यंदाच्या २७ मे रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त नेहरूंमधील लेखक या आगळ्यावेगळ्या पैलूला अभिवादन-

‘I am not a man of letters’’ असे म्हणणारे नेहरू खरे तर प्रतिभावंत लेखक होते. त्यांच्या कोटावर नित्य विराजमान असणाऱ्या गुलाब पुष्पाप्रमाणे त्यांची लेखनकला ही सदैव टवटवीत व सतेज होती. त्यांच्यातील साहित्यिक कधी आत्मचरित्राच्या स्वरूपात (An Autobiography) तर कधी इंदिराजींना लिहिलेल्या पत्रांच्या स्वरुपांत (Glimpses of world history), कधी विश्लेषकाच्या रूपांत (Discovery of india), कधी निबंधाच्या स्वरूपांत, तर कधी काँग्रेस पक्षाच्या नेत्याना, मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या विविध विषयांवरील मसुद्याच्या रूपांत प्रगट होत असे.
(Glimpses of world History AFd¯F Discovery of India) ही नेहरूंची दोन गाजलेली पुस्तके. जागतिक इतिहासाचा मनाला थक्क करणारा वेध त्यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत घेतला आहे. ऐतिहासिक घटनांचे त्यांचे आकलन, विविध घटनांचा त्यांच्या दृष्टिकोनातून केलेला ऊहापोह, इतिहास घडवणाऱ्या व्यक्तींची त्यांनी रेखलेली चित्रे हे सर्वच मनोज्ञ आहे. त्यांची ही पुस्तके वाचताना आपणास इतिहासाबद्दल नवी दृष्टी प्राप्त होते. नेहरू स्वत:ला इतिहासकार समजत नव्हते. Glimpses च्या प्रस्तावनेत ते स्पष्टपणे म्हणतात, ‘I do not  claim be a historian’
नेहरू रूढार्थाने इतिहासकार नव्हते, परंतु इतिहासाच्या अभ्यासाचे मर्म त्यांनी जाणलेले होते. ते म्हणत इतिहास अभ्यासताना नकाशे, स्थलचित्रे, संदर्भग्रंथ इ. बा’ासाधने आवश्यक आहेतच, परंतु आपले त्याच्याशी एवढे तादात्म्य झाले पाहिजे की तो इतिहास प्रत्यक्ष आपल्यासमोर घडत आहे असे वाटले पाहिजे. ऐतिहासिक स्थलांच्या अवशेषांतून फिरत असताना खऱ्या इतिहासप्रेमीला त्या दगडधोंडय़ातून जेवढा इतिहास कळतो तेवढा तो पुस्तकांतून कळत नाही. हे अवशेष अक्षरश: बोलतात. इंदिराजींना ते लिहिताना, Go near to the old Ashoka pillar in our city of Allahabad or Prayag, see the inscription Carved on it at the bidding of Ashoka and you can hear his Voice across 2000 years.
नेहरूंचे आत्मचरित्र (An Autobiography) हा त्यांच्या लेखनकलेचा सर्वोत्तम आविष्कार आहे. साधारणत: त्यांच्या जन्मापासून ते १९३५ पर्यंतच्याच कालखंडाचे चित्रण यात आहे. नेहरू (कौल) घराण्याचा काश्मीरपासून अलाहाबादपर्यंत दिल्ली मार्गे झालेल्या स्थलांतराचा इतिहास त्यांनी थोडक्यात दिला आहे. त्याचे बालपण, कुमारवयातील त्यांचे लंडनमधील वास्तव्य, तारुण्यात मुलींच्याबद्दल वाटणारे आकर्षण, त्यांचा लाजाळू स्वभाव, पूर्वायुष्यात मोतीलालजींवर पाश्चात्त्य राहाणी व विचारसरणी यांचा पडलेला प्रभाव इत्यादी गोष्टी त्यांनी सहजसुंदर भाषेत प्रांजलपणे वर्णन केलेल्या आहेत. स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेल्यानंतर बापुजींचा प्रभाव त्यांच्यावर कसा पडत गेला याचेही दिग्दर्शन त्यांनी केलेले आहे. ब्रिटनमधील आधुनिक जीवनशैलीत वाढलेले नेहरू उत्तर प्रदेशमधील गरिबातील गरीब शेतकऱ्यांमध्येही उन्हातान्हांत कसे सहजपणे मिसळत हे वाचून आपण नतमस्तक होतो. तुरुंगातील एकांतवासावर उपाय म्हणूनच आपण हे आत्मचरित्र लिहिले असे नेहरू म्हणतात. आपल्या आयुष्यातील घटनांचे सिंहावलोकन करून शांतपणे त्यावर विचार करणे हाच या लिखाणामागील उद्देश होता. आत्मचरित्र हे स्वकथनच असले तरी कोणी तरी आपले हे कथन ऐकत आहे अशी लेखकाची भावना असते, नेहरू लिहितात, ‘‘I was not writing deliberately for an audience, but if I Thought of an audience it was one of my own countrymen and country women’’
नेहरूंनी गोहत्येपासून ते घटस्फोटापर्यंत, सार्वजनिक आरोग्य ते राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत अशा विविध विषयांवर लेखन केले. ज्या विषयाबद्दल समाजात मतभेद असत अशा विषयांवर त्यांनी आपली मते हिरिरीने मांडलेली आहेत. आपल्या मतांवरील आक्षेपांना उत्तर देताना त्यांनी केलेले लिखाण हे अधिकच वाचनीय होत असे. नेहरूंचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांच्या लेखनशैलीविषयी फ्रँक मोराइस लिहितात, ‘‘We can read Neharu not just for his ideas or for insights in to his personality, but also for the way in which expressed himself, for the grace and rhythm of his English at its best. Neharu’s style shows a vigour and clarity as pleasing and compelling to the ear as to the mind’’
नेहरूंच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाचा व त्यांच्या ओघवत्या लेखनशैलीचा प्रत्यय आपणास त्यांच्या लिखानातून सातत्याने येतो. उदा. Discovery of India मध्ये त्यांनी गंगेचे महात्म्य अत्यंत रसाळपणे सांगितले आहे.

नेहरू वर्णन करतात. The story Ganges from her source to the sea, from old times to new, is the story of Indias civilization and culture, of the rise and fall of Emprres of great and proud cities, of the adventure of man and the quest of the mind which has so occupied Indias thinkers, of the richness and fulfilment of life as well as its denial and renunciation, of ups and downs, of growth and decay of life and death.’’ अशा तऱ्हेचे सुंदर उतारे त्यांच्या लेखनात जागोजागी सापडतात.
नेहरू हे निर्मितीक्षम लेखक होते. त्यामुळे इतिहासाची पाने धुंडाळताना, जागतिक इतिहासावर दृष्टिक्षेप टाकताना, भारताचा पुनशरेध घेतानाही यांनी नवनिर्माणाचा विचार केला. ‘‘Today we have little leisure to think of the past, It is the future that fill our minds the future that we are fashioning and the present that absorbs all our time and energy.’’ अशा तऱ्हेने त्यांची दृष्टी भविष्याकडे लागलेली असे.
नेहरू स्वत: उत्तम लेखक होते व इतरांचे लेखन ते आवर्जून वाचत. त्यापासून ते प्रेरणा घेत. सुप्रसिद्ध अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या ‘Stopping by woods on a snowy eveningl’ या कवितेमधील,
The woods are lovely dark and deep
But I have promises to keep
And miles to go before I sleep
And miles to go before I sleep

या काव्यपंक्ती त्यांच्या आवडीच्या होत्या.
नेहरूंचे मन हे कवीचे होते. त्यांची ओघवती भाषा ही काव्यसदृशच आहे. नेहरूंच्या कवीप्रवृत्तीचा आविष्कार म्हणजे त्यांचे लिखाण. त्यांच्यामधील हा सुप्त कवी त्यांचे जीवन व्यापून राहिलेला होता. तुरुंगात असताना ते भल्या पहाटे उठत व आकाशाचे निरीक्षण करत. मावळत्या चंद्राचा प्रकाश अन पहाटेची सूर्यप्रभा यांचा खेळ व अस्तंगत होणारे तारकाविश्व यांचे अवलोकन करताना त्यांचे भान हरवून जात असे. इंदिराजींना ते लिहितात, ‘‘I like to watch the coming of the dawn and the way it gradually put out the stars. Have you ever seen the moonlight before the dawn and the slow change to the day’’ तुरुंगातील एकांतवासांत आषाढमेघच त्यांचे सहचर होत!
उत्तम लेखक असलेले नेहरू फर्डे वक्तेही होते. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची शक्ती त्यांच्या भाषणात होती. त्यांची भाषणे अक्षरश: काव्यरूप धारण करत. भारत स्वतंत्र होत असताना त्यांनी केलेले भाषण हा अव्वल साहित्याचा नमुना आहे. नेहरू म्हणाले, ‘‘Long years ago we made a tryst which destiny, and now the time comes when we shall redeem our pledge not wholly or in full measure but very substantially. At the stroke of the midnight hour, when the world sleeps India will awake to life and freedom.’’ आपल्या या नादमधुर भाषणाची सुरुवात त्यांनी, ‘‘A moment comes which comes but rarely in history, when we step out from the old to the new when an age ends and when the soul of a nation lung suppressed finds utterance’’ अशा भावपूर्ण शब्दांत केली.
अशा या महान स्वातंत्र्यसेनानीला, आधुनिक भारताच्या शिल्पकाराला, लोकशाहीच्या खंद्या पुरस्कर्त्यांला, कविमनाच्या श्रेष्ठ साहित्यिकाला अन् भारतीय जनतेच्या लाडक्या जवाहरला त्यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!