म्यानमार म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते ती लहानपणी भूगोलाच्या पुस्तकामध्ये वाचलेली माहिती. ती म्हणजे जगाला तांदूळ पुरवणारे कोठार, वैशिष्टय़पूर्ण शेतकऱ्यांची बांबूची टोपी आणि ‘मंडाले’मधील लोकमान्य टिळकांचा तुरुंगवास.. त्या पलीकडच्या म्यानमारचे हे अनोखे दर्शन..

‘म्यानमार’चे अजून व्यापारीकरण झाले नसल्याने निवांत पर्यटनाला खूप वाव आहे आणि बघण्यासारखे खूप आहे, असं सुचवलं गेलं. म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेशाची जुजबी माहिती, म्हणजे लहानपणी भूगोलाच्या पुस्तकामध्ये वाचलेली माहिती. जगाला तांदूळ पुरवणारे कोठार, वैशिष्टय़पूर्ण शेतकऱ्यांची बांबूची टोपी आणि ‘मंडाले’मधील लोकमान्य टिळकांचा तुरुंगवास, बस एवढेच! पण सफरीवर जायचं म्हणून कुतूहल चाळवले आणि माहितीची जमवाजमव सुरू केली.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

या देशात प्रवेश फक्त विमानामार्गेच करता येतो. त्यामुळे आम्हाला बँकॉकमार्गेच जावे लागले. अंतर्गत प्रवास रस्त्यानेच करावा लागला. रेल्वे अगदीच अविकसित, पुरातन आहे. अशा या देशाची  आमची आठ दिवसांची सफर होती.

मुंबईहून बँकॉकमार्गे याँगॉनला  पोहचलो; जेवण करून ‘बगान’ला जाण्यासाठी अंतर्गत विमानतळावर आलो. विमानतळ छोटा पण येथेही अंतर्गत सजावटीसाठी लाकडांचा खूप सुंदर उपयोग केला होता. खांब, सज्जे लाकडाच्या जाळ्यांनी मढवलेले! ‘बगान’ला पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. ‘सूर्यास्त’ पाहाण्यासाठी एका पॅगोडाकडे निघालो. पॅगोडाच्या गच्चीसारख्या चौथऱ्यावरून सूर्यास्ताचा नजारा फारच छान दिसत होता. ‘बगान’ हे म्यानमारचे सांस्कृतिक राजधानीचे ठिकाण. जिकडे बघावे तिकडे लहान-मोठे पॅगोडाच पॅगोडा होते. मंडाले भागातील हे पुरातन शहर. येथे मुळात दहा हजार बुद्ध देवळे निर्माण केली होती. आज त्यापैकी २२०० शिल्लक आहेत. येथील ‘आनंद’ पॅगोडा, मॅनमार स्तूप तसेच सोन्याचा मुलामा दिलेला ‘श्वेड्जगॉन’ पॅगोडा प्रसिद्ध आहे. ‘श्वेड्जगॉन’ पॅगोडा ११०२ मध्ये बांधून पूर्ण झाला. त्यात बुद्धाचा दात आणि अस्थी जपून ठेवल्या आहेत. म्यानमारमधील सर्वात मोठी ‘इरावडी’ (इरावती) नदी येथूनच वाहते.

पॅगोडाच्या पाश्र्वभूमीवर सूर्यास्त पाहून आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलो. मुख्य रस्त्यापासून आत दूर झाडीत लपलेले हॉटेल. झाडांच्या कमानीतूनच प्रवेश होता. अंतर्गत सजावटीत लाकडाची कलाकुसर मुबलक तर येथील सर्व कर्मचारी अत्यंत अगत्यशील, हसतमुख, प्रेमळ! ‘टुरिस्ट’ गावाची हवा डोक्यात न गेलेले. ‘अतिथी देवोभव’ हे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवते. येथील हॉटेलमध्ये कुणीही कर्मचारी ‘टीप’साठी थांबत नाहीत. तर दारातच एक पेटी ठेवलेली असते त्यात प्रवाशांनी आपल्या मर्जीप्रमाणे टीप टाकायची असते. ती सर्व कर्मचारी वाटून घेतात. इथे सर्वच ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे. रात्रीचं जेवण ‘कठपुतळी खेळाच्या’ करमणुकीसह झालं. आपल्याकडे राजस्थानातील ‘कठपुतळीचा खेळ’ प्रसिद्ध आहेच.  यांच्या बाहुल्या आकाराने मोठय़ा असतात तसेच हत्ती, घोडे, बैल यांचाही त्यात समावेश असतो. या सर्वाची सजावट, कपडे खूप आकर्षक असतात. जवळजवळ सर्वच हॉटेलमध्ये करमणूक म्हणून हा खेळ दाखवतात.

28-lp-myanmar

दुसऱ्या दिवशी प्रथम एका बुद्ध देवळाला भेट दिली! ही देवळे उंच चबुतऱ्यावर बांधलेली आहेत. बऱ्याच पायऱ्या चढून वर जावे लागते. आपल्या देवळाप्रमाणेच देवळात प्रवेश करण्यापूर्वी पादत्राणे बाहेर आवारात काढून अनवाणी चालायला लागते. त्याची सवय नसल्याने त्रास होतो, त्यापेक्षाही देवळातील शिखरापाशी गच्चीवर निमुळत्या जिन्याने चढणे, उतरणे जिकिरीचे असते.

या देवळाच्या गच्चीवरून ‘बगान’मधील असंख्य पॅगोडांचे दर्शन होते. हे पॅगोडा अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेली ‘स्मृती स्थाने’ होती, लहान-मोठी. हवा बऱ्यापैकी थंड होती. थोडंफार धुकंही होतं. नंतर आमची भेट होती आनंद पॅगोडाला. एका विस्तीर्ण मैदानावर भव्य पांढरी स्वच्छ उंच इमारत होती, बाहेरील कोरीव काम उत्कृष्ट होतं. आतमध्ये प्रवेश केल्यावर तर इमारतीची उंची, भव्यता जास्त लक्षात आली. येथील विशेष म्हणजे प्रवेशदारांतील लाकडाची भव्य उंच दारे आणि चार दिशेला बुद्धाच्या उभ्या चार निरनिराळ्या मुद्रेतील सुवर्णमूर्ती. असंख्य भाविक फुले विशेषत: कमळं अर्पण करण्यासाठी गर्दीने ये-जा करत होते. पुढे श्वेड्जंगान (shwezigon) पॅगोडाला भेट होती! एका प्रचंड मोठय़ा जागेत एक सोनेरी रंगाने सजवलेलं गोल देऊळ आहे तसंच आवारात चहूबाजूला असंख्य देवळं आहेत. येथील कोरीव काम उत्कृष्ट आहे. स्वच्छ उन्हात सोनेरी कलाकुसर झगमगत होती. अनेक ठिकाणी मोठाल्या घंटा आणि त्या वाजवण्यासाठी मोठे लाकडांचे ओंडके होते. लहान मुले त्या घंटा वाजवण्याचा आनंद घेत होती. निरनिराळ्या कोनांमधून या सुवर्ण झगमगाटाला कॅमेऱ्यात बंदिस्त करत किती चाललो ते कळलंच नाही. जेवणाची वेळ झाली होती. भोजनगृहाचे अंतरंग अर्थातच लाकूड आणि बांबूने सजवलेलं होतं. मोठय़ा मोठय़ा कठपुतळ्या खांबांवर विराजमान होत्या.  विशेष म्हणजे टेबलावर ‘लॅकर’च्या लाकडी थाळ्यांमध्ये जेवण वाढून ठेवलं होतं. या ‘म्यानमारी’ थाळीचा फोटो काढून मगच जेवायला बसलो. जेवण नुसतंच प्रेक्षणीय नव्हतं तर चविष्टपण होतं! जेवण चालू असताना ‘कठपुतळी’चा खेळ चालू होता. ही ‘ब्रह्मी’ थाळी चक्क बांबूची केली होती हे संध्याकाळी ‘लॅकर क्राफ्ट फॅक्टरी’ला भेट दिली तेव्हा कळलं. रेस्टॉरंटच्या आजूबाजूला लाकूड आणि बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंची दुकाने होती. विशेष म्हणजे हत्ती, घोडे इत्यादी प्राणी-पक्षी पूर्ण आकारात होते. विश्रांतीनंतर ‘लॅकर क्राफ्ट फॅक्टरी’ला भेट द्यायची होती. या ठिकाणी बांबूपासून अनेक वस्तू करतात. म्यानमारमध्येच उपलब्ध असलेल्या विशिष्ट मऊ बांबूचा उपयोग करतात. बांबू सोलून अगदी पातळ पट्टय़ा तयार करतात त्या गोल गोल एकावर एक गुंडाळून निरनिराळ्या वस्तू तयार करतात. तसंच एका विशिष्ट झाडापासून काळा रंग तयार करतात व त्याचे आतून आणि बाहेरून १३ थर देऊन वस्तूला घट्टपणा तसेच तकाकी आणतात. मग त्यावर, फुले, प्राणी, पक्षी यांची चित्रे रंगवतात. ही कलाकुसर पाहताना थक्क व्हायला होतं. जवळच या वस्तूंचे प्रदर्शन तसंच विक्री केंद्र आहे. किमती डॉलरमध्ये असून, खूपच महाग आहेत. पण त्यामागचे कष्ट, कौशल्य विचारात घेता ठीक वाटल्या. येथून आम्ही ‘इरावडी’ (इरावती) नदीमधून बोटीतून फेरफटका करत सूर्यास्ताचा नजारा पाहण्यासाठी गेलो. ही म्यानमारमधील सर्वात मोठी नदी. विस्तीर्ण पात्रांतून मोठय़ा बोटीतून जलवाहतूक होते. आमच्यासाठी दोन छोटय़ा मोटार बोटी आयोजित केल्या होत्या. सूर्यास्त जवळ आल्याने सर्वत्र एक सोनेरी रंगाची झालर पसरली होती. बोटीतून आम्ही नदीपात्राच्या मध्यापर्यंत गेलो. नारंगी सूर्यबिंबाभोवती सोनेरी रंगाचे खळे खूपच छान दिसत होते. त्याला ‘सन बो’ (sun bow) असे म्हणतात. हे सृष्टिसौंदर्य डोळ्यांत आणि कॅमेऱ्यामध्ये साठवून किनाऱ्यावर आलो. जवळच्या एका खेडय़ात पायी चक्कर होती. नदीच्या पुराचे पाणी गावात येण्याची शक्यता म्हणून घरे उंच बांबूच्या खांबावर बांधलेली. इथले लोकजीवन बघून झाल्यावर आजचा दिवस संपला होता. उद्या आधी हेको या शहरात जाऊन नंतर कलावला प्रयाण करायचं होतं.

29-lp-myanmar

बगानहून एक तासाचा विमान प्रवास करून ‘हेओ’ला आलो. तिथून पुढे पिंडीयाकडे बसने निघालो. वाटेत पिटंवा या गावी काही जणांनी कॉफी आणि डंपिलगचा आस्वाद घेतला! पुढे पाच मैलावर पिंडीया नावाचे गाव आहे, तिथे एका डोंगरात उंच ठिकाणी ‘श्वेयूमिन’ पॅगोडा आहे. खरं तर ही एक मोठी गुहा आहे आणि या गुहेत निरनिराळ्या आकारांच्या, रंगांच्या बुद्धमूर्ती आहेत. नवस फेडण्यासाठी ‘बुद्ध’मूर्ती अर्पण करायची प्रथा आहे. थोडक्यात हे‘नवश्या बुद्धाचे’ देऊळ आहे! उंच डोंगरातील देवळात जाण्यासाठी ‘लिफ्ट’ची सोय आहे. जिन्याने चढून जायचीही सोय आहे. काचेच्या लिफ्टमधून वर जाताना िपडीया गाव आणि तलाव यांचे विहंगम दर्शन होते. या गुहेत आठ हजार ९४० बुद्धमूर्ती आहेत. अगदी सुवर्ण बुद्धापासून ते संगमरवरी पांढऱ्या बुद्धापर्यंत. गुहेत तो वर-खाली आहे. पण अनवाणी चालणं सुस व्हावं म्हणून रस्ता नीट बांधून काढला आहे आणि त्याच्यावर जाजम अंथरलं आहे. आत विजेची सोय आहे. त्यामुळे दर्शन छान होतं. लिफ्टच्या दरवाजाच्या चौकटीला सुबक लाकडी कोरीव काम केलं होतं. हजारो बुद्धांचे दर्शन घेऊन खाली पिंडीया गावात आलो.

पिंडीया तळ्याकाठी बांबू आणि लाकूड मिळून तयार केलेल्या विस्तीर्ण रेस्टॉरंटमध्ये दुपारचं जेवण होतं. सूप, उकडलेल्या भाज्या आणि भात हा मेन्यू चविष्ट होता. जेवणानंतर कलावला जाण्यापूर्वी, हातकागद आणि बांबूच्या छत्र्या तयार करण्याच्या एका लघुउद्योगाला भेट देण्याचा कार्यक्रम होता. कुठलीही आधुनिक यंत्रं न वापरता बांबूची छत्री करणारा कारागीर खूप कुशल होता. छत्रीची मूठ जुन्या सुतारकामाची अवजारे वापरून केली जाते; इतकंच नाही तर छत्रीची उघडझाप करणारी खिट्टी पण बांबू छिलून केली जाते.

कलाव हे इथलं थंड हवेचं ठिकाण. इथे एक छोटे रेल्वेस्टेशन आहे. ब्रिटिश राजवटीत १९४० साली भारतातून अनेक हिंदू, मुस्लीम मजूर इथे रेल्वे बांधण्यासाठी आले. त्यातले बरेच इथे स्थायिक झाले. हे गाव छोटंसंच आहे आणि सिमला दार्जिलिंगसारखे वर-खाली टेकडय़ांवर बसले आहे. आमचं रिसॉर्टही असंच उंच टेकडीवर होतं.  एक रात्र येथे काढायची होती.  दुसऱ्या दिवशी गावात फेरफटका मारून ‘म्यानमार रेल्वे’चा प्रवास करायचा होता तो इन्ले सरोवराकडे जाण्यासाठी!

सकाळी हॉटेलच्या बागेत रंगीबेरंगी फुले फुलली होती आणि भुंगे आणि मधमाश्यांचा गुंजारव सुरू होता. थंडी वाजत होती, पण वातावरणातला ताजेपणाही जाणवत होता. हेकोला जाणारी रेल्वे गाडी वेळेवर आली तर साडेअकराला येणार होती. तोपर्यंत कलाव गावदर्शनाचा अनुभव चालतच घ्यायचा होता. गावातल्या मुख्य चौकात बसने आम्हाला सोडले आणि पावणे अकरापर्यंत भटकायची मुभा दिली. एका गल्लीमध्ये दुतर्फा भाजीपाल्याची फळांची दुकाने ओसंडून वाहात होती. ताज्या भाज्यांचा फळांचा एक संमिश्र वास सबंध गल्लीभर होता. भाजीबाजारातून परत चौकात आलो तर तिथे दुसरा बाजार भरत होता. आज आठवडे बाजाराचा दिवस होता. गल्लीच्या दोन्ही बाजूला छोटे छोटे तंबू ठोकून त्यांत कपडे, फुले, किराणा, मांस, अंडी, मासे, इ. अनेक नित्योपयोगी वस्तू विकायला होत्या. त्यातच खानपानाची सोय असलेली खाऊगल्लीपण होती. जुन्यापुराण्या वस्तूंचा ‘मीनाबाजार’पण होता. ‘नकळत फोटो’साठी (candid photography) उत्कृष्ट संधी होती. सूर्य वर आला तशी थंडी कमी झाली. बरोबर पावणे अकराला सगळेजण बसजवळ जमलो आणि स्टेशनकडे निघालो. स्टेशन जवळच होतं. म्यानमारमधील रेल्वे अगदी अविकसित आणि बाल्यावस्थेत आहे. आपल्याकडे खेडेगावातही यापेक्षा चांगले स्टेशन असेल. कलाव स्टेशन एक अगदी छोटी बैठी इमारत होती. एकच प्लॅटफॉर्म होता आणि फक्त स्टेशनच्या इमारतीसमोर प्रवाशांना थांबण्यासाठी छोटी शेड आणि बाके होती. एका वयस्क गृहस्थाने मी फोटो काढतो आहे असं बघितल्यावर, धूम्रपान करत असताना नाकातोंडातून धूर काढून ‘खास पोझ’ दिली. इथे स्त्री-पुरुष सतत धूम्रपान करतात. गाडी १५-२० मिनिटे उशिरा आली. पाच डब्यांची छोटी गाडी. तीन साधे डबे, एक अप्पर क्लास(?) डबा, एक मालवाहतुकीचा डबा आणि डिझेल इंजिन. आमची तिकिटे ‘अपर क्लास’ची होती म्हणे! म्हणजे आमच्या डब्यात बसण्याच्या जागेवर गाद्या (कुशन) होत्या. बाकी डबा एकदम जुनाट जाळ्या-जळमटांनी भरलेला. कधी स्वच्छ केला होता कोण जाणे. अपर क्लासच्या डब्याची ही स्थिती तर सामान्य डबा कसा असेल ही कल्पनाच केलेली बरी! गाडी सुटली आणि खिळखिळ्या डब्यांचा खडखडाट जाणवू लागला. डबा हालत डुलत होता. मध्येच आदळत आपटत होता. त्या आवाजांत कुणाशी बोलणंपण शक्य नव्हतं. ‘हेओ’ला पोहोचेपर्यंत हाडे शिल्लक राहिली पण मधल्या चकत्या किती वेळा हलल्या आणि परत जागेवर आल्या कोण जाणे! जणू काही विनाशस्त्रक्रिया मणक्यामधील चकत्या जागेवर बसविण्याचा स्वस्त उपाय! एकच रेल्वेमार्ग असल्याने वाटेत स्टेशनवर दुसऱ्या गाडीला जागा करून देण्यासाठी गाडी थांबे तेव्हा हुश्श व्हायचे. मार्ग वळणावळणाचा घाटांतून होता आणि गाडीचा वेगही फार नव्हता, त्यामुळे बाजूची खेडी, बांबूवरची घरे, जनजीवन पाहता आले. कलाव समुद्रसपाटीपासून चार हजार २०० फूट उंचीवर तर हेओ तीन हजार २०० फुटांवर. दीड तासाने स्टेशनवर उतरलो आणि सुखरूप आल्याबद्दल रेल्वेचे आभार मानले. बाहेर आमची बस उभी होती. आणखी दीड तासाचा प्रवास करून न्यायुंगश्वे या गावी पोहोचलो तेव्हा साडेतीन वाजले होते. भूक लागली होती. इथं पिझ्झा लंच होते!

30-lp-myanmar

पुढचे दोन दिवस आम्ही इन्ले सरोवरात राहणार हातो. हा या प्रवासातील सर्वात आकर्षक चित्तथरारक अनुभव असणार होता. आम्ही धक्क्यावर गेलो तर आमच्या मोटारबोटी तयारच होत्या. लांब निमुळत्या बोटीमध्ये चार-पाच प्रवासी एकामागे एक अशी बसण्याची सोय होती, नावाडी बसायला मदत करत होते. नावा सुटल्या. पाण्यावर आल्यावर वारा आणि अंगावर उडणारे पाण्याचे तुषार यांनी गारवा चांगलाच जाणवत होता. इन्ले सरोवर हे म्यानमारमधील ताज्या गोड पाण्याचे दुसऱ्या क्रमांकाचे सरोवर, पन्नास चौरस मैल पसरले असून याची कमीतकमी खोली पाच फूट तर रुंदी जास्तीत जास्त १२ फूट आहे. त्यामुळे वाहतूक छोटय़ा नावांमधून होते. आमचे रिसॉर्ट पाण्यात खांब रोवून, त्यावर उभे होते. मध्यभागी मुख्य इमारत व चारी दिशांना राहण्यासाठी खोल्या होत्या. आमच्या खोल्या पश्चिमेला होत्या, तिथून मनसोक्त सूर्यास्ताचा आनंद घेता आला. आमच्या खोल्या खूपच आरामशीर होत्या. इतर परदेशी प्रवाशांपुढे आम्ही भारतीय खूपच कमी होतो.

आज पूर्ण दिवस बोटीत पाण्यावर काढायचा होता. त्या तयारीने निघालो. या सरोवरांतील दोन वैशिष्टय़े म्हणजे ‘कोनिकल नेट फिशिंग’ आणि ‘लेग रोइंग’! आइस्क्रीमच्या कोनसारखी निमुळती बांबूची एक टोपली केलेली असते आणि उघडय़ा तोंडाच्या बाजूला मासे पकडण्यासाठी जाळे लावलेले असते. कोळी कोनाचा वरचा भाग पकडून जाळे सरोवरात टाकून खालीवर करतो आणि मासे पकडतो. उथळ पाण्यामुळे हे शक्य होते. तसेच नावेच्या टोकावर उभे राहून एक पाय नावेत आणि दुसऱ्या पायाला लांब बांबू गुंडाळून नाव वल्हवली जाते. पायाने वल्हे पकडलेले असते म्हणून ‘लेग रोइंग’!

आमची पहिली भेट होती एका पॅगोडाला. बुद्धमूर्तीला वाहण्यासाठी कमळाची फुले, तसंच उदबत्त्या विकणाऱ्या मुलींची गर्दी टाळून उंच पायऱ्या चढून दर्शन घेऊन खाली आलो. इथे आम्हाला दिलेली ‘शहाळी’ इतकी मोठी की त्यांतील गोड पाणी आणि खोबरे संपवणे कठीण होते. इथून निघालो ते खास रेशीम कारखान्याला भेट द्यायला! मध्ये मध्ये छोटी बेटे लागत, त्यावर भाजीपाला लागवड दिसली. टोमॅटो आणि दुधी भोपळा! तसेच कमळाची फुलेही! याच कमळाच्या देठांपासून रेशीम कसे करतात ते बघायला उत्सुक होतो. सरोवरातच उंच खांबावर संपूर्ण लाकडी कारखाना आहे. कमळाच्या देठाचा तीन-चार इंच लांबीचा तुकडा मध्ये कापून दोन तुकडे दोन बाजूंना ओढून निघणाऱ्या ‘कमलतंतू’पासून दीड-दोन फूट लांबीचा धागा केला जातो आणि लाकडी पाटावरच गुंडाळून कच्चे रेशीम तयार केले जाते. एक मध्यमवयीन स्त्री हे काम करत होती. या कच्च्या रेशमावर प्रक्रिया करून येथेच ते नैसर्गिक रंगांनी रंगवले जाते. हे काम लहान मुले करतात. रंगवलेल्या रेशमाच्या लडय़ा करण्याचे काम वयस्क स्त्रिया चरख्यावर करतात. हा चरखा सायकलच्या चाकाचा वापर करून तयार करतात. अशा तयार रेशमापासून रेशमी कापड हातमागावर विणण्याचे काम तरुण स्त्रिया करतात. हे ‘कमलतंतू’ मुलायम रेशमी कापड विकण्याची सोयही इथेच आहे. पण ते खूप महाग म्हणजे ४० अमेरिकन डॉलरला एक मीटर होते!

पुढील भेट होती, होडी- नावा तयार करण्याच्या कारखान्याला. लाकडांची विपुल उपलब्धता असल्याने सरोवरांतील वाहतुकीची गरज हा कारखाना पूर्ण करतो. लांबच्या लांब लाकडी फळ्यांपासून या नावा तयार करतात. तसेच लाकडावरील अत्यंत सुंदर कोरीव काम, अगदी छोटय़ा छोटय़ा भेटवस्तूंपासून रोजच्या वापरांतील भांडीकुंडी, चमचे वगैरेही तयार करतात. किमतीही खूप असतात. इथली एक खासियत म्हणजे येथील स्त्रिया गळ्यामध्ये एकावर एक अशा िरगा घालून मानेची उंची वाढवतात. आमचे दुपारचे जेवण सरोवरातील एका तरंगत्या रेस्टॉरंटमध्ये होते. ते संपले तेव्हा चार वाजले होते. आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. हवा बदलली होती. आकाशात ढग भरून आले होते, वाराही सुटला होता आणि मधूनच पावसाची एखादी सर येत होती. गारठा जाणवत होता. रिसॉर्टवर येईपर्यंत पावसाला चांगली सुरुवात झाली.

इन्ले सरोवराच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या ‘ऑगष्ट’ नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या इंडेन या गावात एका पॅगोडाला भेट होती. वाटेत एक बुद्ध मोनॅस्ट्री बघितली. ही मोनॅस्ट्री ‘तरंगती’ होती. संपूर्ण लाकडी! देवळाच्या सभोवती तरंगता ‘मीनाबाजार’ही होता. सर्वच विक्रेत्यांकडे ठरावीक भेटवस्तू, टी- शर्ट्स- ‘सराँग’ची कापडे इ. गोष्टी होत्या. सर्वाचीच ‘माझ्याकडे घ्या’ अशी चढाओढ होती. इंडेन गावाकडे जाताना वाटेत अनेक छोटी बेटे लागली. काही बेटांवर भाजी, बांबूची लागवड तर मोठय़ा बेटांवर लोकवस्तीही होती. संथ सरोवराच्या पाण्यातून नदीच्या पाण्याच्या प्रवाहात शिरताच प्रवाहाच्या वेगाने आमच्या बोटी वर-खाली उसळू लागल्या. प्रवाह तसा अरुंद असल्याने एखादी बोट विरुद्ध दिशेने आली तर पाण्याचा फवारा अंगावर उडायचा. इंडेन गावाजवळ नदीचे पात्र बरेच रुंद होते, छान घाट बांधला होता आणि नदीकाठी लोकांचे नित्याचे आंघोळी, कपडे धुणे इ. व्यवहार चालू होते. गाव बांबूच्या गर्द वनात लपलं होतं! या बांबूच्या वनांतून पायवाटेने पॅगोडाकडे जायचे होते. वाटेत लहान मुली एखादे मूल पाठंगुळीला घेऊन निरनिराळ्या वस्तू विकताना दिसल्या. एका ठिकाणी तापवलेल्या वाळूमध्ये भाजलेल्या पापडाचा आस्वाद घेतला. आपल्याकडे वाळूत शेंगा, फुटाणे भाजतात तसे इथे पापड भाजतात. पॅगोडा उंच एका टेकडीवर होता. वर जाण्यासाठी छान पायऱ्या बांधलेल्या होत्या. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला असंख्य दुकाने होती. खोटे दागिने, भेटवस्तू, चित्रे, गालिचे अशा अनेक गोष्टी विकायला होत्या. वर एक मोठा स्तूप होता आणि पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला अनेक लहान-मोठे स्तूप होते. आपल्या प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले. आम्ही खाली आलो तेव्हा खूप भूक लागली होती. आमची जेवणाची सोय नदीकाठी एका छान रेस्टॉरंटमध्ये होती. जेवण करून परतीचा प्रवास सुरू झाला. आता थेट संध्याकाळी न्यायुंगश्वेलाच उतरायचे होते. हवा ढगाळ, थंड होती. वाऱ्यामुळे थंडी वाजत होती. जेवणामुळे सुस्तावले होतो, पण एखादी पावसाची सर किंवा बाजूचे उडणारे पाण्याचे थेंब जागे ठेवत होते. न्यायुंगश्वेला रिसॉर्टवर आलो. भुरभूर पाऊस पडतच होता. इथं स्थलदर्शन असं काही नसल्याने गावात चक्कर मारायला बाहेर पडलो. थोडी फार खरेदी, इकडे तिकडे फेरफटका मारून परतलो.

रात्रभर पाऊस पडत होता, सकाळ पावसातच उगवली. आता परतीचा प्रवास सुरू होणार होता. न्यायुंगश्वेहून बसने ‘हेहो’ विमानतळ. हेहो ते यांगून (पूर्वीचे रंगून) विमानाने असा कार्यक्रम होता. पावसातच निघालो. विमान साडेअकराला होतं. पण विमानतळावर आलो आणि जोर वाढून मुसळधार पाऊस सुरू झाला. विमानतळाच्या इमारतीत आत जाणेही कठीण आणि विमानतळ लहान असल्याने आत बसायलाही जागा नव्हती. आमचे विमान दीड वाजता येऊन सुटणार होते. सुदैवाने ते वेळेवर सुटले आणि पावणेतीनला याँगॉनला पोहोचले. आतापर्यंत आमचा प्रवास अंतर्गत भागात होता. रस्ते लहान असले तरी गर्दी कमी आणि वाहतूक सुरळीत, पण याँगॉन मोठे शहर, मोठे रस्ते पण गर्दी आणि वाहतूक कोंडी असे चित्र होते. रस्त्यावर तिपाईवर मावेल एवढय़ा छोटय़ा खोक्यांमधून, पान, तंबाखू व सिगारेटची विक्री सुरू होती. स्त्री विक्रेत्यांची संख्या जास्त दिसत होती. त्याचप्रमाणे फुले आणि वर्तमानपत्रे यांची लहान लहान दुकाने होती आणि तिथेही स्त्री विक्रेत्याच दिसत होत्या. सर्वच जण भुकेलेले त्यामुळे एका खाऊगल्लीकडे मोर्चा वळवला. सबंध आसमंत, तळणाच्या आणि विविध खाद्यपदार्थाच्या वासांनी भरून पावलेला. आमची सोय एका प्रशस्त वातानुकूलित उपाहारगृहामध्ये केली होती. जेवण लवकर मिळाले तरी जेवण करून बाहेर पडायला साडेचार वाजले. आज लगेच याँगून स्थलदर्शनांत प्रथम भेट होती, भारताचा शेवटचा मोगल सम्राट बहादूरशहा झफरच्या समाधीला. १८५७ च्या स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतल्याबद्दल ब्रिटिशांनी त्याला पकडून, फसवून ब्रह्मदेशात आणून नजरकैदेत ठेवले होते. १९६२ साली त्यांचे निधन झाले, त्याची समाधी येथे आहे. बादशाह सुफी कवी होता, त्याच्या सुफी कविता प्रसिद्ध आहेत. त्याच्या समाधीच्या शेजारी त्याची पत्नी आणि नातींची थडगी आहेत. तेथील व्यवस्थापक भारतीय मुस्लीम होता. त्याला इतक्या मोठय़ा संख्येने भारतीय पर्यटक पाहून खूप आनंद झाला. त्याने इमारत आणि वस्तू मनापासून दाखवल्या. तिथून आम्ही आशियातील सर्वात मोठा पॅगोडाला भेट द्यायला निघालो. हे बुद्ध देऊळ गोल घुमटाकार आकाराचे सोन्याचा मुलामा दिलेला आहे. त्यासाठी साडेतीन टन सोन्याचा वापर करण्यात आला आहे. ख्रिस्तपूर्व ११०२ मध्ये तो बांधून पूर्ण झाला. इथे बुद्धाचा दात जतन करून ठेवला आहे. हा पॅगोडा एका उंच टेकडीवर बांधला असल्याने येथून चहू बाजूला यांगून शहराचे विहंगम दृश्य दिसते. सभोवताली प्रचंड मोठय़ा आवारात अनेक छोटी बुद्धाची देवळे आहेत. या आवारामधील सात कोपऱ्यांना सात वारांची नावे दिली आहेत.

दर पाच वर्षांनी हा पॅगोडा देखभाल, साफसफाईसाठी झाकला जातो. आमच्या दुर्दैवाने हे वर्ष तेच होते. पण जो काही भाग उघडा होता तो सूर्यास्ताच्या प्रकाशात झगमगत होता. जसा अंधार पडू लागला तसे निरनिराळ्या रंगाचे प्रकाशाचे झोत देवळावर सोडण्यात आले. त्याचे सौंदर्य आणखी निराळे होते. या सर्व देवळांचे निरनिराळ्या रंगांत फोटो काढणे ही एक सुवर्णसंधी होती. त्याचा पुरेपूर उपयोग करून हॉटेलवर आलो. सोन्याने झळाळणारा पॅगोडा डोळ्यांसमोर येत होता. त्यातच निद्राधीन झालो.

आज निरोपाचा दिवस! सकाळी नाश्त्यानंतर इरावडी नदीकिनारी बंदराला भेट होती. नदीचे पात्र प्रचंड मोठे आहे आणि त्यातून ‘गोदी’मध्ये व्हावी तशी मोठय़ा जहाजांची वाहतूक होत होती. रविवार सकाळ असल्याने  नदीकिनारी फुटबॉलचा खेळ रंगला होता, तसाच कचराही भरपूर होता. शेजारीच एक देऊळ होते. देवळाबाहेर केळी, शहाळी आणि फुले यांची प्रसादथाळी विकायला होती. भाविकांची गर्दी भरपूर होती. या गर्दीतून बाहेर पडून आमची बस मुख्य रस्त्यावर आली. रविवार असल्याने व्यापारी आणि व्यावसायिक संस्था बंद होत्या. त्यामुळे रस्त्यावर रहदारी कमी होती. जुन्या मुंबईतूनच हिंडतो आहे असं वाटलं! विमानतळावर जाण्यापूर्वी आम्ही ‘बोटॅगाँग’ ऊर्फ ‘स्टॉक मार्केट’मध्ये गेलो. ‘क्रॉफर्ड मार्केट’सारखं भलं मोठं होतं. म्यानमारमधील एकूण एक गोष्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण. स्वस्त आणि मस्त. आत छोटी छोटी दुकाने, विशेषकरून बांबूच्या वस्तू, ‘सराँग’ची विविध कापडे, तयार कपडे आणि भेटवस्तूंनी खचाखच भरलेली. सर्वानीच या शेवटच्या खरेदीचा मनसोक्त आनंद घेतला. खरेदी करून थेट विमानतळाकडे निघालो ते म्यानमारच्या आठवणी मनात साठवतच..

असा आहे म्यानमार

‘म्यानमार’ म्हणजे ‘ब्रह्मदेश’. वेदांमध्ये याचा उल्लेख ‘ब्रह्मवर्त’ म्हणजेच ब्रह्मदेवाचे स्थान म्हणून केला आहे. ‘बर्मा’ हे नाव तेथील आदिम ‘बामर’ जमातीवरून पडले आणि ब्रिटिश कालखंडात रुजू झाले. १९८९ साली बदलून ‘म्यानमार’ झाले. भारत, बांग्लादेश, चीन, लाओस आणि थायलंड अशा सीमा असलेला, आशिया खंडातील हा सर्वात गरीब देश आहे. या देशात शंभरेक निरनिराळ्या वंशाच्या जमाती आहेत. त्यातही बौद्ध धर्मीय सर्वात जास्त आहेत. ‘रंगून’ हे सर्वात मोठे शहर आता ‘याँगून’ म्हणून प्रसिद्ध आहे. आशियामधील सर्वात मोठा सुवर्ण पॅगोडा म्हणजे ‘श्वेडगॉन पॅगोडा’ येथे आहे. तांत्रिक अकुशलता आणि निरक्षरता यामुळे या निसर्ग-संपन्न देशाचा विकास झाला नाही. नैसर्गिक खनिज संपत्ती, मसूर मोती, सफायर, जेड, माणिक यांचे प्रचंड उत्पादन येथे होते.  ब्रह्मी साग प्रसिद्ध आहे. देशाच्या उत्पन्न वाढीसाठी १९९२ पासून पर्यटनास प्रोत्साहन दिले जाते आहे. कॅट हे येथील चलन आहे. हा अफगाणिस्तान नंतरचा दोन नंबरचा अफू पिकवणारा देश असून ‘मेफॅटा माइन’ औषधाच्या उत्पादनात जगात त्याचा पहिला नंबर आहे.
रमेश करकरे – response.lokprabha@expressindia.com