‘जिनका घर शिशों का होता है, वो दुसरों पर पत्थर फेंका नही करतें’ अशा दमदार डायलॉगबाजीने प्रेक्षकांच्या टाळय़ा घेणाऱ्या राजकुमारची ३ जुलै ही १८ वी पुण्यतिथी. त्यानिमित्त राजकुमारच्या आगळय़ावेगळय़ा कारकिर्दीचे अवलोकन..

राजकुमारचे निधन, त्या संदर्भातील बातमी, त्याच्यावरचे अंत्यसंस्कार हे सगळंच त्याच्या आपल्या खासगी आयुष्याबाबत शक्य तितकी गुप्तता पाळा, अशाच स्वभावधर्मानुसार झाले.. ३ जुलै १९९६ चा तो दिवस. भ्रमणध्वनी, इंटरनेट यांचे आगमन होण्यापूर्वीचा तो काळ. मोजक्या उपग्रह वाहिन्या मात्र आल्या होत्या, पण ‘चोवीस तास’ बातम्यांचा रतीब घालण्याची प्रवृत्ती आली नव्हती. तात्पर्य, राजकुमारच्या निधनाचे वृत्त वेगाने पसरावे असे वातावरण नव्हते. साधारणपणे दुपारी दोन-अडीच वाजल्यानंतर वृत्तपत्राच्या कार्यालयातील आम्ही काही सिनेपत्रकार एकमेकांना दूरध्वनीवरून ‘असे काही घडले ते खरे आहे का’ विचारू लागलो. राजकुमारचा मुलगा पुरू याची भूमिका असणाऱ्या ‘बाल ब्रह्मचारी’ या चित्रपटाच्या पीआरओलाही या चित्रपटाचा निर्माता- दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्याकडून ही दु:खद बातमी उशिरा कळली होती. प्रसार माध्यमात या बातमीची खातरजमा होईपर्यंत त्याच्यावर अंत्यसंस्कार झालेदेखील होते..
तो राजकुमारसारखा जगला व स्वत: निर्माण केलेल्या अनाकलनीय अशा प्रतिमेनुसारच जगाच्या पडद्यावरून गेला. सिनेमाच्या भाषेत ‘कन्टिन्युटी’.
राजकुमारच्या यशोगाथेवर दृष्टिक्षेप टाकताना त्याच्या ‘प्रगतिपुस्तका’नं किती सुपरहिट चित्रपट आहेत, किती अपयशी ठरले यावरून मोजदाद करणे योग्य नाही. राजकुमार त्यापलीकडे जाऊन आपले अस्तित्व वलय व लोकप्रियता निर्माण करण्यात यशस्वी ठरला. कधी तो एखादे कोडे ठरावा, तर कधी घमेंडी वाटावा, असे काहीसे हे चमत्कारिक समीकरण आहे.
विशिष्ट शैलीतील संवादफेक आणि त्याच्या वागण्यासंदर्भातील वेडेवाकडे किस्से या दोन गोष्टींसाठी त्याची ओळख अधोरेखित झाली.
बी. आर. फिल्म निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ या मल्टिस्टार कास्ट चित्रपटातील त्याने रहेमान याला उद्देशून केलेला संवाद त्या काळात (१९६७ ) प्रचंड गाजला व असे संवाद म्हणजेच आपली अभिनयशैली असे तो मानू लागला. तो संवाद होता, ‘चिनॉय शेठ शिशे के घर में रहनेवाले लोग दुसरों के उपर पत्थर नही फेंका करते.. यह चाकू कोई बच्चे के खेलने की चीज नही, हाथ कट जाएगा तो खून निकल आयेगा..’ या संवादाला रसिकांच्या प्रचंड टाळय़ा पडल्या व या यशानंतर राजकुमारने अभिनयापेक्षा संवादफेकीवर जरा जास्तच लक्ष केंद्रित केले. कधी त्यात तो प्रभावीदेखील ठरला. उदा. कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकिजा’मध्ये तो मीनाकुमारीला एकदा म्हणतो, ‘यह पाँव जमीं पे मत रख देना, मैले हो जायेंगे..’ तर कधी तो व्यक्तिरेखेबाहेर येऊन राजकुमारढंगात संवाद बोलू लागला. मर्यादा, चंबल की कसम, बुलंदी, दिल का हीरा, कर्मयोगी अशा चित्रपटांत तसा प्रत्यय येतो. पण ‘एका विशिष्ट लयीतील संवाद’ अशी त्याची ओळख व ताकददेखील झाल्याने दिग्दर्शक त्याला स्वातंत्र्य देतात असे जाणवू लागले. आणि त्याच्या याच गुणावर ‘फिदा’ असणारा असा त्याचा स्वत:चा एक मोठा चाहतावर्गही निर्माण झाला. तो राजकुमारचे संवाद ऐकायला सिनेमाचे तिकीट काढू लागला. त्याच्या संवादावर मनसोक्त टाळय़ा मारू लागला. गिरगावातील इम्पिरियल या चित्रपटगृहाच्या भिंतीवर त्याचे ‘बुलंदी’चे संवाद लिहिले होते, ते वाचून तिकीट काढणारे फिल्मदीवाने होते. हेदेखील यशच!
राजकुमार संवादफेकीतला बादशहा म्हणून ओळखला जाताना त्याच्यातील अत्यंत गुणी सशक्त व संवेदनशील कलाकार बाजूला पडला. मेहबूब खानचा ‘मदर इंडिया,’ श्रीधरचा ‘दिल एक मंदिर,’ चेतन आनंदचा ‘हीर रांझा’ या चित्रपटांत राजकुमारचा उत्तम अभिनय पाहायला मिळतो. कालांतराने चेतन आनंदच्या ‘कुदरत’ या पुनर्जन्मावर आधारित चित्रपटातही राजकुमारने सकस अभिनयाचा प्रत्यय दिला.
तो सहकलाकारांशी तिरसटपणे वागतो, अनावश्यक सल्ले व उपदेश देतो, याबाबतही केवढय़ा तरी कथा, किस्से, दंतकथा प्रसिद्ध आहेत. चित्रपट कलाकारांच्या ‘इतनी सी बात’ला तिखट-मीठ लावून अशा गोष्टी पुन:पुन्हा रंगवून सांगितल्या जाताना त्यावरून त्या कलाकाराभोवती एक प्रतिमा निर्माण होते. राजकुमार अशा दंतकथेचा जणू ‘नायक’ ठरला. दिग्दर्शक राज खोसलाला एका पार्टीत म्हणे त्याने विनोदवीर राजकिशोर अशी हाक मारून अवमानित केले, झीनत अमानला अशाच एका ‘पार्टी’त त्याने ओळखलेच नाही व म्हटले, ‘इतनी खूबसूरत हो तो फिल्मों में काम क्यू नहीं करती..?’ ‘गलियों का बादशाह’साठी नृत्याच्या चित्रीकरणात भाग घेताना तो स्मिता पाटीलला म्हणाला, ‘आर्ट फिल्मों में काम करने से कुछ नहीं आता, डान्स आना जरुरी है..’ (हे स्मिताने ऐकून घेतले असेल असे वाटते का?) एकदा परेश रावलने त्याला म्हणे उलट उत्तर देत म्हटले की, राजकुमारसर, किसी की आवाज अच्छी होती है तो किसी की अॅक्टिंग.. मगर अॅक्टिंग अच्छी होना जरुरी है.
अशा किश्शांमुळे राजकुमार सतत चर्चेत राहिला. चित्रपटसृष्टी, चित्रपटरसिक व प्रसारमाध्यमे यांना असे किस्से म्हणजे खमंग खुराकच. त्यात तथ्य किती याचा कधीच कोणी शोध घेतला नाही.
कोणत्याही व्यक्तिरेखेत एकाच सुरात संवाद म्हणण्याच्या त्याच्या तथाकथित स्टाइलवर कोणाही दिग्दर्शकाने त्याला रोखले नाही. (बहुधा त्याचे तेच वैशिष्टय़ चित्रपटाला तारेल अशी दिग्दर्शकाला खात्री असावी.) आणि त्याच्या वागण्यात तिरसटपणा का असावा, यामागची मानसिकताही कोणी शोधली नाही. (चित्रपट कलाकाराची लोकप्रियता पाहावी, त्याचे वागणे तपासू नये असा समज असावा.) या साऱ्यातून त्याची जानी अशी ओळख झाली व त्या नावानेच तो ओळखला गेला. त्यात त्याची अभिनेता म्हणून वाढ खुंटली.
‘जेमिनी पिक्चर्सच्या एस.एस. वासन दिग्दर्शित ‘पैगाम’ (१९५९) नंतर मुक्ता आर्ट्सच्या सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’ (१९९१)मध्ये तो तब्बल एकतीस वर्षांनी दिलीपकुमारसमोर उभा ठाकला. तेव्हा त्याच्यात तोच आत्मविश्वास होता. तो कुठेही कमी पडला नव्हता.
वरळी सी-फेस येथून आपल्या बंगल्यातून तो उघडय़ा जीपमधून एखाद्या राजकुमारासारखा मुंबईच्या उपनगरातील स्टुडिओत येई, पण कोणत्याही सिग्नलला त्याची गाडी थांबली असता कोणीही चाहता अथवा बघ्यांतील कोणीही पुढे सरसावण्यास धजावत नसे. अंधेरीच्या सेठ स्टुडिओत ‘कुदरत’ या व बांद्रा बॅण्ड स्टॅण्डच्या बंगल्यात (जो आज शाहरुखचा ‘मन्नत’ नावाने आहे.) मेहुलकुमारचा ‘तिरंगा’ या दोन चित्रपटांच्या सेटवर ‘शूटिंगचा आँखो देखा हाल’ अशा स्वरूपाच्या सिनेपत्रकारितेसाठी गेलो असता राजकुमारचे गोरेगोमटे रूपडे, त्याचा दरारा, रुबाब हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. अत्यंत शांतपणे तो सेटवर आला, तो येताच सेटवरच्या शांततेत भर पडली. मग दिग्दर्शकाचे त्याच्याशी अदबीने वागणे सुरू झाले. आता तो सगळय़ांच्या केन्द्रस्थानी होता. आता तो दृश्य- संवाद, समोरच्या कलाकाराची जागा, कॅमेऱ्याचा वावर असे सगळे व्यवस्थित समजून घेणार, मध्येमध्ये नाक अथवा डोळय़ांखाली खाजवणार, गळय़ावरून हात फिरवणार आणि मग ही स्वारी कॅमेऱ्यासमोर येणार. कामाची कसलीही घाई नसणे हे त्याचे वैशिष्टय़. दुपारी सेटवरच्या उंच ब्रेकची घोषणा होताच तो आपल्या खोलीत/ मेकअप रूममध्ये जाणार (तोपर्यंत व्हॅनिटीचे आगमन झाले नव्हते) दोन तासांची व्यवस्थित विश्रांती-झोप वगैरे घेऊन मग पुन्हा ताजातवाना होऊन सेटवर येणार. एखाद्या ‘राजा’सारखा तो वावरायचा, त्याला ते शोभायचे. त्याच्या कामाची अशी पद्धत असल्यानेच त्याच्या चित्रपटांची संख्या वाढली नाही. त्याची त्याला आपल्या अस्तित्त्व अथवा स्टारडमसाठी गरजच भासली नाही. तो मात्र ऐटीत सांगे, ‘लोग मुझे देखने के लिए फिल्मो की तिकीट खरीदते है..’ त्याच्या बोलण्यातला हा गर्व अथवा दर्प काहींना खटकेल, पण त्यात त्याचा आत्मविश्वास होता ना? हेमामालिनीने त्याच्यासोबत ‘लाल पत्थर,’ ‘शरारा,’ ‘एक नयी पहेली,’ ‘कुदरत’ इत्यादी चित्रपटांतून आवर्जून भूमिका केली, यावरून तो खाजगी पातळीवर अत्यंत सहकारी वृत्तीचा असावा. त्याच्या पुरू, पाणिनी या मुलांनी व वास्तविकता या मुलीनेही चित्रपटाच्या क्षेत्रात पाऊल टाकले, पण राजकुमारमधील एकही गुण त्यांच्यात नसल्याने त्यांची वाटचाल खुंटली. ‘जानी’चे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, त्याने कधीही आम्हा सिनेपत्रकारांशी ऊठसूट ‘सुसंवाद’ ठेवला नाही. आपल्या चित्रपटाचा मुहूर्त, त्याचे चित्रीकरण, प्रीमियर खेळ, पाटर्य़ा यातील आपल्या वागण्यातून तो आपल्याबाबत काय लिहिले जावे यांचा जणू पुरवठा करीत असे. अगदीच कोणी मुलाखतीसाठी आग्रह धरलाच तर तो नजर भिडवत म्हणे, ‘होमवर्क करके आ जाना, राजकुमार से मुलाखत कोई आसान बात नही है..’
जानी कसा अवघड, विक्षिप्त व विचित्र होता याचे हे असे कितीतरी रंग आहेत. पण कारकिर्दीच्या सुरुवातीला दिलीप-देव-राज या त्रिमूर्तीच्या वाटचालीतही जानीने उभे राहण्यात यश मिळवले व नंतर मनोजकुमार सुनील दत्त-धर्मेद्र-जीतेंद्र-राजेश खन्ना यांच्यासमोरही तो वाटचाल करू शकला. अर्थात, त्याचे वळण, त्याचा रस्ता पूर्णपणे वेगळा होता. राजकुमार हे वेगळे रसायन आहे हे त्यात त्याने सतत सिद्ध केले, अगदी त्याच्या मृत्यूची बातमीदेखील त्याच्या त्या वाटचालीला साजेशी ठरली. त्याला कर्करोगाने ग्रासले असल्याची बराच काळ चर्चा असूनही त्या दरम्यान त्याने ‘सौदागर’मधील भूमिका साकारली होती, पुढेही काही काळ वाटचाल केली, पण आपल्या आयुष्याचा शेवट मात्र सहजी कोणाला कळणार नाही असाच केला.
राजकुमारच तो, तसाच तिरसट वागणार…