बहुधर्मीय आणि अठरापगड जातींच्या सोलापुरात अलीकडे सार्वजनिक उत्सवांची गर्दी वाढत चालली असून वर्षभरात या शहरात सुमारे २५ सार्वजनिक उत्सव साजरे होतात. उत्सव म्हणजे मिरवणुका आल्याच. या मिरवणुकांतून एकमेकांची चढाओढ होत असताना साहजिकच ध्वनिप्रदूषणाचा उत्तरोत्तर जोर चढताना दिसून येतो. धुळीच्या प्रदूषणाने त्रस्त असलेल्या सोलापूरकरांना आता ध्वनिप्रदूषणानेही चांगलेच पछाडले आहे. सार्वजनिक उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये लेझीम-झांज यासारखे मर्दानी खेळ, जोडीला हलगी, ढोल, ताशा, संबळ, सनई या पारंपरिक वाद्यांचा वापर होत असताना त्यावर डी. जे. डॉल्बींचे आक्रमण वाढत आहे. किंबहुना ‘लेझीम भुलली डॉल्बीला’ अशी अवस्था प्राप्त झाली आहे. अर्थात काही मंडळांनी डॉल्बीला थारा न देता पारंपरिक वाद्यांचा वापर करताना खास हैदराबादहून हलगी पथक आणल्याचे दिसून आले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यंदाच्या गणेशोत्सवात तुलनेने डॉल्बीचा जास्तच दणदणाट दिसून आला. सोलापूरच्या गणेशोत्सवाला १८८५ सालापासूनची म्हणजे तब्बल १२९ वर्षांची परंपरा आहे. शहराचा पसारा वाढला तसा आजमितीला विविध सहा मध्यवर्ती मंडळांच्या आधिपत्याखाली १४००पेक्षा अधिक सार्वजनिक मंडळे गणेश प्रतिष्ठापना करतात. परंतु वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे या परंपरेचा अभिमान कसा बाळगायचा, हा प्रश्न आहे. बहुसंख्य मंडळे लेझीम व झांज खेळ सादर करताना तो पाहण्याचा आनंद अनोखाच असतो. विशेषत: मानाच्या आजोबा गणपतीसह थोरला मंगळवेढा तालीम, पत्रा तालीम, पाणीवेस तालीम, वल्लभभाई पटेल तरुण मंडळ, सोमवंशीय क्षत्रिय समाज, पूर्व भागातील ‘ताता’ (आजोबा) गणपती अशा विविध नावाजलेल्या मंडळांचे खेळ पाहण्यासाठी अलोट गर्दी होते. एकाच वेळी पाचशे ते हजार तरुणांचे लेझीम ताफे, त्यातील एकापेक्षा एक सरस डाव पाहताना जोश वाढून होश उडून जातो. परंतु आता या लेझीम खेळावर डॉल्बीने अतिक्रमण केले आहे. लेझीम खेळताना सोबत ध्वनीकर्णाबरोबरच डॉल्बी वाजविण्याचा अट्टहास वाढत चालला असून यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बीने अक्षरश: उच्छाद मांडला होता. अर्थात हा उच्छाद पोलीस यंत्रणेच्या साक्षीनेच मांडला जात होता. पोलीस यंत्रणेने नेहमीप्रमाणे जास्त आवाजाच्या ध्वनी यंत्रणेच्या आवाजाची मर्यादा ताडून दुसऱ्या दिवशी संबंधित मंडळांवर कारवाई करण्याची तयारी चालविली होती. कारवाईची जाणीव संबंधित मंडळांनाही असली तरी त्याची तमा कोणालाही नव्हती. कायद्यापेक्षा पोलीस यंत्रणेची भीती उडाल्याचे हे एक उदाहरण ठरावे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण होत असताना त्यावर तात्काळ हस्तक्षेप न करता केवळ बघ्याची भूमिका घ्यायची आणि मिरवणूक संपल्यानंतर, अर्थात नागरिकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास झाल्यानंतर मग शेवटी किंवा दुसऱ्या दिवशी संबंधितांवर खटले दाखल करायचे, ही पोलिसांची पद्धत बेजबाबदार आणि तेवढीच ढिम्मपणाची वाटते. वेळीच उपाय योजले तर कोणत्याही उत्सवात ध्वनिप्रदूषण टाळता येते, याचा प्रत्यय यापूर्वीचे पोलीस आयुक्त हिंमतराव देशभ्रतार यांच्या कार्यकाळात सोलापूरकरांनी घेतला होता. कायद्याचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण झाल्यास यंत्रणेने खटले दाखल करताना वापरातील डी. जे., डॉल्बीची महागडी यंत्रसामग्री जप्त करणे अपेक्षित असते. डॉल्बी ज्यावर ठेवली जाते, तो कंटेनर व जनरेटरसह संपूर्ण यंत्रसामग्री जप्तीची कारवाई यापूर्वी देशभ्रतार यांच्या कार्यकाळात होत असे. ही जप्त केलेली महागडी यंत्रसामग्री पोलीस ठाण्यात उघडय़ावर महिनाभर पडली तर होणाऱ्या नुकसानीच्या जाणिवेने डॉल्बी-डी. जे. चालक योग्य तो धडा घेत असत. त्याही पुढे जाऊन ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या डी. जे. डॉल्बी कारवाईत जप्त केल्यानंतर कायद्याचा आधार घेऊन ती नष्ट करण्याची तरतूद असावी. म्हणजे चांगला परिणाम साधता येऊ शकेल.