– सुनीता कुलकर्णी

नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अनुराग बसू यांच्या ‘लुडो’ सिनेमाची, त्यातल्या सगळ्यांच्याच अभिनयाची वाखाणणी होत असली तरी लुडोचे खरे हिरो दोनच आहेत. ‘ओ बेटाजी, ओ बाबूजी, किस्मत की हवा कभी गरम, कभी नरम, कभी नरम कभी गरम’ हे ‘अलबेला’ सिनेमामधलं भगवानदादा यांच्या तोंडी असलेलं गाणं जबरदस्त टायमिंगवर वेळोवेळी म्हणणारा पंकज त्रिपाठी यांचा डॉन सत्तू भैय्या आणि शाळकरी वयातल्या प्रेमात माती खाऊनही पिंकीच्या प्रेमपाशातून अजूनही सुटू नसलेला राजकुमार रावने मोठ्या झोकात सादर केलेला आलोक गुप्ता उर्फ आलू.

राजकुमार रावचे याच आठवड्यात दोन सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत आणि या गुणी कलाकाराची दोन्ही भूमिकांसाठी वाहवा होत आहे. त्यातला एक म्हणजे ‘लुडो’ आणि दुसरा म्हणजे प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेला ‘छलाँग’.

बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा म्हणजे घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत असतानाच्या काळात राजकुमार रावसारख्या कसलीही फिल्मी पार्श्वभूमी नसलेल्या, सिनेमा चालण्यासाठी हिरोसारखं तथाकथित देखणेपण नसलेल्या, उलट अत्यंत सामान्य दिसणं हाच युएसपी असलेल्या अभिनेत्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर टिकून राहणं आणि सातत्याने घवघवीत यश मिळवणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.

एफटीआयआय मधून शिक्षण घेऊन राजकुमार रावने २०१० मध्ये पहिला सिनेमा केला तो, ‘लव्ह सेक्स अॅण्ड धोखा’. हॅण्डीकॅमेरा, स्पाय कॅमेरा, सिक्युरिटी कॅमेरा, अॅमॅच्युअर कॅमेरा वापरून केलेला हा सिनेमा पूर्णपणे नवोदितांचा सिनेमा होता. त्याच्या विषयाची, हाताळणीची तेव्हा भरपूर चर्चा झाली होती.

तिथपासून सुरू झालेला राजकुमार रावचा प्रवास टप्प्याटप्प्याने आजच्या मुक्कामावर येऊन पोहोचला आहे. त्याचा प्रत्येक टप्पा दिवसेंदिवस देखणा होत गेलेला आहे. ‘क्वीन’मधली अगदी जेमतेम फुटेज असलेली विजयची भूमिका असो वा संपूर्ण सिनेमा खांद्यावर उचलणारा ‘न्यूटन’ असो, राजकुमार राव प्रेक्षकांना कधीच निराश करत नाही. त्यामुळेच हंसल मेहता यांच्या शाहीद आझमी या वकिलावरच्या ‘शाहीद’ सिनेमासाठी तर त्याने सर्वोत्कष्ट अभिनयाचा राष्ट्रीय तसंच फिल्मफेअर पुरस्कार खिशात घातला. त्यानंतरही अनेक पुरस्कार आणि नामांकनं त्याच्याकडे चालत गेली आहेत. घराणेशाहीचा वारसा नसताना, स्टारडम नसताना, मार्केटिंगचे ढोल न वाजवता निव्वळ अभिनयगुणांवर बॉलिवडूमध्ये पाय रोवून उभा असलेला राजकुमार राव हा खरोखरच एक राजहंस आहे.