परफ्युम तसंच बॉडी स्प्लॅश या अ‍ॅक्सेसरी आहेत का याबद्दल मतभेद असू शकतात, पण ते वापरण्याबद्दल मात्र कुणाचं दुमत असू शकत नाही. मात्र कुठला परफ्युम, कधी आणि कसा वापरायचा हे मात्र आपल्याला माहीत असलं पाहिजे.

आज ज्या अ‍ॅक्सेसरीबद्दल आपण बोलणार आहोत, ती खरे पाहता अ‍ॅक्सेसरी आहे का? याबद्दलच अनेक शंका उपस्थित होऊ शकतात. त्यात ही अ‍ॅक्सेसरी आपलं काम न बोलता, न दिसता करत असते. त्यामुळे आपली अदृश्य साथीदार म्हटले तरी चालू शकेल. अर्थात मी परफ्युमबद्दल बोलतेय, हे इतक्यात तुम्हाला लक्षात आलेलं असेल. रोज कॉलेज किंवा ऑफिसला जाताना ‘आपल्याला काय गरज परफ्युमची?’ असा विचार आता तुमच्या मनात येऊ शकतो आणि तो साहजिक आहे. अर्थात ‘परफ्युमची गरज आपल्यापेक्षा आपल्या शेजारी उभ्या असलेल्या माणसाला जास्त आहे’ हा विचार मुंबईत ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आयुष्यात एकदा तरी येतो. गर्दीत इतरांच्या घामाचा वास सहन करण्यापलीकडचा असतो. पण त्याचवेळी तुमच्या शेजारचा तुमच्याविषयीसुद्धा हाच विचार करत असेल, हे मात्र आपण सहजपणे दुर्लक्षित करतो. विनोदाचा भाग सोडला, तर आजच्या काळात ‘परफ्युम लावणे’ केवळ चैन राहिली नसून गरज बनली आहे. पण परफ्युम लावायचा म्हणजे त्यामध्ये आंघोळ करायची असे अजिबात नाही. अति परफ्युम लावल्यामुळे समोरचा घाबरून पळायचा नाही तर.. त्यामुळे परफ्युम लावायचे योग्य फंडे आज आपण पाहुयात.
सर्वात पहिले म्हणजे ‘परफ्युम’ ही काही पाश्चात्त्यांनी चंगळ म्हणून आपल्यावर थोपावलेली गोष्ट अजिबात नाही. आपल्याकडेही फार पूर्वीपासून अत्तर लावायची परंपरा आहे. परफ्युम हे त्याचे अद्ययावत रूप. त्यामुळे हा आपला प्रांत नाही असे काही नाही. वेगवेगळ्या ठिकाणी जाताना, दिवसभराच्या वेळेनुसार कोणत्या स्वरूपाचा परफ्युम वापरावा यातही फरक असतो. त्यामुळे ‘घरात आधीच परफ्युमच्या दोन बाटल्या आहेत, त्या संपवा मग नवीन आणा’, हा नियमही येथे लागू होत नाही.
सुरुवात करूयात परफ्युम आणि बॉडी स्प्लॅश यांच्यातील मूळ फरकापासून. बाजारात आज कोणताही फ्रेग्रंस विकत घ्यायला गेलो, की हे दोन प्रकार प्रामुख्याने समोर येतात. मुळात परफ्युम्स म्हणजे विविध प्रकारची फुले, मसाले, फळे यांची ऑइल्स. पण परफ्युम्सच्या तुलनेत बॉडी स्प्लॅशमध्ये या ऑइल्सचे प्रमाण कमी असते. त्यामुळे रोजच्या वापरासाठी बॉडी स्प्लॅश वापरणे उत्तम. कारण त्याचा दरवळ मंद असतो. रोजच्या वापरात परफ्युमच्या स्ट्राँग फ्रेग्रंस गरजेचा नसतो. त्यावेळी बॉडी स्प्लॅश आपल्या मदतीला येतो. यामध्ये अजून एक प्रकार असतो डिओड्रंटचा. घामाचा दर्प येऊ नये म्हणून याचा वापर केला जातो, पण ते किती काम करते याबद्दल मात्र शंकाच आहे.
मुळात कोणता परफ्युम किंवा बॉडी स्प्लॅश निवडावा याबद्दलसुद्धा कित्येकांच्या मनामध्ये शंका असतात. कारण दुकानात परफ्युम विकत घ्यायला गेल्यास दुकानदार चार वेगवेगळे प्रकार दाखवतो. त्या प्रत्येकाचा सुगंध तपासताना आपण गोंधळून जातो आणि त्या गोंधळात एखादा परफ्युम निवडतो. नंतर घरी गेल्यावर आपल्याला तो सुगंध फारसा आवडला नसल्याचे लक्षात येते. परफ्युममध्ये मुख्य चार प्रकार येतात. फ्लोरल, ओरिएन्टल, वूडी आणि फ्रेश फ्रेग्रंस. यापैकी फ्लोरल परफ्युम्स फुले, ओरिएन्टलमध्ये मसाले, वूडीमध्ये चंदनासारख्या सुकी लाकडे आणि मसाले आणि फ्रेशमध्ये स्रिटस फळांच्या सुगंधाचा प्रामुख्याने वापर केलेला असतो. त्यानुसार परफ्युम निवडताना नक्की कोणत्या प्रकारातला निवडता आहात हे प्रथम पाहून घ्या. रोजच्या वापरासाठी फ्रेश, फ्लोरल प्रकारातील परफ्युम्स सुरुवातीला वापरून पाहा. पार्टीसाठी मात्र स्ट्राँग फ्रेग्रंस असलेली वूडी, ओरिएन्टल प्रकारातील परफ्युम्स वापरावीत.
परफ्युम्सच्या निवडीनंतरसुद्धा ती नक्की कधी आणि कुठे लावायची हे तपासणेसुद्धा महत्त्वाचे असते. कित्येकदा परफ्युम लावल्यावरही पार्टी किंवा ऑफिसला जाईपर्यंत त्याचा सुगंध विरून गेलेला असतो. त्यामुळे परफ्युम योग्य ठिकाणी लावणे खूप महत्त्वाचे असते. त्याचबरोबर आपण लावत असलेले परफ्युम किती वेळ टिकणार आहे याची माहिती असणे सुद्धा गरजेचे आहे. साधारणपणे परफ्युमचा सुगंध ६-७ तास राहतो, तर बॉडी स्प्लॅश ३-४ तासांमध्ये विरून जातो. अर्थात तुमच्या परफ्युममध्ये ऑइलचे प्रमाण जितके जास्त तितका त्याचा सुगंध जास्त काळ टिकतो.
परफ्युम्स लावताना आपल्या शरीराच्या ‘हिट अ‍ॅक्टिव्हेटेड पल्स पॉइंट्स’वर लावावेत. हे पॉइंट्स कानाच्या मागे, हाताच्या तळवा, गुडघ्याचा मागचा भाग, मानेच्या पाठची बाजू, मनगटाचा जोड या ठिकाणी असतात. या भागात तयार होणाऱ्या उष्म्यामुळे परफ्युमचा सुगंध अधिक काळ टिकतो. तसेच आंघोळीनंतर लगेच परफ्युम लावणे उत्तम. त्यामुळे अधिकाधिक परफ्युम शरीरात शोषले जाते आणि त्याचा सुगंध जास्त काळ टिकतो. आंघोळीनंतर मॉइश्चराइझर हातावर घेऊन त्यात परफ्युम स्प्रे करावे आणि मग ते वरील भागांवर लावावे. तसेच केसात परफ्युम लावायचे असल्यास तुमच्या कंगव्यावर परफ्युम स्प्रे करून मग केस विंचरावेत. यामुळे परफ्युमच्या सुगंधाचा अधिकाधिक वापर करून घेता येतो.
आजच्या तारखेला गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडपासून ते थेट ऑफिसमध्ये बॉसला इम्प्रेस करण्यासाठी परफ्युम्स आपल्या मदतीला धावून येतात. त्यामुळे त्यांच्यापासून पळून जाण्यापेक्षा त्यांचा खुबीने वापर केल्यास आपल्याला त्याचा फायदा नक्कीच करता येऊ शकतो. मग वाट कसली पाहताय, तुमचा फ्रेग्रंस शोधायच्या तयारीला आताच लागा.