06 August 2020

News Flash

वास्तव पालकांचं आणि मुलांचं!

<span style="color: #ff0000;">चर्चा</span><br />वेगवेगळ्या माध्यमांमधून लहान मुलांवर सतत येऊन आदळणाऱ्या बलात्काराच्या बातम्यांचा त्या लहानग्यांच्या मनावर नेमका काय परिणाम होत असेल? अशा घटनांवरच्या प्रतिक्रिया म्हणून

| August 9, 2013 01:01 am

चर्चा
वेगवेगळ्या माध्यमांमधून लहान मुलांवर सतत येऊन आदळणाऱ्या बलात्काराच्या बातम्यांचा त्या लहानग्यांच्या मनावर नेमका काय परिणाम होत असेल? अशा घटनांवरच्या प्रतिक्रिया म्हणून आसपासची माणसं जे काही बोलतात, वागतात, त्याचा मुलं काय अर्थ लावत असतील? कसं वागायचं या अडनिडय़ा वयातल्या मुलांशी? जगाच्या क्रूर व्यवहारांत कसं जपायचं त्यांचं बालपण?
सकाळी सकाळी वर्तमानपत्रं वाचायला जावं, तर हिंसाचाराच्या बातम्यांनी मन अगदी उदास होऊन जातं. नक्षलवादी, धर्माध दहशतवादी यांच्या भीतीनं मन भयग्रस्त होतं. अशा मनोवस्थेत आज लोक दिवसाच्या कामाला सुरुवात करताहेत. हे अनेक र्वष चाललंय, पण गेल्या दोनतीन वर्षांत त्यांना एका वेगळ्याच काळजीनं घेरलंय. वृत्तपत्रं, दूरदर्शन यात आता बलात्काराची बातमी ठळकपणे दिसू लागली आहे. त्या बातमीनं सगळ्यांना विशेषत: पालकांना पुरतं हादवून टाकलंय. याचं कारण त्यांची मुलं. दिवसभर त्यांची मुलं शाळेच्या निमित्तानं घराबाहेर असतात. आई, बाबा घरी नसल्यानं कैक मुलं शाळेव्यतिरिक्तच्या वेळात पाळणाघरात असतात किंवा वेगवेगळ्या अभ्यासवर्गात किंवा छंदवर्गात जातात. आपल्या गैरहजेरीत नाना ठिकाणी वावरणाऱ्या आपल्या मुलांचा बचाव या नव्या संकटापासून आपण करू शकत नाही ही जाणीव या पालकांना हतबल वाटायला लावते आहे.

मेंदूची कार्यप्रणाली एका समाजाचा अतूट घटक म्हणून जगणाऱ्या माणसाची आहे आणि आपण सारी शहरी माणसं मात्र आज काळाच्या बदलत्या रेटय़ात आपण समाजापासून विभक्त होऊन एकेकटे जगतो आहोत. कधी आपल्या मुलांना समाजाचा घटक म्हणून वावरायची संधीच मिळत नाही.

आपल्या मुलीवर कुणी, कधी बलात्कार केला तर, या नुसत्या काळजीनंच मुलींच्या आया हादरून जाताहेत, तर दुसरीकडे आपल्या कॉलेजवयीन मुलावर तारुण्यसुलभ मैत्रीतून उमटणाऱ्या फुटकळ नाराजीपायी कुणी मुलगी शारीरिक छेडछाडीचा आरोप करून त्याला पोलिसांत तर देणार नाही ना, ही काळजी मुलग्यांच्या आईबाबांना छळते आहे.
हे आजचं वास्तव आहे. ते नाकारू म्हटलं तरी नाकारता येणार नाही, पण नुसती काळजी करत बसण्यापेक्षा काळजी घेणं अधिक चांगलं आणि काळजी नेमकेपणानं घेता येण्यासाठी सर्वप्रथम आपल्यापुढच्या प्रश्नांची व्याप्ती आपण नीट, समग्रतेनं समजून घेतली पाहिजे.
सर्वसाधारणपणे आज पालक आपल्या लेकरावर बलात्कार किंवा तत्सम अन्याय झाला तर काय होईल असाच एकांकी विचार करताहेत. आयआयटी किंवा मेडिकल, इंजिनीअरिंग कॉलेजात हल्ली रॅगिंग होतंय त्यातही हिंसाचार, लैंगिक विकृती ठळकपणे दिसत आहे. अशा कृतीत एक तारुण्यसुलभ वृत्ती म्हणून असेल, पण आपलीच हुशार, चांगली मुलं सामील होताहेत हे वास्तव नजरेआड करून चालणार नाही. आपली मुलं जेव्हा गंमत म्हणून मुलींची छेडछाड करतात किंवा आपल्या मुली कॉलेजात एखाद्या मुलाला ‘सीसी’ म्हणून चिडवतात आणि त्या गप्पा काही पालक  चवीनं ऐकत असतात, त्याचं काय? तेव्हा पालक म्हणून ते कसे वागत असतात? सुटीच्या दिवशी अनन्वित हिंसाचारानं आणि बीभत्स शरीर प्रदर्शनानं चितारलेले चित्रपट चवीनं पाहाणारे आईबाबा मुलांसमोर करमणुकीतून मिळणाऱ्या आनंदाचं कोणतं मॉडेल ठेवताहेत?
बलात्काराचा प्रश्न हा वरवरच्या चर्चेनं समजून घेत राहिल्यानं त्याच्या व्याप्तीचा आवाका येणं कठीण आहे. त्यासाठी आज हे असं सारं या समृद्ध जीवनशैलीत जगू देणाऱ्या शहरांतून, गावागावांतून का घडतं आहे याचा आपण नीट विचार केला पाहिजे. आपल्यासारख्या सुखवस्तू, सुशिक्षित, सुसंस्कृत घरातल्या मुलांमध्ये ही हिंसावृत्ती कशी आणि का जोपासली जाते आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला आज विज्ञानाची मदत आणि मार्गदर्शन उपलब्ध आहे.

या चैनी जीवनशैलीत मूल्यं कधीच हरवून गेली आणि आवडलेल्या मुलीकडे एक भोग्यवस्तू म्हणून पाहायला सरावलेल्या पुरुषाला बलात्कार हा पौरुषत्व सिद्ध करण्याचा अंतिम निकष वाटू लागला.

विज्ञान सांगतं की, आपलं वर्तन मेंदूच्या अधीन असतं. माणसाचा मेंदू लाखो वर्षांतील माणसांच्या जीवनशैलीतील घडामोडींतून उत्क्रांत झाला आहे. माणसाला होमोसेपीअन म्हणजे प्रगल्भ प्राणी असे म्हणतात ते या इतर प्राण्यांच्या तुलनेत कैकपटीनं विकसित आणि प्रगल्भ बनलेल्या त्याच्या मेंदूमुळेच. माणूस लाखो वर्षांपूर्वी उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर छोटा, छोटा समाज बनवून जगू लागला. त्या समाजातील प्रत्येकाची भावनिक पातळीवर देवाणघेवाण होऊ लागली तसतशा राग, भीती, आनंद, दु:ख, उबग, आश्चर्य या जुन्या भावनांच्या जोडीला माणसामध्ये लाज वाटणं, अपराधी वाटणं, संकोचल्यासारखं अवघड वाटणं.. या नवीन भावना उद्भवल्या. माणसाला प्रगल्भ प्राणी- होमोसेपीयन – ही पदवी मिळाली आहे ती निव्वळ उत्क्रांतीच्या झमेल्यात टिकून राहण्यासंदर्भातली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माणूस जेव्हा स्वत:च्या जुन्या आणि नव्या भावनांना शिस्त लावतो तेव्हाच त्याचं जगणं- वागणं सुसंस्कृत होतं.
हे कसं घडलं याबद्दल सांगायचं तर आपला पूर्वज हळूहळू एक सामाजिक प्राणी म्हणूनच जगत आणि वाढत गेला. त्याच्या मेंदूला अवतीभवतीच्या समाजातल्या प्रत्येक घटनेची आणि त्यातून उद्भवणाऱ्या भावनांची दखल घेऊन, मगच त्याचा अर्थ लावायची सवय लागली. तो मेंदूचा जणू स्वभावच बनला. मेंदूची कामाची पद्धत बऱ्याच अंशी कॉम्प्युटरसारखी असते. कॉम्प्युटरमधल्या सॉफ्टवेअरनुसारच कॉम्प्युटर कार्यरत करता येतो. उपलब्ध सॉफ्टवेअरचा वापर करूनच कॉम्प्युटर आपल्या प्रश्नांना उत्तरं देतो. तसंच मेंदूचं आहे.
मेंदूची कार्यप्रणाली एका समाजाचा अतूट घटक म्हणून जगणाऱ्या माणसाची आहे आणि आपण सारी शहरी माणसं (यात निखळ आदिवासी सोडून सारी माणसं आली.) मात्र आज काळाच्या बदलत्या रेटय़ात आपण समाजापासून विभक्त होऊन एकेकटे जगतो आहोत. कधी आपल्या मुलांना समाजाचा घटक म्हणून वावरायची संधीच मिळत नाही. ती शाळेत जातात, खेळाच्या मैदानावर जातात, पण सदैव कुणाच्या तरी आज्ञेत, धाकात, कठोर शिस्तीत वावरत असतात. मनमोकळेपणानं इतरांशी मिसळणं, त्यांना त्यांच्या गुणदोषांसकट आपुलकीनं स्वीकारणं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण चुकलोमाकलो तरी या वर्तनाकडे क्षमाशील वृत्तीनं पाहून आपल्याला प्रेमानं स्वीकारलं जातंय ही आपुलकी अनुभवणं हे सारं मुलांच्या वाटय़ाला अभावानंच येतंय. आज आपल्या वस्तू, खेळणी सर्वासमवेत वाटून घेत, समवयस्कांसोबत खेळत, त्यातले टक्केटोणपे अनुभवत ही मुलं मोठी होत नाहीत.
आता आजीच्या वयात आल्यावर मी या पालकांच्या पिढीकडे पाहाते तेव्हा समाजात स्वत:च्या प्रेरणानुसार वागत सामावून जाणं त्यांनाही त्यांच्या बालवयात फारसं अनुभवायला मिळालं नाही, हे ध्यानात येतं. जो अनुभव त्यांच्याही गाठी पुरेसा नाही तो अनुभव ते त्यांच्या मुलांना कसा देणार? गेल्या शंभर-दोनशे वर्षांत पाश्चात्त्य देशात व्यक्तिस्वातंत्र्याच्या अट्टहासापायी माणूस आत्मकेंद्रित बनला. स्वत:चं सुख, आनंद मिळवताना तो अधिक तर स्वत:चाच विचार करू लागला. त्याच्या समाजाभिमुख मेंदूतली बरीचशी क्षमता वापरणं या आत्मकेंद्रित वृत्तीपायी त्याला जमेनासं झालं. अनेकदा तर त्याचा मेंदू या माणसांच्या भलभलत्या प्रश्नांनी भांबावून जाऊ लागला. मेंदूची क्षमता पुरेपूर वापरणं या माणसांना जमेना. त्यांचे नवनवीन प्रश्न उद्भवू लागले. त्यातून नवीन समस्या उभ्या राहिल्या आणि या माणसाचं जगणं अधिकच आत्मकेंद्रित, स्वार्थी बनू लागलं.
त्या काळातली आणखी एक घटनाही महत्त्वाची आहे. याच दरम्यान यंत्रयुग अवतरलं, प्रचंड प्रमाणात वस्तू चुटकीसरशी अत्यंत कमी वेळेत बनवता येऊ लागल्या. त्या वेळेत खपवणं गरजेचं बनलं. त्यासाठी जाहिरात युग अवतरलं. या दोघांनी मिळून माणसांसमोर एक नवाच भूलभुलैया तयार केला. या नवनवीन वस्तू जीवनावश्यक आहेत अशी मानसिकता तयार करून जाहिरात युगानं ती पोसली. वस्तूंनी भरलेल्या घरात आणि जगात आत्मकेंद्रित वृत्तीला खतपाणी मिळत गेलं. पूर्वी पापड बनवायला, दिवाळीचा फराळ बनवायला शेजारणीची मदत लागे, तिची भांडीकुंडी लागत. आता त्या वस्तू बाजारात आयत्या मिळू लागल्या. हुतुतू, लंगडी, लगोरी हे खेळ खेळायला सवंगडी लागत. आता एकेकटय़ा मुलानं खेळायचे खेळ विकत आणता येऊ लागले. फार कुणाची मदत न घेता वस्तूंची मदत घेत माणसं जगू लागली. कुटुंबही छोटं बनलं. समाजात मिसळण्याचे योग दुर्मीळ झाले. त्याची उणीव या भौतिक व्यक्तिगत सुबत्तेनं भरून काढली. नकळतच माणूस इतरांना उपभोग्य वस्तू समजून वागू लागला. आता अधिकाधिक पैसा मिळवणं गरजेचं बनलं. साधनशुचिता पार लयाला गेली. चैनीत आयुष्य जगण्यासाठी वाममार्गानं मुबलक पैसा मिळू लागला आणि त्या पैशांतून हळूहळू प्रतिष्ठाही विकत घेता येऊ लागली. या झमेल्यात स्वत:च्या भावनांना शिस्त लावणं, भावविश्व समृद्ध करणं, आपल्या जीवनशैलीतून उच्च अभिरुची जोपासणं जणू कालबाह्य़ झालं. उत्तम खेळ खेळून, नाटकात अभिनय करून कर्तृत्व सिद्ध करणं याला घराघरांतून प्रोत्साहन मिळण्याऐवजी आपल्या पैशातून मुलांसाठी शैक्षणिक यश विकत घेणं सुरू झालं. सारं जगणंच बाजारू झालं. अशी मौजमजा करताना सुखाची चटक लागली आणि आनंद पार हरवून गेला.
पण होमोसेपीअन – प्रगल्भ मानवाला आनंदाची ओढ उपजत असल्यानं माणूस तरीही सतत आनंदच शोधत राहिला. वस्तूपलीकडे आनंद असतो हे सांगणारे शिक्षक, पालक त्याला भेटलेच नाहीत, कारण त्या पालकांची, शिक्षकांची आनंदाशी नीटशी ओळखही आजवर कधी झालेली नव्हती. सुख मिळवण्याच्या या चढाओढीत यशस्वी ठरलेल्या श्रीमंतांना शह देण्यासाठी शारीरिक बळ वापरून शह देणारे गुंडही तयार झाले. बघता बघता श्रीमंत गुंड बनले आणि गुंड श्रीमंत बनले.
ते पाहत वाढलेली सामान्य माणसं एका भकास जीवनशैलीत जगू लागली. माझे सुदृढ शरीर हे माझं पौरुषत्व हा समज मुलांमध्ये जोपासला जाण्याऐवजी माझी लैंगिक कुरघोडी हे पौरुषत्व असा समज पुरुषात दृढ होत गेला. हाती खुळखुळणाऱ्या पैशातून मुलांना नाना चैनींची चटक लागली आणि मला हवी ती वस्तू मला मिळालीच पाहिजे असा त्यांचा समज झाला. या चैनी जीवनशैलीत मूल्यं कधीच हरवून गेली आणि आवडलेल्या मुलीकडे एक भोग्यवस्तू म्हणून पाहायला सरावलेल्या पुरुषाला बलात्कार हा पौरुषत्व सिद्ध करण्याचा अंतिम निकष वाटू लागला.

एक मुलगी म्हणाली, ‘‘मुलींवर बलात्कार होतो म्हटल्यावर मुलींना दोष देणारेही कमी नाहीत. मला वाटतं या बातम्यांपायी मोठी माणसंच खूप घाबरून गेली आहेत आणि ती काहीबाही बोलताहेत.’’

ढोबळमानानं आज सामोरं येणारं हे समाजचित्र, पण सगळंच काही अंधारलेलं आहे, असंही नाही. आजही काही सुजाण पालक स्वत:च्या भावनांना परिश्रमपूर्वक शिस्त लावून सुसंस्कृत जीवनशैली जगू पाहाताहेत. त्यांच्यापुरता एक सुसंस्कृत समाज त्यांनी समवयस्क पालकांच्या मदतीनं साकारला आहे. त्या समाजात वाढताना त्यांची मुलं जीवनातले अनेक आनंद अनुभवताहेत. सुदृढ परस्पर नातेसंबंधांमुळे ती मुलं एक अनोखी सुरक्षितता अनुभवताहेत. या मुलांच्या पालकांनाही आपापल्या मुलांची शारीरिक सुरक्षिततेची काळजी वाटतेच आहे. आपल्या सुस्वभावी, सुसंस्कृत मुलांचा बळी तर हा बाह्य़ जगातला समाज घेणार नाही ना, हा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे. या पालकांच्या सांगण्यावरूनच मी एकदा त्यांच्या किशोरवयीन मुलांशी बोलले. पहिला प्रश्न मी मुलांना विचारला, ‘‘हल्ली वृत्तपत्रांत, टीव्हीवर जिथं तिथं बलात्कार, विनयभंग याचीच चर्चा सुरू आहे. ते ऐकताना, पाहताना, वाचताना तुम्हाला काय वाटतं?’’
एक मुलगा म्हणाला, ‘‘ही सर्व माध्यमं अशा चटकदार बातम्यांच्याच मागे लागतात. काही महिन्यांपूर्वी आर्थिक भ्रष्टाचाराच्या गोष्टी सुरू होत्या. आता शारीरिक भ्रष्टाचाराविषयी त्यांना बोलायचंय. त्या बातम्यांना फार महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. बलात्कार, विनयभंग वर्षांनुवर्षे होताहेत. आता माध्यमं वाढली, ती दूरवर पोहोचून बातम्या मिळवू लागली म्हणून आपल्याला एकाएकी समाजात बलात्कार वाढले असं वाटायला लागलंय.’’
‘‘पण तुमच्या वयातील मुलांना बलात्कार का करावासा वाटत असेल?’’ मी विचारलं.
त्यावर एक मुलगी म्हणाली, ‘‘आमच्यापैकी इथला प्रत्येक जण काही ना काही करण्यात रमला आहे. मी नृत्य करते, काही जण गाणं शिकताहेत, कुणी ओरिगामीत रंगलंय, तर कुणी फोटोग्राफीत. शिवाय फुलपाखरं, वन्यप्राणी यांच्यात तर आम्ही सगळेच एकत्र रमतो. त्यामुळे आम्हाला समाधान मिळतं, पण आमच्या अनेक मित्रमैत्रिणींना एकही छंद नाही. खिशात खुळखुळणारे पैसे खर्चल्याशिवाय त्यांना कुणासोबत अर्धा तासही काढता येत नाही. पैशामुळे त्यांच्यात समर्थपणाची भावनापण खूप येते. ती पॉवर दाखवण्याच्या प्रयत्नातच ती सदैव दिसतात. समाधान न मिळणं आणि अंगची ताकद, क्षमता नीट वापरता न येणं यामुळे बलात्कार करावासा त्यांना वाटत असणार.’’
हे ऐकून एक मुलगा म्हणाला, ‘‘सतत वस्तूंच्या गराडय़ात जगल्यामुळे या मुलांना मित्रमैत्रिणी यासुद्धा वस्तूच वाटतात.’’
त्यावर दुसरा एक मुलगा म्हणाला, ‘‘ज्या मुलीवर बलात्कार होतो तिचं काय होत असेल याचा विचारच करवत नाही, पण जो पुरुष असा बलात्कार करतो त्याला स्वत:चीच किती लाज वाटत असेल याचा विचारही मला करता येत नाही.’’ ते ऐकून एक मुलगी म्हणाली, ‘‘स्वत:शी स्वत:बद्दल विचार करू न शकणारी व्यक्तीच असं वर्तन करू शकेल असं मला वाटतं.’’
त्यानंतर एक मुलगी म्हणाली, ‘‘मुलींवर बलात्कार होतो म्हटल्यावर मुलींना दोष देणारेही कमी नाहीत. मला वाटतं या बातम्यांपायी मोठी माणसंच खूप घाबरून गेली आहेत आणि ती काहीबाही बोलताहेत.’’
 मी चमकून विचारलं, ‘‘असं का गं म्हणतेस?’’
ती म्हणाली, ‘‘माझ्या वर्गातली एक मुलगी मिनी स्कर्ट घालून तिच्या आईबरोबर एकदा सिनेमा पाहायला गेली होती. तिथं तिला आमच्या टीचर भेटल्या. दुसऱ्या दिवशी त्या टीचरनी वर्गात आल्या आल्या त्या मुलीला उभं केलं आणि त्या आम्हाला म्हणाल्या, ‘तुम्ही मुलीच अशा उठवळ आहात. मिनी स्कर्ट घालून आपणच देहप्रदर्शन करायचं आणि कुणी बलात्कार केला तर त्याला नावं ठेवायची.’ ती मुलगी रडू लागली तर टीचरनी आणखीच रागावून तिला वर्गाबाहेर हाकललं. मला तर टीचरना विचारावंसं वाटत होतं, परवा शिशुवर्गातल्या युनिफॉर्म घातलेल्या मुलीवर शाळेच्या बसमध्ये बलात्कार झाला. त्या एवढय़ाशा मुलीनं युनिफॉर्म घालून कुठलं देहप्रदर्शन केलं होतं?’
हे ऐकून मी म्हटलं, ‘‘केवळ स्त्री म्हणूनच त्या मुलीला हे सोसावं लागलं असं म्हणायचं का?’’
मुलं क्षणभर विचारात पडली. मग एक मुलगा म्हणाला, ‘‘आपणही शारीरिक हिंसा म्हणून केवळ बलात्कारावरच चर्चा करतो आहोत. माझ्या एका मित्राला एकदा केवळ दुसऱ्या मुलाच्या खास मैत्रिणीशी बोलताना पाहिल्यावर तिच्या त्या मित्रानं आपली गँग आणून बेदम मारलं, रक्तबंबाळ केलं. इथं सारेच पुरुष होते. तरीही मार खाल्लेला माझा मित्र आजही त्या मानसिक धक्क्य़ातून पुरता बाहेर आलेला नाही.’’
ही चर्चा ऐकून मला स्वत:ला खूपच दिलासा मिळाला. मानसशास्त्र म्हणतं, की घरी प्रेम, स्वीकार आणि शांतीचा अनुभव घेत वाढलेली मुलं धीट, खंबीर आणि कणखर बनतात. बाहेर अगदी युद्ध सुरू असलं तरी या मुलांच्या मनातल्या सुरक्षिततेच्या जाणिवेला धक्का बसला नाही. बाहेरचं जग आपण कुणीही सुधारू शकत नाही, पण आपल्यापुरतं तरी आपल्या छोटय़ाशा कुटुंबाला आपण एका निकोप समाजाचा घटक बनवायचा प्रयत्न नक्की करू शकतो. आपल्या हरघडी सहवासात येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे वस्तू म्हणून पाहणं टाळून एक आपल्यासारखाच माणूस म्हणून आपण पाहूया, मूल्याधिष्ठित जीवनशैलीत जगूया. हे सारं करणं म्हणजेच काळजी घेणं आहे. नुसती काळजी करणं काय कामाचं?
मघाशी चर्चा सांगितली त्या गटातील मुलांच्या पालकांनी कोणती काळजी घेत छोटासा समाज तयार केला? त्यांनी हे जग आणि जगणं सुंदर आहे, असं वाचलं होतं, गाण्यातून ऐकलं होतं, पण ते स्वत: अनुभवायचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. स्वत:च्या भावनांना शिस्त लावून योग्य पद्धतीनं त्या व्यक्त करत राहिलं, की हळूहळू जीवनातलं सौंदर्य जाणवू लागतं. हळूहळू त्याची हरघडी प्रचीती येत राहाते. अशी धारणा एकदा पक्की झाली की, संकटांच्या रूपानं जेव्हा जीवनातली मानवनिर्मित असुंदरता वाटय़ाला येते तेव्हा तिचा स्वीकार करून त्या असुंदरतेचंच खत घालून या सुंदर जीवनाची आराधना सुरू ठेवता येते. या पालकांनी असं जगण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न करत राहायला धैर्याची, संयमाची वारंवार कसोटी लागत राहते.  समाजाचा आधार त्यासाठी गरजेचा असतो. त्यांच्या मित्रमैत्रिणींनी, कुटुंबीयांनी तो वेळोवेळी पुरवला. अशा निकोप वातावरणात वाढलेली ही त्यांची मुलं आताच जीवनातल्या असुंदरतेचं शेवाळं दूर करून त्याखालच्या नितळ पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहू लागली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2013 1:01 am

Web Title: parents and kids
Next Stories
1 तनामनात पाऊसच पाऊस!
2 प्रतीक्षा पावसाच्या ज्ञानकोशाची!
3 ‘झोती होती ऽऽऽ, झोती होती ऽऽऽ’!
Just Now!
X