसंग हमखास होतात. त्यामुळे या नेकलेस महाशयांना नाराज करून अजिबात चालत नाही.

आधी म्हटल्याप्रमाणे ज्याप्रमाणे या नेकलेसचे प्रांतानुसार किंवा संस्कृतीनुसार प्रकार पडतात, त्याचप्रमाणे कधी, कुठे, कोणत्या प्रकारचा नेकलेस घालावा याचेही सोप्पे नियम आहेत. अर्थात हे नियम बंधनकारक नाहीत, पण ते पाळल्यास नेकलेसच्या निवडीत आपण कधीच चुकू शकत नाही. सर्वात प्रथम म्हणजे, प्रत्येक ड्रेस किंवा साडीवर नेकलेस घातलाच पाहिजे, हा हट्ट मनातून काढून टाका. कारण कित्येकदा बंद गळ्याच्या ड्रेस, एम्ब्रॉयडर्ड ब्लाऊज, जाड दुपट्टय़ासोबत नेकलेस हवाच, या हट्टापायी आपण तो नेकलेस घालतो आणि अख्खा लुक बिघडवून टाकतो. कित्येकदा आपण एखाद्या ड्रेसवर नेकलेस घालत नाही आणि तेव्हा समोरची ‘बर झालं तू नेकलेस नाही घातलास, गळ्याभोवतीची एम्बॉयडरी उठून दिसतेय,’ असं बोलून जाते. तेव्हा लक्षात येतं, ‘घरातून निघताना नेकलेस घालण्याचा मोह आवरला ते किती बर झालं ते’. त्यामुळे ‘नेकलेस इज मस्ट’ हा नियम आधी डोक्यातून काढून टाका.

आपल्या ड्रेसच्या किंवा ब्लाऊजच्या गळ्याच्या आकारानुसार नेकलेस कोणता घालायचा हे ठरवणे सर्वात सोप्पे असते. त्यामुळे डीप नेक असेल तर त्यावर गळ्याभोवती बसणारा नेकलेस घालणे उत्तम. तसेच जर बंद गळ्याचे प्लेन टी-शर्ट किंवा टय़ुनिक घालणार असाल तर त्यावरही अशा प्रकारचा नेकलेस शोभून दिसतो. कित्येकदा आपल्या साडीचा ब्लाऊज डीप नेकचा असतो पण पदरावर मोठी एम्ब्रॉयडर्ड बॉर्डर असते, अशा वेळीसुद्धा अजून मोठा नेकलेस घालणे टाळावे. सध्या समोरच्या बाजूला नाजूक चेन आणि मागे डेकोरेटिव्ह गोफ अशा प्रकारचे उलटे नेकपीस बाजारात दिसतात. बॅकलेस ड्रेसवर असे नेकलेस शोभून दिसतात. त्यामुळे कधी तरी ड्रेसिंगमध्ये बदल म्हणून हे ट्राय करायला हरकत नाही.

‘पेन्डंट’ हा असा प्रकार आहे जो बहुतेक सगळ्यावर मॅच होतो. मग तुमच्या ड्रेसचा गळा डीप असो किंवा पोलो नेक. पेन्डंट त्यावर खुबीने उठून दिसते. त्यामुळे कॉलेजला जाणाऱ्या तरुणींमध्ये पेन्डंट्स पॉप्युलर असतात. फॉर्मल ते पारंपरिक सगळ्या प्रकारच्या लुकवर पेन्डंट्स उठून दिसतात, त्यामुळे यांच्या डिझाइनमध्ये भरपूर विविधता पाहायला मिळते. पण अर्थात असे असले तरी पेन्डंटची लेन्थ योग्य असणे गरजेचे असते. स्टँड lp58कॉलरच्या ड्रेसवर छोटय़ा किंवा लांब चेनचे पेन्डंट शोभून दिसते. मध्यम लांबीची चेन घातल्यास ते मध्ये अडकल्यासारखे वाटते. पोलो नेक किंवा बंद गळ्याच्या ड्रेसवर गळ्याला घट्ट बसेल अशा चेनचे पेन्डंट घातल्यास उत्तम.

नेकपीसच्या रंगावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतात. गोल्ड, खास करून मॅट गोल्ड रंगाचे नेकपीस बहुतेक सर्व रंगांच्या कपडय़ांवर मॅच होतात. पण सिल्व्हर रंगाचे नेकपीस घालताना खास काळजी घावी लागते. कित्येकदा साडी किंवा ड्रेसची बॉर्डर गोल्ड असते पण आपण फक्त रंग मॅच होतोय म्हणून सिल्व्हर बेसचा नेकपीस त्यावर घालतो. जो अजिबात चांगला दिसत नाही. तसेच कुंदन नेकपीससुद्धा सगळ्या रंगांवर खुलून दिसत असला तरी ड्रेसच्या कलरला मॅचिंग नेकपीस निवडण्यापेक्षा कॉन्ट्रास नेकपीस निवडला तर तो अधिक चांगला दिसतो. मोत्यांचे दागिनेसुद्धा कित्येक रंगांवर खुलून दिसतात. पण त्यातही बेस कलर कुठला आहे हे नक्की तपासा.

नेकपीस असला म्हणजे कानातले किंवा बांगडय़ा हव्याच असाही हट्ट नसतो. त्यात नेकपीस आणि इअररिंग्ज मॅचिंग असलेच पाहिजेत असाही काही नियम नसतो. सध्या नेकपीस वेगळा आणि इअररिंग्ज वेगळ्या घालण्याचा ट्रेंड आहे. फक्त त्यात रंगाचा किंवा पॅटर्नचा एक समान धागा असला पाहिजे. बाकी काही नको. मग हे महाराज मिरवायला सज्ज असतात. एकदा यांची निवड नीट झाली की, इतर अ‍ॅक्सेसरीजची काळजी करायची गरज नसते. मग लागा तयारीला.. योग्य नेकपीस निवडायच्या..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2014 1:07 am

Web Title: necklace
टॅग Fashion,Ramp Walk
Next Stories
1 मोहिनी गडद रंगांची ..
2 नांदी फ्युचरिस्टिक फॅशनची
3 ऑत कुटुर…
Just Now!
X