08 July 2020

News Flash

ट्रॅव्हलॉग : …महासागराच्या साक्षीने !

समृद्ध, प्रगत जीवनासाठी वेगवेगळय़ा संधींसाठी अमेरिकेचं आकर्षण अनेकांना असतंच. पण वेगळं काही पाहू, अनुभवू इच्छिणाऱ्यांनाही अमेरिका निराश करत नाही.

| July 25, 2014 01:04 am

समृद्ध, प्रगत जीवनासाठी वेगवेगळय़ा संधींसाठी अमेरिकेचं आकर्षण अनेकांना असतंच. पण वेगळं काही पाहू, अनुभवू इच्छिणाऱ्यांनाही अमेरिका निराश करत नाही.

शाळेत असताना भूगोलाच्या तासाला महासागरांची नावे पाठ करताना अ‍ॅटलासमध्ये बघूनच समाधान मानावे लागे. भविष्यात हे महासागर बघण्याचा योग येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण नातेवाइकांच्या आमंत्रणामुळे अमेरिकेत जाण्याचा व भटकंतीमध्ये प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक ओशनच्या काठाकाठाने मनसोक्त फिरण्याचा योग आला.
१७ माईल ड्राईव्ह – पेबल बीच हा पॅसिफिक किनाऱ्याच्या बाजूबाजूने १७ मैलांचा प्रवास म्हणजे एक नयनरम्य अनुभव! या भागाच्या एका बाजूला दाट झाडी तर दुसऱ्या बाजूला पॅसिफिक किनारा. या १७ मैलांच्या प्रवासाची सुरुवात दाट झाडीतून होते. रस्ता डोंगरउतारावरून खाली खाली जातो. तोपर्यंत आपण प्रशांत महासागराच्या काठी उतरणार आहोत याची कल्पना येत नाही. विविध वृक्षांची हिरव्या रंगाने नटलेली वनश्री बघून डोळय़ांचे पारणे फिटते. खड्डे नसलेल्या रस्त्यावरून आपली गाडी अगदी हळू जाते त्यामुळे सारं काही सावकाश पाहता येतं. इथे स्थानिक हकलबेरी झुडपं भरपूर आहेत, म्हणून त्याला हकलबेरी डोंगर म्हणतात. त्याशिवाय पाईन, मेपल्स त्यांच्या रंगछटांमुळे लक्ष वेधून घेतात.
मोटारगाडय़ांचा जमाना येण्यापूर्वी हा १७ मैलांचा रस्ता घोडागाडीने पार करावा लागे. एका बाजूला समुद्राची गाज तर दुसऱ्या बाजूला विविध वृक्षांची सलामी. १६०२ साली स्पॅनिश निसर्गप्रेमी प्रवाशांनी माँटेरे पेनिनसुला (द्वीपकल्प) शोधून काढला. त्यानंतर अनेक प्रवासी इथे भटकंती करत. पण राहाण्याची चांगली सोय व्हायला १८८० साल उजाडले. १९१६च्या सुमारास तर गोल्फ लिंक्स झाल्या. मोठय़ा प्रमाणावर पर्यटक येऊ लागले. त्या वेळी १९१९ साल होतं. वेगवेगळय़ा गोल्फ स्पर्धा इथे भरू लागल्या. अगदी अलीकडे म्हणजे २०१० साली पाचवी यू.एस. ओपन गोल्फ टुर्नामेंट इथे झाली. जगातील सर्व गोल्फ खेळाडूंचे इथे येऊन गोल्फ खेळण्याचे स्वप्न असते.
१७६९ साली स्पॅनिश संशोधक व सहकारी ‘माँटेरे बे’च्या शोधात इथे मुक्काम ठोकून होते. या पिकनिक स्पॉटला स्पॅनिश बे म्हणतात.
इथे समुद्रात जो जमिनीचा खडकाळ भाग आहे तिथे लाटांचा अगदी खळखळाट असतो. ‘पॉइंट जो’ जवळच हा भाग आहे. अगदी सुरुवातीला दर्यावर्दी या भागालाच ‘माँटेरे बे’कडे जाण्याचा मार्ग समजत. पण या खडकाळ भागावर त्यांच्या बोटी आपटत. समुद्रात बुडालेल्या खडकांचा अंदाज न आल्याने असे अपघात होत.
साधारण १८व्या शतकाच्या अखेरीस व १९व्या शतकाच्या प्रारंभी चिनी कोळय़ांनी ‘पॉइंट जो’ व ‘चायना रॉक’ येथे या खडकांच्या आधारे उतरत्या छपरांच्या घरे बांधली.
मग दिसतो तो ‘बर्ड रॉक.’ साधारण १९२० सालच्या सुमारास ११ व्या कॅव्हलरीकडून घोडे सवारीसाठी हा भाग वापरला जायला सुरुवात झाली. पण खूप वर्षे आधी या भागात घोडय़ांच्या विशिष्ट प्रकारच्या शर्यती होत असत.
‘बर्ड रॉक’ हा खऱ्या अर्थाने पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. अगणित पक्षी या किनाऱ्याजवळ असलेल्या खडकांवर ये-जा करतात. हार्बर सील्स आणि सी-लायन्सचे या खडकांवर मोठय़ा प्रमाणात वास्तव्य आहे. सी-लायन्स विचित्र वास आणि कर्कश आवाज नकोसा वाटतो.
यापुढे सील रॉक्स हा पिकनिक स्पॉट आहे. तिथे आरामात बसून जलचर व पक्षी यांचं निरीक्षण एकाच वेळी करू शकतो. वेळ कसा जातो ते कळत नाही. इथून थोडं पुढे गेल्यावर अगदी पांढरीशुभ्र वाळू आपलं मन मोहून घेते. दरवर्षी वसंत ऋतूत हार्वर सील्स या ठिकाणी प्रजननासाठी येतात. त्यामुळे १ एप्रिल ते १ जून दरम्यान पर्यटकांच्या पसंतीचा पिकनिक स्पॉट बंद असतो.
सर्वसामान्यांसाठी स्पायग्लास हिल्स गोल्फ कोर्स खुले असून ‘ट्रेझर आयलँड’ या सुप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखकाला स्फूर्ती मिळाली ती येथील वृक्षराजी व समुद्र यांच्या निकटपणामुळे, जे सौंदर्य मनाला भावते त्यातूनच!
पुढे १३ एकरांत पसरलेली क्रॉकर ग्रोव्ह आहे. पाईन व सायप्रेस वृक्षराजीने भरलेली ही दुनिया अलगच आहे. माँटेरी सायप्रस ज्याला सर्व सायप्रस झाडांचा पितामह मानतात तो इथेच आहे. या सायप्रस पॉइंटचं महत्त्व गेल्या १०० वर्षांहून अधिककाळ अबाधित आहे. येथून दिसणारी पॅसिफिकची किनारपट्टी मनाला मोहून टाकते. बहरलेला महासायप्रस जणू आपल्याला सांगतो की निर्मळ मनाने हे निसर्गसौंदर्य बघा.
कॅलिफोर्नियातील महत्त्वाची खूण म्हणजे ‘एकला सायप्रस.’ या उंच खडकाळ भूमीवर हा ‘एकला सायप्रस’ गेली २५० वर्षे अभिमानाने ताठ उभा असून, अनेकांसाठी प्रेरणास्रोतच आहे.
दुसरा माँटेरी सायप्रस ज्याला ‘घोस्ट सायप्रस’ म्हणजे ‘भूत सायप्रस’ असं म्हणतात. त्याचं खोड वाऱ्याच्या माऱ्यामुळे पांढरं पडलं आहे. पहात रहावं असा हा वृक्ष. त्यानंतर येतो शेवटचा ‘पॉइंट पेसकॅडरो!’ ‘कार्सेल बे’ आणि ‘स्टील वॉटर कोव्ह’ याचे उत्तरेकडचे टोक!
पर्यटकांसाठी इथे उत्तम हॉटेल्स, गोल्फ कोर्स व इतर अनेक सोई आहेत. या भागात अनेक लेखक, सिनेजगतातील महान व्यक्ती राहतात. त्यांच्या प्रतिभेचा फुलोरा भरभरून उमलेल असे निसर्गरम्य वातावरण इथे आहे. जगातील सर्वात प्रेक्षणीय असे धरती-सागर मीलनाचे ठिकाण म्हणून पेबल-बीच ओळखले जाते.
गोल्डन गेट ब्रिज
जगामध्ये जे उत्तोमोत्तम पूल बांधलेले आहेत त्यांमध्ये ‘गोल्डन गेट ब्रिज’ हा मानाचे स्थान पटकावून आहे. कॅलिफोर्नियातील सॅनफ्रॅन्सिस्को इथे असलेला हा पूल सॅनफ्रॅन्सिस्को बे व मरिन कौंटी- पॅसिफिक महासागराला जोडतो. आम्ही तिथे पोचलो तेव्हा सकाळच्या सूर्याच्या किरणांनी पूल उजळून निघाला होता. ‘गोल्डन गेट ब्रिज’ हे नाव सार्थ झाल्याचे वाटले.
२७३७ मीटर्स लांबीचा हा पूल आम्ही गाडीने पार केला. पुलाच्या अलीकडचे म्हणजे शहराच्या बाजूचे पार्किंग जवळजवळ भरलेले होते. तर पुलावरून चालत जाऊन परत येण्याचा वेळ व चालणे या दृष्टीने बराच खटाटोप झाला असता. तसेही पलीकडे मरिन कौंटीला भटकायचं होतंच. त्यामुळे पुलाची भव्यता न्याहाळत गाडीने पूल पार केला. गाडी पार्क करून जेवढं चालत जाऊन परतता येईल असा अंदाज घेण्याचं ठरवून पुलावर चालायला सुरुवात केली. उन्हामध्ये खूप उबदार वाटत होतं पण वारा मात्र असा भन्नाट होता की चालणं कठीण झालं. चक्क मागे मागे ढकलले जात होतो. समोरून येणाऱ्या मोटारींमुळे येणाऱ्या हवेच्या झोताची भर पडत होती. पण सुदैवाने वारा पडला आणि चालणं शक्य झालं.
गोल्डन गेट ब्रिज हा भक्कम अशा दोन केबल्सवर सस्पेंडेड आहे. या दोन केबल्सची लांबी ८०,००० मैल आहे. पृथ्वीला एक वळसा होईल एवढी. ९० फूट रुंदी असलेल्या या पुलाच्या दोन्ही बाजूंना पादचाऱ्यांसाठी व्यवस्थित रस्ता ठेवला आहे. या पुलाचा मुख्य सस्पेंडेड भाग ४२०० फुटांचा आहे.
हा पूल बांधणाऱ्यांचं खरोखर कौतुक करावं तेवढं थोडंच! या पुलाचे प्रमुख शिल्पकार आहेत जोसेफ स्ट्रॉस, इरव्हिंग मॉरो आणि चार्लस् इलिस. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना दिलेली साथ अमोल होती. त्यांच्या कंपन्यांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास या त्रयीने सार्थ केला. एवढंच नव्हे तर दिलेल्या वेळेच्या आधीच व अपेक्षित बजेटपेक्षाही कमी खर्चात हा पूल बांधला गेला. दिलेल्या कालावधीपेक्षा अनेक र्वष उलटून गेली तरी प्रकल्प सुरू न होणं व त्यामुळे अंदाजापेक्षा कैकपटीने जास्त खर्च होणं या गोष्टींचा आपल्याला अनुभव असल्याने हे कसं शक्य आहे हे असंच आपल्याला वाटत. पण हे सत्य समोर दिसत आहे, हे पण मान्य करावं लागतं.
सुरुवातीला हा प्रकल्प हाती घेण्याचं धाडस करायला बरेच जण कचरत होते. याचं मुख्य कारण प्रशांत महासागर हेच आहे. नाव जरी प्रशांत असलं तरी सॅनफ्रॅन्सिस्को बेमधील पाण्याचा प्रवाह हा उसळत्या लाटांच्या रूपातच आहे. जोडीला तुफान वारे आणि येथील पाण्याची खोली.
ज्याप्रमाणे भगीरथाने स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणल्याची कथा आपण वाचतो त्याप्रमाणे स्ट्रॉस व त्यांच्या सहकाऱ्यांनी बांधलेला ‘गोल्डन गेट ब्रिज’ आपण प्रत्यक्ष डोळय़ांनी पाहतो, त्यावरून जातो, त्याची माहिती वाचतो, पूल पार करुन पल्याड पोहचल्यावर मागे वळून त्याचं सौंदर्य पाहिल्यावर थक्क होतो.
५ जानेवारी १९३३मध्ये या पुलाच्या बांधकामाला सुरुवात होऊन २७ मे १९३७ मध्ये पूल पूर्ण झाला. त्या वेळचे अमेरिकेचे प्रेसिडेंट रुझवेल्ट यांनी व्हाइट हाऊसमध्ये बटन दाबून या पुलाचं उद्घाटन केलं व जनतेसाठी हा पूल खुला झाला.
पुलाखाली पूर्वी सोन्याचा साठा होता म्हणून ‘गोल्डन गेट’ असं नाव दिल्याचं सांगतात.
या टॉवर्सचा रंग केशरी/नारिंगी आहे. याची दोन कारणं आहेत. आजूबाजूची किनारपट्टीवर असलेली हिरवी वनश्री, निळंशार पाणी व निळं आकाश या पाश्र्वभूमीवर हे केशरी टॉवर्स परिसराची शोभा वाढवितात. दुसरं महत्त्वाचं कारण समुद्रातील जहाजांना केशरी रंगामुळे अगदी धुकं असलं तरी हे टॉवर्स दिसतात.
ज्या दोन प्रमुख केबल्स आहेत त्या दोन्ही बाजूंना काँक्रिटमध्ये भक्कम रीतीने बसवल्या आहेत. प्रत्येक केबलमध्ये २७,५७२ वायर्स आहेत. यावरून या केबल्स किती मजबूत आहेत व म्हणूनच त्या या सस्पेंडेड पुलाचा त्यावरील वाहतुकीचा भार पेलू शकतात हे लक्षात येतं.
या पुलावरून २०१२ पर्यंत १६०० लोकांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. अनेक आत्महत्यांची नोंद झालेली नाही. सुमारे २४५ फूट उंचीवरून उडी मारताना डोक्यावर आपटल्याने आत्महत्या करणाऱ्यांपैकी जवळजवळ ९८ टक्के लोक मरतात. जगामध्ये आत्महत्या करण्यासाठी निवडली जाणारी ही दुसऱ्या क्रमांकाची जागा आहे असा निष्कर्ष आहे. इतक्या सुंदर व प्रेक्षणीय पुलासाठी हे गालबोट आहे.
भन्नाट वाऱ्यामुळे आत्तापर्यंत ३ वेळा पूल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये पुलावरील वाहतूक सुरक्षा कामानिमित्त ‘गोल्डन गेट ब्रिज’ ५२ तास सलग वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची सूचना आधीच जाहीर केली आहे. कार्यतत्परता म्हणतात ती हीच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2014 1:04 am

Web Title: oceans
Next Stories
1 डोकं लढवा
2 वारशाचा इतिहास!
3 वाचक प्रतिसाद : चित्राच्या बाजारावर सारेच उदासीन…
Just Now!
X