घरात, कार्यालयात गौतम बुद्धांचा, गांधीजींचा फोटो लावायचा आणि प्रत्यक्षात मात्र कोलाहलात जगायचं ही आपली केवळ प्रवृत्तीच नाही तर संस्कृतीच झाली आहे..

मध्यंतरी नसीरुद्दीन शहा यांचा, गिरीश कासरावल्ली यांनी दिग्दíशत केलेला ‘एक घर’ नावाचा सिनेमा, राज्यसभा चॅनेलवर लागला होता. ‘मने’ या मूळच्या कन्नड सिनेमाचा हा िहदी रिमेक. यामध्ये एक अप्रतिम सीन होता. नसीरुद्दीन शहा एक मध्यमवर्गीय विवाहित तरुण. हा तरुण एका प्रचंड कोलाहलाच्या वस्तीतलं घर बदलून दुसऱ्या वस्तीत राहायला येतो. या नव्या वस्तीतल्या घरात, रात्री हा तरुण िभतीला कान देऊन काही तरी ऐकतोय असा प्रसंग. बायको (दीप्ती नवल) विचारते, हे काय करतो आहेस म्हणून? तो म्हणतो, ‘‘खामोशी सुन रहां हूँ.’’ हा प्रसंग नसीरुद्दीन शहांनी कसा स्वाभाविकपणे सुंदर अभिनीत केलाय, यासाठी तो सिनेमाच पाहायला हवा.
मला जाणवलं ते, प्रयत्नपूर्वक शांतता ऐकण्याच्या अवस्थेतला तो तरुण आणि आपल्यात आज काहीच फरक नाही. चांगुलपणासारखी शांतताही आज शोधावी लागते आहे.
अनेकदा जाहीर कार्यक्रमांत, खासगी गप्पांत वयस्क लोकांकडून, आम्हा तरुण नटमंडळींना, ‘पूर्वीचे ते दिवस कसे राहिले नाहीत; जुन्या काळी नटांचे आवाज कसे असायचे? हजार- दोन दोन हजार प्रेक्षकांसमोरही केशवराव भोसल्यांची (इथे कोणतंही सोयीचं नाव येतं) तान शेवटच्या रांगेत कशी ऐकू जायची. त्या वेळच्या नटांची तयारीच कशी असायची. आजचे कसले हे नट?’ या ऋचा वरचेवर ऐकायला मिळत असतात आणि आम्ही नट असल्याने तर सतत. खरंच आहे ते.
पण जुन्या काळचा संदर्भ फक्त एवढय़ावरच कसा संपतो? तो काळ १०० वर्षांपूर्वीचा. तो काही आजच्यासारखा यंत्रयुगाचा काळ नव्हता. त्या वेळच्या माणसाचा जीवन व्यवहार किती शांततेचा होता. नसíगक आवाजांच्या तुलनेत मनुष्यनिर्मित आवाजांची संख्या अतिशय मर्यादित होती. शांतता हा जगण्याचा स्थायिभाव होता. खूप वेळच्या शांततेमध्ये कधीमधीच निर्माण झालेल्या ध्वनीला, त्यामुळेच महत्त्व असायचं. दिवस उजाडला की आवाजांमध्ये काय ती भर, पण रात्री रातकिडे, पक्षी, प्राण्यांचे आवाज, नाही तर वाऱ्याच्या वेगाबरोबर घर्षणाने निर्माण होणारे आवाज.. अशा रात्रींच्या शांततेत, कर्णमधुर गायनाची तान, दूरवरच्या कानांचा ठाव घेणं स्वाभाविकच. त्याचं आणखी महत्त्वाचं कारण म्हणजे, आवाजाला दूरवर प्रवास करण्यासाठी मध्ये काही अडथळाच नसायचा. ना आजच्यासारख्या इमारतींचा, ना वातावरणात भरलेल्या इतर हजारो आवाजांचा.

पण नंतर यंत्रयुग निर्माण झालं आणि माणसाच्या जीवन व्यवहारांत सतत नवनवीन आवाजांची भर पडत गेली. कारखाने, गिरण्या, शिवणयंत्रे, हातमाग, भट्टय़ा, वाहने इत्यादी आवाजांनी दिवस बांधला गेला. एक वेळ तोपर्यंतही शांततेचं अस्तित्व होतं असं म्हणू शकतो आपण.
पण नंतर संपूर्ण जग डिजिटल करून पूर्वीच्या तुलनेत माणसानं आपलं जगणं प्रचंड सुखकर करून घेतलं. पण एका बाजूला विकास साधला की, दुसऱ्या बाजूला त्याची किंमतही मोजावी लागतेच.
आधीचे वातावरणातले बाहेरचे आवाज नष्ट झाले नाहीतच, पण आधुनिकीकरणाने नव्याने असंख्य आवाजांची भर झाली. घरात टी.व्ही, फ्रिज, मिक्सर, वॉिशग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन्स, गीझर, स्वयंपाकाच्या चिमण्या, लाकूड असो वा कठीण दगड कापणारे कटर्स असोत, वेिल्डग मशिन्स, ड्रििलग मशिन्ससारखी नाना तऱ्हेची आवाज करणारी मशिन्सच मशिन्स.. बाहेर तर गाडय़ाच गाडय़ा, त्यांचे विविध नमुन्यांचे हॉर्न्स; कुठे रस्त्याचं काम चाललं असेल तर, मोठमोठे क्रशर्स, बुलडोझर्स, प्रसंगी कुठे मोच्रे, घोषणा; बस, ट्रेनमधला प्रवास असो वा हॉटेल, नाटक, सिनेमे हॉल्स असोत; सर्वत्र आवाजच आवाज. सण-समारंभ असतील, तर आजकाल विचारायचीच सोय नाही. घरातही आणि बाहेरही आणि या सर्वावर कडी म्हणजे मोबाइल्स.. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत कुठेही क्षणभराचीही शांतता नाही.
प्रगती साधायची तर विकास हा व्हायलाच हवा. तो अपरिहार्यच आहे, पण त्याचबरोबरीनं येणारी बंधनं मात्र नको आहेत आपल्याला.

प्रयोग संपेपर्यंत दोन तास आपण फोनशिवाय राहूच शकत नाही; मग हे लोक नाटक वगरे पाहायला का येतात? ब्लॅकआऊट, हा आलेला मेसेज चेक करण्यासाठी दिलेला मधला वेळ आहे अशीच लोकांची समजूत झाली आहे की काय ?

मध्यंतरी माझ्याकडे युरोपात राहणारे एक नातेवाईक सुट्टीसाठी आले होते. युरोपात नव्याने नोकरीसाठी गेलेल्या माझ्या एका मित्राचा विषय निघाला. हा माझा मित्र माझ्या नातेवाइकांना ओळखत होता. या माझ्या नातेवाइकांनी सांगितलं की, ते माझ्या या मित्राला घेऊन त्यांच्या ब्रिटिश मित्रांच्या पार्टीला जाणार होते. या पार्टीला माझ्या मित्राला नेण्याआधी, त्या ब्रिटिश लोकांनी माझ्या नातेवाइकाला स्पष्टपणे विचारलं की, हा तुमचा मित्र हळू आवाजात बोलतो का? तरच त्याला पार्टीला येऊ द्या, कारण इंडियन्सना हळू आवाजात बोलता येत नाही. त्यांच्या मोठय़ा आवाजात बोलण्याचा त्रास होतो. या प्रसंगात काही देशाभिमानी लगेच ब्रिटिशांना शिव्यांची लाखोली वाहू शकतात, पण मला काही त्यात गर वाटलं नाही. साधं हळू बोलण्याची अपेक्षाही सहन करू शकत नाही आपण.
सर्वत्र आवाजच आवाज असले तरी प्रसंगी शांतता ठेवण्याचे आपण प्रयत्न करूच शकतो ना. जिथे शांतता ठेवणं आपल्या हातात आहे, तिथे आपण शांतता का ठेवू शकत नाही?
नट हे कसे समाजाचे घटक आहेत, त्यांनी नतिकतेचं कसं पालन करायला पाहिजे; नाटकांचा दर्जा कसा दिवसेंदिवस खालावत चालला आहे; हे सतत आम्ही ऐकतच असतो; प्रसंगी त्यात तथ्यही आहेच, पण प्रेक्षकही या कलेचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे; त्या प्रेक्षकाच्या जबाबदारीबद्दल एकही माणूस बोलताना दिसत नाही, कारण प्रेक्षक पसे मोजून आलेले असतात. त्यामुळे त्या पशात कसेही वागण्याचा त्यांना अधिकारच मिळालेला असतो, असा त्यांचा पक्का समज झालेला असतो.
मी व्यावसायिक नाटक करत असल्याने, निरनिराळ्या गावांत, निरनिराळ्या थिएटर्समध्ये प्रयोग करत आलेलो आहे. गेल्या इतक्या प्रयोगांत, मला अभावानंच एखादा प्रयोग आठवतो, जो आम्ही व्यत्यय आला नाही म्हणून थांबवला नसेल. मी माझं नाटक सादर करत असतानाही आणि दुसऱ्यांचं बघायला गेलो असतानाही, प्रयोग सुरू झाला तरी प्रेक्षक जागेवर बसलेले नसतात. वारंवार कळकळीची विनंती करून, प्रसंगी चिडून सांगूनही प्रेक्षक मोबाइल बंद करत नाहीत. वयस्कर लोकांना तो बऱ्याचदा बंद करायचा लक्षात राहात नाही आणि हे मी अनेकदा अनुभवलंय की, कसा बंद करायचा हे त्यांना माहीतच नसतं. अनेक महाभाग तर, फोन वाजला तर बाहेर जातात, पण बाहेर जाईपर्यंत तो वाजत राहील याची काळजी घेतात. कट केला तर परत आपल्याला करावा लागेल. नाटकाचा बेरंग झाला म्हणून काय फरक पडतो? प्रयोग संपेपर्यंत दोन तास आपण फोनशिवाय राहूच शकत नाही; मग हे लोक नाटक वगरे पाहायला का येतात? हा खरंच प्रश्न पडतो. म्हणून फोन बंद करणारे लोक सरळ बसतात असंही नाही. ब्लॅकआऊटमध्ये फोन सर्रास चेक केला जातो. ब्लॅकआऊट, हा आलेला मेसेज चेक करण्यासाठी दिलेला मधला वेळ आहे अशीच लोकांची समजूत झाली आहे की काय असे वाटते! पहिल्या रांगेतल्या लोकांनाही, त्यांच्या मोबाइल स्क्रीनचा प्रकाश स्टेजवर जातोय याचं भान नसतं, कारण दोन सीनच्या मध्ये किमान ५० तरी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मोबाइलचा प्रकाश पडलेला आम्ही स्टेजवरून पाहात असतो. प्रयोग सुरू असतानाही मध्ये मध्ये बोलत असतात, प्लास्टिकच्या पिशव्यांचे आवाज करत असतात, खात असतात.
माझ्या ‘नांदी’ नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग होता. प्रयोग ऐन रंगात आला असताना, मध्यंतरानंतर मागच्या रांगेत बसलेल्या एका सुसंस्कृत म्हणवणाऱ्या प्रेक्षकाने, अत्यंत क्षुल्लक कारणाने उभं राहून मोठमोठय़ाने ओरडून प्रयोग थांबवला होता. त्याला त्याची तक्रार प्रयोगानंतरही करता आली असती, पण गंभीर प्रसंग सादर होत असताना, कलाकारांची एकाग्रता आणि हजार प्रेक्षकांच्या रसभंगापेक्षा त्याला त्याची वैयक्तिक तक्रार महत्त्वाची वाटली.
मी एक नाटक बघायला गेलो होतो तेव्हा, पहिल्या रांगेतली एक स्त्री तिच्या लहान मुलाला घेऊन नाटक पाहायला बसली होती आणि त्याच नाटकात तिचं मोठं अपत्य समोर स्टेजवर काम करत होतं, पण या माऊलीने, धाकटय़ाच्या हातात, तिला व्यत्यय नको म्हणून तिचा मिनी आयपॅड खेळायला दिला होता. म्हणजे तिला तिच्या मुलाची कटकट नको म्हणून ती इतर सर्व प्रेक्षकांनी सहन करायची. तिला सांगितलं, पण पसे खर्च करून शिक्षण घेता येतं, पण पसे खर्च करून समज विकत घेता नाही याचाच प्रत्यय आला.
सिनेमागृहातही हीच परिस्थिती.
दवाखाने, मंदिरे, जिथे शांतता अपरिहार्य आहे तिथेही तमा बाळगली जात नाही. अगदी सांत्वनाला गेल्यावरही मोबाइल बंद ठेवणं कमीपणाचं वाटतं.
ट्रॅफिकमध्ये कारण नसताना हॉर्न वाजवणे, हा तर जन्मसिद्ध हक्कच मानला जातो. पुढे गाडय़ांची रांग डोळ्याला दिसत असतानाही हॉर्न वाजवण्याची खोड काही केल्या जात नाही.

एखाद्याचा आवाज बंद करण्यासाठी, प्रसंगी कानाखाली आवाज काढून, आवाजाला अधिक मोठय़ा आवाजाने उत्तर देण्याच्या नवीन रिवाजामुळे दुर्लभ झालेल्या शांततेची किंमत चुकवावी लागतेच.

वैयक्तिक नियमांचाच आपण एवढा बोजवारा उडवतो, मग सामाजिक उत्सवांचं काय घेऊन बसलात? पूर्वी गणेशोत्सवाची वाट अधीरपणे पाहिली जायची, पण आताशा उत्सव जवळ आले की धडकीच भरते. गणपती उत्सवांपाठोपाठ नवरात्र, मग दिवाळी, मग नववर्ष, मग शिमगा.. हे झाले फक्त िहदूंचे सण. मोहरम, रमझान, ईद या आणि अशा सर्व धर्माच्या सणांनी सामाजिक जीवनाच्या शांततेचा नुसता चोथा झालेला आहे आणि प्रत्येक धर्माची शिकवण अंतिमत: शांततेचा संदेश देते. उरलेल्या दिवसांची कसर लग्ने, वाढदिवसाच्या पाटर्य़ा, राजकीय सभा, आंदोलने यांनी भरून काढलेली असतेच.
डोळे बंद केले की, आपल्यापुरता अंधार होतो; पण कान आतून बंद करण्याची कोणतीही नसíगक रचना परमेश्वराने आपल्याला दिलेली नाही. तसंच दिवसाउजेडी कृत्रिमपणे अंधार करता येतो, पण वातावरणातले आवाज आपल्याला असे सहजासहजी नष्ट करता येत नाहीत.
माझ्या घराचं इंटीरियर करताना आम्ही घराला साऊंडप्रूफ काचा बसवल्या. बाकी सर्व कामांपेक्षा ही गोष्ट तुलनेनं खूप खर्चीक होती. थोडक्यात मला शांतता विकत घ्यावी लागली म्हणा किंवा शांततेची किंमत मोजावी लागली.
पण लौकिक अर्थाने ते खरंच नाही का? एखाद्याचा आवाज बंद करण्यासाठी, प्रसंगी कानाखाली आवाज काढून, आवाजाला अधिक मोठय़ा आवाजाने उत्तर देण्याच्या नवीन रिवाजामुळे दुर्लभ झालेल्या शांततेची किंमत चुकवावी लागतेच.
दैनंदिन कोलाहलापासून चार शांततेचे क्षण अनुभवण्यासाठी, प्रसंगी अधिकचे पसे खर्च करून माणूस शांततेसाठीच निसर्गरम्य परिसरात जातो. मंद वाऱ्याच्या झुळकीसरशी होणारी पानांची सळसळ, अव्याहत वाहणाऱ्या झऱ्याची झुळझुळ, समुद्राची गाज, संथ लयीतलं मंत्रमुग्ध करणारं संगीत, पक्ष्यांचा किलबिलाट, या ध्वनींच्या पाश्र्वभूमीवरची शांतता मनाला तजेला देणारी ठरते. शांतता स्वत:शी बोलायला लावते, स्वत:च्या आत डोकावायला मदत करते; आपल्या श्वासाबरोबर आपली लय अनुभवायला भाग पाडते. म्हणूनच दोन शब्दांमधल्या पॉझमुळेच संवादाला अर्थ प्राप्त होत असतो; दोन बिट्समधल्या शांततेनंच तालाची लय ठरत असते; घरातल्या शांततेवरूनच कुटुंबातल्या सुखाची कल्पना येत असते आणि धार्मिक स्थळांमधल्या गाभाऱ्यातल्या शांततेवरूनच त्याचे पावित्र्य ठरत असते.
मनुष्य हा निसर्गत: शांतताप्रियच आहे. आज जगात सर्वत्र दोन जातींत, पंथांत, धर्मात युद्ध, मारामाऱ्या, िहसा, रक्तपात होत असला तरी; माणसाला हवी आहे ती शांतता. दोन माणसं, दोन शेजार असतील, नाही तर दोन समूह, दोन पक्ष, नाही तर दोन देश असतील. दोघांपकी शांततेचं पहिलं पाऊल कोण टाकतो, यालाच फार किंमत आहे, कारण ते टाकणाऱ्यालाच त्याची किंमत मोजावी लागते, पण अंतिमत: त्यात सगळ्यांचं भलं असतं.
समजा स्वत:ला िहदू म्हणवणाऱ्यांनी िहदूंच्या सणांमध्ये ठरवलं की, आम्ही गणेशोत्सवामध्ये डी.जे.चा वापर करणार नाही; मिरवणुका शांततेत पार पाडू; आम्ही स्वत:हूनच शांतता राखू. आमच्या मंदिरांमध्ये आम्ही पहाटे लोकांच्या झोपा उडवणाऱ्या आरत्या, अभंग कण्र्यावरून लावायच्या बंद करू; तर इतर धर्मीयांना अधिकारानं शांततेचा पुरस्कार करण्याचा दबाव आणता येईल, पण मलाच जर शांत बसायचं नसेल, तर मी दुसऱ्याला कोणत्या अधिकारानं गप्प बस म्हणून सांगू?
नुसताच घरात ज्ञानेश्वरांचा, गौतम बुद्धांचा नाही तर पक्ष कार्यालयात महात्मा गांधींचा, मंडेलांचा फोटो लावून काय उपयोग होईल?
छोटीशी असली तरी निदान, शांततेची थोडीशी किंमत आपण आपल्या पातळीवरही मोजू या.. आणि आनंदी राहायचा प्रयत्न करू या..