वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

टाळेबंदीच्या काळात समस्त जनता घरात बसली. अनेकांना वर्क फ्रॉम होम होतं. पण तरीही घरबसल्या उरलेल्या वेळाचं काय करायचं हा प्रश्न होता. टीव्हीवर जुन्याच मालिका पुन्हा दाखवल्या जात होत्या. लोकांनी त्या बघितल्या. अगदी रामायण- महाभारतही मोठय़ा प्रमाणात बघितलं. पण पारंपरिक टीव्हीमध्ये रस नसलेल्यांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म होता. तिथल्या हॉटस्टार, अमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स, वूट, झीफाईव्ह अशा सगळ्या पर्यायांनी, तिथल्या कण्टेंटने टाळेबंदीतला कंटाळवाणेपणा दूर करायला लोकांना मदत केली. त्याचाच परिणाम म्हणजे इथला प्रेक्षक काबीज करण्याच्या या कंपन्यांच्या मनसुब्याला करोनाकहरातील टाळेबंदीने चांगलाच हात दिला आहे. पारंपरिक टीव्हीपलीकडचा कंटेंट देणाऱ्या या प्लॅटफॉम्र्सची चलती होतीच, पण तिला करोनाकाळाने अधिक वेग दिला आहे. करोनाकाळामुळे अचानक लोकांच्या हातात मिळालेला रिकामा वेळ याबरोबरच त्यामागे इतरही काही कारणं आहेत. ती बघण्याआधी आपल्या देशातले सर्वाधिक बघितले जाणारे निदान पाच तरी ओटीटी प्लॅटफॉर्म माहीत असायला हवेत.

ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप प्लॅटफार्म किंवा इंटरनेट स्ट्रीमिंग म्हटल्यावर नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार, झीफाईव्ह, जिओ, वूट, अल्टबालाजी, सोनीलिव्ह, विऊ, होईचोई, मॅक्स प्लेयर अशी नावं कुणाच्याही डोळ्यासमोर येतात. त्यातही चारपाच नावांची विशेष चलती आहे. भारतात ओटीटी सेवा देणारे एकूण ४० प्रोव्हायडर्स आहेत. २०१८ मध्ये त्यांची २१ दशकोटी रुपयांची व्याप्ती होती ती २०१९ मध्ये वाढून ३५ दशकोटी रुपयांपर्यंत पोहोचली. २०२३ पर्यंत या व्यवसायाची व्याप्ती ११.९७ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. इंटरनेट वापरकर्ते जसजसे वाढतील तसतशी ही वाढ आणखी आणखी होत जाईल असं सांगितलं जातं. २०२१ पर्यंत भारतातल्या इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ७३५ दशलक्षच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यातही ७३ टक्क्यांहून अधिक लोक ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रादेशिक आशयाला प्राधान्य देतील असं सांगितलं जातं. केपीएमजीच्या अहवालानुसार आज भारतीय लोक सरासरी २० ते २५ मिनिटं ओटीटी प्लॅफॉर्मवर वावरतात. या सगळ्यावरून आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मचा व्यावसायिकदृष्टय़ा कसा विचार केला जात असेल याचा अंदाज येऊ शकतो.

पारंपरिक टीव्हीवरच्या सासबहू मालिकांना कंटाळलेले प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या वेगवेगळ्या वेबसीरिज, सिनेमे, शोज, डॉक्युमेंट्रीज यांची चर्चा करताना दिसतात. गेली साताठ वर्षे या अ‍ॅपआधारित सेवांनी मनोरंजनाची वेगळीच दुनिया खुली केली असली तरी तिला खऱ्या अर्थाने बूस्टर डोस मिळाला आहे तो करोनाकाळात. पारंपरिक टीव्हीपेक्षा वेगळा आशय, या प्लॅटफॉर्मची गरज लक्षात घेऊन तयार केले गेलेले वेगळे कार्यक्रम यामुळे या माध्यमाने पारंपरिक टीव्हीवर कुरघोडी केली आहे. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या पर्यायांमधून निवड करणं कठीण जावं अशी प्रेक्षकांची अवस्था आहे. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्लेयर हे आशयपूर्ण कार्यक्रम, वैविध्य, स्ट्रिमिंगचा, ट्रान्समिशनचा दर्जा याबाबतीत जागतिक पातळीवरचा उत्तम अनुभव असलेले दादा लोक असले तरी १३० कोटींची बाजारपेठ असलेल्या भारतात मात्र त्यांना काहीसं बॅकफूटवर जावं लागलं आहे. त्यामुळे दर्जाच्या बाबतीत हे दोन प्लॅटफॉर्म आघाडीवर पण प्रेक्षकसंख्या, सदस्यसंख्या, कार्यक्रमांचे पर्याय याबाबतीत मात्र हॉटस्टारसह, वूट, सोनी लिव्ह, जिओ अशा देसी तडक्याला अधिक पसंती अशी परिस्थिती आहे.

स्टार इंडियाचं हॉटस्टार (आताचं डिस्ने हॉटस्टार) भारतात सगळ्यात जास्त बघितलं जातं. त्यामुळे तो भारतात तरी सगळ्यात जास्त सदस्य आणि प्रेक्षकसंख्या असलेला ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. जुलै २०२० च्या आकडेवारीनुसार हॉटस्टारचे भारतात ४०० दशलक्ष वापरकर्ते आहेत. आठ कोटी लोक पैसे भरून आपली सुविधा वापरतात असं हॉटस्टारने जाहीर केलं आहे. त्यानुसार हॉटस्टार हा भारतामधला, लोकांनी पैसे भरून सुविधा घेतली आहे असा सगळ्यात मोठा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. अर्थात याचं श्रेय जातं ते हॉटस्टारवर बघायला मिळणाऱ्या क्रीडाविषयक कार्यक्रमांना- आयपीएल मॅचेसना, ‘गेम ऑफ थ्रोन’सारख्या जागतिक पातळीवर गाजलेल्या वेबसीरीजला आणि डिस्नेच्या साथीला आहे. ‘सन ऑफ अबिश’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’सारखा ओरिजिनल कंटेंटही त्यांच्याकडे आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइम हा एकीकडे हॉटस्टारचा आणि दुसरीकडे नेटफ्लिक्सचा स्पर्धक आहे. भारतात अ‍ॅमेझॉन प्राईमची पैसे भरून सुविधा घेणारे  ४.४ दशलक्ष सदस्य आहेत. आधी त्यांचे दर वर्षांला ४९९ रुपये होते. पण नेटफ्लिक्सचा भारतात प्रवेश झाल्यावर अ‍ॅमेझॉनने आपले दर वाढवले. तरीही जागतिक पातळीच्या तुलनेत भारतात त्यांचे दर कमीच आहेत. अर्थात अ‍ॅमेझॉन प्राईमची सेवा लोक फक्त व्हिडिओसाठीच घेतात असं नाही. प्राईमच्या सदस्यांना अ‍ॅमेझॉनवरील एरवीच्या आणि सेलमधील खरेदीतही घसघशीत सवलत मिळते म्हणूनही ही सेवा घेतली जाते. त्याशिवाय प्राईमवरचा ‘पंचायत’, ‘पाताललोक’, ‘मेड इन हेवन’, ‘ब्रीद’ यासारखा कंटेण्ट उचलून धरला जातो.

भारतात अ‍ॅमेझॉन लोकप्रियतेत दुसऱ्या क्रमांकावर असण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांनी निवडलेला नवे सिनेमे सगळ्यात आधी उचलून आपल्या प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित करण्याचा मार्ग. ‘शकुंतला देवी’, ‘गुलाबो सिताबो’ हे टाळेबंदीच्या काळात प्रदर्शित झालेले सिनेमे तर आहेतच पण त्याआधीही या प्लॅटफॉर्मवरून सातत्याने नवे चित्रपट सिनेमागृहानंतर लगेचच पाहायला मिळत आहेत.

सोनी लिव्हवरदेखील मनोरंजनाबरोबरच स्पोर्ट्सही बघायला मिळतात. त्यामुळे डिस्ने हॉटस्टारप्रमाणे त्यांनाही प्रेक्षकपसंती आहे. आपले सात ते आठ मासिक सदस्य असून त्यातले २० ते २५ टक्के लोक पैसे भरून आपली सुविधा घेतात असा सोनीलिव्हचं म्हणणं आहे. म्हणजे दीड ते दोन कोटी लोक पैसे भरून सोनी लिव्हची सुविधा घेतात. पण त्यासंबंधी त्याहून अधिक माहिती उपलब्ध नाही. पण ‘कौन बनेगा करोडपती’, ‘कपील शर्मा शो’, ‘इंडियन आयडॉल’, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’, ‘क्राईम पेट्रोल’, ‘दस का दम’ असे भारतीय प्रेक्षकांना आवडणारे अनेक कार्यक्रम त्यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे दाखवल्या जाणाऱ्या फुटबॉल स्पर्धाही आवडीने बघितल्या जातात. त्यांच्या दरांचे तीनचार स्लॅब तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडू शकता.

ओटीटी प्लॅटफॉर्म लोकप्रिय होण्यात नेटफ्लिक्सचा मोठा हातभार असला तरी भारतात त्यांना पुरेसे पाय रोवता आलेले नाहीत. भारतात आपली सदस्य संख्या नेमकी किती आहे याची आकडेवारी नेटफ्लिक्सने जाहीर केली नसली तरी एका आकडेवारीनुसार नेटफ्लिक्सचे २०१८ मध्ये भारतात साधारण सव्वा कोटी सदस्य होते. २०१९ मध्ये ते वाढून दोन कोटी झाले. नेटफ्लिक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरात मिळून १६७ दशलक्ष लोक पैसे भरून त्यांची सुविधा घेतात, तर आशिया पॅसिफिक रीजनमध्ये त्यांचे १६ कोटी सदस्य आहेत.  सिनेमे आणि वेबसिरिजमध्ये नेटफ्लिक्स ओरिजिनल्स या नावाने ओळखला जाणारा कंटेंट हा त्यांचा सर्वोत्तम कंटेंट समजला जातो. ‘नार्कोज, ‘हाऊस ऑफ कार्ड्स, ‘स्ट्रेंजर थिंग्ज’, ‘डेअर डेव्हिल’, ‘सेक्रेड गेम्स’.. नेटफ्लिक्सवरच्या उत्तम कंटेण्टची यादी खूप मोठी आहे. त्यांनीही त्यांच्या दरांमध्ये वेगवेगळी पॅकेजेस दिलेली असली तरी त्यांचे दर सगळ्यात जास्त आहेत.

दर महिन्याच्या वापरकर्त्यांची संख्येची तुलना केली तर वायकॉम एटीनच्या ओटीटी प्लॅटफॉमची म्हणजे वूटची डिस्ने हॉटस्टारबरोबर जोरदार स्पर्धा आहे. २०२० च्या जानेवारी महिन्यात वूटने १० कोटी प्रेक्षकसंख्येचा आकडा पार केलेला होता. वूटवर वायकॉम १८ च्या सगळ्या चॅनल्सवरून सादर केले गेलेले कार्यक्रम बघता येतात. वूटचा ओटीटीसाठीचा ओरिजिनल कंटेंट आहे. सिनेमे आणि लहान मुलांसाठीचे कार्यक्रम आहेत. विविध भारतीय भाषांमध्ये वायकॉमची चॅनल्स असल्यामुळे या सगळ्या भाषकांनी वूटला उचलून धरलं आहे.

झीफाईव्ह या झी नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्मला वायकॉम एटीनसारखाच त्यांच्या टीव्हीच्या जाळ्याचा फायदा मिळतो. झीच्या सगळ्या भाषांमधल्या चॅनल्सवरून सादर होणारे वेगवेगळे कार्यक्रम, सिनेमे, रिअ‍ॅलिटी शो, अगदी बातम्यासहित सगळा कंटेण्ट झीफाईव्हवर उपलब्ध होतो. त्याशिवाय ओटीटीसाठीचा वेगळा कंटेण्ट, सिनेमे हे सगळं झीफाईव्हवर उपलब्ध आहे. गेली अनेक वर्षे भारतातल्या मनोरंजनाच्या दुनियेत झी नेटवर्क असल्यामुळे त्याचा त्यांना फायदा मिळतो. इतर ओटीटी प्लॅटफॉर्मच्या तुलनेत झीफाईव्हवरचा कंटेण्ट खूपच कमी दरात उपलब्ध आहे.

याशिवाय अल्टबालाजी, मॅक्सप्लेयर, विऊ, होईचोई, मुबी, आरे, इरॉस नाऊ असे काही विनामूल्य उपलब्ध असलेले तर काही पैसे भरून सेवा घेता येतील असे ओटीटी प्लॅटफॉर्मवरचे पर्याय उपलब्ध आहेत. आणि भारतात अधिकाधिक प्रेक्षक खेचण्याची या सगळ्यांमधली स्पर्धा टाळेबंदी आणि त्यानंतरच्या काळात अधिक तीव्र झाली आहे. १३० कोटी लोकसंख्या, त्यातही तरुणांची संख्या सर्वाधिक, इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्यता आणि क्षमता, सातत्याने स्वस्त होत चाललेला डाटा, दिवसागणिक होत असलेली टेलिकॉम क्षेत्रातील तंत्रज्ञानाची वेगवान प्रगती या सगळ्या अतिशय आकर्षक बाबी असल्या तरी भारतीय बाजारपेठही तितकीच वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यामुळे सर्वोत्तम कंटेण्ट देण्यात जगात भारी ठरलेल्या नेटफ्लिक्सला भारतात प्रेक्षक मिळवणं आणि टिकवून ठेवणं यासाठी खूप धडपड करावी लागत आहे. हॉटस्टारच्या तुलनेत त्यांची प्रेक्षकसंख्या भारतात तरी नगण्य आहे. नेटफ्क्सिने भारतात मोठी गुंतवणूक केली. ‘सेक्रेड गेम्स’सारख्या भारतीय प्रेक्षकासाठीची निर्मिती असलेल्या वेबसीरीज दिल्या. पण ते आजही अगदी जिओ आणि एअरटेलच्याही मागे असल्याचं सांगितलं जातं.

भारतीय मनोरंजन बाजारपेठेची विशिष्ट रचना या सगळ्याला कारणीभूत आहे. एक तर भारतात असलेल्या विविध भाषा मनोरंजनाच्या बाजारपेठेचं बऱ्यापैकी विभाजन करतात. बहुसंख्येने असलेल्या इथल्या सर्वसामान्य प्रेक्षकाला त्यांच्या मातृभाषेतला कंटेण्ट अधिक भावतो. त्यानंतर तो हिंदी आणि त्यानंतर इंग्रजी भाषेमधल्या कंटेण्टकडे वळतो. झीफाईव्ह, वूट यांच्याकडे कंटेण्ट लीगसी आहे. म्हणजे त्यांचा त्यांचा, टीव्ही चॅनल्सवरचा मूळ कंटेण्ट आहे. उदाहरणार्थ झीच्या अ‍ॅपवर प्रेक्षकांना झीची वेगवेगळ्या भाषांमधली सगळी ४५ चॅनल्स आणि त्यांचे कार्यक्रम बघायला मिळतात. ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या सिनेमे, वेबसीरिजव्यतिरिक्त त्यांचे डेली सोप, रिअ‍ॅलिटी शोज बघायला मिळतात. तेच वूटच्या बाबतीत आहे. वायकॉम एटीनच्या सगळ्या चॅनल्सवरचा कंटेण्ट प्रेक्षकांना वूटवर बघायला मिळतो. तेच हॉटस्टारचंही आहे. हे सगळं एरवी फक्त केबलवरून किंवा सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून बघता यायचं. या चॅनल्सकडे त्यांचा आधीचा कंण्टेट आहेच शिवाय नवा घेऊन ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाले आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांचा कंण्टेट तुलनेत स्वस्तात देणं शक्यही होतं आहे.

साहजिकच कंटेण्ट भरपूर आणि दर तुलनेत कमी अशी भारतीय ओटीटी प्रोव्हायडर्सची स्थिती आहे. उदाहरणच द्यायचं तर झीफाईव्हवर ११५३ शो आणि ३१४७ सिनेमे आहेत. सननेक्स्ट या तमीळकडे  ३९० शो आणि ४०८७ सिनेमे आहेत तर नेटफ्लिक्सकडे ८२ हिंदी शो आणि ७८९ सिनेमे आहेत. आणि झी तसंच सननेक्स्ट यांचे दर नेटफ्लिक्सच्या तुलेत खूप कमी आहेत. आणि त्यामुळे नेटफ्लिक्सच्या तुलनेत हॉटस्टार, अमेझॉन प्राइम, झी फाईव्ह, सननेक्स्ट अधिक वेगाने वाढत आहेत. बुद्धिमान, दर्जेदार कंटेण्ट मिळत असल्यामुळे जगभरात नेटफ्लिक्सला अधिक पसंती आहे. पण भारतात मात्र सर्वसामान्य प्रेक्षकाला कौटुंबिक, भावनिक कंटेण्ट जास्त आवडतो.

टाळेबंदीआधी भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मची त्याच्या नैसर्गिक गतीने वाढ होत होती. पण टाळेबंदीच्या काळात लोकांच्या हातात असलेला मोकळा वेळ, स्थानिक ओटीटी पर्यायांच्या तुलनेत कमी किमती (काही पर्याय तर विनामूल्य उपलब्ध आहेत) आणि दिवसेंदिवस स्वस्त होत जाणारे आणि सहजपणे परवडू शकणारे स्मार्टफोन यामुळे देशातल्या दृक्श्राव्य माध्यमात क्रांतीच झाली आहे. मोबाइल डेटासाठीच्या सहज परवडतील अशा पॅजेसेसमुळे विविध प्रकारच्या व्हिडीओंना मागणी वाढली. त्यातही जिओच्या पॅकेजेसमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म अधिक आवाक्यात आला. जिओचं फोन कनेक्शन वापरणाऱ्यांना जिओच्या ओटीटीवरचा कंटेण्ट सहजपणे उपलब्ध होतो. व्होडाफोनची सव्‍‌र्हिस घेणाऱ्यांना व्होडाफोन प्लेचा तर एअरटेल कनेक्शन वापरणाऱ्यांना कंपनीचा कंण्टेट सहज उपलब्ध होतो. या सगळ्यातून मिळणारा प्रेक्षक आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आधीपासून स्पर्धा होतीच, पण टाळेबंदीमधल्या परिस्थितीने ती अधिक तीव्र केली आहे. एका अहवालानुसार टाळेबंदीच्या काळात ओटीटीवरील कंटेण्ट बघितला जाण्याचं प्रमाण ६० टक्क्यांनी वाढलं.

या प्रेक्षकांमध्ये नोकरदार आहेत, व्यावसायिक आहेत, विद्यार्थी आहेत, गृहिणी आहेत. यापैकी एकतृतीयांश लोकांना विनामूल्य असणाऱ्या ओटीटी पर्यायांची निवड केली, एकतृतीयांश लोकांनी सशुल्क पर्याय निवडले. उरलेल्या लोकांनी ट्रायल काळापुरतंच ओटीटी वापरलं तर बाकीच्या लोकांनी घरातल्या, मित्रमंडळींच्या सदस्यत्वाचा वापर केला. ते बघण्यासाठी जिओ, एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया हे नेटवर्क उतरत्या क्रमाने वापरलं. हिंदी आणि इंग्रजी भाषांमधले कार्यक्रम बघितले जातातच, पण प्रादेशिक भाषांमध्ये ओटीटीवर तेलुगू भाषेतले कार्यक्रम जास्त बघितले गेले. त्याखालोखाल पंजाबी, बंगाली, मराठी आणि तमीळ असा क्रम होता.

या कार्यक्रमांमध्ये अ‍ॅक्शन आणि कॉमेडी या दोन जॉनरला सगळ्यात जास्त पसंती होती. त्यातही पुरुषांनी अ‍ॅक्शन जास्त बघितली आणि स्त्रियांनी ड्रामा आणि रोमँटिक या दोन जॉनरचे कार्यक्रम जास्त बघितले. हॉटस्टार मेट्रोसिटीत जास्त बघितलं गेलं तर सोनीलिव्ह टीअर वन सिटीत जास्त बघितलं गेलं. नेटफ्लिक्स आणि प्राइम बघणाऱ्यांमध्ये शहरी नोकरदारांचं प्रमाण जास्त होतं. वूट बघणाऱ्यांमध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त होतं तर कोलकात्यात अल्टबालाजी जास्त बघितलं गेलं. टायर टू आणि टायर थ्री सिटीमध्ये इरॉसनाऊ जास्त प्रमाणात बघितलं गेलं. वेगवेगळ्या पाहण्यांमधून ही आकडेवारी आणि निरीक्षणं पुढे आली आहेत.

लोकांच्या हातामधल्या मोबाइलमध्ये अ‍ॅपआधारित ओटीटी पर्याय उपलब्ध असणं हा तंत्रज्ञानाने निर्माण करून दिलेला व्यक्तिगत अवकाश आहे. घरोघरी एकच टीव्ही होता तेव्हा सगळे मिळून त्यावर एकच कार्यक्रम बघत. पण आता प्रत्येकाला त्याला हवं ते, हवं तेव्हा बघता येतं. यामुळेही ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वापराचे आकडे वाढलेले दिसतात. टाळेबंदीच्या काळात हातात वेळच वेळ आल्याने ते आणखी वाढले. त्याशिवाय या काळात मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी काही काळासाठी विनामूल्य कंण्टेट उपलब्ध करून दिला. काही ओटीटी पर्यायांनी काही काळापुरतं विनामूल्य सदस्यत्व किंवा फ्री ट्रायल्स उपलब्ध करून दिल्या. आणि आता त्याची सवय लागल्यामुळे यापुढच्या काळात हा वापर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याबरोबरच या काळात ब्रॉडबॅण्ड सेवेचा वापरही वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून यापुढच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी लोक मोबाइलवरून मोठय़ा स्क्रीनवर जाण्याचं प्रमाण वाढेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. पण जसजसा वापर वाढेल तसतसं हे व्यासपीठही एरवीच्या टीव्हीसारखं सर्वसमावेशक होत जाईल, त्यातला थेटपणा, धारदारपणा, प्रयोगशीलता कमी होत जाईल आणि लोकांना हवं तेच द्या असं होत जाईल अशी भीती काहींना वाटते.

टीव्हीपेक्षा स्मार्ट स्टिक

ओटीटी प्लॅटफॉर्मवरचे अ‍ॅपआधारित कार्यक्रम बघण्यासाठी मोबाइल फोन, लॅपटॉप यांचा वापर केला जातोच, त्याशिवाय ४२ इंची किंवा त्याहूनही अधिक मोठय़ा आकाराचे स्मार्ट टीव्ही घेऊन घरबसल्या मोठय़ा स्क्रीनवर डिजिटल माध्यमाचा आनंद घेतला जातो. घरातले अगदी पाचसात वर्षांपूर्वी घेतलेले एलसीडी, एलईडी टीव्ही काढून काहीजण नवे स्मार्ट टीव्ही घेतात. त्यांच्या किंमती १५ हजारापासून सुरू होतात. पण कमी खर्चात स्मार्ट टीव्ही हवा असेल तर आणखीही पर्याय उपलब्ध आहेत. एक तर तुमच्या घरी यूएसबी कनेक्शन असलेला जुना एलईडी किंवा एलसीडी टीव्ही असला तर बाजारात मिळणारी तीनचार हजाराची स्टिक घेतली आणि लावली की तुमच्या टीव्हीचं स्मार्ट टीव्हीत रूपांतर होतं. मोठय़ा आकाराचा स्मार्ट टीव्ही हवा असला तर त्याच्या किंमती जास्त आहेत. पण लोक स्मार्ट टीव्ही घेत असल्यामुळे आता चांगल्या ब्रॅण्डेड कंपन्यांच्या एलईडी टीव्हीच्या किंमती मात्र कमी झालेल्या आहेत. १५ ते २० हजारापर्यंत ४२ इंची एलईडी टीव्ही मिळतो. त्याला स्टिक वापरून २० ते २५ हजारात मोठय़ा स्क्रीनचा उत्तम स्मार्ट टीव्ही मिळू शकतो. स्टीकने अशा पद्धतीने स्मार्ट टीव्हीची बाजारपेठ काबीज करायचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

ओटीटीवर फर्स्ट डे फर्स्ट शो

आपल्याकडे २० मार्चनंतर कडकडीत टाळेबंदी जाहीर झाली आणि त्या काळात प्रदर्शित होऊ घातलेल्या सिनेमांचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला. टाळेबंदी इतक्यात संपत नाही हे लक्षात आल्यानंतर निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपापले सिनेमे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. तिथे प्रदर्शित झालेला पहिला भारतीय सिनेमा म्हणून यापुढच्या काळात नेहमीच सुदीप सोरकारच्या ‘गुलाबो सिताबो’ या सिनेमाचा उल्लेख केला जाईल. अमिताभ बच्चन, आयुषमान खुराना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमावर मिश्र प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे सिनेमागृहात त्याने किती व्यवसाय केला असता, माहीत नाही, पण अमेझॉन प्राइमवर मात्र त्याने निर्मात्यांना चांगले पैसे मिळवून दिले. या सिनेमापासून प्रेक्षकांनी आज प्रदर्शित होणारा सिनेमा आजच्या आज घरबसल्या बघण्याचा अनुभव घ्यायला सुरुवात केली. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूमुळे ‘दिल बेचारा’ सिनेमाला तर अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ‘शकुंतला देवी’, ‘रात अकेली’ ‘लूटकेस’ हे विद्या बालन, नवाजुद्दीन सिद्दिकी, कुणाल खेमू या बडय़ा सिताऱ्यांचे सिनेमेही लोकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या बघितले. त्याआधी टाळेबंदीच्या सुरूवातीच्या काळात ‘पॅरासाइट’ हा ऑस्कर विजेता तर ‘अंग्रेजी मीडियम’ हा इरफानखानचा शेवटचा सिनेमाही चाहत्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरच बघितला. सिनेचाहत्यांना फर्स्ट डे फर्स्ट शो बघणं हे ओटीटी प्लॅटफॉर्मने सहज शक्य करून दिलं.