भारतामध्ये मोबाइल पर्वाला सुरुवात झाली ती नोकियामुळे. त्यामुळे नोकिया हे अनेक भारतीयांसाठी मोबाइल हॅण्डसाठीचे पर्यायी नावच झाले आहे. हा मोबाइल सर्वसामान्यांच्या हातात येण्यालाही नोकियाच कारणीभूत ठरली. मोबाइलची भारतातील लोकप्रियता, स्वस्तातील मोबाइल या सर्व घटना भारतात तरी नोकियाशीच संबंधित आहेत; पण याच नोकियाला नंतरच्या काळात उतरती कळा लागली. कंपनी डबघाईला आली. अखेरच्या टप्प्यामध्ये मायक्रोसॉफ्टने नोकिया विकत घेतली आणि आता ती मायक्रोसॉफ्ट या नावानेच ओळखली जाणार आहे. आता अलीकडेच त्यांचे बाजारात आलेले उत्पादनही मायक्रोसॉफ्ट लुमिया या नावाने बाजारात आले आहे. हा महत्त्वपूर्ण बदल प्रत्यक्षात येण्यापूर्वी नोकियाच्या नावे बाजारात आलेले अखेरचे उत्पादन म्हणजे नोकिया लुमिआ ७३० डय़ुएल सिम. नोकियाने बाजारात आणलेले हे अखेरचे उत्पादन मात्र एकूणच तंत्रप्रेमींना दीर्घकाळ लक्षात राहील, असेच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षभरात मोबाइलची बाजारपेठ तीन महत्त्वाच्या किमती गटांमध्ये विभागली गेली आहे. पहिला किमती गट हा ७ हजार ते १० हजार असा आहे. दुसरा १२ ते १५ हजार आणि तिसरा त्यापुढील. यामध्ये सध्या सर्वाधिक चलती आहे ती ७ ते १० हजार या गटामध्ये आणि मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय, त्यातही खास करून तरुणाईने पसंती दिली आहे ती १२ ते १५ हजार या किमती गटाला. त्या गटामधील मोबाइल विकत घेणाऱ्यांना मोठा स्क्रीन, एचडी रिझोल्यूशन, चांगले अधिक रिझोल्यूशन असलेला कॅमेरा या त्यांच्या गरजा आहेत. मोबाइल विकत घेणारा तरुण असेल तर त्याला कमीत कमी पाच मेगापिक्सेल असलेला फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी हवा असतो. हे सारे गृहीतक लक्षात घेऊनच नोकियाने हे त्यांचे अखेरचे उत्पादन बाजारात आणलेले दिसते. त्यामुळेच त्यात पाच मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, २४ एमएमचा वाइड अँगल असलेला बॅक कॅमेरा आणि तरुणाईसाठी खास डय़ुएल सिम अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
हा नोकिया ७३० डय़ुएल सिम दिसायला देखणा आहे. त्याचे वजन केवळ १३० ग्रॅम्स आहे. सध्याच्या तरुणाईला मोठा डिस्प्ले अधिक भावतो, ते लक्षात ठेवूनच या मोबाइलचा डिस्प्ले ४.७ इंचांचा ठेवण्यात आला आहे. त्याचे आकारमान १३४.७ गुणिले ६८.५ गुणिले ८.७ मिमी. एवढे आहे. वजनाला हलका आणि दिसायला सडपातळ अशी त्याची बाहय़रचना आहे. समोरच्या बाजूने हा जेवढा आकर्षक आहे तेवढाच तो मागच्या बाजूनेही बॅककव्हरमुळे आकर्षक ठरला आहे. हिरवा, निळा, पिवळा, लाल अशा अनेक आकर्षक रंगांमध्ये तो उपलब्ध आहे. रिव्हय़ूसाठी आलेल्या फोनला हिरव्या रंगाचे बॅककव्हर होते. मोबाइलच्या उजव्या बाजूला पॉवर ऑन ऑफ बटन आहे, तर तिथेच आवाज कमी-अधिक करण्याचे बटनही आहे. मागच्या बाजूस सर्वात वरती मध्यभागी कॅमेरा, तर त्याखाली एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. मागच्या बाजूस असलेला हा कॅमेरा ६.७ मेगापिक्सेलचा आहे. मागच्याच बाजूला उजवीकडे खाली स्पीकरची सोय आहे. फोनच्या वरच्या बाजूस हेडफोन जॅक, तर अगदी खालच्या बाजूस चार्जिग डॉक आहे.
हा मोबाइल डय़ुएल सिम प्रकारात मोडणारा असून महत्त्वाचे म्हणजे यावर दोन्ही थ्रीजी कार्ड्स काम करू शकतात. यासाठीचे स्लॉट्स मागचे कव्हर काढल्यानंतर आतमध्ये पाहायला मिळतात. समोरच्या बाजूस असलेला कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा असून त्याला २४ मिमी. वाइड अँगलची सोय देण्यात आली आहे. त्यामुळेच या कॅमेऱ्याचे वर्णन सेल्फी कॅमेरा असेही केले जाते. अलीकडे सेल्फीची व्याख्या बदलते आहे. पूर्वी केवळ स्वत:चा फोटो म्हणजे सेल्फी असे म्हटले जात होते. आता आपण आहोत, त्या ठिकाणासह, तेथील उपस्थितांसह काढलेला फोटो म्हणजे सेल्फी ठरते. मग अशा वेळेस तो परिसर आणि सोबतची मंडळी सारे काही टिपायचे तर त्यासाठी वाइड अँगलच उपयोगी पडणार. म्हणून नोकियाने या मॉडेलमध्ये ही खास सोय दिली आहे.
मोबाइलसाठी त्याचा प्रोसेसर सर्वाधिक महत्त्वाचा असतो. या मॉडेलसाठी क्वालकॉम स्नॅपडॅगन ४०० क्वाडकोअर प्रोसेसर वापरण्यात आला असून तो १.२ गिगाहर्ट्झ क्षमतेचा आहे. आजवरच्या अनेक लुमिआमध्ये ५१२ एमबी रॅमचा वापर केला जायचा. त्यामुळे रॅम वापराच्या ठिकाणी मोबाइलची क्षमता अध्र्यावरच यायची; पण या मॉडेलमध्ये मात्र नोकियाने थेट १ जीबी रॅमचा वापर केला आहे. सध्या बाजारात आलेल्या स्पर्धक कंपन्यांनीही एक जीबी रॅम वापरल्याने ती गरजच होती. ती इथे नोकियाने पूर्ण केलेली दिसते. याशिवाय ८ जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली असून ती एक्स्टर्नल मेमरी कार्डमार्फत तब्बल १२८ जीबीपर्यंत वाढविता येते. याच्या बॅटरीची क्षमता तब्बल २२० एमएएच एवढी आहे.
विंडोज फोन ८.१ ही अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टम या फोनसाठी वापरण्यात आली आहे. यामध्ये असलेला एक चांगला फायदा म्हणजे यात दोन्ही सिम कार्डासाठी स्वतंत्र टाइल्स मायक्रोसॉफ्टने दिल्या आहेत. अलीकडे दोन वेगवेगळी सिम कार्ड्स वापरण्याचा ट्रेंड आहे. त्यानुसार लोक कार्यालयीन कामासाठी वेगळे सिम वापरतात व वैयक्तिक क्रमांक वेगळा ठेवतात. मात्र अनेक ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये त्यासाठी वेगवेगळी सोय नसल्याने सर्व मेसेजेस एकाखालोखाल एक येतात आणि पाहताना अनेकदा लक्षात न आल्याने एका नंबरवरून आलेल्या मेसेजला उत्तर मात्र त्यातील डिफॉल्ट नंबरवरून जाते आणि फोन वापरणाऱ्यासह प्रत्यक्ष ज्याला संदेश पाठवला आहे, त्याचाही खूप गोंधळ उडतो. मात्र विंडोज फोनमधील या सुविधेमुळे इथे मात्र असा गोंधळ होणार नाही.
कॅमेऱ्यासाठी लुमिआच्या या मॉडेलमध्ये लुमिआ कॅमेरा, सिनोमाग्राफ, क्रिएटिव्ह स्टुडिओ, लुमिआ सेल्फी, लुमिआ स्टोरीटेलर अशी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध करण्याची सोय आहे. त्यातील सिनेमाग्राफ भरपूर वापरले जाते. या मोबाइलबद्दल बोलायचे तर, यातील सेल्फी अ‍ॅप सर्वाधिक वापरले जाईल, असे दिसते. इतर लुमिआ फोनप्रमाणे इथेही तसाच अनुभव येतो. उन्हातील फोटो चांगले येतात आणि कमी प्रकाशातील फोटोमध्ये मात्र तेवढा चांगला अनुभव येत नाही. या कॅमेऱ्यावर टिपलेल्या व्हिडीओज्चा दर्जा मात्र चांगला आहे.
एकाच वेळेस अनेक विंडोज ओपन केल्यानंतरही काम करताना या मोबाइलवर कोणतीही अडचण येत नाही. अनेक मोबाइल्सवर एकाच वेळेस अनेक अ‍ॅप्स ओपन केल्यानंतर हँग होत असल्याचा अनुभव येतो. तसा अनुभव या मोबाइलवर मात्र जराही आला नाही.
खरे तर आता याच रेंजमधील अनेक मॉडेल्स बाजारपेठेत उपलब्ध आहेत. या सर्व मॉडेल्समध्ये एकूणच कामाच्या बाबतीत लुमिआ ७३० अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो. प्रत्यक्ष कॉल्स, मेसेिजग, सर्व अ‍ॅप्स, कॅमेरा यांचा वापर सर्वाधिक होतो. तो करत असताना कोणतीही अडचण येत नाही. नोकिआने जाता जाता पैसावसूल फोन दिला आहे.
वैदेही
भारतीय बाजारपेठेतील किंमत- रु. १४,९९९ (मात्र ऑनलाइन संकेतस्थळांवर स्वस्तात उपलब्ध आहे.)

मराठीतील सर्व टेकफंडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nokia lumia 730 dual sim
First published on: 06-03-2015 at 01:26 IST