निम्म्याहून अधिक मंडळांचा भर पारंपरिक वाद्यांऐवजी डॉल्बी सिस्टीम (डीजे)सारख्या कर्णकर्कश यंत्रणेवर राहिल्याने नाशिक शहरातील बहुतांश भागात ध्वनिप्रदूषणाची मर्यादा अगदी सहजपणे ओलांडली गेली. गतवर्षीच्या तुलनेत या प्रदूषणात सरासरी पाच ते १२ टक्क्यांची वाढ झाली. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी तर काही मंडळांच्या डीजेसमोर उभे राहताना गणेशभक्तांच्या छातीत अक्षरश: धडधड होत होती. या संदर्भातील नियमावली केवळ कागदावर राहत असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर कोणाचा चाप नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.

गणेशोत्सव अन् ध्वनिप्रदूषण हे समीकरण तसे कधीच रूढ झाले आहे. या कोलाहलात गुलालवाडी व्यायामशाळा, सूर्यप्रकाश-नवप्रकाश, सत्यवादी यांसारखी बोटावर मोजता येतील अशी काही मंडळे मात्र पारंपरिक बाज टिकवून आहेत. बालगोपाळांचे लेझीम पथक, युवतींचा सहभाग असलेले ढोलपथक, पारंपरिक वेषभूषेत महिलांनी खेळलेल्या फुगडय़ा व तत्सम खेळ, काही मंडळांकडून सादर झालेले चित्तथरारक मर्दानी खेळ हे त्याचे निदर्शक. संबंधितांच्या पथकांनी सनई, झांज, चिपळ्या, ढोल व ताशे आदी वाद्यांचा वापर केला. परंतु, या वाद्यांना पसंती देणाऱ्या मंडळांची संख्या वर्षांगणिक कमी होत असल्याचे प्रकर्षांने जाणवले. अवाढव्य साऊंड सिस्टीम, लेझर शो, कान फाडणाऱ्या आवाजाने मिरवणुकीत ढोल-ताशांचे आवाजही दबले गेले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने गणेशोत्सवादरम्यान शहरातील जवळपास दहा ठिकाणी ध्वनिमापन केले. रहिवासी क्षेत्रात सर्वसाधारणपणे ५५ डेसिबल तर वाणिज्यिक भागात ६५ डेसिबल ध्वनीची मर्यादा आहे. सर्वसाधारणपणे रात्रीच्या वेळी दोन्ही क्षेत्रांत या मर्यादेत १० डेसिबलने घट होते. गणेशोत्सवात सर्व भागांत सरासरी ७२ ते ९० डेसिबलची नोंद झाली. ही बाब लक्षात घेतल्यास गणेशभक्तांच्या कानाचे काय झाले असेल याचा विचार करता येईल. महापालिकेच्या भालेकर मैदानात विविध कंपन्यांच्या मंडळांनी गणेशाची स्थापना केली होती. या ठिकाणी आवाजात प्रत्येक मंडळांची स्पर्धा होती. प्रत्येकाने अशी काही ध्वनी यंत्रणा उभारली की, धड एकाही मंडळाचे काय सुरू आहे ते समजत नव्हते. दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना परस्परांशी संवाद साधणे अवघड ठरले असा आवाज मैदानावर घुमत होता. याच ठिकाणी मूकबधिर मित्र मंडळाने ध्वनिप्रदूषणविरहित गणेशोत्सव साजरा करून उभयतांच्या डोळ्यात अंजन घातले. काही मंडळांनी देखाव्यांवर फारसा खर्च करण्याचे टाळून मिरवणुकीत आपला आवाज कसा घुमेल यावर मोठी गुंतवणूक केली. ध्वनिप्रदूषणाच्या नियमावलीचे उल्लंघन झाल्यावर कारवाईची तरतूद आहे. पण, या तरतुदीवरून आजतागायत कारवाई झाली नसल्याने गगनभेदी आवाजाने गणेशभक्तांना त्रस्तावणाऱ्या मंडळांचे फावले आहे.