गेले महिनाभर सुरू असलेला फुटबॉलवार स्वार होऊन आलेला अमाप उत्साह आणि वेगाचा महोत्सव जर्मनीच्या विजेतेपदाने आता संपला आहे. आता पुन्हा प्रतीक्षा चार वर्षांनंतरच्या फुटबॉल विश्वचषकाची. या वेळच्या या स्पर्धानी नेमकं काय दिलं?

गेला महिनाभर उत्कंठता वाढवणारे, हृदयाचे ठोके चुकवणारे क्षण चाहत्यांनी अनुभवले. जगभरातील ३२ संघ एका विश्वचषकासाठी एकमेकांशी झुंजत होते. फुटबॉलमधील महासत्ता बनण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. फुटबॉल वर्ल्डकप म्हटला की अनपेक्षित घडणार, हे निश्चित असते. जर्मनीने अर्जेटिनावर मात करून आपणच फुटबॉलमधील राजे आहोत, हे दाखवून दिले. चौथ्यांदा जर्मनीने विश्वचषकावर नाव कोरले आणि यापुढे फुटबॉलमध्ये जर्मनराज पाहायला मिळेल, याचे संकेत दिले. १९९० नंतर प्रथमच जर्मनीने विश्वविजेतेपद पटकावण्याची करामत साधली. खरं तर त्यानंतरच्या प्रत्येक स्पर्धामध्ये त्यांनी किमान उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. पण त्यांना जेतेपदाने कायम हुलकावणी दिली होती. अखेर जोकिम लो यांच्या प्रशिक्षकपदाखाली त्यांचे विश्वविजेतेपद पटकावण्याचे स्वप्न साकार झाले.
अर्जेटिनाला मात्र २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याची स्वप्नपूर्ती करता आली नाही.
जर्मनी आणि अर्जेटिना यांच्यातला अंतिम सामना हा युरोप वि. दक्षिण अमेरिका असाच ओळखला गेला. पण त्यापेक्षाही अर्जेटिनाला जेतेपद मिळवून देत लिओनेल मेस्सी हा स्टार खेळाडू दिएगो मॅराडोनासारख्या महान फुटबॉलपटूंच्या पंक्तीत स्थान मिळवतो का, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिनाने बलाढय़ जर्मनीला अखेपर्यंत झुंजवले होते. पण मारियो गोएट्झे याने अतिरिक्त वेळेत ११३व्या मिनिटाला गोल करून अर्जेटिनाच्या स्वप्नांचा चुराडा केला. जर्मनीने २४ वा विश्वचषकजिंकला तरी या विश्वचषकातून अनेक गोष्टी अधोरेखित झाल्या.

कोस्टा रिका, बेल्जियम, अमेरिका, कोलंबिया, नायजेरिया, चिली, मेक्सिको, ग्रीस आणि स्वित्र्झलड या छोटय़ा पण ‘सरप्राइज पॅकेज’ ठरलेल्या संघांची कामगिरी कौतुकास्पद होती. स्पेन, इटली, इंग्लंड, पोर्तुगाल या दिग्गज संघांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. फुटबॉलविश्वासाठी हा फार मोठा धक्का होता. पण या छोटय़ा संघांची कामगिरी तसेच ब्राझीलचा विश्वचषकातील सर्वात दारुण पराभव, गतविजेत्या स्पेनचे साम्राज्य खालसा, लुइस सुआरेझचे चावा प्रकरण, जेम्स रॉड्रिगेझचा ‘गोल्डन बूटा’वर कब्जा, मिरोस्लाव्ह क्लोसचा सर्वाधिक गोलांचा विश्वविक्रम तसेच कॅमेरूनच्या खेळाडूंवर झालेले मॅचफिक्सिंगचे आरोप आणि गोलरक्षकांची सुरेख कामगिरी यामुळे हा विश्वचषक सर्वाच्या चांगलाच लक्षात राहील. या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांनी फक्त दिग्गज संघांना पराभवाचे धक्के दिले नाहीत तर यापुढे संपूर्ण जग आमची दखल घेईल, अशी कामगिरी करून दाखवली आहे. ‘नवे आहोत, पण छावे आहोत,’ हेच त्यांनी आपल्या सर्वागसुंदर खेळाने दाखवून दिले. सरप्राइज पॅकेज ठरलेल्या या संघांच्या, खेळाडूंच्या कामगिरीची घेतलेली दखल-
कोलंबिया :
सोप्या अशा क गटात कोलंबियाला स्थान मिळाले. पण रादामेल फलकावच्या अनुपस्थितीत खेळणारा कोलंबिया संघ मोठी मजल मारेल, हे कुणाला स्वप्नातही वाटले नसावे. जोक पेकेरमन यांच्या प्रशिक्षकपदाखालील महत्त्वाकांक्षी संघ म्हणजे कोलंबिया. पण याच जिद्दीच्या जोरावर कोलंबियाने साखळी तिन्ही विजय मिळवून गटात अव्वल स्थान पटकावले. बाद फेरीत कोलंबियासमोर उरुग्वेसारख्या दिग्गज संघाचे आव्हान होते. पण या सामन्याआधी उरुग्वेचा स्टार खेळाडू लुइस सुआरेझ हा चावा प्रकरणामुळे खूप गाजला होता. इटलीच्या जॉर्जियो चिएलिनीच्या खांद्यावर चावा घेतल्यामुळे त्याच्यावर चार महिन्यांची बंदी आली होती. याचा फायदा उठवत कोलंबियाने गेल्या वेळी उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या उरुग्वेचे आव्हान संपुष्टात आणले. त्यानंतर त्यांची गाठ होती बलाढय़ ब्राझीलशी. इतिहास, परंपरा, खेळाडूंची तांत्रिक शैली याबाबतीत परस्परविरोधी असलेले हे संघ एकमेकांशी झुंजले. कोलंबियाची मदार जेम्स रॉड्रिगेझवर तर ब्राझीलची नेयमारवर. पण उपांत्यपूर्व फेरीत नेयमारसेनाच यशस्वी ठरली. कोलंबियाचे आव्हान संपुष्टात आले पण त्यांच्या जेम्स रॉड्रिगेझने सर्वाची मने जिंकली. स्पर्धेत तब्बल सहा गोल आणि दोन वेळा गोलसहाय्य करणाऱ्या रॉड्रिगेझने ‘गोल्डन बूट’ पुरस्कार पटकावला. रॉड्रिगेझसारखा स्टार खेळाडू या स्पर्धेतून जगाला मिळाला.
कोस्टा रिका :
दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे सरप्राइज पॅकेज ठरले ते म्हणजे कोस्टा रिका. उत्तम तांत्रिक खेळ आणि चेंडूवर ताबा मिळवण्यात पटाईत असलेल्या कोस्टा रिकाने विश्वचषकाच्या इतिहासात या वेळी मोठी झेप घेतली. मूळातच कोस्टा रिकाला साखळी फेरीत इंग्लंड, इटली आणि उरुग्वे अशा दिग्गज संघांचा समावेश असलेल्या ‘ग्रूप ऑफ डेथ’ गटात स्थान मिळाले होते. तीन बलाढय़ संघ एकाच गटात असल्यामुळे कोस्टा रिकाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागेल, असा अंदाज फुटबॉलपंडितांनी वर्तवला होता. पण सुरुवातीला उरुग्वेला, त्यानंतर इटलीला पराभवाचा धक्का देत कोस्टा रिकाने बाद फेरीतील आव्हान कायम राखले. इंग्लंडविरुद्ध बरोबरी पत्करून गटात अव्वल स्थान पटकावत कोस्टा रिकाने सर्वाची वाहवा मिळवली. त्यानंतर बाद फेरीत त्यांनी ग्रीससारख्या संघाला पेनल्टी-शूटआऊटमध्ये ‘आऊट’ केले. केयलर नवास या गोलरक्षकाने तसेच ब्रायन रुइझ या आक्रमकपटूने कोस्टा रिकाला हे सुवर्णदिवस दाखवून दिले. उपांत्यपूर्व फेरीतही त्यांनी नेदरलँड्ससारख्या मातब्बर संघाला पेनल्टी-शूटआऊटपर्यंत झुंजवले. पण या वेळेला नवासला आपली चमक दाखवता आली नाही.
बेल्जियम :
बेल्जियमला साखळी फेरीत सोपा ड्रॉ मिळाला. अल्जेरिया, रशिया आणि दक्षिण कोरिया या दुबळ्या संघांवर सहज मात करून बेल्जियमने बाद फेरीत प्रवेश मिळवला. पण त्यांची खरी अग्निपरीक्षा होती अमेरिकेविरुद्ध. थिबाऊट कोर्टियस हा जगातील सर्वोत्तम गोलरक्षक वि. अमेरिकेचा टिम हॉवर्ड या गोलरक्षकांमध्ये हा सामना रंगला गेला. हॉवर्डने बेल्जियमचे तब्बल १५ गोल वाचवत सर्वोत्तम कामगिरी साकारली. पण हॉवर्डची झुंज अपयशी ठरली. पण त्याच्या कामगिरीचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही कौतुक केले. अमेरिकेत फुटबॉलला मिळालेली प्रसिद्धी पाहून आता अमेरिकेने २०२६ च्या फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजनासाठी बोली लावण्याची तयारी सुरू केली आहे. बेल्जियमने २-१ असा अमेरिकेवर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पण अर्जेटिनाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. बेल्जियमचे ब्राझीलमधील आव्हान संपुष्टात आले तरी त्यांनी आपले भविष्य किती उज्ज्वल आहे, हे दाखवून दिले.
आफ्रिकन देशांचे वर्चस्व :
आतापर्यंत फुटबॉलवर वर्चस्व राहिले आहे ते युरोपियन आणि दक्षिण अमेरिकन देशांचे. पण या वेळी नायजेरिया, अल्जेरिया, घाना या आफ्रिकन देशांनीही छाप पाडली. अर्जेटिना वगळता बोस्निया-हेझ्रेगोव्हिना आणि इराण या दुबळ्या संघांचा समावेश असलेल्या नायजेरियाने नशिबाच्या जोरावर बाद फेरी गाठली पण बाद फेरीत त्यांनी फ्रान्ससारख्या बलाढय़ संघाला दिलेली लढत कौतुकास्पद होती. अखेरच्या क्षणी दोन गोल स्वीकारावे लागल्यामुळे त्यांना घरचा रस्ता पकडावा लागला. दुबळ्या संघांच्या गटातून अल्जेरियाने बाद फेरीत प्रवेश मिळवला. पण जर्मनीसारख्या मातब्बर खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाला त्यांनी अतिरिक्त वेळेपर्यंत नाचवले. रायस बोल्ही या गोलरक्षकाने अप्रतिम कामगिरी केल्यामुळे हे शक्य झाले. पण आफ्रिकन संघही कमी नाहीत, हे या संघांनी दाखवून दिले.
नेयमारची दुखापत व सुआरेझचा चावा प्रकरण :
१९५०मध्ये घरच्या मैदानावर विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न हुकल्यामुळे यजमान ब्राझीलकडून देशवासीयांना भरपूर अपेक्षा होत्या. ब्राझील हा फुटबॉलवेडा देश. पाच वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ब्राझीलला मायदेशात वर्ल्डकप जिंकता आला नव्हता. त्यांचे हे स्वप्न नेयमार साकारेल, अशी त्यांना अपेक्षा होती. नेयमारच्या अप्रतिम कामगिरीमुळे ब्राझीलने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. पण उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या जुआन कॅमिलो झुनिगाने पाठीच्या मणक्यावर कोपर मारत त्याला खाली पाडले. थेट मैदानातूनच नेयमारची रवानगी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. मणक्याचे हाड फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे उपांत्य फेरीत नेयमार खेळू शकला नाही आणि जर्मनीकडून त्यांची पुरती वाताहत झाली. लुइस सुआरेझ हा उरुग्वेसाठी महत्त्वाचा खेळाडू. पण इटलीच्या बचावपटूंनी त्याला घेराव घालत गोल करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे रागाच्या भरात सुआरेझने इटलीच्या जॉर्जियो चिएलिनीच्या खांद्यावर चावा घेतला. एखाद्या खेळाडूचा चावा घेतल्याची ही त्याची तिसरी वेळ ठरली. त्याच्यावर चार महिन्यांची बंदी आल्यानंतर उरुग्वेलाही स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. पण नेयमारची दुखापत आणि सुआरेझचे चावा प्रकरण या विश्वचषकात भरपूर गाजले.
फुटबॉल ही काही ठरावीक मातब्बर संघांची मक्तेदारी नाही, हे छोटय़ा संघांनी दाखवून दिले. अमेरिका, मेक्सिको, स्वित्र्झलड, ग्रीस यांसारख्या संघांनी बाद फेरीत मजल मारून यापुढे आपल्याला कमी लेखू नका, असा इशारा दिग्गज संघांना दिला आहे. त्याचबरोबर स्पेन, इंग्लंड, इटली, ब्राझील या संघांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पण यापुढेही विश्वचषकात हे छोटे संघ कमाल दाखवतील, त्यांच्या कामगिरीने प्रेरित होऊन भारतासारख्या क्रमवारीत बऱ्याच खालच्या क्रमांकावर असलेल्या संघाला फुटबॉलमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे बळ मिळेल, अशी आशा करूया.