किमी,
तब्येत बरी आहे का? सगळं ठीक चाललंय ना? काय आहे, तुला वाचनाची आवड नाही हे मला माहिती आहे. वाचनाची आवड असावीच असा आग्रह नाही, पण किमान माझा मेल तरी नीट वाचावास अशी मी अपेक्षा केली तर मी जास्त एक्स्पेक्ट करतो आहे का? किमे, तुझ्या पत्रातून मला साक्षात्कार झाला की मी आपचा प्रचार करत आहे म्हणून. माझ्या संपूर्ण ई-मेल पत्रातून मी आपचा प्रचार करत आहे असे कुठे म्हटले आहे? मी प्रचार करत असल्याचे दाखवा, हजार रुपये मिळवा! दिल्लीत आपनं सरकार चालवलं नाही हे तुझं ऑब्जेक्शन मान्य आहे आणि माझ्या मते ती चूकच आहे आपची; पण काँग्रेस आणि बीजेपीच्या इतक्या चुका पोटात घेतल्यानंतर आपची नवखेपणातून झालेली चूक समजून घ्यायला काय हरकत आहे? आता मला सांग तू असं कितीतरी वेळा चुकीचं बोलतेस, स्पेलिंग मिस्टेक्स करतेस, नीट वाचत नाहीस, पण मी तुला समजून घेतो की नाही? तुझ्या चुका पाहून जर मी म्हणालो की किमी वेडी आहे (म्हणजे आहेच!) म्हणून तिच्याशी संवाद साधण्यात अर्थ नाही तर ते चुकीचे ठरेल किनै? बरं वेडाबाई, समजा मी आपचा प्रचार करत असलो असतो तरी फ्रस्ट्रेशन यावं असं काय आहे त्यात? फ्रस्ट्रेशन हा शब्द किती मोठा आहे त्याची ग्रॅविटी समजते का तुला? अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींनी तुला फ्रस्ट्रेशन येऊ लागलं तर कसं होईल किमे? मध्यंतरी शाळेतल्या मुलांच्या आत्महत्येचं सत्रच सुरू झालं काय तर कसलं फ्रस्ट्रेशन, कसलं तरी टेन्शन! जगणं इतकं सुंदर आहे यार कशाला पाहिजे टेन्शन अन् फ्रस्ट्रेशन. हे शब्द तू तुझ्या डिक्शनरीतून काढून टाक. प्रत्येक व्यक्तीमध्ये क्रिएटिविटीचा भन्नाट स्टॉक आहे. तिनं तो शोधला पाहिजे. तो उघडण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल, मार्ग वेगळा असेल पण ते शोधायला पाहिजे. एक्स्प्लोअर करायला हवं ना किमे. आपल्याजवळ असलेल्या गोष्टी आपण दूर कुठेतरी शोधत बसतो आणि सापडत नाहीत म्हणून नाराज होतो. अल्केमिस्ट वाचलंयस ना तू? किंवा तू ती गोष्ट ऐकली असशील की एका माणसाचं सोन्याचा हार घरात हरवतो पण घरात अंधार म्हणून तो बाहेर शोधू लागतो का तर बाहेर प्रकाश आहे म्हणून. बाहेर प्रकाश आहे, फोकस आहे, आणखी abc गोष्टी आहेत, पण जर माझं म्हणून जे माझं आहे ते जर हरवलं असेल घरात तर ते मला घरात शोधायला हवं ना. ते शोधलं की मग जगण्याला एक पॅशन गवसते. पॅशनशिवाय जगायला काहीच लागत नाही. माणसाच्या आयुष्यात काही कमतरता असली की ती ओवरकम करण्यासाठी आपण पॅशिओनेटली जगू लागतो. कुणीतरी हिंदी कवीनी म्हटलं आहे ना- जीने के लिये एक कमी की तलाश कर! मै तो जीने के लिये ‘किमी’ की तलाश कर रहां हूं! जोक अपार्ट मला अशी किमी हवी आहे जिला ती स्वत: सापडली आहे. पॉइंट टू बी नोटेड- ही कोणतीही फिलॉसॉफी नाही. सो पॉइंट इज की छोटय़ा छोटय़ा गोष्टीवरून फ्रस्ट्रेट व्हायचं कारण नाही. ज्यांची क्षितिजं म्हणजे horizons गं, थांबत नाहीत त्यांना नवीन काही मिळत जाते. मराठी पोएट बा. भ. बोरकर यांनी म्हटलं आहे-
तुला कसे कळत नाही
फुलत्या वेलीस वय नाही
क्षितिज ज्याचे थांबले नाही
त्याला कसलेच भय नाही
त्याला कसलाच क्षय नाही!
(भय = fear, क्षय =decay)
वेडे, असं फुलत राहिलं पाहिजे. थोडं आणखी चाललं की नवं horizon दिसू लागतं आणि वाटतं इथवर चाललो ते काहीच नाही. आणखी चालावंसं वाटू लागतं. प्रत्येक नव्या क्षणाला आपण पुन्हा नव्यानं जन्म घेत असतो आणि न्यूबॉर्न बेबीला जसं सगळं नवीन दिसू लागतं तशी आपली सिच्युएशन होते. ही अवस्था कायम टिकवून ठेवणं किती डिफिकल्ट आहे ना गं. म्हणजे आपल्याला आधी एक्स्पिरीयन्स असेल एखाद्या गोष्टीचा की आपण त्याबाबत जजमेंट पास करून टाकतो. सोपं असतं ना असं जजमेंट पास करणं पण आपला अंदाज चुकल्यावरच आपल्याला कळू लागतं. हो ना? असो.
बाय द वे, मॅडम आपलं काय सुरू आहे विशेष? काही कशाचा स्टडी वगैरे? Or as always doing wrong thing at right time?
आणि हो वोटिंग केलंस का? ‘आप’लं तर मतदान झालं बुवा. आणि आमच्या या पार्टीकडे जरा पॉझिटिव्हली पाहा की. उगीच ‘हम ‘आप’ के है कौन’ स्टाइलमधून बघायची गरज नाही.
मिस यू किमे!
विकी