छाया : विनय परळकर
वन्यजीव चित्रण करताना एक महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे ज्या जिवांचे चित्रण तुम्ही करणार आहात, त्याची पूर्ण माहिती तुम्हाला असावी लागते.. अन्यथा प्रस्तुतच्या छायाचित्रामध्ये दिसणारी बाब ही कोणत्या तरी झाडाचे वाळलेले पान आहे, असेच वाटेल आणि नजरेची फसगत होईल. पण तुम्ही चांगले अभ्यासक असाल तर तुम्हाला लक्षात येईल की, हे ओक लीफ बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू आहे. त्याचे पंख मिटतात तेव्हा ते वाळलेल्या पानाप्रमाणे दिसतात आणि ते उघडतात तेव्हा आतमध्ये सुंदर रंगछटा पाहायला मिळतात.. फुलपाखरू सतत पंखांची उघडझाप करत असते. त्यामुळे त्याचे फोटो टिपताना नवशिक्यांची गडबड उडते म्हणजे शटर क्लिक् होते तेव्हा नेमके पंख बंद असतात.. म्हणूनच चांगले निरीक्षक व्हावे लागते. मग लक्षात येते की, सकाळच्या पहिल्या उन्हात फुलपाखरांची हालचाल काहीशी मंद असताना चांगले फोटो मिळू शकतात.