विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

सर्वाचाच गृहवास संपविण्याच्या दृष्टीने मेअखेरीस पावले उचलण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत; महाराष्ट्राने खबरदारी घेऊ या, असे आवाहन केले आहे. असे असले तरी आज ना उद्या हा गृहवास संपवावाच लागेल. अशा वेळेस सामान्य नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत या खेपेस नामवंत तज्ज्ञ व ‘लोकप्रभा’ परिवारातील विज्ञानलेखिका डॉ. उज्ज्वला दळवी यांनी ‘कव्हरस्टोरी’च लिहिली आहे. अर्थचक्र रुळावर आणण्यासाठी आपण काय केले पाहिजे यावर विविध तज्ज्ञ व्यक्त होत आहेत; पण या कोविडकोंडीच्या काळात एका मुद्दय़ाकडे अद्यापही आपले फारसे लक्ष गेलेले नाही. यातील पहिली बातमी आहे ती, पाकिस्तानातील जकोबाबाद आणि युनायटेड अरब अमिरातीमधील रास अल खैमा ही दोन ठिकाणे भूतलावरील मानवाने न राहण्यायोग्य ठरली याची. लॉगबरो विद्यापीठातील टॉम मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने केलेल्या अभ्यासात हे लक्षात आले. त्यासाठी त्यांनी ‘वेट बल्ब टेम्परेचर’ ही वैज्ञानिक पद्धती वापरली. तापमापकाला ओला फडका गुंडाळून उष्म्याच्या नोंदी केल्या जातात. त्यात या दोन्ही ठिकाणी काही तास तरी तपमान एवढे चढते की, माणूस त्या तपमानात जिवंत राहणे कठीण असे या तज्ज्ञांच्या लक्षात आले. त्या नोंदींविषयी त्यांना काही शंकाही होत्या. त्या व्यवस्थित आहेत का? त्यासाठी त्यांनी या ठिकाणाच्या गेल्या अनेक वर्षांतील नोंदीही तपासून पाहिल्या. या नोंदींना वैज्ञानिक तर्कशास्त्र लावल्यानंतर लक्षात आले की, नोंदी बरोबर आहेत. अति उष्मा हा वाढलेल्या कार्बन उत्सर्जनाचा परिणाम होता.

दुसरी महत्त्वाची बातमी कार्बनब्रिफची. ही जागतिक संघटना आपण किती कार्बन उत्सर्जन दररोज करतो, त्याच्या नोंदी ठेवते. त्यांनीही एक छोटेखानी अहवाल जारी केला. वातावरण स्वच्छ झाले हे तर आपणही अनुभवलेच. पंजाबमधल्या शहरांतून हिमालयाचे दर्शन कैक वर्षांनी झाले. उद्योग बंद असल्याने काही ठिकाणी नद्या नितळ दिसू लागल्या. एकुणात काय, तर कार्बन उत्सर्जन घटले, कारण सारे उद्योग बंद होते. २००६ सालाएवढी ही कार्बन उत्सर्जनाची पातळी आल्याचे हा अहवाल सांगतो. मात्र एकूणच जगभरातील माणसाच्या सवयींचा विचार करता आपण कोविडकोंडीआधीची स्थिती अवघ्या महिन्याभरातच गाठू अशी शक्यता आहे.

कार्बन उत्सर्जनामुळे होणारे परिणाम तर आपण विविध विकार-आजारांच्या निमित्ताने भोगतोच आहोत, तरीही लक्ष दिलेले नाही. मात्र कदाचित सद्य:स्थितीतील वातावरण स्वच्छ झाल्याचा अनुभव घेतल्यानंतर तरी त्याचे महत्त्व पटावे. अलीकडच्या शास्त्रीय अभ्यासात वैज्ञानिकांच्या असे लक्षात आले आहे की, प्रदूषण एवढे खोलवर जाते की, ते माणसाच्या डीएनएमध्येही घुसखोरी करून विकारांच्या दिशेने जाण्यास भाग पाडते. म्हणूनच कोविडकोंडींच्या काळात हा धडा आपण घेणे गरजेचे आहे. या कालखंडात लक्षात आलेल्या बाबींमध्ये अर्निबध शहरीकरणाचे भयानक परिणाम पाहिले. अनेक शहरांची निर्मिती ही झाडे-जंगले कापून करण्यात आली आहे. ही प्राचीन प्रथा आहे, चाणक्याच्या अर्थशास्त्रातही याचे दाखले आहेत. मात्र आपण त्याच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन कधीच केले आहे.

कार्बन ब्रिफच्या अहवालात २००६ एवढय़ा पातळीवर पोहोचल्याची नोंद असली तरी त्याच्याच पुढच्या परिच्छेदात इशाऱ्याची घंटाही आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही घट तशी आनंददायी नाही. कारण त्याने वातावरणातील कार्बन किंचित कमी झालेला असला तरी संपलेला नाही. मुळात यापूर्वीच उत्सर्जित केलेला कार्बन एवढा आहे की, सध्या भूतलावर असलेल्या झाडांची तेवढा सगळ्याच्या सगळा शोषण्याची क्षमता नाही! म्हणूनच कोविडकोंडी सुटत असतानाच्या काळात हाही धडा आपण घ्यायला हवा. अन्यथा आपण अर्थचक्र जोरदार फिरवण्यासाठी सारे काही धाब्यावर बसवू आणि ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच स्थिती असेल!