फिलिप हॉफमन हा हॉलीवूडमधला गुणी अभिनेता. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्याचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला. ‘ए मोस्ट वॉन्टेड मॅन’ हा त्याचा शेवटचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

ड्रग्जच्या कथित ओव्हर डोसमुळे मॅनहॅटन अपार्टमेंटमध्ये फिलिप सेमूर हॉफमन हा हॉलीवूडचा एक गुणी, प्रतिभासंपन्न, वैशिष्टय़पूर्ण, ऑस्कर विजेता अभिनेता मृतावस्थेत आढळला, त्याला आता एक वर्ष होतंय. २५ जुलै २०१४ रोजी प्रदर्शित झालेला ‘ए मोस्ट वॉन्टेड मॅन’ हा त्याचा शेवटचा चित्रपट. वयाच्या अवघ्या ४६व्या वर्षी ड्रग्ज घेण्याच्या व्यसनामुळे दुर्दैवी मृत्यू ओढवून घेतलेल्या या अभिनेत्याची ‘ए मोस्ट वॉन्टेड मॅन’ या एस्पिओनेज थ्रिलर प्रकारात मोडणाऱ्या चित्रपटात महत्त्वाची, मध्यवर्ती भूमिका आहे, आणि चित्रपटाला अभिनयाचं परिमाण देताना हॉफमन ती भूमिका अक्षरश: जगलाय.
जॉन ले कॅरी यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाची पटकथा लिहिलीय अ‍ॅन्ड्रय़ू बोनेली यांनी. ‘ए मोस्ट वॉन्टेड मॅन’ ही समकालीन, बुद्धिप्रामाण्यवादी चक्रावून टाकणारी कथा आहे. प्रेम, वैरभाव आणि राजकारण यामुळे निर्माण होणारा तणाव, शेवटच्या हृदयाचे ठोके बंद पाडणाऱ्या क्लायमॅक्स दृश्यापर्यंत टिकून राहतो.
हॉफमनने साकारलेल्या व्यक्तिरेखेचं नाव आहे गुंथर बाखमान. चित्रपटाची कथा आकार घेते हाम्बुर्गमध्ये. ९/११च्या दहशतवादी हल्ल्याची कट-कारस्थानंदेखील हाम्बुर्गलाच शिजली होती.
हाफ-चेनेन, हाफ-रशियन असा एक रशियात अनन्वित छळ झालेला माणूस (ग्रिगोरी डॉब्रिजिन अभिनीत) बेकायदेशीरपणे स्थलांतर करून हाम्बुर्गमध्ये पोहोचतो. हाम्बुर्गच्या मुस्लीम कम्युनिटीत तो त्याच्या वडिलांनी अवैध मार्गाने मिळवलेल्या संपत्तीवर हक्क सांगायला आलेला असतो. जर्मन आणि यू. एस. सिक्युरिटी एजन्सी या वस्तुस्थितीत जवळून रस घेतात. काळ जसा पुढे सरकतो, तसतशी उत्कंठा वाढतच जाते. मोस्ट वॉन्टेड मॅनची खरी ओळख पटवण्यासाठी स्पर्धा सुरू होते.
कोण आहे तो? शोषित बळी, की विनाश करायला उद्युक्त झालेला अतिरेकी?
गुंथर (हॉफमन) हा एका अतिशय गुप्त, खोलवर रुजलेल्या संस्थेचा भाग आहे. संस्थेचे लोक कोणाला रिपोर्ट करतात ते गुलदस्त्यातच असतं. ते स्वत:च काम करतात आणि सुरक्षेला असणाऱ्या धमक्यांचा प्रतिबंध करतात. कॅरेच्या इतर अतिशय लोकप्रिय नायकांप्रमाणे गुंथर एक सुज्ञ हिशेबी, चलाख माणूस आहे. तो दिसतो त्यापेक्षा अधिक ‘टफ’ आहे. कठीण निर्णय घेण्याची जबाबदारी नेहमी त्याच्यावरच सोपवली जाते.
पटकथेत महत्त्वाचं स्थान असलेली दुसरी दोन महत्त्वाची पात्रं म्हणजे ‘द व्हाऊ’फेम रेचेल अ‍ॅडॅम्स अभिनीत एक मानवी हक्क पुरस्कर्ती आणि स्ट्रीट लॉयर, तसंच विल्यम डॅफोचा, त्या निर्वासिताला घसघशीत रक्कम वारसाहक्कापोटी मिळावी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलेला एक संशयास्पद ‘मनी मॅन’. गुंथर त्याच्यावर कारपॉव्हबद्दल पुरावा मिळवण्यासाठी अंगावर छुपा रेकॉर्डर बाळगण्यासाठी दबाव आणत असतो.
हॉफमनचे डॅकोबरोबरचे सीन्स तणावग्रस्त आहेत. सुंदररीत्या ते चित्रित करण्यात आले आहेत. हे दोन्ही नट काही तरी हातचं राखून नंतर त्यांचा स्फोट घडवण्याबद्दल प्रसिद्ध आहेत- एकमेकांवर दबाव टाकत- प्रभावी पुरुषांच्या व्यक्तिरेखा त्यांनी रंगवल्या आहेत. आधी कोणाचा स्फोट होईल? प्रेक्षकांच्या मनावरही दडपण येतं. थोडासा हिंसाचारही या ठिकाणी दाखवण्यात आलाय. दिग्दर्शक कॉर्बिजिनच्या आधीच्या ‘द अमेरिकन’ चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटदेखील विचारपूर्वक पुढे सरकतो.
बैरूटला एक मोहीम उधळली गेल्याची भरपाई म्हणून- गुंथरला हाम्बुर्गला पाठवण्यात आलं आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला तो इसा या पूर्वी उल्लेख केलेल्या त्या हाफ-चेचेन, हाफ-रशियन, शहरात येणाऱ्या व्यक्तींच्या यादीत नाव न नोंदलेल्या व्यक्तीच्या आगमनाची माहिती काढत असतो. इतरांना ती व्यक्ती काही तरी कट-कारस्थान करतेय असं वाटत असलं तरी गुंथरला तशी खात्री वाटत नाही. मोठा मासा गळाला अडकवण्यासाठी तो इसाचा उपयोग करणार असतो, आणि तो मोठा मासा आहे एक अनामिक उद्योजक, ज्याच्यावर एका मुस्लीम दानशूर व्यक्तीने दिलेली मदत अतिरेक्यांना शस्त्रं पुरवण्यासाठी वापरत असल्याचा संशय आहे. मुस्लीम दानशूर व्यक्तीच्या भूमिकेत आहे होमायँू एरशादी.
गुंथरच्या व्यक्तिरेखेचं वर्णन सीनिकल आयडियालिस्ट असं समीक्षकांनी केलंय. तो स्वत:च्या उद्धारासाठी या कामात असला तरी त्याचा विश्वास आहे, की त्याच्या कामामुळे जग एक सुरक्षित ठिकाण होणार आहे.
गुंथरच्या भूमिकेत विरोधाभास आणि गुंतागुंत आहे. हॉफमन ज्या प्रकारचे ‘डल’ रोल्स करतो, तशीच ही भूमिका आहे. एखाद्या कलाकाराप्रमाणे तो काही तरी चांगलं निर्माण करण्यासाठी एका वेळेला एक वीट घेतो, ती लावतो, आणि मग ती खाली पडण्याची वाट बघतो.
वॉशिंग्टन पोस्टने गुंथर बाखमानच्या व्यक्तिरेखेचं वर्णन करताना म्हटलंय- या दाढीचे अर्धवट खुंट वाढलेल्या, चेन स्मोकिंग, हार्ड ड्रिंकिंग- जर्मन इंटेलिजन्स ऑथरेटिव्हला- स्पाय मास्टर म्हणताना चुकल्यासारखं वाटतं. पण फिलिप सेमूर हॉफमनने ही ‘अ‍ॅन्टि-हीरो’ व्यक्तिरेखा फार सुंदर साकारलीय. त्याचा हा एक शेवटचा आणि अतिशय प्रभावी परफॉर्मन्स आहे.
द इंक फॅक्टरी, द पॉट बॉयलर प्रॉडक्शन्स, अम्युॅझमेंट पार्क फिल्म्स यांनी कॅरेची कादंबरी २००८ मध्ये प्रकाशित झाल्यावर त्यानंतर ५ वर्षांनी या त्याच शीर्षकाच्या चित्रपटाची निर्मिती केली. सिनेमाचा साऊंड ट्रॅक कॅथलिन ब्रेनॅन आणि टॉम व्ॉट्स यांचा आहे.
कॅरेच्या ज्या दुसऱ्या कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले ते म्हणजे ‘टिंकर टेलर सोल्जर स्पाय’ आणि ‘द कॉन्स्टंट गार्डनर’ या चित्रपटांनाही लोकप्रियता मिळाली. मध्यवर्ती पात्रांची या सिनेमात छुपं सत्य शोधून काढण्यासाठी वैयक्तिक कसोटी लागली होती.
हॉफमन हा हॉलीवूडचा चित्रपट आणि नाटय़ अभिनेता. त्याचा जन्म- रॉचेस्टर, न्यूयॉर्क येथे फेअर पोर्टच्या उपनगरात- २३ जुलै १९६७ रोजी झाला. हायस्कूलच्या नाटकात कामं केल्यावर त्याने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या टिश्क स्कूल ऑफ द आर्ट्समधून बी. एफ. ए. पदवी मिळवली. त्याची सर्वात गाजलेली भूमिका म्हणजे ‘कपोते’ (ूंस्र्३ी)चा टायटल रोल. या भूमिकेसाठी त्याला उत्कृष्ट अभिनेत्यासाठी असलेलं लॉस एंजेलिस फिल्म क्रिटिक्स अवॉर्ड मिळालं. २००६मध्ये त्याला त्याच भूमिकेसाठी बेस्ट अ‍ॅक्टरचं ऑस्कर देण्यात आलं.
हॉफमनचे ट्रेडमार्क्‍स आहेत भावनांचा मोठा आवाका दर्शवणारी पात्रं, आणि त्याची संथ, जवळजवळ निष्प्राण अशी बोलण्याची ढब. २००७च्या ‘देअर विल बी ब्लड’चा अपवाद वगळता त्याने पॉल थॉमस अ‍ॅन्डरसनच्या सगळय़ा चित्रपटांतून भूमिका केल्या.
देखणा म्हणता येणार नाही, पण वैशिष्टय़पूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या, नाटय़-चित्र माध्यमांची उत्तम जाण असलेल्या या प्रतिभासंपन्न, ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचा हा शेवटचा चित्रपट, हा विचार सिनेरसिकांच्या मनाला चटका लावून जातो. ‘हॉफमन म्हणजे चुरगळलेल्या शांततेचं एक बेट’ आहे, असं समीक्षकांनी म्हटलंय. हॉफमनचा गुंथर बाखमान म्हणजे एक कोडं आहे. तो हीरो आहे की राक्षस किंवा एकमेकांना छेद देणाऱ्या शक्यता याबद्दल आश्चर्य करणं हे आपलं काम आहे. हॉफमनने वठवलेला गुंथर बाखमान एका मानवतावादी रस्त्यावरच्या दहशतवादाच्या विरोधातील संघटनेच्या दलाचा नेता. शांत, समतोल, प्रासंगिकपणे विफल होणारा, व्हिडीओ मॉनिटरमधल्या कैद्याकडे खेळकरपणे हात हलवणारा तो म्हणजे एक ‘पोकर-फेस’ कोडं आहे.
नेहमीच नुकताच पाऊस पडून गेलेल्या हाम्बुर्गचं चित्रीकरणदेखील फार सुरेख झालंय. इतर सहकारी अभिनेते, मेहदी डेहबी, नील मलिक, अब्दुल आपापल्या भूमिकांत चपखल बसले आहेत. अशा प्रकारच्या पठडीतील सिनेमांच्या ‘डाय-हार्ड’ फॅन्ससाठी हा सिनेमा काहीसा ताठर आणि हिशेबी असूनदेखील एक पर्वणीच आहे.