‘पीअर प्रेशरचा’ प्रॉब्लेम असुरक्षित, हिंसक वातावरणातून उद्भवलाय तेव्हा नवतरुणांना त्यांची शक्ती विधायक मार्गानं वापरायला शिकवणं हे आजघडीचं अत्यंत महत्त्वाचं मिशन म्हणूनच आपण हाती घेतलं पाहिजे.

गेल्या वेळी पीअर प्रेशरवर झालेल्या चर्चेतून मिळालेल्या माहितीमुळे पालक थोडे निवांत झाले. मुलांचं हे सारं विचित्र वागणं तात्पुरतं आहे आणि आपण पालकत्वाची जबाबदारी चांगली पार पाडली आहे, या दोन गोष्टी त्यांना छान समजल्या. घराघरांतलं वातावरण पुन्हा शांत झालं.
आता मी त्यांना म्हटलं, ‘‘तुम्ही सारे जबाबदारीनं वागता. आपली किशोरवयीन मुलंही जबाबदारीनं वागताहेत. पण या वयात धूसर दिसणारं वास्तव आणि बाजारू वृत्तीनं मांडलेला आपल्या दैनंदिन जीवनातला हैदोस यापायी ‘पीअर प्रेशर’ फार क्रूर आणि निर्दय स्वरूपात सामोरं येतंय, अनेकदा ते आत्मघातकी बनतंय, हे खरं आहे. त्याबाबत आज थोडं सांगते.’’
‘‘आजी, गेल्या महिन्यात माझ्या मुलाचा अठरावा वाढदिवस झाला. मी त्याला एक कार द्यायचं ठरवलं, पण तो बाइकचा हट्ट करतोय. काय करायचं समजतच नाही.’’ एक बाबा विचारू लागला.
मी त्याला म्हटलं, ‘‘हेच ते कन्झ्युमरीझमनं साकारलेलं वास्तव. त्यांनी जाहिरातबाजीतून या नवतरुणांना पटवलंय, की भन्नाट वेगानं मोटरबाइक चालवणं म्हणजेच तारुण्याचा जल्लोष. परवा मी एका कॉलेजसमोरून चालले होते. तिथं आठदहा मुलं भर रस्त्यातील रोड डिव्हायडरवर मोटारसायकलचे स्टंटस् करत होती. त्यांचा हा आत्मघातकी खेळ पाहून मी थबकलेच. एकदा वाटलं, कॉलेजात जाऊन प्रिन्सिपॉलना भेटावं. या खेळांना ते आळा का घालत नाहीत, याचा जाब त्यांना विचारावा. पण लगेच उमगलं, की ते हतबल झाले असणार याबाबतीत. या मुलांच्या पालकांनी ही वाहनं कौतुकानं मुलांना घेऊन दिली आहेत. हे चाळे मुलं कॉलेजच्या हद्दीबाहेर करताहेत. आजघडीच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आणि श्रीमंती लाडांचा हा नवा फंडा आहे. प्रिन्सिपॉल यात कसे पडणार?’’
एवढय़ात मला पोलीसची शिट्टी ऐकू आली. मी त्या पोलिसाला विचारलं, ‘‘अहो, तुम्ही समोर असताना हे सगळं काय चाललंय?’’ तो पोलीस म्हणाला, ‘‘अहो, नस्ता ताप आहे हा. हे सगळे शिकलेले आणि बापाच्या पैशावर मौजमजा करणारे. माझा महिन्याचा पगार आहे, तेवढा यांचा दिवसाचा खर्च असतो.’’
त्यावर मी म्हटलं ‘‘असतील चारदोन बडे बापके बेटे. पण बहुतेक सारी तुमच्या-माझ्यासारखी मध्यमवर्गीयच तर असतात नं इथली मुलं.’’ पोलीस म्हणाला, ‘‘खरंय तुमचं. पण हे वयच वेडं नं? आपल्यातलं शौर्य, धाडस दाखवायची खुमखुमी असते नं? मग काय? लायसेन्स् मिळायच्या पूर्वीच यांची धाडसाला सुरुवात होते. अहो, वयाचे खोटे दाखले यांचे बापच यांना मिळवून देतात. मग तुमच्या आमच्यासारख्यांची मुलं ज्यांना आईबाप मोटरसायकलही देत नाहीत आणि खोटी लायसेन्सही मिळवून देत नाहीत, त्यांच्या मुलांना त्यांचे हे मित्र म्हणतात, ‘हरकत नाही. तू माझी बाइक घे नं. चालव तू इथं’ अहो, किती मुलं मरताहेत या मुंबईत मोटरबाइकच्या वेडापायी.’’
मी सुन्न झाले. मूल्यशिक्षण हा आज शाळेतला अभ्यासाचा विषय झाला आहे. घराघरांतून कायदा मोडायचंच शिक्षण मिळतंय मुलांना. तुम्ही पालक कायदे पाळत जगताहात, तुमचं जगणं मूल्याधिष्ठित ठेवताहात. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण तेच तेवढं पुरेसं नाही. आज वयाच्या या वळणावरचे धोके आपल्या मुलांना दिसत नसले, तरी तुम्ही सावध राहा. आजकाल जिकडे तिकडे बार बोकाळलेत. शनिवार-रविवार सहलीला जाणं रूढ झालंय. हे छान आहे. पण तिथल्या मौजमजेच्या कल्पना विकृत बनून गेल्या आहेत. अशा सहलीत दारू पिणं आणि ती पण भरमसाट पिणं हाच मुख्य कार्यक्रम बनून गेला आहे. सहलीसाठी ‘दारूऐवजी दारू ढोसण्यासाठी सहल’ असंच वास्तव बनलंय. त्यामुळे दारू पिण्यात काही वावगं आहे, हेच मुलांना समजत नाही. थोडय़ा सधन स्वत:ला पुरोगामी समजणाऱ्या घरात तर मुलांचे आईवडीलच त्या मुलांचा अठरावा वाढदिवस मुलांना सोबत बिअर किंवा व्हिस्की प्यायला लावून साजरा करताहेत. अशा पार्टीला आपली मुलं गेली, की त्यांना आपण अगदी मागासलेले आहोत, असं वाटू लागतं. मग मित्रांनी त्याच्या बाबांनी आग्रह केल्यावर आपली मुलं ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवायच्या नादात दारू प्यायला शिकतात. हल्ली तर शीतपेयांतून पिणाऱ्याच्या नकळतच मादक पदार्थ, ड्रग्ज त्याला पाजले जाताहेत. त्यामुळे आपली मध्यमवर्गीय मुलं मोठय़ा प्रमाणात व्यसनाधीन होताहेत. भरभक्कम कॅपिटेशन फी कर्ज काढून किवा प्रॉव्हिडंट फंडातून पैसे उभे करून मुलांना मेडिकल किंवा इंजिनीअरिंग कॉलेजात प्रवेश मिळवून देऊन त्यांच्या भविष्याची सोय करणारे पालक आजकाल खूप आहेत. घरापासून दूर राहाणारी ही त्यांची मुलं आपण गरीब, मागासलेले नाहीत, हे दाखवण्याकरता दारू, ड्रग्ज घेऊ लागतात आणि बघता, बघता व्यसनाधीन होतात. घरी याचा पत्ता लागेपर्यंत खूपच उशीर झालेला असतो.

याहून एक भयावह प्रकार आता सांगते. हल्ली लिपस्टिक, कपडे, चपला, पर्सेस अशा वस्तूंच्या पानपानभरून जाहिराती केल्या जाताहेत. मुलींना त्या वापरतात ते कपडे, प्रसाधनं हा त्यांच्या अस्तित्वाचा, व्यक्तिमत्त्वाचा भाग वाटलाच पाहिजे, असा प्रचार सर्व माध्यमांतून पद्धतशीर केला जातो आहे. मॉडेलिंग करणंही स्त्रीत्वाचा प्रगत आविष्कार मानला जातो आहे. आईवडील मुलींना मॉडेलिंग करायला प्रोत्साहन देताहेत. रिसेप्शनिस्ट, फ्रंट डेस्कवरच्या नोकऱ्या करणं हे सारं मुलींना आवडू लागलंय. यात गैर काहीच नाही. चांगलेच आहे. पण अशा बहुतेक सर्व व्यवसायात एक स्त्री म्हणून मुलींचं प्रचंड लैंगिक शोषण सर्रास केलं जातंय हे वास्तव पालक मुलींना समजावून सांगत नाहीत. लैंगिक शोषण हा या व्यवसायांचा अटळ भाग आहे, असं मानून मुली तो आनंदानं स्वीकारताहेत. एकूणच मुलींबाबतीत त्यांच्या आईचं वर्तन, नीतिमूल्यं याचा परिणाम मुलींवर होतो. हल्ली लैंगिक स्वातंत्र्य याचा नीटसा विचार या आया करताना दिसत नाहीत असं डॉक्टर म्हणून मला आलेला अनुभव सांगतो. एक उदाहरण देते. एक आई प्रेगन्सी टेस्ट करून घेण्यासाठी युरीन बाटलीत घेऊन आली. पन्नाशीच्या वयाची ती बाई. टेस्ट रिझल्ट पॉझिटिव्ह आल्यावर तिला डॉक्टरांनी विचारलं, ‘‘ही युरीन कुणाची आहे?’’ ती म्हणाली, ‘‘अहो डॉक्टर, गंमतच झाली. माझी लेक प्रेमात पडली आहे. हल्ली कसं छान आहे नं? मुलींना प्रेमात पडल्यावर लगेच लग्नाची सक्ती नाही आपण करत. त्यामुळे त्यांना खूप छान एंजॉय करायला मिळते ही रिलेशनशिप. माझी लेक तर दर विकेंडला मस्त भटकत असते त्याच्याबरोबर. परवा पाळी चुकली म्हणाली, तेव्हा मीच सांगितलं, ‘‘युरीन दे. तपासून आणते. मग निस्तरून घेऊ आपण एखाद्या ‘गायनॅक’कडे जाऊन’’ डॉक्टर बिचारे आवाक् झाले.
आणखी एक बदललेलं नवीन वास्तव तुम्हाला सांगते. फक्त मुलींच्या बाबतीतच लैंगिक शोषण होतं आहे या भ्रमात राहू नका. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये, नोकरीच्या ठिकाणी अगदी शाळेत आणि निरनिराळय़ा क्लासेसमध्ये समलिंगी वर्तन असणारे खूप आहेत. ते मुलग्यांचं या बाबतीत शोषण करताहेत. स्वत:चा सेक्श्युअल प्रेफरन्स ही वैयक्तिक बाब आहे. पण नीतिमूल्यं ढासळल्यानं व्यक्तिगत नीतिनियम आणि सामाजिक नीतिनियम यातल्या सीमारेषा पुसल्या गेल्या आहेत. शिक्षकांच्या भूमिकेतून केलं जाणारं हे असं शोषण ही आज नीतीमूल्यं किती ढासळली आहेत, त्याचं एक ठळक निदर्शक आहे.
शिक्षकांनं शिक्षकाची भूमिकाच निभावली पाहिजे. शाळा हे मुलांचं दुसरं घर असतं आणि शिक्षक हे तिथले त्यांना सांभाळणारे. त्यांनी निकोप वाढण्यासाठी सा करणारे पालक असतात, असं शास्त्र म्हणतं. पण प्रत्यक्षात शाळांमधलं ‘पिअर प्रेशर’ हे एक दाहक वास्तव आहे. शाळेत काही धट्टीकट्टी, वयाच्या मानानं थोराड वाटणारी मुलं असतात तशीच काही लहानखुरी मुलंही असतात. ही थोराड, वाह्यत मुलं अशा किरकोळ मुलांना ‘सी सी’ म्हणून चिडवतात. त्यातून मुलगा गोरागोमटा असेल तर त्याला ‘लडकी’ म्हणतात. नाना तऱ्हेनं ही मुलं त्यांना हैराण करतात. या संवेदनक्षम वयात अशा छळाला सामोरं जाताना मुलांचा आत्मविश्वास पार खच्ची होतो. मुळात त्यांची अस्मिता घायाळ होते. काही मुलं भीतीग्रस्त होतात. आईबाबांची मदत घेऊ जातात. बरेचदा त्यांचे आईबाबा या वास्तवाकडे गांभीर्यानं पाहातच नाहीत किंवा स्वत:च्या व्यस्त जीवनशैलीत रमलेले असल्यानं ते चक्क त्याकडे काणाडोळा करतात. मुलं निराशेच्या गर्तेत जातात. काही सुदैवी मुलांचे पालक तुमच्यासारखे सजग असतात. ते मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतात आणि मुलांना स्वत:ला सावरायला मदत करतात. पण बाकी सारी मुलं कुणी या दांडगटाना खूश ठेवण्याच्या प्रयत्नात चोऱ्या करू लागतात. व्यसनाधीन होतात. काही अधिक दुर्दैवी मुलं तर आत्महत्येचा पर्याय निवडतात.
या बाबतीत पालकांच्या हातात फारसं काही राहात नाही. पण शाळांना मात्र खूप काही करता येण्यासारखं आहे. पण शाळा आणि शिक्षक कातडीबचाऊ धोरण बाळगताना दिसतात. इतर अनेक बाबतीत पालकांना वेठीला धरणाऱ्या शाळा आणि शिक्षक अशा अत्यंत महत्त्वाच्या बाबींबाबत बेफिकीर वागताना दिसतात. अनेकदा शिक्षकही या अगतिक मुलांवर आलेली बला नीट समजून न घेता त्यांची ‘कॉवर्ड’ म्हणत त्यांची निर्भर्त्सना करतात. अशा मुर्दाड विद्यार्थ्यांना धारेवर धरणं शाळांना अशक्य आहे की त्यांना ती त्यांची जबाबदारीच वाटत नाही हेच मला समजत नाही. शालेय वयातील मुलं आणि त्यांचे पालक यांना याबाबतीत शिस्त लावणं ही शाळांची जबाबदारी आहे. पण शाळांचं उद्दिष्ट आजकाल इतकं व्यापारीवृत्तीचं आणि गल्लाभरू झालंय, की त्यांच्याकडून अशा अपेक्षा करायला माझं मनच राजी नाही.
हे ऐकून एक बाबा म्हणाले, ‘‘हे सारं खरंच भयानक आहे. पण तरीदेखील आपल्या हातात काहीच नाही असं कसं असेल?’’ मी म्हटलं, ‘‘वा! छान! कुठल्याही परिस्थितीत प्रत्येकाला एक तरी विधायक पर्याय सापडतोच. तो शोधूया आता. इतके सारेजण असताना आपण मुकाटय़ानं मूग गिळून स्वस्थ का बसायचं?’’
यावर बराच ऊहापोह झाला. सरतेशेवटी एक छान कल्पना पुढे आली. ती अशी..
शाळेतील मुलांच्या पालकांनी सर्वानी मिळून एक प्रभावगट निर्माण करायचा. असा एक गट आहे, तो गट मुलांचा हितचिंतक आहे, शाळेचाही तो गट एक सहकारी मित्र आहे, ही गोष्ट शाळे शाळेतील प्रत्येक मुलामुलीला ठाऊक असलेच पाहिजे. स्वत:वर किंवा वर्गमित्रावर/मैत्रिणीवर वरीलपैकी काही अन्याय झाला आहे किंवा होतो आहे असं वाटल्यास कुणीही विद्यार्थी प्रत्यक्ष किंवा इंटरनेटमार्फत या गटाची मदत मिळवू शकेल. मग या गटाचे प्रतिनिधी शाळेशी संपर्क साधून आधी वस्तुस्थितीची खातरजमा करून घेतील. या गटात सामाजिक कामात रस घेणारे, स्वत:चा प्रत्यक्ष वेळ त्यासाठी देऊ इच्छिणारे मानसोपचारतज्ज्ञही असतील. एकदा खातरजमा करून घेतल्यावर त्या गैरवर्तन करणाऱ्या मुलांच्या पालकांना शाळेमार्फत ते स्पष्ट समज देतील व तो प्रकार थांबेस्तोवर ते पाठपुरावा करतील. आज सर्वत्र बोकाळलेल्या भ्रष्टाचारापायी, गैरशिस्तीपायी प्रत्येक संस्थाही स्वार्थी, आपमतलबी बनली आहे. मुलांच्या हिताचा आणि मुख्यत्वे त्यांच्या सुरक्षिततेचा विचार त्यांना आज करावासाच वाटत नाही, याचं मुख्य कारण असं, की तो विचार न करूनही त्यांचं मजेत चालतंय. त्यांना जाब विचारणारं कोणी नाही. अशा परिस्थितीत हमरीतुमरीवर येण्यात अर्थ नसतो. निरनिराळी संपर्कसाधनं वापरून पालकांना याबाबत जागृत करणं, आज सोपं आहे. एकदा असा गट प्रभावी बनला, एखाद दोन शाळात मुलांना अशा वर्तनाबाबत योग्य ती समज दिली गेल्यानं गैरप्रकारांना आळा बसला, की एक महत्त्वाची गोष्ट घडेल. आपले पालक सारे मिळून दहशतवादाला सामोरे जायला समर्थ आहेत, ही जाणीव मुलांना खूप उभारी देईल. ती निर्भय मनानं शाळा-कॉलेजात शिकू लागतील.
मात्र एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया. या दबाव गटानं गांधीजींच्या समन्वयाच्या मार्गाची कास सोडता कामा नये. हा प्रश्न केवळ अहिंसेच्या मार्गानंच सुटेल. मला वाटतं मुळात ‘पिअर प्रेशरचा’ प्रॉब्लेम असुरक्षित, हिंसक वातावरणातून उद्भवलाय तेव्हा नवतरुणांना त्यांची शक्ती विधायक मार्गानं वापरायला शिकवणं हे आज घडीचं अत्यंत महत्त्वाचं मिशन म्हणूनच आपण हाती घेतलं पाहिजे. आपापलं मूल मोठं होत जाईल, तसतशी त्याला घरातली काही जबाबदारीही सांभाळायला आपण दिली पाहिजे. त्यांची शक्ती विधायक मार्गानं प्रकट व्हायला खूप सोप्या गोष्टी करता येतील. पालकांचा एक असा गट लवकर कार्यरत होवो अशाच तयारीला तुम्ही आज लागा. अगदी लगेचच.