लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवास समाज प्रबोधनाच्या हेतूने सार्वजनिक स्वरूप दिले. ब्रिटिशांच्या राजवटीत सत्त्व हरवून बसलेल्या समाजातील उदासीनता झटकून टाकण्यासाठी त्याचा खूप उपयोगही झाला. मंगल मूर्तीसमोरील व्यासपीठांवरून आरत्या, भजन, कीर्तनाबरोबरच व्याख्याने, चर्चासत्रे होत होती. त्यानिमित्ताने लोक एकत्र येत होते. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात उत्सवात प्रबोधनापेक्षा मनोरंजनाची मात्रा वाढत गेली. टी.व्ही.चे प्रस्थ वाढल्यानंतर गणपतीच्या मांडवातील जादूचे प्रयोग, एकांकिका आणि एकपात्री प्रयोगांना गर्दी जमेनाशी झाली. रस्त्यावर पडद्यावर दाखविले जाणारे चित्रपटही काळाच्या पडद्याआड गेले. साधारण दोन दशकांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव अशा संक्रमण अवस्थेतून जात असतानाच जनमानसावर प्रभाव टाकण्याची त्याची ताकद लक्षात घेऊन राजकीय प्रवृत्तींनी मंडळेच हायजॅक करण्यास सुरुवात केली. मोठमोठय़ा देणग्या देऊन राजकीय पुढाऱ्यांनी उत्सवातील स्थानिक मित्र मंडळांचा प्रभाव कमी केला. त्यांची जागा राजकीय कार्यकर्ते आणि पुढाऱ्यांच्या अनुयायांनी घेतली. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असा लौकिक असणाऱ्या ठाणे तसेच परिसरातील उपनगरांमध्ये ही प्रक्रिया अधिक वेगाने घडली. उत्सवानिमित्त घरोघरी मागितल्या जाणाऱ्या वर्गण्यांचे पर्व मागे पडून देणग्या आणि प्रायोजकांचे प्रस्थ वाढू लागले. मग नाव गणपतीचे आणि उदोउदो मात्र राजकीय पुढाऱ्यांचा असा उद्योग सुरू झाला. मूर्तीची उंची, मिरवणुकीतील गर्दी, त्यात उधळला जाणारा गुलाल, मंडपातील ध्वनिक्षेपकांचा आवाज या निकषांच्या आधारे उत्सवाची लोकप्रियता मोजली जाऊ लागली. या साऱ्या अव्यवस्थेतही मंडपातील भाविकांची गर्दी कायम राहावी म्हणून ठिकठिकाणी स्थापना होणारे गणेश अचानक नवसाला पावतात अशी आवई उठविण्यात आली. मग नवस बोलण्यासाठी आणि फेडण्यासाठी मांडवाबाहेर मोठमोठय़ा रांगा लागू लागल्या. टी.व्ही. मालिकांमधील कलावंत टीआरपी मिळविण्यासाठी अशा लोकप्रिय सार्वजनिक मंडळांच्या मंडपांमध्ये हजेरी लावू लागले. 

धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली आपला प्रभाव वाढविण्याच्या या राजकीय क्लृप्तीला ठाणे शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘धर्म’विरोधी ठरवून त्यांची थट्टा केली जाऊ लागली. गणेशोत्सवाप्रमाणेच त्याआधी येणारी दहीहंडी तसेच पूर्वी केवळ गुजराती बांधवांपुरताच मर्यादित असणाऱ्या नवरात्र उत्सवातही बिनदिक्कतपणे रस्ते अडविले जाऊ लागले. अखेर उत्सवांच्या या अतिउत्साही उन्मादाला आवर घालण्यासाठी संवेदनशील नागरिकांना न्यायालयात धाव घ्यावी लागली. ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय व्यावसायिक डॉ. महेश बेडेकर यांनी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून उत्सव साजरे करण्याच्या या प्रवृत्तीविरुद्ध उच्च न्यायालयात २०१० मध्ये जनहित याचिका दाखल केली. त्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने शासन, ठाणे महापालिका तसेच पोलिसांना यासंदर्भात सर्व संबंधितांशी चर्चा करून उत्सव साजरे करण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे करताना कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मर्यादांचे पालन व्हावे, असे आदेशही दिले. मात्र अद्याप तशी कोणतीही नियमावली तयार होऊ शकलेली नाही. कारण ती कुणालाच नको आहे. बहुतेक सार्वजनिक मंडळांनी यासंदर्भात अतिशय नकारात्मक भूमिका घेतल्याने उत्सवांच्या निमित्ताने घालण्यात येणारा गोंधळ मागच्या पानावरून पुढे दरवर्षी सुरू आहे. त्यात काही खंड पडलेला नाही. कारण ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांविरुद्ध पोलीस गुन्हे दाखल करतात, पण पुढे त्याचे काहीच होत नाही. ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो,’ असाच काहीसा हा प्रकार आहे. यंदा मात्र पोलिसांनी सर्रास नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी बोलावलेल्या बैठकीत संबंधित मंडळांना त्याची पूर्वसूचनाही दिली. आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळातील ध्वनिक्षेपक यंत्रणा जप्त करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ही धार्मिक संस्था असल्याने त्यांच्या माध्यमातून राजकीय प्रचार करता येणार नाही, या नियमाचीही त्यांनी आठवण करून दिली. मात्र त्यांचे हे प्रयत्नही ‘पालथ्या घडय़ावर पाणी’ ठरले. यंदाही उत्सवात मांडवासमोर दर्शनी भागात स्वागत कमानींवर राजकीय नेत्यांच्या छब्या झळकताना दिसल्या.
दहीहंडीच्या वाढत्या प्रस्थामुळे हल्ली श्रीकृष्णजयंतीनिमित्त ठाणे शहरातील अनेकांना आपल्याच घरात एक दिवसापुरता सक्तीने बंदिस्त व्हावे लागते. कारण बाहेर पडण्याच्या वाटाच बंद केलेल्या असतात. डीजेंच्या कर्णकर्कश ढणढणाटापासून वाचण्यासाठी काहीजण चक्क घर बंद करून सकाळीच बाहेरगावी जातात. पाळीव प्राण्यांची स्थिती त्याहून केविलवाणी असते. कारण त्यांची श्रवणशक्ती मानवापेक्षा अधिक संवेदनशील असते. त्यामुळे उत्सवाच्या दिवशी पाचपाखाडी विभागातील काहीजण पाळीव प्राण्यांसह सहलीला जातात. सार्वजनिक उत्सवांच्या या उन्मादी प्रथांविरुद्ध प्रसारमाध्यमे तसेच समाजात वातावरण निर्मिती होत असल्याचे पाहून यंदा राजकीय नेत्यांनी त्यांच्या अंकित असलेल्या कान-नाक-घसा तज्ज्ञांकरवी समाजाचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यांच्याच अंगलट आला. कारण ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा..’ म्हणत त्यांच्यावर चौफेर टीका झाली. अगदी वैद्यकीय व्यावसायिकांनीही त्यांचे ‘कान’ उपटले.
ध्वनिक्षेपण यंत्रणा अथवा डीजेंमुळे ध्वनिप्रदूषण होते, म्हणून अनेकांनी पारंपरिक ढोल ताशांचा पर्याय स्वीकारला. मात्र ही पारंपरिक वाद्येही डीजेंइतकीच ध्वनिप्रदूषण करण्यात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. सार्वजनिक ठिकाणी आवाजाची पातळी ६५ डेसिबल्स असावी, असा दंडक आहे. आधुनिक डीजे आणि पारंपरिक ढोल-ताशे या दोघांनीही या निकषांची पायमल्ली करीत ८५ ते शंभर डेसिबल्स इतकी आवाजाची पातळी गाठली. पुन्हा धार्मिक मिरवणुकीत गणपतीसमोर कोणती गाणी वाजवावीत, याचाही विधिनिषेध आयोजक पाळताना दिसत नसल्याचे आढळून आले आहे. अतिशय बीभत्स, अश्लील आणि द्विअर्थी गाणी मिरवणुकांमध्ये वाजवून त्यांच्या तालावर बेधुंदपणे नाचण्याची विकृती यंदाच्या उत्सवातही मोठय़ा प्रमाणात दिसून आली.