खरे तर हे मुद्दाम, वेगळे सांगायची गरज नाही. गणेशोत्सव काळात मुंबईत राहिलेल्या प्रत्येकाला त्याच्या आजूबाजूने कानावर आदळत असलेल्या आवाजाचा अनुभव आलाच असेल. तसा तो दरवर्षीच येतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाऊंडेशनसारख्या संस्था या आवाजाची मोजणी करतात. दरवर्षी आवाजामध्ये वरचढ ठरलेल्या ठिकाणांची नावे बदलतात, अर्थात लालबाग परिसर, गिरगाव-जुहू चौपाटीकडे येणारे मार्ग हे नेहमीचे शिलेदार. ध्वनिप्रदूषणाबाबत हे वर्षही अपवाद नाही. अर्थात काही चांगले बदलही दिसून येत आहेत.

ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी लागणारे डेसिबलचे यंत्र आता प्रत्येकाच्या मोबाइल हॅण्डसेटमध्ये अ‍ॅपच्या रूपाने हाती आलेय. त्यावरून ‘आवाज’ संस्थेने शहरातील विविध ठिकाणच्या आवाजाचा अहवाल तयार केल्यावर लक्षात आले की मुंबईत बारा महिने सदासर्वकाळ आवाजाची पातळी चढी असते. केंद्रीय ध्वनीनियमन कायद्याप्रमाणे शांतता क्षेत्रात ५० डेसिबल, निवासी ठिकाणी ५५ डेसिबल तर व्यावसायिक ठिकाणी ६५ डेसिबल पातळीची मर्यादा असते. मात्र शहरात ही मर्यादा दिवसाच्या कोणत्याही वेळी पाळली जात नाही. त्यामुळे गणेशोत्सवसारख्या आनंदाच्या वेळी ती पाळली जाण्याची काही शक्यताच नव्हती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाऊंडेशनने घेतलेल्या चाचण्यांमधून ते समोरही आले.
विशेषत: गणेश मंडप किंवा कडेकोट पोलीस बंदोबस्त असलेल्या विसर्जन स्थळांपेक्षा मिरवणुकीच्या रस्त्यांवर अधिक आवाज होता. रोजच्या रहदारीमुळे गजबजलेल्या सेना भवनचा चौक विसर्जना वेळी मात्र शांत असल्याचे लक्षात आले. इतरत्र मात्र विसर्जन मिरवणुकात कानठळ्या बसवणाऱ्या डीजेसोबतच ढोल, ताशांसारखी पारंपरिक वाद्य आणि फटाके यांच्यामुळे आवाजात वाढ दिसत होती, असे आवाजच्या संस्थापक सदस्य सुमायरा अब्दुलाली यांनी सांगितले. सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकींमध्ये आवाज असतोच, मात्र दीड दिवसांच्या घरगुती गणेश मिरवणुकांवेळीही आवाजाची पातळी चढीच होती, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील २५ ठिकाणी ध्वनिप्रदूषणाची मोजणी केली. गिरगाव, जुहू आणि दादर चौपाटी वगळता इतर ठिकाणे ही गणेश मंडपाजवळ होती. सर्वच ठिकाणी आवाजाची पातळी ही नियमित पातळीपेक्षा खूपच जास्त होती. बोरीवली, अंधेरी, जुहू, दादर, घाटकोपर, चेंबूर, गिरगाव, लालबाग या सर्वच ठिकाणी दिवसभरातील सरासरी आवाज ८० डेसिबलहून खाली आला नव्हता. लालबागसारख्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे माहेरघर असलेल्या ठिकाणी तर अर्थातच सरासरी पातळी ९४ डेसिबलपर्यंत पोहोचली होती. ही पातळी अधिक वाटत असली तरी गेल्या चार वर्षांतील मंडळाच्या अहवालातील ध्वनिप्रदूषणाचा आलेख पाहता आवाजाची पातळी किंचित प्रमाणात खाली आलेली दिसते. विसर्जनाच्या मिरवणुकीतील डीजेसोबत ढोल ताशे यांचा आवाज तेवढाच असला तरी अकरा दिवस गणपतीच्या मंडपात मात्र स्पीकर्सचे आवाज कमी होते. सरसकट सर्वच मंडपात हे दिसून आले नाही तरी पोलिसांच्या ‘भीती’ने का होईना, रात्री अकरापर्यंत अनेक मंडपाचे स्पीकर्स बंद होताना दिसत होते. अर्थात आवाजाची ही कसर मंडळांनी शनिवार-रविवारच्या रात्री भरून काढली. मात्र तरीही पूर्वीप्रमाणे रात्र-रात्र कानठळ्या बसवणारे आवाज मध्यरात्रीनंतर शांत होऊ लागले, हे ध्वनिप्रदूषण चळवळीतील कार्यकर्त्यांचे यश म्हणायला हवे.
कोणतीही चळवळ समाजात झिरपायला थोडा काळ जावा लागतो. पर्यावरणस्नेही गणेशोत्सव-शाडूची मूर्ती, थर्माकोलविरहित मखर, कृत्रिम तलावात विसर्जन- आता चांगल्या अर्थाने ‘स्टेटस सिम्बॉल’ बनले आहेत. त्यामुळे दरवर्षी शाडूच्या मूर्तीची, कृत्रिम तलावांची लोकप्रियता वाढतेय. ध्वनिप्रदूषणाचेही तसेच. पूर्वी सत्यनारायणाच्या पूजेसाठी किंवा अगदी हळदीकुंकवासाठीही जोरजोरात लावले जाणारे स्पीकर आता किमान उच्चभ्रू सोसायटय़ांमधून हद्दपार झाले आहेत.
आनंद हा आवाजाशिवाय व्यक्त होऊ शकत नाही ही पूर्वापार समजूत. आनंद जेवढा मोठा तेवढाच तो व्यक्त करण्यासाठी आवाज मोठा.. शांतता म्हणजे काहीतरी विपरीत घडल्याची चाहूल देणारी.. अशी भीती आपल्याकडे असते. मात्र गेली अनेक वर्षे ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे, पाठय़पुस्तकातील धडय़ांमुळे समाजाच्या काही स्तरात ध्वनीस्नेही मंडळी तयार होत आहेत. त्याच्या एक पाऊल पुढे जात पर्यावरणप्रेमाचाच भाग असलेला ध्वनीस्नेही हा स्टेटस सिम्बॉल व्हायला हवा..