पीअर प्रेशरचा आपल्या मुलांवर दुष्परिणाम होतो आहे, या भावनेने पालक त्रस्त असतात. पण मुलं मात्र पीअर प्रेशरकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून बघत असतात.

पालकांशी ‘पीअर प्रेशर’ (सहाध्यायींनी पाडलेला मानसिक दबाव) या विषयावर मनमोकळी चर्चा केल्यावर मी मुलांशी बोलायचं ठरवलं. पीअर प्रेशरचं मनाला विषण्ण करणारं रूप आमच्या चर्चेतून जे समोर आलं होतं, त्या वास्तवाला आपली ही अजाणत्या किशोरवयातली मुलं दररोज कशी सामोरी जात असतील, या विचारानं मन अगदी व्याकूळलं होतं. त्यांची खूप काळजी तर वाटत होतीच, पण आपल्याप्रमाणे त्यांनाही हतबल झाल्यासारखं वाटत असतं की काय, या प्रश्नानं मनात भीतीही दाटून आली होती.
मी मुलांना म्हटले, ‘‘गेले काही दिवस आम्ही सारे तुमच्या शाळा-कॉलेजातल्या ‘पीअर प्रेशर’बद्दल बोलत होतो. त्यातून ते दाहक, अगदी मन व्याकूळ करणारं वास्तव समोर आलं, ते माझ्यासारख्या म्हाताऱ्या आजीला अगदी काळजीत टाकणारं आहे.’’
त्यावर एक कॉलेजवयीन मुलगा म्हणाला, ‘‘आजी तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. हरघडी आमच्या कॉलेजातल्या मित्र-मैत्रिणींचं इतकं बेपर्वा आणि घातक वर्तन पाहताना आम्ही पण अनेकदा अगदी घाबरून जातो. नवीन प्रवेश घेतलेल्या मुला-मुलींचं सुरुवातीला जे रॅगिंग केलं जातं, ते तर अशोभनीय आणि अनेकदा खूप घातक, त्या त्या मुलाला किंवा मुलीला अगदी उद्ध्वस्त करेल इतपत क्रूर असतं. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा छळ नव्याचे नऊ दिवस म्हणण्याइतपत तात्पुरता नसतो.’’
मी घाबरून विचारलं, ‘‘मग?’’
तो म्हणाला, ‘‘ही व्रात्य मुलं गावाकडून आलेली किंवा भेदरलेली, आपल्या मुंबईचा डामडौल पाहून बावरलेली मुलं बरोबर हेरतात आणि त्यांना वर्षभर अगदी जीव नकोसा होईल इतपत छळतात.’’
मी विचारलं, ‘‘मग तरीही तुम्ही सगळे किती मजेत असता कॉलेजात! अगदी सुटीच्या दिवसातही कॉलेजात ‘टाइम पास’ करायला आवडतं नं तुम्हाला?’’
त्यावर एक कॉलेजवयीन मुलगी म्हणाली, ‘‘मग काय? कॉलेज म्हणजे आम्हाला अगदी ‘स्व’तंत्र भारत वाटतो. खूप मजा असते गं तिथे.’’
तिचं हे बोलणं ऐकून शिबिरातल्या शाळकरी वयाच्या मुलांचे भीतीनं कावरेबावरे झालेले चेहरे थोडे उजळलेले मला दिसले. म्हणून मीही तिला उत्सुकतेनं विचारलं, ‘‘इतक्या भीतिदायक वातावरणात ‘फ्रीडम’ अनुभवणं कसं काय जमतं गं तुम्हाला?’’
ते ऐकून एक मुलगा ‘थ्री इडियट्स’मधल्या आमिर खानसारखी अ‍ॅक्टिंग करत म्हणाला, ‘‘आजी, आल् इज वेल गं! अगं, हे रॅगिंग वगैरे असतंच. शिवाय मित्रांच्या नादानं काहीजण सिगरेट ओढायला लागतात. बीयर पिण्यात प्रौढी मिरवतात. बाईकवर स्टंटस् करायच्या भरीला दोस्तांना पाडतात, हे सगळं जसं आमची एक रिअ‍ॅलिटी असते नं, तशीच, किंबहुना त्याहून खूप छान अशी या ‘रिअ‍ॅलिटीं’ची दुसरी बाजू असते. काही थोडी मुलं इतरांचा छळ करतात, दोस्तांना चुकीच्या वाटेनं घेऊन जातात, हे खरं. पण इतर बहुसंख्य मुलं-मुली कॉलेजातलं वातावरण मनमुराद एन्जॉय करतात. पेपरवाले, टीव्हीवाले सारे मिळून जर आमच्यासारख्या मुलांना भेटत गेले, तर त्यांना पीअर प्रेशरची एक मस्त, धम्माल बाजू दिसेल आणि मग ती त्यांना इतकी आवडेल की ते तीही बाजू मांडू लागतील. मग इतर आईबाबांनाही रिअ‍ॅलिटी रिअली समजेल.’’
मी आनंदले आणि म्हणाले, ‘‘वा! ऐकू दे तरी मला तुमच्या तोंडून ती रिअ‍ॅलिटी.’’
तो मुलगा सांगू लागला, ‘‘आजी, आमचा टेक्नोव्हॅन्झा किंवा इतर कॉलेजातले टेक्नोफेस्ट किंवा खरं तर प्रत्येक कॉलेजातला फेस्टिव्हल बघशील नं तर तुला आम्ही म्हणतोय ते पीअर प्रेशरचं ‘फेस्टिव्ह’ रूप दिसेल. तुला ते पाहून खूप बरं वाटेल.’’
मी म्हटलं, ‘‘खरंय तू म्हणतोस ते. तुझ्या कॉलेजातला टेक्नोव्हॅन्झा पाहायला मी आले होते, तेव्हा मी पाहिलंच की मुलं-मुली मिळून तुम्ही मोजक्या सामग्रीतून काय काय साकारता ते आणि तुझा बाबा सांगत होता, की तो जेव्हा त्या कॉलेजात होता, तेव्हा मुली कमी असायच्या आणि त्या दिवेलागणीला घरी जायच्या. आता मुली तुमच्या बरोबरीनं रात्र, रात्र जागतात. काम करतात. अगदी कष्ट करतात. तुमच्या बरोबरीनं.’’
‘‘बरोबर सांगतेस तू. अगं आता आमच्या कॉलेजातही व्रात्य मुलं आहेतच. पण बहुसंख्य मुलं चांगली आहेत. त्यांचा प्रभाव पडतो. अशी मुलं मुलींशी एक सहकारी म्हणूनच वागतात. त्यामुळे त्यांच्या मैत्रीत परस्पर आदर मुख्य असतो. त्यामुळे व्रात्य मुलांची मुलींची छेड काढायची हिंमतच होत नाही.’’

पेपरवाले, टीव्हीवाले 
सारे मिळून जर आमच्यासारख्या मुलांना भेटत गेले, तर त्यांना पीअर प्रेशरची एक मस्त, धम्माल बाजू दिसेल आणि मग ती त्यांना इतकी आवडेल की ते तीही बाजू मांडू लागतील. मग इतर आईबाबांनाही रिअ‍ॅलिटी रिअली समजेल.

आता दुसरा इंजिनीअरिंग कॉलेजातला मुलगा चेवाचेवानं म्हणाला, ‘‘इस रिअ‍ॅलिटी का और भी कुछ पहेलू है! अगं आजी काही मुली जरा जास्तच मोकळ्या असतात. या फेस्टिव्हलच्या निमित्तानं त्यांना घरून रात्री उशिरापर्यंत थांबायची मुभा मिळते. मग या मुलीच मुलांच्या जरा जास्त जवळ यायचा प्रयत्न करतात. त्यांना त्यात मजा वाटते. मग व्रात्य मुलांना आयतीच संधी मिळते. त्यांची गरज आपोआप भागते. बेक्कार असतात असल्या या मुली. माझं तर डोकंच सणकतं त्यांचे चाळे पाहून.’’
मी म्हटलं, ‘‘अरे, या मुलींच्या जरा जास्त मोकळ्या वागण्यालाही कारणं असतात.’’ त्यावर उसळून त्याचा दोस्त म्हणाला, ‘‘आजी, या मुली कसले कपडे घालतात! त्यांचे कपडे आणि वागणं, बोलणं चालणं इतकं फिल्मी आणि उत्तेजक असतं की, ते जणू त्यांची छेड काढण्याचं, त्याचा फायदा उठवण्याचं जाहीर निमंत्रणच असतं. फॅशन म्हणून मस्त कपडे घातलेल्या मैत्रिणी आम्हालाही आवडतात. ‘अगं, काय चिक् दिसतेस’ असं आम्ही सरळ, सरळ म्हणतोही आमच्या मैत्रिणींना. त्याही मस्त ‘थँक यू’ म्हणत आमचे कॉम्प्लिमेंटस स्वीकारतात. पण काही मुली आपण छान दिसावं म्हणून कपडे घालण्यापेक्षा त्यातून देहप्रदर्शन घडावं, मुलांच्या डोळय़ात ते भरावं, म्हणूनच तसले कपडे घालतात. त्यामुळेच की काय त्याही छान दिसत नाहीत आणि त्यांचे कपडेही छान दिसत नाहीत.’’
मी म्हटलं, ‘‘रिअ‍ॅलिटीचे पैलू छानच दाखवलेस की तू! मोर पिसारा फुलवतो ते पावसाला पाहून नाही. लांडोरीला आकर्षित करावं म्हणून तो पिसारा फुलवतो, नाचतो. तिचं लक्ष आपल्याकडे वेधावं म्हणून मोर हे करत असतो. वंशवृद्धीसाठी केलेलं हे निसर्गाचं देखणं नियोजन असतं. तुम्हा मुलांना मुलींबद्दल आणि मुलींना मुलांबद्दल आकर्षण जाणवायला लागतं. ते व्यक्त करायची अनिवार ओढही या वयात प्रकर्षांनं वाटू लागते. पण मी म्हणते, तसं स्वत:च्या या नवनवीन संवेदनांना आणि त्यातून जाग्या होणाऱ्या भावनांना नीट नियंत्रित करून आपली छाप पाडायला तुम्ही शिकलं पाहिजे. भावनांना नाकारायला जायचं नाही, तर त्यांना शिस्तशीर व्यक्त होण्याची संधी आपण द्यायची. हळूहळू अंगी संयम वाढत जातो आणि आपलं व्यक्तिमत्त्व सुसंस्कृत बनत जातं. मग त्याची छाप इतरांवर आपोआप पडते.’’
यावर एक मुलगी म्हणाली, ‘‘मुलांच्या अशा वागण्यानं मग निरपराध मुलींची होणारी विटंबनाही टळेल.’’
क्षणभर सारेच गप्प बसले. मग एक मुलगी सांगू लागली ‘‘अगं आजी, गुंडांचा प्रभाव असतो नं, त्याहून दोस्तीचा प्रभाव मोठा असतो.’’ त्यावर एक मुलगा म्हणाला, ‘‘गुंडांचीही दोस्तीच असते आपसात. टोळक्या टोळक्यानंच वावरत असतात ते. त्यामुळे थोडा दहशतवादही असतो.’’ ते ऐकून एक मुलगी म्हणाली, ‘‘चांगल्या मुला-मुलींचा ग्रुप या दहशतवाद्यांवर मस्तपैकी मनोवैज्ञानिक दबाव आणू शकतो, हे मी नुकतंच अनुभवलं. मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. पहिल्या दिवशी पालं, तर तिथं एक टारगट मुलांचा गट होता. प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या भाषणाच्या वेळी त्यांची अश्लील टिकाटिप्पणी जोरजोरात सुरू होती. त्यांच्या गटातल्या मुलीला पहिलं बक्षीस मिळावं, म्हणून त्यांनी हा उद्योग मांडला होता. मी हे कट्टय़ावर माझ्या दोस्तांना सांगताच ते म्हणाले, ‘‘चिंता मत करो. आपून गांधीगिरी करेंगे.’’ दुसऱ्या दिवशी माझं भाषण पहिलंच होतं. माझे मित्र-मैत्रिणी झाडून सगळे आले आणि कुठलाही अपशब्द किंवा हुल्लडबाजी न करता त्यांनी माझं नाव पुकारलं जाताच फक्त टाळय़ा वाजवून मला असं चिअर-अप् केलं, की मी तर भीती वगैरे विसरूनच गेले, पण ते टोळकंही एकदम चूप झालं. मुकाटय़ानं ऐकू लागलं.’’
मित्र-मैत्रिणींच्या प्रभावानं जसं चांगल्या गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटतात नं तसंच कधी कधी आपण भीतीपोटी किंवा इन्फीरिअ‍ॅरिटी कॉम्प्लेक्स्मुळे मागे मागे राहतोय असं वाटलं नं तर तेव्हाही दोस्त मंडळी खरोखर पीअर प्रेशर आणून आपल्याला ती गोष्ट करायला लावतात.’’
‘‘ते कसं काय रे?’’ मी उत्सुकतेनं विचारलं.
तो म्हणाला, ‘‘अगं, मला नं ट्रेकला जायला आवडायचं नाही. रविवारी सकाळी चांगलं ऐष करत आरामसे उठायचं सोडून कुठे ते उन्हातान्हात पायपीट करत बसायचं, असं मला वाटायचं. पण माझा तो आळस बघून माझ्या दोस्तांनी एक नवीन शक्कल वढवली. एका रविवारी पहाटे पहाटेच ते मला उठवायला आले. आईबाबांची झोपमोड व्हायला नको, म्हणून मी भराभरा आवरलं आणि गेलो. मला फार काही मजा आली नाही. म्हणून मी त्यांना म्हणालो, ‘‘पहाटे, पहाटे तुम्ही आलात की आईबाबांची झोपमोड होते. मी नाही येणार.’’ ते सारे गप्प बसले. पुढच्या शनिवारी सगळी गँग रात्री दहा वाजता माझ्या घरी! आल्या आल्या बाबांना माझा दोस्त म्हणाला, ‘‘काका, सॉरी हं. गेल्या रविवारी पहाटे बेल वाजवून त्रास दिला तुम्हाला. पण चूक लक्षात येताच आम्ही ठरवलं, की रात्रीच याला आमच्या घरी येऊ दे. म्हणजे सकाळी वेळेवर निघता येईल आणि मुख्य म्हणजे तुमची झोपमोड होणार नाही. माझ्या घरी आईबाबा लवकरच निजतात, त्यामुळे ते लवकर उठतात.’’ मी मुकाटय़ानं सॅक घेतली आणि गेलो त्यांच्या सोबत. पण बघता बघता मला ते सगळं आवडायला लागलं, या ट्रेकमुळे मी इतरही खूप काही करायला लागलो. मी पक्षी, झाडं, फुलं काहीच बघायचो नाही. आता मला त्यातली गंमत कळली. एखादा पक्षी किंवा बहरलेलं झाड दिसलं, की दोस्त परीक्षा घ्यायचे माझी. मी गडबडलो की म्हणायचे, ‘‘जाने दो! नया, नया है बच्चा!’’ त्या टीकेमुळे मी अवतीभवती पाला लागलो. आता तर इतका रमलोय त्यात की, मी चक्क फोटोग्राफी करायला लागलो.
‘‘आजी, माझं पण तसंच झालं. मला कविता मुळीच आवडत नसे. पण आमच्या ग्रुपमध्ये सगळय़ांनी मला माझ्या नावडीसकट स्वीकारलं. मला कविता म्हणजे त्यातले शब्द कळायचे, पण त्यात काही खास मजा येईलसं मला आढळत नसे. पण या ग्रुपमध्ये कविता इतक्यांदा म्हटल्या जातात आणि त्यावर चर्चा होत राहते, की कविता म्हणजे लिहिलेल्या शब्दातून न लिहिलेलं वाचणं, समजून घेणं हे मला हळूहळू समजत गेलं आणि मजा यायला लागली. आता मला कविता खूप आवडायला लागली.’’ एका मुलीनं सांगितलं.
मग एक हॉस्टेलमध्ये राहाणारा मुलगा म्हणाला, ‘‘आजी हॉस्टेलवर रहायला लागल्यावर या पीअर प्रेशरच्या भीतीमुळे आपण सर्वात सामावून गेलंच पाहिजे, नाहीतर एकटे पडू म्हणून मी आवर्जून सर्वाशी समरस व्हायचा प्रयत्न सातत्यानं केला, त्याचा फायदा मला परीक्षेच्या वेळेस खूपच झाला. एकटं, एका खोलीत बसून अभ्यास करायची घरी मला सवयच नव्हती. अवतीभवती आई, ताई, आजी असायचीच. त्यामुळे पहिल्या तिमाहीत माझा परफॉर्मन्स अगदीच खराब झाला. खूप होमसिक वाटायला लागलं. हळूहळू वाटू लागलं की, आईबाबा इतका खर्च करताहेत. मग आपण मार्क्‍स मिळवायलाच हवेत. या विचाराच्या दडपणाखाली मी अगदी दबून गेलो. मला कशातच रस वाटेना. माझ्या मित्रांच्या हे लक्षात येताच त्यांनी खूप काही केलं माझ्यासाठी. रोज कुणी ना कुणी आवर्जून येऊन मला सोबत करत माझ्या खोलीत अभ्यास करत बसायचा. वर्गात पहिल्या येणाऱ्या मुलानं तर कमालच केली. तो म्हणाला, ‘‘मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतो. दिवसा फारसं काही उजळणी वगैरे न करता मी नवीन चॅप्टर्सच्या नोटस् बनवतो. तू फक्त दिवसाच अभ्यास करू शकतोस. तुला जागरण झेपत नाही नं? काही चिंता नको. तू नोटस् काढायच्या भरीसच पडू नकोस. माझ्या नोट्स तू दिवसा वाचायला लाग.’’ एवढं सांगून तो थांबला नाही, तर तो अगत्यपूर्वक नोट्स माझ्या रूममध्ये आणून देत असे. पुढच्या तिमाहीत मी भरघोस मार्क्‍स मिळवले. आता मी एकटाही अभ्यास करू शकतो आणि रात्री जागूनही त्यांच्याबरोबर अभ्यास करतो. दिवसभरात माझा बराच अभ्यास आटोपल्यामुळे रात्री खूप कमी वाचावं लागतं. म्हणून त्यांना कॉफी बनवून द्यायचं काम मी करतो आणि मगच झोपायला जातो.’’