14 July 2020

News Flash

छोटा पडदा : राज्य नव्या नायिकांचं..!

फ्रेश लुक हवा म्हणून मालिकेत नवीन कलाकार घेतले जातात; पण आता हा ट्रेंड थोडा बदलतोय. मालिकेतल्या नायिकांमध्ये नवीन चेहरे दिसून येताहेत. खऱ्या अर्थाने मालिका नायिकाप्रधान

| February 27, 2015 01:13 am

lp48फ्रेश लुक हवा म्हणून मालिकेत नवीन कलाकार घेतले जातात; पण आता हा ट्रेंड थोडा बदलतोय. मालिकेतल्या नायिकांमध्ये नवीन चेहरे दिसून येताहेत. खऱ्या अर्थाने मालिका नायिकाप्रधान झाल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून मालिकांच्या सादरीकरणात आणि विषयांतही अनेक बदल झाले. पूर्वी मालिकांच्या गर्दीत रिअ‍ॅलिटी शोजची तीनेक डोकीच वर असायची. आता ही गर्दी मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोजनी समसमान वाटून घेतली. हा अनेक बदलांपैकीचा एक बदल. प्राइम टाइमची लांबी वाढवणं, रिअ‍ॅलिटी शोज वीकेण्डसोबतच वीकडेजनासुद्धा ठेवणं, बॉलीवूडकरांना टीव्हीत एंट्री देणं, मालिकांचे सेट चकचकीत करणं असं सगळंच या बदलांमध्ये आलं. मालिकांच्या विषयांमध्ये बदल होत गेले. आता तर हे बदल सातत्याने होत असतात. मालिकांमधले वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड तर दर दोन महिन्यांनी बदलताना दिसतात. असाच एक नवा ट्रेंड इंडस्ट्रीत रुजू होतोय. टीव्हीचा लुक फ्रेश दिसण्यासाठी टीव्हीवर नवनवीन प्रयोग होताना दिसताहेत. त्यापैकी एक म्हणजे मालिकांमधले नवे चेहरे. मालिकेची जोडी कोरी असली, की मालिकेचा आणि पयार्याने चॅनलचा लुक फ्रेश दिसतो. असा त्यांचा फंडा; पण याच ट्रेंडमध्ये जरा अ‍ॅडिशन झाली आहे. मालिकांमध्ये नायकापेक्षा नायिकेच्या रूपात नवा चेहरा बघायला मिळतोय. ‘कमला’, ‘असे हे कन्यादान’, ‘तू माझा सांगाती’, ‘देवयानी’, ‘माझिया माहेरा’, ‘जय मल्हार’ अशा काही मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या नायिकांची पहिलीच मराठी मालिका आहे. या नायिकांच्या निमित्ताने टीव्ही इंडस्ट्रीला पुन्हा एकदा फ्रेश लुक मिळाला आहे.
ई टीव्ही मराठीच्या ‘कमला’ या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. विजय तेंडुलकर यांच्या ‘कमला’ या नाटय़कृतीवर ही मालिका असल्यामुळे त्याबाबत कुतूहल वाटत होतं. कमला ही मध्यवर्ती भूमिका कोण साकारणार याबाबतही चर्चा होतीच. अखेर या मालिकेचा पहिलावहिला प्रोमो झळकला आणि या चर्चेला पूर्णविराम लागला. कमला ही महत्त्वाची भूमिका साकारणारी नायिका ठरली अश्विनी कासार. रंगभूमीचा अनुभव असला तरी अश्विनीची ही पहिलीची मालिका. पहिल्याच मालिकेत मध्यवर्ती भूमिका करण्याची संधी मिळाल्यामुळे अश्विनी खूश आहे. मुंबईच्या रुईया कॉलेजमधली विद्यार्थिनी असल्यामुळे नाटय़वलयात होती. ‘‘कॉलेजमध्ये असताना ‘गमभन’, ‘अनन्या’, ‘मुक्तिधाम’ अशा एकांकिकामध्ये काम करण्याची संधी मिळाली. या एकांकिकांमध्ये साकारलेल्या भूमिकांची लांबी फार नव्हती; पण तरी त्या खूप काही शिकवून गेल्या. कॉलेजमध्ये असेपर्यंत एकांकिकांमध्ये काम करणं हे एका छंदापुरतंच होतं. या क्षेत्रात करिअर करेन असं तेव्हा वाटलं नव्हतं, किंबहुना मी तसं ठरवलंच नव्हतं. कायद्याचा अभ्यास करायचा निर्णय मी घेतला होता; पण नाटय़वलयात असल्यामुळे अनेकदा मालिकांसाठी विचारणा व्हायची; पण अभ्यास आणि मालिकेचं शूट याची वेळ जमून येणार नाही, असं मला वाटायचं म्हणून मी नाही सांगायचे,’’ असं अश्विनी सांगते. लॉच्या शेवटच्या वर्षांला असणाऱ्या अश्विनीने ‘कमला’साठी ऑडिशन दिली आणि तिची निवड झाली. याबाबत ती सांगते, ‘‘मी याआधी कधीच कुठलीच ऑडिशन दिली नव्हती. त्यामुळे ‘कमला’साठी दिलेल्या ऑडिशनविषयी धाकधूकच होती. ऑडिशननंतर माझ्या चार-पाच लुक टेस्ट झाल्या. तोपर्यंत माझी निवड झाली हे मला माहीत नव्हतं. अखेर मालिकेचं शूट सुरू झालं. सहकलाकारांपैकी कोणीही मला मी नवीन असल्याचं भासू दिलं नाही, सांभाळून घेतलं.’’ अश्विनीसोबत मुख्य भूमिकेत दिसतोय अक्षर कोठारी. अक्षरने याआधी ‘बंध रेशमाचे’ आणि ‘आराधना’ या दोन मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.
स्टार प्रवाहच्या ‘देवयानी’ मालिकेतल्या देवयानी म्हणजे भाग्यश्री मोटे हिने मात्र याच क्षेत्रात करिअर करायचं हे पक्कं ठरवलं होतं. भाग्यश्रीने याआधी हिंदी मालिकांमध्ये काम केलंय. ‘जोधा अकबर’ आणि ‘देवों के देव महादेव’ अशा मोठय़ा मालिकांमध्ये तिने याआधी काम केलंय. ‘देवयानी’ ही तिची पहिलीच मराठी मालिका. तीनेक वर्षांपूर्वी भाग्यश्रीने एक मराठी सिनेमा केला होता; पण त्यानंतर ती थेट मराठी मालिकेच्या मुख्य भूमिकेत येऊन बसली. ‘‘पूर्वी हिंदी मालिकांमध्ये काम केल्यामुळे इंडस्ट्रीत तशा ओळखी होत्या. त्यामुळे कोणत्याही मालिका किंवा सिनेमाचे ऑडिशन कुठे-कधी आहेत हे मला समजायचं. तिथूनच मी ‘देवयानी’साठीही ऑडिशन दिली. माझी निवड झाली. ‘देवयानी’ ही मालिका माझ्या करिअरमधला टर्निग पॉइंट आहे,’’ भाग्यश्री सांगते. पहिल्याच मालिकेतून लोकप्रिय झालेल्या भाग्यश्रीने मालिकाच करायची आहे असं काही ठरवलं नव्हतं. ती सिनेमात काम करण्यासाठीही प्रयत्न करत होती. मास मीडियाचं शिक्षण घेतलेली भाग्यश्री मूळची पुण्याची. कॉलेजमध्ये असताना थिएटर ग्रुपमध्येही ती होती. महाविद्यालयीन lp49काळात तिने ‘विश्वगर्जना’ हे व्यावसायिक नाटक केलं होतं. देवयानी या व्यक्तिरेखेबाबत ती सांगते की, ‘‘सुरुवातीला प्रेक्षकांनी मला चटकन स्वीकारलं नाही; पण हळूहळू त्यांना मी आवडायला लागले. माझ्या पहिल्याच मराठी मालिकेला इतका चांगला प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा केली नव्हती; पण मालिकेच्या एका प्रमोशनच्या इव्हेंटसाठी गेले होते तेव्हा तिथला प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून मी भारावून गेले होते.’’
झी मराठीची ‘जय मल्हार’ या लोकप्रिय मालिकेतील म्हाळसा, बानू या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अनुक्रमे सुरभी हांडे आणि इशा केसकर यांचीही ‘जय मल्हार’ ही पहिलीच मालिका. ई टीव्ही मराठीची नुकतीच सुरू झालेली ‘माझिया माहेरा’ या मालिकेतली नक्षत्रा मेढेकर हीदेखील नवोदित अभिनेत्रीच आहे. या नवीन नायिकांचं एक वैशिष्टय़ म्हणजे कमी वेळेत त्यांना मिळालेली लोकप्रियता. मालिकेतल्या नवीन गोष्टी बघण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतो. त्यातच जर मालिकेची मुख्य जोडी नवी असेल, तर त्याबाबतचं असलेलं कुतूहल टोकाचं असतं. मालिका सुरू होण्याआधीच प्रेक्षकांमध्ये चर्चासत्र सुरू होतं; पण नेहमी अशा नवलाईला प्रेक्षकांची पसंती मिळतेच असं नाही. काही वेळा मालिकेचा विषय फसतो, तर काही वेळा कलाकारांची निवड प्रेक्षकांना खटकते. कधीकधी मालिका सुरुवातीला पकड घेते, मात्र नंतर तिची गाडी घसरते; पण सध्याचा नव्या नायिकांचा ट्रेंड मात्र या सगळ्याला अपवाद ठरतोय. मराठी मालिकांच्या दुनियेत नव्या नायिका सध्या राज्य करताना दिसताहेत. नवीन चेहरे असूनही त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. या प्रतिसादामुळे खऱ्या अर्थाने मालिका नायिकाप्रधान वाटू लागल्या आहेत.

lp50व्यक्तिरेखा प्रस्थापित होण्यासाठी
मी माझ्या मालिकांमधल्या व्यक्तिरेखांसाठी कलाकारांची निवड त्यांचा अभिनय विचारात घेऊन आणि ते कलाकार त्या व्यक्तिरेखेला शोभून दिसतील की नाही यावरून करतो. तो कलाकार नवीन आहे की जुना असा विचार त्यामागे नसतो. ‘तू माझा सांगाती’साठी नव्या-जुन्या अशा अनेक कलाकारांची ऑडिशन घेण्यात आली होती. त्यातून अवली ही व्यक्तिरेखा मला जिच्यात दिसली तिची मी निवड केली; पण एक सांगावंसं वाटतं की, मालिकांमधल्या कलाकारांकडे व्यक्तिरेखा म्हणूनच बघितलं जातं. गेल्या काही वर्षांमधल्या मालिकांवरून हे स्पष्टपणे जाणवेल. मालिकेतली विशिष्ट व्यक्तिरेखा प्रस्थापित होण्यासाठीही नव्या चेहऱ्यांना घेतलं जातं. पूर्वी काही मालिका केलेले कलाकार पुन्हा दुसऱ्या मालिकेत दिसले, तर प्रेक्षकांना त्या कलाकाराला नवीन व्यक्तिरेखेत स्वीकारायला काहीसा वेळ लागतो. त्यामुळे त्याचऐवजी नवीन कलाकार घेतला, तर तो चेहरा फ्रेश असतो आणि त्याच कलाकारामुळे मालिकेतली व्यक्तिरेखाही चटकन प्रस्थापित होते.
संगीत कुलकर्णी, निर्माता, तू माझा सांगाती.

झी मराठीची ‘असे हे कन्यादान’ ही नवी मालिका. विषय वडील-मुलीच्या नातेसंबंधांवर असल्यामुळे प्रेक्षकांच्या जवळचा विषय. मालिका नवी असल्यामुळे हळूहळू पकड घेतेय. या मालिकेतल्या नायिकेबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चा असते. मालिकेच्या पहिल्याच भागात दाखवलेल्या तिच्या मनमोहक नृत्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ही नायिका म्हणजे मधुरा देशपांडे. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शोमध्ये अँकरिंग केल्यानंतर ती या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. पुण्याच्या गरवारे कॉलेजमध्ये शिकलेली मधुरा भरतनाटय़ात विशारद आहे. ‘‘मला पूर्वीपासूनच अभिनय क्षेत्रात आवड होतीच. माझ्या घरी कोणीच या क्षेत्राची पाश्र्वभूमी असलेले नाही. मी सीए करत होते; पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की, मी सीए करत राहिले तर मला अभिनयात करिअर करता येणार नाही. त्यामुळे मी पूर्ण वेळ अभिनयालाच द्यायचा ठरवलं,’’ मधुरा सांगते. कॉलेजमध्ये असताना राज्य नाटय़स्पर्धा, एकांकिका स्पर्धा अशा अनेक स्पर्धामध्ये ती भाग घ्यायची. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची तिने प्रवेशपरीक्षा देऊन तिथल्या एका कार्यशाळेत ती सहभागी झाली होती. ‘‘पूर्वी ‘झुंज’ आणि ‘आराधना’ या मालिकांमध्ये मी लहान भूमिका केल्या होत्या; पण ‘असे हे कन्यादान’ ही मुख्य भूमिका म्हणून पहिली मालिका. माझ्या अनुभवी सहकलाकारांकडून मी सतत काही ना काही शिकत असते. सेटवर अनेक नवनवीन गोष्टी समजत असतात. शिकत काम करण्याचं समाधान सुखावून जातं,’’ मधुरा तिचा अनुभव सांगते. माध्यम कुठलंही असो, मला अभिनय करायला आवडतो, असंही ती स्पष्ट सांगते. भरतनाटय़म विशारद असल्यामुळे मधुराने तिचा बॅक अप प्लॅन म्हणून नृत्याचा विचार केला आहे. मधुरासोबत प्रसाद जवादे हा मुख्य भूमिकेत दिसतो. त्याने यापूर्वी ‘अरुंधती’ या मालिकेत नायकाची भूमिका केली होती.
पुण्याच्या फग्र्युसन कॉलेजमधून नाटय़शास्त्रात ग्रॅ्रज्युएशन केलेल्या प्रमिती नरके हिची ई टीव्ही मराठीची ‘तू माझा सांगाती’ ही पहिलीच मालिका. संत तुकारामांची बायको, अवली हिच्याभोवती ही मालिका फिरते. या मुख्य भूमिकेसाठी प्रमितीची निवड झाल्याने ती खूश होती. याचं कारण ती सांगते, ‘‘पुण्याहून मुंबईला आल्यानंतर ठिकठिकाणी ऑडिशन्स देत होते. एका महिन्यात लगेचच या मालिकेसाठी माझी निवड झाली. माझा विश्वासच बसत नव्हता. ‘तू माझा सांगाती’ या मालिकेसाठी माझी निवड झाल्याचा मला खूप आनंद झाला.’’ कॉलेजमध्ये असताना ‘रंगदृष्टी’ या नाटकाच्या ग्रुपमधून प्रायोगिक नाटकं करणं, हिंदी-मराठी-इंग्लिश अशा तिन्ही भाषांमधून नाटकं बसवणं इथवरच ती अभिनयाशी जोडलेली असल्याचं प्रमिती सांगते. ‘‘कॅमेऱ्यासमोर मी कधीच काम केलं नव्हतं. त्यामुळे मालिकेत काम करताना काहीसं दडपण होतं. त्यात चिन्मय मांडलेकरसारख्या अनुभवी आणि हुशार अभिनेत्यासोबत काम करायचं या विचाराने त्या दडपणात भर पडली; पण सहकलाकारांनी मला सांभाळून घेतलं. मग मालिकेचा विषय, मी साकारत असलेली व्यक्तिरेखा, त्या काळातली भाषा, देहबोली, विचारसरणी या सगळ्यांबाबत अभ्यास केला,’’ असंही तिने सांगितलं. एकुणात, डेली सोपच्या वलयात सध्या महिलाराज सुरू आहे, असं म्हणायला हरकत नाही.
चैताली जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2015 1:13 am

Web Title: new marathi actresses
Next Stories
1 विनोदाचा अस्सल बाज
2 ‘निर्माती अनुष्का’चा सिनेमा
3 नातं : चांगल्या विचारांसाठी चीअर्स
Just Now!
X