१८९४ ते १९११ या उमेदीच्या १७ वर्षांच्या कालावधीत देशभरात प्रतिष्ठेची मानली गेलेली अशी तब्बल २४ सुवर्ण आणि रौप्य पदके मिळविणारा चित्रकार आणि १९११ साली थेट लंडनमध्ये आपले चित्रप्रदर्शन साकारणारा पहिला भारतीय चित्रकार हा परिचय आहे विख्यात चित्रकार एम. एफ. पिठावाला यांचा. १९०७ ते १९०९ सलग तीन वर्षे बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक चित्रप्रदर्शनात त्यांना सुवर्णपदक मिळाले. १९०८ सालचे त्यांचे सुवर्णपदकप्राप्त चित्र आजही मुंबईच्या रिपन क्लबमध्ये पाहायला मिळते. जलरंग आणि तैलरंग या दोन्ही माध्यमांवर त्यांची तेवढीच उत्तम पकड होती. व्यक्तिचित्रण हा त्यांचा आवडीचा आणि अधिकार असलेला असा विषय होता. व्यक्तिचित्रणाच्या बाबतीतही त्यांनी खूप वेगळे प्रयोग केले. प्रस्तुत चित्रामध्येही पारशी मुलीचे व्यक्तिचित्रण करताना त्यांनी ठोकळेबाजपणा पूर्णपणे टाळला आहे.