गेल्या तीन-चार वर्षांत सार्वजनिक उत्सवांविषयी सुरू असलेल्या चर्चेमुळे ठाण्यातील नागरिकांचे यासंदर्भात बरेच प्रबोधन झाले आहे. उत्सवांच्या आडून आपापल्या मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करण्याचा राजकीय प्रवृत्तींचा डाव उघड झाला आहे. त्यातूनच उत्सवांच्या या वाढत्या इव्हेंटीकरणाविरोधात शहरात जनमत तयार होऊ लागले आहे. ठाणे शहरानेच दशकभरापूर्वी पर्यावरणस्नेही गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा पर्याय दिला. निर्माल्य कलशात टाकण्यास प्रवृत्त करून तलावांची दरुगधी रोखली. समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेने दोन वर्षांपूर्वी विसर्जन घाटांवर गोळा केलेल्या निर्माल्यापासून खत निर्माण करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ते वितरित केले. यंदा शहरातील सर्व रोटरी क्लबस्, समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिका शहरातील सर्व विसर्जन घाटांवरील निर्माल्य गोळा करून त्यापासून खत निर्माण करणार आहेत.