lp63गेल्या तीन भागांमधून आपण या वेळच्या ऑस्कर नामांकन मिळालेल्या चित्रपटांचा आढावा घेतला. या भागात ऑस्कर नामांकन मिळालेल्या, पण प्रत्यक्ष ऑस्कर मिळण्याची शक्यता खूपच कमी असलेल्या चित्रपटांबद्दल-

काही वर्षांपूर्वी ऑस्करला सर्वोत्कृष्ट चित्रपटांची पाच नामांकनं असायची. पुढे हा आकडा वाढवून दहापर्यंत नेण्यात आला. याला अर्थातच कारणं होती. तद्दन व्यावसायिक चित्रपटांच्या पलीकडे जाऊन अधिक विस्तृत पटावर चित्रपटांची दखल घेणं शक्य व्हावं हे एक, तर अधिक नामांकनांच्या निमित्ताने समारंभातही चित्रपट उद्योगाच्या अधिक मोठय़ा तुकडय़ाला सामावून घेता यावं आणि ओघानेच कार्यक्रमाचं आकर्षण अधिक वाढवून त्याची सेलेबिलिटीही वाढवावी हेदेखील तितकंच महत्त्वाचं. यामुळे होतं काय, की दर वर्षी नामांकनांवर हक्क सांगणाऱ्यांमध्ये काही चित्रपट असे असतात, ज्यांना नामांकनात असूनही सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पारितोषिक मिळण्याची जराही शक्यता नाही. यंदा असे चित्रपट आहेत, ते डेमिएन चेजेलचा ‘व्हिपलॅश’, आवा डुवर्नेचा ‘सेल्मा’ आणि क्लिन्ट इस्टवूडचा ‘अमेरिकन स्नायपर’.
या चित्रपटांना पुरस्कार नक्की मिळणार नाही हे जवळपास ठरल्यात जमा असलं तरी याचा अर्थ हे चित्रपट चांगले नाहीत असा मात्र मुळीच नाही. ते ऑस्करच्या गणितात बसणं कठीण आहे इतकंच. यातले दोन चित्रपट म्हणजे ‘स्नायपर’ आणि ‘सेल्मा’. हे परस्परांपेक्षा खूपच भिन्न असूनही त्यांची काही एका पातळीवर तुलना होऊ शकते. इराकच्या युद्धात शौर्य गाजवून आलेल्या आणि युद्धबाह्य़ परिस्थितीत मारल्या गेलेल्या क्रिस काईल या अमेरिकेतल्या सर्वात तरबेज नेमबाजाची शौर्यगाथा आणि मार्टिन लूथर किंगने कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी दिलेला ऐतिहासिक लढा, यात तुलनेसाठी साम्यस्थळं तरी काय, असा प्रश्न पडणं साहजिक आहे; पण उत्तर तसं सोपं आहे. या दोन्ही चित्रपटांना सत्य घटनांचा आधार आहे. या दोन्ही चित्रपटांत दिसणारे लढे हे अमेरिकेची प्रतिमा काही प्रमाणात डागाळणाऱ्या इतिहासाचा भाग आहेत.
‘अमेरिकन स्नायपर’ हा पुष्कळ चालला. इस्टवूडसारख्या मोठय़ा दिग्दर्शकाचा चित्रपट असल्याने अन् चित्रपट स्वतंत्र कलाकृती म्हणून दर्जेदार असल्याने यात काही आश्चर्यही नव्हतं, पण पुढे यातून वाद उभे राहिले. चित्रपटाला ज्या युद्धाचा संदर्भ आहे, ते आज अमेरिकन जनतेच्या डोक्यात ताजं आहे, किंबहुना व्हिएतनाम युद्धाप्रमाणेच जनता ते विसरून जाण्याचा प्रयत्न करते आहे. अशा वेळी या युद्धातल्या कामगिरीला लक्षवेधी ठरवणं आणि १६० च्या वर इराकी नागरिकांचा (युद्ध परिस्थिती पाहता हे सारे सैनिक नक्कीच नव्हते, किंबहुना अमेरिकन बाजूही इथे मुळातच वादग्रस्त असल्याने, प्रत्यक्ष इराकी सैनिकांनाही एक नैतिक अधिकार होता. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे काईलचे सारे बळी तरी जस्टिफाइड होते का, असाही एक प्रश्न आज डोकं वर काढून राहिला आहे.) बळी घेणाऱ्याला नायक म्हणून चित्रित करणं, हे अनपेक्षित आहे. इस्टवूडच्या आधीच्या युद्धपटांमध्ये (‘लेटर्स फ्रॉम आयवो जिमा’ आणि ‘फ्लॅग्ज ऑफ अवर फादर्स’) दिसणारा युद्धविरोधी दृष्टिकोनही इथे पुसट झालेला दिसतो. काईलची भूमिका करणाऱ्या ब्रॅडली कूपर ला इथे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन आहे, पण स्वत: इस्टवूडला दिग्दर्शन विभागातून बाहेर ठेवलेलं दिसतं. ही सारी पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर सर्व सामाजिक-राजकीय संदर्भ विसरल्यास चांगला वाटणारा हा चित्रपट वा त्यातला अभिनेता स्पर्धेत टिकाव धरतीलसं वाटत नाही.
‘सेल्मा’मधला कृष्णवर्णीयांचा नागरी हक्कांचा लढाही वॉर ऑन टेररइतकाच विसरण्याजोगा, कदाचित थोडा अधिकच. मात्र त्याला आता बराच काळ लोटल्याने आणि चित्रपट योग्य बाजूच उचलून धरत असल्याने ऑस्कर नामांकन योग्यच, अपेक्षितही. मात्र प्रत्यक्ष ऑस्कर पुरस्कारांमधला कृष्णवर्णीयांचा इतिहास लक्षात घेतला, तर ‘सेल्मा’ जिंकणं केवळ अशक्य. ‘सेल्मा’ घडतो, तो १९६४ मध्ये मार्टिन लूथर किंगना नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतरच्या काळात अन् त्यात दिसतो तो मतदानाच्या मूलभूत हक्कासाठी दिलेला लढा. कागदोपत्री कृष्णवर्णीयांना हक्क मिळाल्यानंतरही ते अमलात आणण्यासाठी गोऱ्यांकडून झालेला विरोध, प्रत्यक्ष राष्ट्राध्यक्ष जॉन्सन यांनी ठाम पाठिंबा देताना केलेली टाळाटाळ आणि लढय़ादरम्यान झालेले अनन्वित अत्याचार, हे सारं ‘सेल्मा’ अतिशय प्रखरपणे दाखवतो. आपल्या प्रेक्षकाकरता ज्याप्रमाणे लिंकनमधले तपशील काहीसे अवघड होते, तसेच इथलेही आहेत, पण दृश्यरूपात ‘सेल्मा’ हा अधिक वरचढ आहे.
मार्टिन लूथर किंग (डेव्हिड ओयेलोवो) ही व्यक्तिरेखा इथे प्रमुख असली तरी हा लिंकनसारखा एकखांबी तंबू नाही. याचा फोकस प्रामुख्याने एका घटनाक्रमावर असला तरी त्यातलं अनेक पातळ्यांवर चालणारं विस्तृत राजकारण, त्याबरोबरच प्रत्यक्ष लढा, यांमुळे ही भूमिका इतरांबरोबर विभागली जाते. तरीही या भूमिकेला ऑस्कर नामांकन मिळणं हे योग्य झालं असतं. ते नं मिळणं हे आश्चर्यकारक तर आहेच, वर ते अधिक आक्षेपार्ह वाटतं ते यासाठी की, हे महत्त्वाचं नावं वगळल्यामुळे यंदाच्या अभिनयाच्या २० जणांच्या नामांकन यादीत एकही कृष्णवर्णीय नाव उरत नाही. त्यात भर म्हणजे ‘सेल्मा’ची दिग्दर्शिका आवा डुवर्ने, हिलाही दिग्दर्शनाचं नामांकन मिळालेलं नाही. गेल्या वर्षी ‘१२ इअर्स ए स्लेव’च्या केलेल्या कौतुकाचं हे उत्तर म्हणावं का?
आपण गेले काही आठवडे चर्चा करत असलेल्या नामांकन यादीतलं कदाचित सर्वात वेगळं आणि अतिशय लक्षवेधी नाव म्हणायचं तर ‘व्हिपलॅश’चं म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे ‘बॉयहूड’ हा इंडी वर्गात बसणारा होता, त्याचप्रमाणे ‘व्हिपलॅश’देखील आहे, पण हा ‘बॉयहूड’इतका संकल्पनेच्या पातळीवर महत्त्वाकांक्षी प्रयोग नाही. ही एका व्यक्तिगत अनुभवासारखी छोटी गोष्ट आहे. तिची निर्मितीही छोटय़ा स्केलवरच केलेली आहे. मात्र ती पडद्यावर पाहणं हे थक्क करून सोडणारं आहे.
हायस्कूलमध्ये शिकणारा आणि पुढे ड्रमर होऊ पाहणारा एक विद्यार्थी, आणि आपल्या चेल्यांकडून हवं ते काढून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाणारा शाळेच्या बँडचा कंडक्टर, यांमधल्या युद्धाचं हे चित्रण आहे. दिग्दर्शक चेजेल याच्या ते स्वानुभवावर आधारल्याचं मानलं जातं.
सामान्यत: शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं नातं सांगणारे चित्रपट संवेदनशील वळणाचे असतात असं दिसतं. ‘गुड विल हन्टिंग’पासून ‘तारें जमीं पर’पर्यंत याची अक्षरश: शेकडो उदाहरणं देता येतील. ‘व्हिपलॅश’ या साऱ्यांपासून वेगळा आहे. पहिल्याच प्रसंगात आपल्याला १९ वर्षांचा अँड्रय़ू (माइल्स टेलर) आणि कंडक्टर फ्लेचर (जे के सिमन्स, साहाय्यक अभिनेत्यांच्या नामांकनातलं महत्त्वाचं नाव) यांच्यातली जी तणावपूर्ण भेट दिसते, ती आपल्याला पुढल्या भागात संपूर्णपणे गुंतवते. चित्रपट जो टोन पकडतो, तो एखाद्या थ्रिलरसारखा आणि पुढे काय घडणार याची उत्कंठा आपल्याला ग्रासून टाकते. अँड्रय़ू आणि फ्लेचर यांच्यात तयार होणारं दहशतीचं नातं, त्यातून दिसणारे मानसिक ताणतणाव, गुरुशिष्यातल्या नात्याचे सहसा संबोधले न जाणारे पदर आणि या दोन्ही बाजूंबद्दल निघणारे काय बरोबर- काय चूक यासंबंधातले निष्कर्ष यातून एक अविस्मरणीय चित्रपट तयार होतो. शेवटच्या कॉन्सर्टमध्ये फ्लेचरने मांडलेला ट्रॅप आणि त्यातून अँड्रय़ूत होत गेलेला बदल हे सिनेमा या माध्यमाचा परिणाम आपल्यावर नव्याने ठसवायला पुरेसं आहे. काहीही नेत्रदीपक, चमत्कृतीजन्य विषय नसताना, भव्य स्पेशल इफेक्ट नसताना, वरवर साधा विषय असताना दिग्दर्शक आपल्या कथानक सांगण्याच्या पद्धतीमधून काय चमत्कार करू शकतो, ते ‘व्हिपलॅश’ पाहून समजतं. त्याला पुरस्कार मिळणार नाही हे माहीत असूनही, तो मिळावा असं निश्चित वाटतं, तेही त्यामुळेच.
माझ्या अनुभवानुसार या आठ चित्रपटांमधल्या स्पर्धेत कोण जिंकेल, कोण हरेल याबद्दल अंदाज बांधणं हे म्हटलं तर कठीण आहे, म्हटलं तर सोपं. ही निवड होते, ती छोटय़ा ज्युरींमधून नाही, तर सर्व अॅकेडमी मेम्बर्सनी केलेल्या मतदानातून, त्यामुळे कस केवळ चित्रपटाच्या दर्जाचा लागत नाही, तर चित्रपटसंस्था आपले चित्रपट कसे, किती लोकांपर्यंत पोचवतात याचाही लागतो. ऑस्कर पुरस्कारांची वेळ जसजशी जवळ येत जाते, तसं येणाऱ्या बातम्या, वाढती लोकप्रियता, चर्चा, प्रसिद्धी, वाद यांमधून हळूहळू चित्र स्पष्ट व्हायला लागतं. आज विचारलं तर मी ठामपणे एवढंच सांगू शकतो की ‘बर्डमॅन’ आणि ‘बॉयहूड’ यांमधला एक चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरेल. त्यांचे विषय, त्यांचा आवाका, त्यांचं सादरीकरण आणि त्यांचं होणारं कौतुक हे सारं पाहून तसं या घडीला तरी वाटतं. बाकी आपण लवकरच पाहणार आहोत. शुभेच्छा तर साऱ्यांनाच आहेत, ‘मे द बेस्ट फिल्म विन!’
गणेश मतकरी