साधारण ३० वर्षांपूर्वी कामामुळे आईवडिलांना भेटायला जायला १०-१५ दिवसांमध्ये काही तासांकरताच वेळ मिळायचा. दरवेळी प्रेमाने माझ्याबरोबर जेवणारे माझे वडील दसऱ्याच्या दिवशी मला ‘तू आधी जेव मी नंतर जेवतो’ असे म्हणाले. आईला विचारले तर ती म्हणाली, हल्ली त्यांना जेवायला खूप वेळ लागतो. प्रत्येक घासाबरोबर पाणी प्यावे लागते.’ मी दुसऱ्याच दिवशी त्यांना रुग्णालयात नेऊन त्यांची बेरियम स्वालो टेस्ट (Barium Swallow) केली तेव्हा त्यांना अन्ननलिकेचा कर्करोग आहे समजले. उशिरा सांगितल्याने तो बराच पसरला गेला होता. पुढे त्यांच्यावर सर्व उपचार केले, पण वाढलेल्या आजाराने त्याला यश आले नाही. इतर कुठल्याही कर्करोगाप्रमाणे हा कर्करोग लवकर लक्षात आला असता तर त्यावर नक्कीच जास्त चांगले उपचार करून त्याचा त्यांना फायदा झाला असता.

‘हल्ली जेवताना घास अडकल्यासारखा वाटतो, किंवा पाण्याचा घोट घेतल्यावरच घास खाली सरकत जातो’, अशा तक्रारी घेऊन उतारवयातील व्यक्ती अनेकदा येत असतात. वैद्यकशास्त्रात ही उतारवयातली धोक्याची सूचना असते. अन्ननलिकेत उत्पन्न झालेल्या ह्य अडथळ्याची कारणे अनेक असतात. त्यातील काही कारणे खालीलप्रमाणे असू शकतात.
१) अन्ननलिकेत आलेला पडदा (web)
२) दबली, चिमटली गेलेली अन्ननलिका
३) हालचाल मंदावलेली अन्ननलिका
४) अन्ननलिकेला आतून आलेली गाठ जी साधी वा कॅन्सरची असू शकते.
त्यामुळे प्रत्येक वेळी घास गिळायला त्रास होणे म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर असू शकेल असं नाही. इतर कारण असायचीही शक्यता असू शकते. त्यामुळे जर कुणाला गिळताना घास अडकल्यासारखे होत असेल तर डॉक्टरी सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्लय़ाप्रमाणे तपास करावे व योग्य निदान करून घ्यावा व त्यानुसार इलाज करावा.
या अनुषंगाने आज आपण अन्ननलिकेच्या कॅन्सरबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ या. वृद्धत्वामुळे येणाऱ्या मृत्यूमध्ये अन्ननलिकेच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण तसे बरेच आहे. शिवाय गिळण्याच्या त्रासामुळे दिनचर्याही त्रासदायक होते.

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Guru Gochar 2024
Guru Gochar 2024 : २० दिवसानंतर ‘या’ राशींचे नशीब पालटणार, वर्षभर मिळेल यांना बक्कळ धनलाभ

अन्ननलिकेच्या कॅन्सरची कारणे
* अतिमद्यपानामुळे व धूम्रपानामुळे
* कुठल्याही स्वरूपातील तंबाखू खाणे व तंबाखूची मशेरी लावणे
* रोजच्या आहारात फळे व हिरव्या भाज्या नसल्याने
* साठवलेले अन्नपदार्थ खाणे
* जेवणातून अ, ब, ई जीवनसत्त्व यांची कमतरता
* अतितिखट व अतिमीठ खाणे
* काही वेळा हा कॅन्सर आनुवंशिक पण असू शकतो. तो साधारण सत्तरीनंतर आढळून येतो.
अन्ननलिकेचा कॅन्सर हा दुर्धर असतो. पूर्वी हा साठी-सत्तरीच्या लोकांमध्ये सापडायचा, पण हल्ली खासकरून आपल्या देशात हा कॅन्सर तिशीतील, चाळिशीतील लोकांमध्येही आढळू लागला आहे.

अन्ननलिकेच्या कॅन्सरची लक्षणे
प्रमुख लक्षण म्हणजे गिळायला त्रास होणे, पाणी सहज जाते, परंतु जड/घन रूप अन्न घशात अडकते. गिळताना घास अडकणे, छातीत दुखणे, घास खाली घालण्यासाठी घासानंतर पाणी पिणे आवश्यक ठरणे. पुढे पुढे पाणी पितानाही अडकल्याचा त्रास जाणवतो व पाठीत दुखते.
कॅन्सरची गाठ अन्ननलिकेतील पोकळीतील २/३ जागा व्यापून उरते. इथे कॅन्सर हा जसा आत आत अन्ननलिकेला पार भेदून तिच्या आजूबाजूच्या टिश्यूमध्ये पण पसरत गेलेला असतो. म्हणजे निदान होईपर्यंत आजार बराच वाढलेला व पसरलेला असतो.
याच्या जोडीला भूक मंदावणे, वजन कमी होणे, खोकल्याची उबळ येऊन अन्न बाहेर येणे, केव्हा केव्हा आवाज घोगरा होणे वा बसणे, अन्न गिळताना खोकल्याची उबळ येणे, पाठीत/ छातीत दुखणे, क्वचित रक्ताची उलटी होऊ शकणे, हाड दुखू लागणे, पोटात हाताला गाठ लागणे व मानेत गाठ येणे इ. लक्षणे कॅन्सर पूर्ण शरीरात पसरत गेला असेल तर आढळतात.
पूर्वी जरी हा आजार बेरियम स्वालोने लक्षात येत असे तर हल्ली एन्डोस्कोपीने निदान होते. एन्डोस्कोपीच्या तपासामध्ये रुग्णाच्या तोंडातून एक टय़ूब अन्ननलिकेत घातली जाते. या टय़ूबच्या टोकाला कॅमेरा असतो व पूर्ण अन्ननलिका त्यामुळे डॉक्टरला पाहता येते. काही गाठ वाटल्यास त्याची बायॉप्सी घ्यायची म्हणजे त्याचा तुकडा काढून घ्यायची सोय असते. या बायॉप्सीवरून कॅन्सरचे निदान करता येते. काही एन्डोस्कोपीमध्ये सोनोग्राफीही करता येते. यामध्ये कॅन्सर बाहेर किती वाढला आहे, तो कुठपर्यंत पसरला आहे, हेही पाहता येते. छातीचा एक्सरे व सीटी स्कॅन-कॅन्सर छातीत आजूबाजूला पसरला आहे की नाही हे कळण्यासाठी याचा उपयोग होतो. बोन/पेट स्कॅन करून हाडात/ इतरत्र हा कॅन्सर शिरला आहे का समजते.

उपाययोजना
१) रुग्ण डॉक्टरकडे लवकर आला तर कॅन्सर पसरण्यापूर्वीच त्याचे निदान करता येते. अशा वेळी शस्त्रक्रिया करून अन्ननलिकेची गाठ काढून टाकता येते. बऱ्याचदा अन्ननलिका पूर्णपणे काढावी लागते व जठराची नळी करून अन्न जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागते. या शस्त्रक्रिया मोठय़ा व जिकिरीच्या असतात, परंतु यशस्वी झाल्यास रुग्णास चांगले जेवता येते व आता या शस्त्रक्रिया Thoracoscopy द्वारेही होऊ शकतात.
२) शस्त्रक्रिया करणे शक्य नसेल तर दुर्बिणीतून एक स्टेंट (जाळीचा रस्ता) टाकून अन्नमार्ग मोकळा केला जातो. लेझरसारखे उपकरण वापरूनही रस्ता मोकळा करता येतो. यामुळे रुग्णांना तोंडाने जेवता येते.
३) विविध कर्करोगावरची औषधे (केमोथेरपी) किंवा क्ष-किरण चिकित्सा (रेडिओथेरपी) ही वापरूनही रुग्णास काही प्रमाणात आराम देऊ शकतो.
४) हल्लीच्या काळात लवकर निदान झालेला कर्करोग केवळ दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करूनही बरा केला जातो.
थोडक्यात अन्ननलिकेचा कर्करोग जरी दुर्धर असला तरीही लवकर लक्षात येऊन त्यावर योग्य उपाय केले तर नक्कीच काही वर्षे तरी आरामदायी आयुष्य देऊ शकतो.
डॉ. अविनाश सुपे