सरकारने शिक्षणाचा हक्क मान्य केला असला तरीही आज अनेक कारणांमुळे शाळेत न जाणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे. ही मुलं शाळेत जावीत यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न होणं गरजेचं आहे.

आजघडीला असंख्य समस्यांचे आव्हान पेलत असलेल्या आपल्या देशासमोर एकच आशास्थान आहे, ते भावी पिढीचे. आजची मुले हीच उद्याच्या भारताची खरी ताकद आहे. ही ताकद आपोआप निर्माण होणार नाही, तर सकस आणि पोषक शिक्षणाने ती निर्माण करायची आहे. भारतातील प्रत्येक बालकाला जर असे शिक्षण मिळाले, तरच आपला देश जटिल समस्यांच्या जाळ्यातून मुक्त होण्याची शक्यता आहे.
देशातील प्रत्येक मूल शाळेत दाखल होणे आणि त्याला कल्याणकारी शिक्षण मिळणे, ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. देशातील शाळेत न जाणाऱ्या मुलांची संख्या चिंताजनक आहे. जगातील एकूण शाळाबाहय़ मुलांपैकी जवळजवळ वीस टक्के मुले आपल्या देशात आहेत; तसेच ‘युनेस्को’च्या अहवालानुसार भारतात पौगंडावस्थेतील शाळाबाहय़ मुले सर्वाधिक आहेत. रसरसून शिकण्याच्या ऐन उमेदीच्या वयात ही मुले शाळेबाहेर असणे हे आपल्या विकसनशील देशाला मुळीच परवडणारे नाही. जोपर्यंत आपल्या देशात लहान मुले कुपोषित आहेत, पैशाअभावी किंवा इतर असंख्य कारणांनी शाळेची पायरी चढू शकत नाहीत, शिकण्याचे आपले जन्मजात हक्क प्राप्त करू शकत नाहीत; नव्हे, त्यांचे हक्क हिरावून घेतले गेले आहेत; ठिकठिकाणी अपमान, मानहानी यांनी ती गांजलेली आहेत, मोठय़ांकडून दुर्लक्षिली गेलेली आहेत आणि भुकेने तडफडून प्राण गमावण्याची पाळी त्यांच्यावर येते, तोपर्यंत महासत्ता बनणे हे केवळ मृगजळच आहे.
देशात शाळाबाहय़ मुले केवळ खेडय़ांतच नव्हेत, तर मोठय़ा शहरांतही बहुसंख्येने आहेत; त्याचप्रमाणे आदिवासी, डोंगराळ भागात राहणारी मुले, तथाकथित दलित वर्गातील मुले, भटक्या विमुक्त वर्गातील मुले, ऊसतोडणीवरील आणि वीटभट्टीच्या कामगारांची मुले, अपरिमित दारिद्रय़ाने ग्रासलेली मुले, आजारी मुले, अपंग आणि मतिमंद मुले, कुपोषणाने खंगलेली मुले, रस्त्यावर भीक मागणारी मुले, फळे-फुले विकणारी मुले, अनाथ मुले, बालसुधारगृहांतील मुले आणि गरजेपोटी थातूरमातूर कामांस जुंपलेली मुले ही शाळेच्या बाहेर आहेत. यातही मुली मोठय़ा प्रमाणावर शाळेच्या बाहेर असणे ही फार गंभीर समस्या आहे. शालेय शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या आई-वडिलांना कळत नाही, असेही नाही; परंतु त्यांची कौटुंबिक, सामाजिक दयनीय अवस्था आणि अडाणीपणा हा मुलांच्या शिक्षणाच्या आड येतो. एक तर नवा शिक्षण हक्क कायदा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यातही अनेक अडचणी आहेत. केवळ माहिती पोहोचली म्हणजे झाले असे नव्हे; शिक्षणाचे महत्त्व समजण्याइतकी सामाजिक-सांस्कृतिक कुवत आणि भान त्यांच्यात आलेले नाही. काही गावात जवळपास एकही शाळा उपलब्ध नाही. शिक्षकांची संख्याही फार कमी आहे. लहान भावंडांना सांभाळण्यासाठी मुले-मुली शाळा सोडून घरी राहत असल्याची उदाहरणे मोठय़ा प्रमाणावर आहेत. शिवाय शेती, पशुपालन, वेतकाम, विणकाम अशा पारंपरिक उद्योगधंद्यांत पालकांना मुलांचीच मदत हवी असते. शाळेत पाठविल्याने त्यांच्या मदतीअभावी धंद्याचे नुकसान होण्याची भीती त्यांना असते. कित्येक पालक मुलांना शिक्षणासाठी खेडय़ातून शहराच्या ठिकाणी पाठवतात; परंतु शहरातील जीवनमान न झेपल्याने मुले नापास झाली की शिक्षण सोडून रस्त्यावर सटरफटर कामे करून पोट भरणे पसंत करतात, ही वस्तुस्थिती आहे.
देशातील शाळाबाहय़ मुलांचा शोध घेऊन त्यांना सुयोग्य शिक्षण देणे हे आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे. देशातील सर्व मुले शिकल्याशिवाय देश खऱ्या अर्थाने उभा राहू शकणार नाही. विकसनशील भारताचे स्वरूप ‘विकसित’ देशात होण्यासाठी शाळाबाहय़ मुलांना सुयोग्य शिक्षण मिळायलाच हवे. ही जबाबदारी सरकारची आहे, हे खरे असले तरी आपण प्रत्येकाने हे पवित्र देशकार्य पूर्णत्वास नेण्यात सहभागी होणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या देशातील या मुलांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपला आधार मिळणे गरजेचे आहे. आपली मुले सुशिक्षित व स्वावलंबी होऊन नवा तेजस्वी भारत निर्माण करू शकली पाहिजेत. हे घडून येण्याकरिता शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना आपले म्हणायची गरज आहे. आपल्याला ठिकठिकाणी भेटणाऱ्या अशा मुलांना प्रेमाने जवळ करून शाळेत जाण्याविषयी आग्रह धरणे शक्य आहे. आपल्या घरगडय़ांच्या मुलांना अभ्यास, स्वच्छता शिकविणे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे हे सहजशक्य आहे. स्टेशनवर भेटणाऱ्या हमालांच्या मुलांना शाळेत जाण्याचे महत्त्व सांगणे, भीक मागणाऱ्या मुलांशी, त्यांच्या पालकांशी संवाद साधून शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आपल्याला अशक्य नाही. यासाठी मन मोठे करण्याची गरज आहे. आपल्या प्राप्त पदव्यांमधून आलेला ‘प्रतिष्ठे’चा फुगा फोडल्याशिवाय ही मुले आपल्याला आपली वाटणार नाहीत. या वंचित मुलांना पूर्णत्वाने समजून घेण्यासाठी आस्था हवी, करुणा हवी. हे आपल्याला का जमू नये? हे जर आपल्याला जमले नाही, तर आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण स्वत:च्या पलीकडे कोणत्या स्वरूपात करू शकतो? उच्चशिक्षणाने आपण स्वार्थी झालो आहोत का? हे प्रश्न प्रामुख्याने विचारल्यशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. अर्थात, सरकारने या सर्व मुलांना एकत्र करून त्यांच्या निवासी शिक्षणाची सोय करणे गरजेचेच आहे. यासाठी गावागावांत निवासी शिक्षणसंस्था उभारायला हव्यात; परंतु या गोष्टी त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस यंत्रणा, सामाजिक-शैक्षणिक संस्था यांनी झटले पाहिजे. या सर्व कुटुंबांची आणि त्यांतील मुलांची नोंद सरकारदप्तरी आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे.
शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांच्या कुटुंबांचा, राहण्याच्या ठिकाणाचा, गावातील परिसराचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विचार केल्यास या मुलांना शिक्षण अशा प्रकारे द्यावे लागेल की, ते त्यांना आपल्यासाठीच आहे असे वाटले पाहिजे. मुलांशी उत्कटतेने संवाद साधण्यासाठी बोलीभाषेचा वापर मोठय़ा प्रमाणावर झाला पाहिजे. बोलीभाषेत संवाद साधून, मुलांना आपलेसे करून, कलात्मकता, खेळ, निसर्गाच्या सान्निध्यात शास्त्रीय प्रयोगांचा अभ्यास असेल तर त्यांना शाळेत यावेसे वाटेल. या दृष्टीने शिक्षकांना सुयोग्य प्रशिक्षण देणे आवश्यक ठरते. शिक्षकांना मुलांबाबत आंतरिक आस्था व प्रेम असल्याशिवाय ही मुले शिकणार नाहीत. मुला-मुलींची शाळेबाहेर असण्याची सर्व कारणे अभ्यासली गेली पाहिजेत. शाळेत शैक्षणिक सोयीसुविधांबरोबरच स्वच्छतागृहे, पिण्याचे शुद्ध पाणी असलेच पाहिजे. कित्येक ठिकाणी स्वच्छतागृहे नसल्याने मुली शाळेत येत नाहीत, हे दिसून येते. मुली शाळाबाह्य़ असण्याचे हे कारण लाजिरवाणे आहे. मुले परीक्षेला, परीक्षेच्या निकालाला, मूल्यांकनाला, प्रगतिपुस्तकाला, नापास होण्याला, शिक्षेला घाबरून शाळा सोडतात हे सत्य आहे. मुले शाळेत यावी म्हणून विविध आकर्षणे दाखविण्याची प्रथा आहे. मोफत साहित्य, रुपयाचे नाणे, सुगंधी दूध, माध्यान्ह भोजन असे अनेक उपाय करूनही मुले शाळेत येत नाहीत; आली तरी शिकत नाहीत. याचे कारण त्यांना ही आकर्षणे महत्त्वाची नाहीत, तर त्यांना मनापासून हवे आहे, प्रेम! प्रेमाने समजून घेणारे शिक्षक! त्यांना समजेल, उमजेल अशा भाषेत संवाद साधणारे शिक्षक त्यांना हवे आहेत, जेणेकरून जीवनाचा अर्थ ही मुले स्वत: शोधून काढण्यात रस घेतील. त्यामध्ये संवेदनशीलता असेल, प्रेमभाव, बंधुभाव असेल. असे विद्यार्थी बनविणे हे आजच्या शिक्षकांचे प्रथम कर्तव्य आहे.
पौगंडावस्थेत असलेली आपली आजची मुले-मुली शाळा सोडून जाण्यात अग्रेसर आहेत, असे ‘युनेस्को’चा अहवाल सांगतो. वय वर्ष १३ ते १९ हा मुलांच्या पौगंडावस्थेचा काल म्हणजे आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा होय. ज्या वयात शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे ही मुले अत्यंत संवेदनशील असतात, त्यांच्या सर्वागीण विकासाला सुयोग्य दिशा प्राप्त होणार असते, त्या वयात शिक्षण हाच त्यांच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग असतो, ज्यावर त्यांचे पुढील संपूर्ण जीवन भरारणार असते, त्याच टप्प्यावर शाळेला रामराम ठोकणे हे किती धोक्याचे आहे! पण परिस्थितीमुळे किंवा अज्ञानामुळे या मुलांना शाळा सोडण्याची वेळ येणे हे फारच दुर्दैवी आहे. पौगंडावस्थेतील मुलांच्या शिक्षणाचा विचार हा एकूणच वेगळ्या प्रकारे करण्याची गरज आहे, जेणेकरून या वयात मुले शाळा सोडणार नाहीत, आणि शाळाबाह्य़ मुले परत आवडीने शाळेत येतील, तसेच शाळेत येत असलेली मुले मनापासून शिकतील.
पौगंडावस्थेतील मुले स्वतंत्र होऊ पाहत असताना त्यांना पूर्णत: मुक्तता गरजेची असते. कोणत्याही दबावाचा त्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. बौद्धिक विकासाबरोबरच या मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. दुर्लक्ष झाल्यास त्यांच्या कोवळ्या मनावर आघात होऊन विकृती निर्माण होऊ शकते. अशा कित्येक मुलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे हा आपल्या देशाचा कलंक होय. म्हणूनच या वयात शिकत असताना त्यांच्या शरीर-मनावर कोणत्याही प्रकारे दडपण किंवा ताण-तणाव येणार नाहीत याची काळजी पालक-शिक्षकांकडून घेतली गेली पाहिजे. असे असताना आपल्या शिक्षणपद्धतीत नेमक्या याच नाजूक वयात मुला-मुलींवर दहावी-बारावीच्या परीक्षा लादल्या जातात. मुले अभ्यास करून मार्क मिळवत असली, तरी हे सर्व नाइलाजास्तव असते. या परीक्षांचा बहुसंख्य मुला-मुलींवर विपरीत परिणाम होतो हेच दिसून येते. त्यातून मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा प्रचंड गोंधळाच्या असल्याने सर्वच मुलांना व पालकांना तापदायक ठरत आहेत. अनेकदा चहूबाजूंनी संकटग्रस्त परिस्थितीतूनही विद्यार्थ्यांना परीक्षा देणे भाग पडते. अशा वेळी त्यांच्या परिस्थितीचा विचार ना परीक्षा मंडळाकडून केला जात, ना शाळेकडून. याचा मानसिकरीत्या धसका या विद्यार्थ्यांनी घेतलेला असतो. ती अशा वेळी हे कोणालाही सांगू शकत नाहीत, कारण त्यांच्याबद्दल आस्था आणि प्रेम असणारे कोणीही त्यांना भेटत नाही. परीक्षेत नापास होणाऱ्या मुलांना पुन्हा शाळेत यावेसे वाटत नाही. शिवाय नापास होण्याच्या भीतीने पालक त्यांना शाळा सोडायलाच प्रवृत्त करतात. मुलींना तर अजूनही ‘परक्याचे धन’ मानण्याची प्रथा असणे हे भयानक आहे. मुली वयात येताच त्यांच्या लग्नाचा विचार सुरू होतो. लग्न ठरले की शिक्षणाची गरज वाटेनाशी होते; याला अज्ञान कारणीभूत आहे. खरं म्हणजे शिक्षणाच्या पायावरच संसार सुखाचा करण्याची ताकद मुलींमध्ये आहे; तसेच नव्या अहवालानुसार शिक्षणामुळेच स्त्रियांचा राजकारण, समाजकारणातील सहभाग वाढल्याचे निदर्शनास आले आहे; ही निश्चितच आशादायी बाब आहे. परंतु पौगंडावस्थेतील मुला-मुलींचा सुयोग्य विचार करता आपलेसे करणारे प्रेमळ शिक्षक आणि दबावविरहित शिक्षण त्यांना मिळणे गरजेचे आहे. केवळ साक्षरता वाढली म्हणजे देश शिकला असे नव्हे, तर सुसंस्कृत, सुबुद्ध, विवेकी समाज निर्माण होणे हे सुयोग्य शिक्षणाचे द्योतक आहे. असे शिक्षण निर्माण झाले, तरच शाळाबाह्य़ मुले शाळेत येतील, शिकतील, टिकतील, घडतील, देश घडवतील.
मंजूषा जाधव