06 August 2020

News Flash

कव्हरस्टोरी : मनोरंजन उद्योगाला ओटीटीची लस!

प्रस्थापित आणि तगडय़ा मनोरंजन माध्यमांच्या तुलनेत सध्या अगदीच बाल्यावस्थेत असलेल्या ओटीटीने टाळेबंदीत चांगलंच बाळसं धरलं आहे.

दीड महिन्यांहून अधिक काळ रेंगाळलेल्या टाळेबंदीने सर्वच उद्योगांचं कंबरडं मोडलं.. पण संकटं ही संधी घेऊन येतात, असं म्हणतात, ते काही खोटं नाही.

विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

दीड महिन्यांहून अधिक काळ रेंगाळलेल्या टाळेबंदीने सर्वच उद्योगांचं कंबरडं मोडलं.. पण संकटं ही संधी घेऊन येतात, असं म्हणतात, ते काही खोटं नाही. या काळात चित्रपटगृहांची दारं बंद झाली आणि टीव्हीवर पुन:प्रक्षेपणं सुरू झाली. लोकांच्या दिनक्रमात आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली होती. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम, डिस्नी-हॉटस्टारसारख्या ओटीटी माध्यमांनी ती बऱ्याच प्रमाणात भरून काढली. प्रस्थापित आणि तगडय़ा मनोरंजन माध्यमांच्या तुलनेत सध्या अगदीच बाल्यावस्थेत असलेल्या ओटीटीने टाळेबंदीत चांगलंच बाळसं धरलं आहे.

संपूर्ण देशभर टाळेबंदी २४ मार्चला लागू झाली, पण काही ठरावीक आस्थापनांना त्याआधीच टाळं लागलं होतं. या सुरुवातीच्या काही ‘मानकऱ्यांत’ होती चित्रपटगृहं! १३ मार्चला शुक्रवार होता. ‘अंग्रेजी मीडियम’सह अन्यही काही चित्रपटांचा पहिलाच दिवस होता. १३ मार्चच्या मध्यरात्रीपासून ३० मार्चपर्यंत राज्यातल्या पाच महत्त्वाच्या शहरांतली चित्रपटगृहं बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. देशभरातील अन्यही अनेक शहरांत असे र्निबध लागू करण्यात आले. त्यापाठोपाठ बंद पडली ठिकठिकाणी सुरू असलेली चित्रीकरणं. ‘वीकेण्ड’ला कोणता ‘मूव्ही’ पाहायचा, याचा ‘प्लान’ आदल्या आठवडय़ातच तयार असणाऱ्यांसाठी हा मोठा ‘लाइफस्टाइल चेंज’ होता. चित्रीकरणच बंद पडल्यामुळे टीव्ही मालिकांच्या एपिसोड्सची बँक अल्पावधीत रिती झाली आणि मग जुन्या मालिकांची उजळणी सुरू झाली.

दरम्यानच्या काळात जवळपास सगळीच ऑफिसं, शाळा, महाविद्यालयं बंद झाली आणि घरातल्या एकाच टीव्हीसमोर एकाच वेळी विविध वयोगटांच्या, विविध अभिरुचीच्या सदस्यांची संख्या वाढली. सुरुवातीचे काही दिवस प्रत्येकच जण तब्बल पाच-सहा तास करोनाच्या बातम्या पाहात होता आणि उरलेल्या वेळात त्यावर चर्चा करत होता. काही दिवस सर्वानीच जुन्या-नव्या मालिकांचे जुनेच भाग पाहिले, पण नंतर वाढत्या रुग्णसंख्येच्या चर्चाही कमी झाल्या आणि जुन्या मालिकांचाही प्रेक्षकांना कंटाळा आला. अनेक जण आपापल्या मोबाइलमध्ये मग्न झाले. तरुणांना अ‍ॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्ससारख्या ओव्हर द टॉप (ओटीटी) माध्यमांचं व्यसन आधीच लागलं होतं; पण नोकरी- व्यवसाय- शिक्षणासाठी सकाळी लवकर उठावं लागत असल्यामुळे वेबसीरिजचं ‘बिंज वॉचिंग’ फक्त वीकेंण्डलाच परवडत होतं. टाळेबंदीमुळे आता कोणालाच सकाळी उठून गाडी पकडायची नसल्यामुळे बरेच जण रात्रीचा दिवस करून वेबसीरिजचे सीझनच्या सीझन संपवू लागले. काहींनी घरातल्या ज्येष्ठांनाही आपल्या ओटीटीच्या प्लानमध्ये जागा करून दिली आणि आगळ्यावेगळ्या आशयाचा भला मोठा खजिना त्यांच्यासमोर खुला केला. नंतर काही टीव्ही वाहिन्यांनीही नव्या आशयाची कमतरता भरून काढण्यासाठी ओटीटीवरील वेबसीरिज टीव्हीवर दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे ज्यांचा या माध्यमांशी आजवर काहीच संबंध आला नव्हता आणि पुढेही बराच काळ आला नसता, अशांनाही या नव्या माध्यमाविषयी कुतूहल निर्माण झालं.

अशी सगळी अनुकूल परिस्थिती असताना काही कंपन्यांनी आपल्या ओरिजनल सीरिजचा पहिला भाग मोफत दाखवणं, एखादा महिना ठरावीक कार्यक्रम मोफत उपलब्ध करून देणं या मार्गानी संधीचा पुरेपूर लाभ घेतला. #इीउं’ेइीएल्ल३ी१३ं्रल्ली िउपक्रमांतर्गत

‘झी ५’ आणि ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’ने त्यांचे काही कार्यक्रम मोफत पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ‘झी ५’ने ‘प्रीमियम कंटेट’मधले काही चित्रपट आणि काही वेबसीरिजचा पहिला भाग विनामूल्य उपलब्ध करून दिला. ‘झी ५’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण कटियाल यांनी ‘फायनान्शिअल एक्सप्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार या काळात त्यांच्या ग्राहकसंख्येत ८० टक्के वाढ झाली. ओटीटीवर सुरू असलेल्या या प्रयोगांचा परिणाम म्हणजे, मनोरंजनाच्या अनेक साधनांपैकी एक आणि तुलनेने अगदीच नवखं असलेलं हे माध्यम टाळेबंदीत मनोरंजनाचं प्रमुख माध्यम म्हणून पुढे आलं.

काही दिवसांपूर्वी ‘पब्लिसाइज इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार टाळेबंदीच्या काळात ओटीटी पाहण्याच्या कालावधीत ३४ टक्के वाढ झाली, लोकप्रियता वाढली, ग्राहकसंख्या वाढली. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊंसिलच्या (‘बार्क’) अहवालानुसार ओटीटीवर या काळात फिक्शन, ऐतिहासिक आणि पौराणिक कथांवर आधारित आणि सुपरनॅचरल प्रकारातील आशय सर्वाधिक पाहिला गेला. नेटफ्लिक्सवर ‘मनी हेस्ट’, डिस्नी-हॉटस्टारवर ‘महाभारत’ आणि वूटवर ‘बिग बॉस’ हे कार्यक्रम, तसंच ‘मिशन मंगल’, ‘चितचोर’, ‘अंग्रेजी मीडियम’, ‘हाऊसफुल ४’, ‘शिकारा’ हे चित्रपट मोठय़ा प्रमाणात पाहिले गेले. विविध ओटीटी माध्यमांवर बातम्या पाहणाऱ्यांचं प्रमाणही वाढल्याचं या अहवालात म्हटलं आहे. टाळेबंदीपूर्वी अल्ट बालाजीचे ग्राहक दिवसाकाठी सरासरी १० हजार ६००ने वाढत होते. आता हे प्रमाण १७ हजारांपर्यंत वाढल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आलं आहे. अमेझॉन प्राइमने याकाळात ६५ नवे कार्यक्रम प्रेक्षकांना सादर केले आहेत. डिस्नीने या क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे प्रेक्षकांसमोर उत्तम आशयाचे उपलब्ध पर्याय वाढले आहेत. एअरटेल, व्होडाफोनसारख्या मोबाइल फोन सेवा देणाऱ्या कंपन्यांनीही या क्षेत्रात प्रवेश केला आहे. एका ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक रकमेचं पॅकेज घेतलेल्या ग्राहकांना या कंपन्यांनी त्यांची स्वत:ची ओटीटी सेवा मोफत दिली आहे. त्याद्वारे विविध टीव्ही वाहिन्या लाइव्ह पाहता येतात, शिवाय चित्रपटांचेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापलीकडे जाऊन या दोन्ही सेवांनी या खास ग्राहकांना ‘झी फाइव्ह’ची सेवा विनामूल्य दिली आहे.

पण ओटीटीचं हे यश केवळ टाळेबंदीपुरतंच मर्यादित राहील का? विविध मुद्दय़ांचा विचार केल्यास उत्तर नकारार्थी येतं.

मुळातच ओटीटी ही अलिबाबाची गुहा! साचेबद्ध मालिका आणि चित्रपट पाहात मोठय़ा झालेल्या भारतीय प्रेक्षकांना तिथलं ‘विश्वरूपदर्शन’ नेहमीच विस्मयचकित करतं! आपण प्रेमकथांशिवाय पान न हलणारे बॉलीवूडपट आणि गृहकलहांच्या पलीकडे न जाणाऱ्या मालिका पाहात आलो आहोत. आपल्या कल्पनांच्या या मर्यादा ओलांडून पुढे घेऊन जाणारा, अभ्यासपूर्ण तरीही रंजक आशय ओटीटी या नव्या माध्यमाने खुला केला आहे. जगभरातल्या अनेकविध विषयांवरचे चित्रपट आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या अक्षरश: हातात आणून दिल्या आहेत. तेव्हा या गुहेत शिरल्यानंतर काळाचं भान न राहाणं स्वाभाविकच आहे. हे वन वे ट्रॅफिकसारखं आहे. एकदा या वाटेवर गेलेला प्रेक्षक परत फिरणं मुश्कील. १०-१२ भागांच्या वेबसीरिजचा लोक एका रात्रीत फडशा पाडतात. त्यामुळे हा केवळ टाळेबंदीपुरता ट्रेण्ड आहे, असं कोणी कितीही म्हटलं तरी तसं चित्र अजिबातच दिसत नाही. हे माध्यम भारतात प्रवेश केल्यापासूनच वेगाने धावत होतं, पण टाळेबंदीने त्याच्या मार्गातले उरलेसुरले अडथळे काही काळासाठी का असेना दूर केले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांना व्यवसायातलं अपेक्षित लक्ष्य वेळेआधी गाठणं शक्य होणार आहे.

ओटीटीच्या या घोडदौडीचा परिणाम प्रस्थापित माध्यमांवर किमान पुढचं वर्षभर तरी जाणवेलच. टाळेबंदीने चित्रपट व्यवसायाचं आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक घटकाचं अक्षरश: दिवाळं काढलं आहे आणि हा व्यवसाय आता एवढय़ात सुस्थितीत येण्याची चिन्हंही नाहीत. विविध वादांमुळे देशाच्या एखाद्या भागातली चित्रपटगृहं बंद राहण्याच्या घटना आजवर अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे ही चित्रपटगृहं बंद ठेवावी लागणं ही काही अगदीच दुर्मीळ घटना नाही; पण संपूर्ण देशभरातली सर्वच चित्रपटगृहं एकाच वेळी सलग काही महिने बंद राहण्याची आणि एवढा प्रदीर्घ काळ बॉक्स ऑफिसचा गल्ला रिता राहण्याची ही निश्चितच पहिली वेळ आहे. या टाळेबंदीमुळे ‘सूर्यवंशी’, ‘एटी थ्री’, ‘सर’, ‘संदीप और पिंकी फरार’, ‘हाथी मेरे साथी’ अशा किती तरी चित्रपटांचं प्रदर्शन पुढे ढकललं गेलं. ‘बागी थ्री’ला प्रेक्षकच मिळाले नाहीत, ‘अंग्रेजी मीडियम’ प्रदर्शनाच्या दिवशीच बंद झाला. त्याचे पुढचे सगळे शो रद्द झाले. नंतर तो डिस्नी-हॉटस्टारवर प्रदर्शित झाला, हा भाग वेगळा. त्यापाठोपाठ ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्प्लॉइज’, ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’ने चित्रीकरण थांबवलं. तज्ज्ञांच्या मते या क्षेत्राला आधीच सुमारे हजार कोटींचा फटका बसला आहे. ‘फायनान्शिअल एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार २०२० च्या पहिल्या तिमाहीत चित्रपट व्यवसायात २९.१ टक्के घसरण झाली. या कालावधीत केवळ १०६२.४ कोटी रुपये एवढाच व्यवसाय झाला. गतवर्षी याच कालावधीत १४९९.४ कोटी रुपये एवढा व्यवसाय झाला होता.

आता एवढय़ात चित्रपटगृहं सुरू होण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. सुरू झालीच तरी त्यांना बराच काळ गर्दीची प्रतीक्षा करावी लागेल. कित्येक महिने एकमेकांपासून चार पावलं दूर राहण्याची सवय लागलेले प्रेक्षक थंड वातावरण असलेल्या बंद चित्रपटगृहात तीन तास घालवण्यास सहजी धजावणार नाहीत. त्यात आजही आपल्याकडे चित्रपटगृहांत जाणाऱ्या बहुतांश प्रेक्षकांसाठी चित्रपट पाहण्यापेक्षा सहकुटुंब किंवा मित्रपरिवारासह जाऊन पॉपकॉर्न खात मौजमजा करणं हा महत्त्वाचा भाग असतो. चित्रपटाकडे आजही आपण सामूहिक मनोरंजनाचं माध्यम म्हणून पाहतो, त्यामुळे एकमेकांपासून दूर बसून, स्वच्छतेविषयीच्या शंकांमुळे खाणं-पिणं टाळत चित्रपट पाहण्यासाठी किती जण इच्छुक असतील, याविषयी शंकाच आहे. पगारकपात, कामगारकपातीच्या कुऱ्हाडी टाळेबंदीच्या पहिल्याच महिन्यापासून अनेकांवर कोसळल्या आहेत. चित्रपटगृहं सुरू होईपर्यंत परिस्थिती अधिकच बिकट झालेली असण्याची शक्यता दाट आहे. आर्थिक ओढगस्तीच्या आणि अनिश्चिततेच्या काळात लोक अशा मौजमजेवर खर्च करताना निश्चितच हात आखडता घेतील. शिवाय चित्रपट हे चैनीचं साधन असल्यामुळे त्यावर ‘कोविड कर’ आकारला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसं झालं तर तिकिटांचे दर आणखी वाढतील आणि प्रेक्षकांना परावृत्त करणाऱ्या कारणांत आणखी एका कारणाची भर पडेल.

संसर्ग टाळण्यासाठी प्रेक्षकांमध्ये अंतर ठेवणं बंधनकारक केलं जाऊ शकतं. कदाचित त्यासाठी चित्रपटगृहांतील आसनव्यवस्थेत बदल केले जातील. प्रेक्षागृह पूर्ण क्षमतेने भरता येणार नाही. मल्टिप्लेक्समध्ये दोन किंवा त्याहून अधिक चित्रपटांची सुरू होण्याची आणि संपण्याची वेळ एकच असणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. त्यांचं मध्यांतरही वेगवेगळ्या वेळेत येईल अशा प्रकारे वेळापत्रक तयार करावं लागेल. ठिकठिकाणी सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावे लागतील. प्रत्येक शोनंतर चित्रपटगृहाची पूर्वीपेक्षा खूपच काटेकोर सफाई करावी लागेल. चित्रपटगृहांच्या, विशेषत: मल्टिप्लेक्सच्या आर्थिक गणितांत खाद्यपदार्थाच्या विक्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मल्टिप्लेक्सचा श्रीमंती डोलारा पेलण्यात हे उत्पन्न मोलाचा वाटा उचलतं. पण स्वच्छता आणि खिशाचा विचार करता, प्रेक्षक या काऊंटर्सपासून दूरच राहण्याची शक्यता आहे. चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने भरण्याची परवानगी नाही, प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद आणि खाद्यपदार्थ विक्रीतून मिळणारं उत्पन्नही घटलेलं, अशा स्थितीत चित्रपट लावून नुकसान करून घेण्यास कोणीही धजावणार नाही. यात गावखेडय़ातल्या सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांपासून, महानगरांतल्या मल्टिप्लेक्सपर्यंत सर्वच चित्रपटगृहं भरडली जातील. मल्टिप्लेक्सच्या अवाढव्य आणि अलिशान जागेचा खर्च भरून काढणं पुढचा काही काळ तरी चालकांसाठी अवघड होऊन बसेल.

ज्या चित्रपटांची निर्मिती प्रक्रिया अगदी शेवटच्या टप्प्यात होती, त्यांना सर्व काही स्थिरस्थावर होईपर्यंत म्हणजे किमान वर्ष-दीड र्वष प्रदर्शन रोखून ठेवणं हा उत्तम उपाय ठरेल, पण निर्मितीसाठी खर्च केलेले कोटय़वधी रुपये एवढा प्रदीर्घ काळ गुंतवून ठेवणं किती निर्मात्यांना शक्य असेल, हा खरा प्रश्न आहे. थोडक्यात काय, तर चित्रपट क्षेत्र काही एवढय़ात रुळावर येत नाही. या माध्यमाची जादू वादातीत आहे. ती काही कमी होणार नाही, पण ती अनुभवण्याच्या मन:स्थितीत प्रेक्षक बराच काळ नसेल.

आता यातही ओटीटीद्वारे मध्यम मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ‘अंग्रेजी मीडियम’ तर प्रदर्शनानंतर लगेच डिस्नी-हॉटस्टारवर उपलब्ध झाला. अमिताभ आणि आयुषमान खुराना यांचा ‘गुलाबो सिताबो’ अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित करण्यात येणार होता, मात्र आता तो १२ जूनला अ‍ॅमेझॉनवरून २०० देशांत प्रदर्शित होईल. येत्या काळात कमी म्हणजे साधारण ५ ते २५ कोटींच्या दरम्यानचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले जाऊ शकतात. तेवढा खर्च भरून काढून व्यावसायिक गणितं जुळवून आणण्याची क्षमता आता या माध्यमांत निर्माण झाली आहे. १०० कोटी वगैरे अवाढव्य बजेटचे चित्रपट मात्र ओटीटीला झेपण्यासारखे नाहीत.

आतापर्यंत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर साधारण तीन महिन्यांनी तो ओटीटीवर उपलब्ध होत होता. आता कदाचित हा कालावधी कमी होईल, कदाचित चित्रपट प्रदर्शित झाल्याबरोबर ओटीटीवर उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यासाठी काही शुल्क आकारलं जाईल. येत्या काळात असे विविध प्रयोग करून पाहिले जाण्याची आणि प्रभावी ठरणारे मार्ग कायमस्वरूपी टिकण्याची शक्यता आहे. ज्यांचा आनंद छोटय़ा पडद्यावर घेताच येणार नाही, असे भव्य चित्रपट करोनोत्तर काळात प्रेक्षकांसमोर आणावे लागतील. त्या भव्यतेची अनुभूती घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटगृहांत येण्यास, त्यांना खिशातून पैसे काढण्यास प्रवृत्त करावं लागेल. चित्रपटांच्या तुलनेत टीव्हीची स्थिती थोडी बरी आहे, असं म्हणता येईल. मालिकांचं चित्रीकरणही एवढय़ात सुरू होण्याची चिन्हं नाहीत. एका सेटवर सुमारे १०० लोक काम करतात, शहराच्या विविध भागांत चित्रीकरण केलं जातं. कलाकार, तंत्रज्ञांसह संपूर्ण टीमची वाहतूक, शारीरिक अंतर, वैयक्तिक सुरक्षेच्या नियमांचं पालन करत चित्रीकरण सुरुवातीला जिकिरीचंच ठरू शकतं, पण मालिकांच्या चित्रीकरणाचा वेग पाहता परवानगी मिळाल्यानंतर अल्पावधीतच नवे भाग उपलब्ध होतील. फक्त तोपर्यंत १०० टक्के प्रेक्षक टिकवून ठेवणं हे वाहिन्यांपुढचं आव्हान असेल. तसा टीव्ही मालिकांशी एकनिष्ठ असलेला एक मोठा वर्ग आहेच; पण दरम्यानच्या काळात नव्या आशय-विषयांच्या प्रेमात पडलेल्या प्रेक्षकांसाठी मालिकांनी आपल्या जुनाट चौकटी मोडणं आवश्यक आहे. व्यवसाय म्हणून हे प्रयोग कदाचित लवकर यशस्वी ठरणारही नाहीत, पण प्रगल्भ प्रेक्षक घडवण्याची जी मोठी क्षमता या माध्यमात आहे, तिचा वापर करून घेणं एकंदर माध्यमाच्या दीर्घकालीन स्थैर्याला निश्चितच हातभार लावेल.

ओटीटीला चांगले दिवस आले असले, तरी त्यांच्यासमोरची आव्हानं अद्याप संपलेली नाहीत. त्यातलं सर्वात मोठं आव्हान आहे इंटरनेट सेवेचं. शहरी भागांतही अनेक ठिकाणी इंटरनेट मिळत नाही, यावरून ग्रामीण भागांत काय स्थिती असेल, याची कल्पना येईल. टाळेबंदी लागू झाल्यानंतर अचानक मोबाइल डेटाचा वापर वाढल्यामुळे त्या सेवांवर ताण येऊन वेग मंदावला होता. त्यामुळे नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइमने विशिष्ट प्रकारचा कंटेट हाय डेफिनिशनऐवजी स्टँडर्ड डेफिनिशनमध्ये उपलब्ध करून दिला. उत्तम इंटरनेटची अनुपलब्धता ही ओटीटीसमोरची मोठी समस्या आहे. टाळेबंदीच्या काळात ओटीटीची लोकप्रियता वाढली असली, तरी जाहिरातींच्या दरांत मात्र घट झाल्याचं बार्कच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. प्रेक्षकसंख्या आणि कार्यक्रम पाहण्यावर व्यतीत केला जाणारा वेळ यात वाढ झाली आहे, मात्र अनेक कंपन्यांच्या उत्पादनांना ग्राहकच नसल्यामुळे त्यांना जाहिरात करण्यात स्वारस्य नाही. या कठीण काळात जाहिरातींवर फार खर्च करणं व्यवहार्य नसल्याने अनेक कंपन्यांनी या खर्चात हात आखडता घेतला आहे.

अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्ससारख्या प्लॅटफॉम्र्सवर जाहिरातीच नसल्यामुळे त्यांच्या आर्थिक गणितांवर याचा परिणाम झाला नसला, तरी यूटय़ूब, डिस्नी-हॉटस्टारसारख्यांच्या महसुलात त्यामुळे लक्षणीय घट झाली आहे. आर्थिक व्यवहार रुळांवर आले की, परिस्थिती बदलेल आणि जाहिराती अधिक आक्रमकपणे केल्या जातील, अशी आशा सध्या या माध्यमांना आहे. आज हे माध्यम ताज्या आशयाच्या निकषावर सर्वात श्रीमंत आहे, पण ही स्थिती फार काळ कायम राहणार नाही. हा जगभर विस्तारलेला व्यवसाय आहे, पण कोविडची साथही जगभर पसरली आहे. या माध्यमात निर्मिती प्रक्रिया अतिशय संथ गतीने चालते. एखादी सीरिज पूर्ण व्हायला साधारण एक वर्ष लागतं. त्यामुळे हाती असलेले कार्यक्रम संपले तर काय, हा प्रश्न या माध्यमांसमोरही उपस्थित होऊ शकेल. मनोरंजनाच्या या व्यवसायावर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यात तळाला असणाऱ्यांना जेवढे दिवस काम तेवढय़ाच दिवसांचं वेतन मिळतं. अचानक उद्भवलेल्या या आपत्तीत त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तो लवकर सुटण्यासाठी काम लवकरात लवकर सुरू करणं हाच उपाय आहे. येत्या काळात मोबदला कमी मिळाला तरी सर्वानाच जोमाने काम करून आपापल्या क्षेत्रातली पडझड सावरावी लागणार आहे. कोविडच्या या कहराने सर्वच क्षेत्रांसमोर नवी आव्हानं निर्माण केली आहेत. नुकसान भरून काढण्यासाठी, बिकट काळात तगून राहण्यासाठी, आव्हानांना पुरून उरण्यासाठी यातल्या प्रत्येक घटकाला प्रदीर्घ काळ स्वत:ला सिद्ध करत राहावं लागेल. अस्तित्वाच्या या संघर्षांत कदाचित अधिक चांगला आशय जन्म घेईल. तो या सर्व माध्यमांना आणि त्यांच्या प्रेक्षकांनाही अधिक प्रगल्भ करेल, पण सध्या तरी मनोरंजन क्षेत्रात निर्माण झालेल्या मोठय़ा पोकळीला ओटीटी हे नवं माध्यम व्यापून उरलं आहे. प्रस्थापित होण्याच्या त्यांच्या वाटचालीतला हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हा केवळ तात्पुरता बदल नाही. नव्या तंत्रज्ञानाच्या भरभक्कम आधारावर उभ्या राहिलेल्या, इतर माध्यमांच्या तुलनेत अधिक स्वतंत्र असलेल्या, मोठी व्याप्ती असलेल्या माध्यमाच्या दीर्घकालीन वाटचालीची ही सुरुवात आहे.

टीव्हीचं वर्चस्व अबाधित

मनोरंजनाच्या प्रत्येक माध्यमाची काही खास वैशिष्टय़ं आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाचा एक प्रेक्षकवर्ग आहे. एखादं नवं माध्यम आलं, तर प्रेक्षक त्याचा अनुभव घेऊन पाहतात. आवडलं तर स्वीकारतात; पण नवं माध्यम स्वीकारलं, म्हणून जुनं माध्यम सोडून देत नाहीत. टाळेबंदीमुळे मनोरंजनाची जवळपास सर्वच साधनं ठप्प झाली आहेत. नवा आशय सध्या ओटीटीकडेच आहे, त्यामुळे प्रेक्षकसंख्या अधिक वेगाने वाढवण्याची संधी या माध्यमाकडे आहे; पण त्याचा टीव्हीच्या प्रेक्षकसंख्येवर आणि लोकप्रियतेवर सध्या तरी काहीही परिणाम होणार नाही. टाळेबंदीच्या काळात टीव्हीवर बातम्या सर्वाधिक प्रमाणात पाहिल्या गेल्या आणि त्यापाठोपाठ चित्रपटांचा आनंद घेतला गेला. चित्रपटांना वाहिलेल्या वाहिन्यांचं रेटिंग या काळात वाढलं. मालिकांचे नवे भाग प्रसारित होऊ लागले की प्रेक्षक पुन्हा ठरल्या वेळी टीव्ही पाहायला बसतील. तो वर्षांनुवर्षांच्या सवयीचा भाग आहे. ‘रामायण’ मालिकेने एकविसाव्या शतकातही ज्या प्रमाणात प्रेक्षकांना आकर्षित करून घेतलं, ते पाहता टीव्हीचं वर्चस्व आजही निर्विवाद असल्याचं सिद्ध होतं.

पूर्वी मनोरंजनाच्या विविध माध्यमांपैकी एक असलेलं ओटीटी हे माध्यम टाळेबंदीत अचानक टीव्हीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आलं आहे. ओटीटीवरील काही वेबसीरिज टीव्हीवर दाखवण्यात आल्या, पण त्यांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. उलटपक्षी टीव्हीवरचे कार्यक्रम जेव्हा ओटीटीवर दाखवले जातात, तेव्हा त्यांना खूपच चांगला प्रतिसाद मिळतो. कलर्स मराठीचा ‘मराठी बिग बॉस’ हा शो वूटवर प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्याव्यतिरिक्त हे ‘मन बावरे’ ही मालिकाही वूटवर मोठय़ा प्रमाणात पाहिली जाते. विविध अभिरुचींच्या प्रेक्षकांसाठी टीव्ही हे एक सामाईक माध्यम आहे. इथे मालिका आहेत, नृत्य-संगीताचे कार्यक्रम आहेत, गंभीर चर्चाही आहेत आणि हलकेफुलके विनोदसुद्धा आहेत. एकदा पैसे भरले की संपूर्ण कुटुंब या विविध प्रकारच्या आशयाचा आनंद घेऊ शकतं. ओटीटीच्या प्रत्येक सेवेसाठी स्वतंत्र शुल्क आकारलं जातं, शिवाय ग्रामीण भागांत इंटरनेटची समस्या आहे, त्यामुळे टीव्हीचा प्रेक्षक ओटीटीकडे वळण्याची शक्यता नाही.

टीव्ही मालिकेच्या भागाचं आज चित्रीकरण झालं की दोन दिवसांत प्रसारण करणं शक्य असतं. त्यामुळे टाळेबंदीनंतर वाहिन्यांवरचे कार्यक्रम लगेच सुरू होतील. ओटीटीच्या एका वेबसीरिजचं काम साधारण एक वर्ष तरी चालतं. या कालावधीत त्यांच्याही नव्या सीरिज, चित्रपटांचं काम थांबलं आहे. त्यामुळे त्यांना नवा आशय निर्माण करायला जास्त वेळ लागेल. टाळेबंदीचा सर्वाधिक फटका चित्रपट व्यवसायाला बसला आहे. अनेक हिंदी चित्रपटांचं प्रदर्शन या संकटामुळे पुढे ढकलावं लागलं. आमचा ‘मी वसंतराव’, नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ हे चित्रपट प्रदर्शनाच्या टप्प्यावर पोहोचले असताना हे संकट ओढवलं आहे. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांनी अनेक नवे विषय हाताळले. त्यातून व्यवसाय किती झाला हा मुद्दा वेगळा, पण प्रेक्षक प्रगल्भ झाला. ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. आज हा व्यवसाय संकटात सापडला आहे. या क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येकाला आणि खेडय़ापाडय़ांतल्या छोटय़ा चित्रपटगृहांपासून मल्टिप्लेक्सपर्यंत सर्वानाच याची झळ बराच काळ सहन करावी लागणार आहे. आयुष्यात कला महत्त्वाची आहेच; पण शेवटी जेव्हा तगून राहण्याचा प्रश्न येतो तेव्हा कलेवरचं प्रेम बाजूला ठेवून मूलभूत गरजा भागवाव्या लागतात. यापुढचा काळ सर्वासाठीच आर्थिक आव्हानं घेऊन येणार आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्यावर प्रेक्षक खर्च करेल की नाही, याविषयी शंकाच आहे. त्यामुळे सध्या तरी संयम ठेवून वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही, पण येत्या काळात चित्रपटनिर्मितीच्या तंत्रात बरेच बदल करावे लागतील, अभिनव प्रयोग करावे लागतील, हे मात्र निश्चित!

– निखिल साने, व्यवसाय प्रमुख, मराठी मनोरंजन, व्हायाकॉम १८.

टाळेबंदी ओटीटीसाठी महत्त्वाचा टप्पा

टाळेबंदीच्या काळात ओटीटीचं महत्त्व नक्कीच मोठय़ा प्रमाणात वाढलं. प्रेक्षकसंख्या आणि या माध्यमावर प्रेक्षकांनी व्यतीत केलेला वेळ यात झालेली वाढ कल्पनेच्या पलीकडची आहे. टीव्हीवर नवे कार्यक्रम नसल्याचा फायदा ओटीटीला झाला आहे. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर ओटीटीची मागणी स्थिर होईल, पण ती निश्चितच टाळेबंदी पूर्वीच्या काळापेक्षा बरीच अधिक राहील. वूट सिलेक्टची प्रेक्षकसंख्या आमच्या अंदाजापेक्षा अडीच ते तीनपट अधिक वाढली आहे. ‘असूर’, ‘मर्जी’, ‘द रायकर केस’सारख्या वेबसीरिजने लोकप्रियता वाढवली आहे. जगभर पाहिल्या जाणाऱ्या ‘शार्क टँक’ या शोचा नवा सीझन २५ एप्रिलपासून वूट सिलेक्टवर उपलब्ध झाला आहे. विविध अभिरुचीच्या प्रेक्षकांसाठी देशविदेशातील नवा आशय उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

– फर्जाद पालिया, प्रमुख, वूट सिलेक्ट

मालिकांना प्रगल्भ व्हावं लागेल

कोविडच्या साथीचा मनोरंजन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेत जुलैमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे; पण भारतात ते शक्य नाही. आपल्याकडची गणितं वेगळी आहेत. ज्याला शक्य आहे, त्याने कोविडवर लस उपलब्ध होईपर्यंत चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलणंच उत्तम ठरेल. अर्थात कोटय़वधींची गुंतवणूक अशी वर्ष-दोन र्वष अडकवून ठेवणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. आमचा ‘दशमी प्रॉडक्शन’चा एक चित्रपट निर्मितीच्या अंतिम टप्प्यात होता; पण आता त्याचं प्रदर्शन बराच काळ पुढे ढकलावं लागण्याची चिन्हं आहेत. ओटीटीची लोकप्रियता वाढत असली, तरी त्यामुळे टीव्हीच्या प्रेक्षकांवर काहीही परिणाम होणार नाही. हे नवं माध्यम आकर्षक असलं, तरीही ते आपल्या समाजात अद्याप रुळलेलं नाही. मुळात शहरी भाग वगळता अन्यत्र इंटरनेटचा अपेक्षित वेग मिळत नाही. शिवाय विविध ओटीटी सेवांसाठी स्वतंत्र पैसे भरणं अनेकांना परवडत नाही. ओटीटी आणि टीव्हीच्या मूळ स्वभावातच फरक आहे. ओटीटीवर जेव्हा एखादी वेबसीरिज येते तेव्हाच तिचा शेवट ठरलेला असतो. सीरिज १० भागांत संपणार की २५ हे आधीच निश्चित झालेलं असतं. टीव्हीचं तसं नाही. टीव्ही मालिका प्रदीर्घ काळ चालतात. त्यातल्या पात्रांशी प्रेक्षकांचं भावनिक नातं जुळलेलं असतं. ओटीटीवरचे कार्यक्रम कुटुंबाबरोबर पाहताना आजही भारतीय प्रेक्षक बिचकतोच. असभ्य भाषा, नग्नता, हिंसा यामुळे ओटीटी केवळ मोबाइलवरच पाहणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. टीव्हीचं तसं नाही. हे माध्यम आपल्या सवयीचं, जवळचं आहे. तरीही येत्या काळात टीव्ही मालिकांना सासू-सुनेच्या राजकारणापलीकडे जाऊन अधिक वैविध्यपूर्ण आशय प्रेक्षकांना द्यावा लागेल.

–  निनाद वैद्य, भागीदार, दशमी प्रॉडक्शन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2020 6:52 am

Web Title: ott entertainment industry coverstory dd70
Next Stories
1 पावसाळ्यानंतरच परत येणार!
2 महाराष्ट्राच्या कोंडीचा प्रयत्न!
3 निमवैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व वाढणार!
Just Now!
X