डॉ. गिरीश वालावलकर – response.lokprabha@expressindia.com

केवळ  हौस किंवा आवड म्हणून पाळलेले पाळीव प्राणी आणि त्या प्राण्यांचं संगोपन करताना, त्यांची काळजी घेताना  आणि त्यांची योग्य ती निगा राखताना ज्या अनेक वस्तू, साधनं आणि सेवांची गरज, आवश्यकता भासते ती सर्व साधनं आणि सेवांच्या उद्योगाला ‘पाळीव प्राण्यांचा उद्योग’ असं म्हटलं जातं. पाळीव प्राण्यांची पैदास करणं, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थाचे उत्पादन करणं, त्यांची निगा राखण्यासाठी साबण, श्ॉम्पू, हेअरब्रश, पावडर यांसारख्या प्रसाधनांची निर्मिती आणि पुरवठा करणं, पाळलेल्या प्राण्यांना प्रशिक्षण देणं, त्यांच्यासाठी विशिष्ट औषध आणि वैद्यकीय सुविधा पुरवणं, ही पाळीव प्राण्यांच्या उद्योगाची प्रमुख अंगं आहेत .

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच

आजही विविध प्रजातींचे कुत्रे आणि मांजरी हे सर्वात जास्त पाळले जाणारे प्राणी आहेत. त्याच बरोबर विविध रंगांचे मासे, पोपट आणि कबुतरांसारखे पक्षी, कासवं  यांची मागणी आता वाढते आहे. पाळीव प्राण्यांशी संबंधित उद्योगाची जागतिक बाजारपेठ सध्या प्रतिवर्षी जवळपास १६ लाख ६५ हजार कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. २०२६ साली ती २४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.  भारतामध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षांत  पाळीव प्राण्यांच्या उद्योगाशी संबंधित वस्तूंची सुमारे ९१ कोटी रुपयांची खरेदी-विक्री  झाली. पुढील काही र्वष ती प्रतिवर्षी ३० टक्के या प्रचंड वेगाने वाढत जाईल असा अंदाज आहे .

पाळीव प्राण्यांच्या उद्योगात येण्यासाठी उद्योजकांकडे  प्राण्यांची प्रचंड आवड, त्यांच्याविषयी स्नेह भावना आणि त्यांची आवश्यक ती काळजी घेण्याची वृत्ती असणं सर्वात महत्त्वाचं आहे. पाळीव प्राण्यांचा पुरवठा आणि त्यांचं योग्य संगोपन करण्यासाठी लागणारी सर्व प्रसाधनं आणि सेवा पुरवणारं ‘पेट केअर शॉप’ सुरू करणं हा या उद्योगात येण्याचा प्रमुख मार्ग आहे. या दुकानात पाळीव प्राण्यांसाठी खाद्यपदार्थापासून औषधांपर्यंत विविध कंपन्यांनी तयार केलेल्या सर्वच उत्पादनांची विक्री करता येते. पाळीव प्राण्यांच्या दुकानात येणारा ग्राहक हा बहुतांशी उच्चभ्रू आणि सुखवस्तू वर्गातला असतो. त्यामुळे दुकानाची सजावट त्याच्या अभिरुचीला सुसंगत अशी आकर्षक आणि आरामदायक असावी लागते. कित्येक वेळा ग्राहक  त्याच्या पाळीव प्राण्यांना घेऊन दुकानात येतो. दुकानात प्राण्यांना खेळण्यासाठी बॉलसारखी छोटी साधनं किंवा त्यांना काहीशा मोकळेपणाने वावरता येईल अशी जागा उपलब्ध असेल तर ग्राहक सुखावतो. दुकानात आलेल्या ग्राहकांशी त्याचा योग्य तो आदर ठेवून संवाद साधावा लागतो. त्याच्याबरोबरच्या पाळीव प्राण्याशी दोन-चार गोड  शब्द बोलल्यास ग्राहकाला आनंद होतो. त्यामुळे उद्योजकाने स्वत:मध्ये या सवयी बाणवून घ्यायलाच हव्यात आणि त्याचबरोबर आपल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा अशा प्रकारे वागण्याच्या सूचना करणं आवश्यक आहे. कर्मचाऱ्याला स्वत:ला प्राण्यांची आवड असेल तर तो अधिक कार्यक्षमतेने आपलं काम करू शकतो. त्यासाठी कर्मचारी निवडताना ‘प्राण्यांची आवड’ हा निकष ठेवावा. ग्राहकाची इच्छा असल्यास त्याला हव्या त्या वस्तू घरपोच करण्याची व्यवस्था करावी लागते. मागणी नोंदवण्यासाठी स्वत:चं मोबाइल अ‍ॅप तयार केलं तर दुकानाला अधिक व्यावसायिक रूप येतं. त्याचबरोबर प्राण्यांसाठी आवश्यक त्या वस्तू योग्य प्रकारे निवडण्यासाठी, ग्राहकाला बऱ्याच वेळा स्वत:ला, तर काही वेळा अगदी प्राण्याला घेऊन दुकानात येणं भाग पडतं. हौसेखातर प्राणी पाळणारा ग्राहक बहुतेक वेळेस स्वत:च्या व्यावसायिक आयुष्यात यशस्वी आणि व्यग्र असतो. त्याला जे हवं आहे ते आपल्या दुकानात नक्की मिळेल, त्याची फेरी वाया जाणार नाही  याची खात्री त्याच्या मनात निर्माण करावी लागते. त्यासाठी दुकानात आवश्यक त्या वस्तूंचा कायमच मुबलक साठा ठेवावा लागतो. त्यासाठी पुरेशा खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. पाळीव प्राण्यांच्या वस्तूंचा ग्राहक हा सामान्यत: उच्चभ्रू वस्तीत राहात असल्याने दुकान तशा विभागात असल्यास त्याला सुरुवातीपासूनच ग्राहक मिळवण्याची संधी जास्त प्रमाणात असते. त्या ठिकाणी दुकान विकत अथवा भाडय़ाने घेण्यासाठी मोठे भांडवल लागू शकते. योग्य रीतीने ग्राहकाची काळजी घेतली तर ग्राहक नेहमीच त्या दुकानातून खरेदी करू लागतो. त्यातूनच त्या दुकानाचा एक ब्रँड तयार होतो. मग त्या विभागाबरोबरच इतर विभागांतून किंवा शहरातून लोक आपल्या दुकानात येऊ लागतात. आपल्या व्यवसाय भरभराटीस येण्याची सुरुवात होते.

पाळीव प्राण्यांच्या उद्योगात आज अनेक नवीन दालनंसुद्धा उघडू लागली आहेत. पाळीव प्राण्यांना, विशेषत: कुत्र्यांना दोन पायावर चालणं किंवा स्टूलवर बसणं यांसारख्या करामती करण्याचं प्रशिक्षण देणं किंवा पाळलेल्या प्राण्यांचे  केस कापून आणि  विंचरून, नख प्रमाणात कापून त्यांना खास श्ॉम्पू आणि साबणाने आंघोळ घालून, पावडर लावून सजवणं यांसारखे व्यवसायसुद्धा मूळ धरू लागले आहेत. घरातील सर्वच माणसं कामानिमित्त बाहेर जाणार असतील तर त्या कालावधीसाठी त्यांनी पाळलेल्या प्राण्यांची काळजी घेणारी ‘पेट डेकेअर सेंटर्स’ म्हणजे एक प्रकारे पाळीव प्राण्यांची पाळणाघरं सुरू झाली आहेत. खास, उत्तम प्रजातींच्या पाळीव प्राण्यांची पैदास करण्याचा उद्योगसुद्धा तेजीत येऊ  लागला आहे. सजावटीचे रंगीबेरंगी मासे, रुबाबदार पोपट, आकर्षक मांजर व बोके आणि उत्तम खास प्रजातींचे कुत्रे यांना चांगली मागणी येऊ लागली आहे. भारतामध्ये लॅब्राडोर, व्होडाफोनच्या जाहिरातीने प्रकाशझोतात आणलेला पग, पामेरियनसारखा दिसणारा, पण जास्त केसाळ इंडियन स्पिटझ, धनगरी कुत्र्याशी साधम्र्य असलेला जर्मन शेफर्ड आणि डॉबरमॅन या प्रजातींना ग्राहकाकडून विशेष मागणी येते आहे. पाळीव प्राण्यांच्या वस्तूंचा ग्राहक हौशी आणि सधन असल्यामुळे त्याला सोयीच्या आणि सुखकारक वाटणाऱ्या वस्तू आणि सेवा थोडय़ा महाग असल्या तरीही त्या खरेदी करण्याची त्याची तयारी असते. त्यामुळे या उद्योगात स्वत:ची आणि स्वत:च्या कंपनीची गुणवत्ता सर्वोत्तम ठेवणं उद्योजकाला शक्य असतं. त्याचबरोबर भारतात अद्याप हा उद्योग तसा बाल्यावस्थेतच असल्याने स्पर्धासुद्धा कमी आहे. त्यामुळे या उद्योजकांना या उद्योगात लक्षणीय यश मिळवण्याच्या संधी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत.

घरात वेगवेगळे प्राणी पूर्वीसुद्धा पाळले  जात, पण आता प्राणी पाळणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे. काही मानसशास्त्रज्ञांच्या मते, एकटे राहणारे पुरुष आणि स्त्रिया किंवा मुलं-नातवंडं परदेशी असणारी वयस्क जोडपी, कदाचित स्वत:चा एकाकीपणा  विसरण्यासाठी प्राणी पाळत असावीत; पण त्याचबरोबर नवरा-बायको आणि मुलाबाळांनी भरलेल्या सुखी कुटुंबांमध्येसुद्धा प्राणी तितक्याच आवडीने पाळले जातात. अलीकडे  प्राणी पाळण्याच्या पद्धतीमध्येसुद्धा फरक पडला आहे. आता पाळलेल्या प्राण्याला कुटुंबातल्या सदस्यांइतकंच महत्त्व दिलं जातं.

सामान्य पाळीव प्राण्यांपेक्षा काही तरी वेगळे प्राणी पाळून त्यांची निगा राखण्याची आवड बऱ्याच लोकांना असते.  डॉ. पूर्णपात्रे यांनी घरात सिंह पाळला होता. सिंह पाळणारे डॉक्टर अशी त्यांची खास ओळख निर्माण झाली होती.  जाहिराततज्ज्ञ भरत दाभोळकर यांनी स्वत:च्या ऑफिसमध्ये पिऱ्हाना जातीचा मासा पाळला होता. दाभोळकरांच्या जाहिरातीइतक्याच त्यांच्या या माशाची चर्चा त्या वेळच्या माध्यमांमध्ये होत असत. अशा प्रकारांमुळे प्राणिप्रेमाला वलय मिळतं. प्राणी पाळणाऱ्यांची संख्या वाढत जाते आणि पाळीव प्राणी उद्योगाला त्याचा फायदा होतो.

काही दिवसांपूर्वी एका नव्या कंपनीच्या उद्घाटन समारंभाचं आमंत्रण आलं. कंपनीचा व्यवसाय एका नव्या संकल्पनेवर आधारित होता. उद्घाटन समारंभात कंपनीच्या प्रमुखांनी आपली संकल्पना जाहीर केली. कंपनीने अनेक उत्तम प्रजातींचे देखणे, गोंडस कुत्रे  पाळून त्यांना विशिष्ट प्रकारे प्रशिक्षित केलं होतं. कंपनी शहरातल्या नावाजलेल्या, संपन्न रहिवासी वसाहती किंवा मॉल्स अशा ठिकाणी आठ ते दहा तासांसाठी एखादा हॉल भाडय़ाने घेऊन आपल्या कुत्र्यांना ते तेथे ठेवणार  होते व तेथील रहिवाशांसाठी किंवा मॉलमध्ये आलेल्या ग्राहकांसाठी ‘श्वानभेटी’चा कार्यक्रम ठेवणार होते. त्या श्वानभेटीमध्ये त्या वसाहतील्या रहिवाशांना किंवा मॉलमध्ये आलेल्या ग्राहकांना, कंपनीच्या कुत्र्यांचे लाड करायची, त्यांना कुरवाळायची आणि त्या कुत्र्यांचे कौतुक करायची सोय कंपनी देणार होती. त्यासाठी कंपनी प्रत्येक माणसाला ताशी साडेचारशे रुपये शुल्क आकारणार होती! ती संकल्पना अभिनव आणि अनोखी  होती. कुतूहल म्हणून कंपनीने एका रहिवाशी वसाहतीत आयोजित केलेल्या एका श्वानभेटीला मी गेलो. या कल्पनेला मिळणारा प्रतिसाद आश्चर्याने थक्क करणारा होता. दिवसभरातील सगळा वेळ बुक झाला होता. लोक रांग लावून आपला नंबर येण्याची वाट पाहत होते. ज्यांना त्या दिवशी बुकिंग मिळाले नव्हतं ते दुसऱ्या दिवशी पुन्हा अशीच श्वानभेट आयोजित करण्याची विनंती कंपनीच्या अधिकाऱ्यांना करत होते! एक नव्याच प्रकारचा व्यवसाय जन्माला येत होता.

कुणाकडून प्रेम करून घेण्याइतकीच कुणावर तरी मनापासून, उफाळून प्रेम करणं हीसुद्धा आपली तेवढीच महत्त्वाची गरज असावी. आजच्या जगात मनापासून प्रेम करायला योग्य माणूस मिळणं अवघड झालं आहे म्हणूनच कदाचित, पाळीव प्राण्यांचा उद्योग दिवसेंदिवस अधिकाधिक भरभराटीला येऊ लागला आहे!